प्रश्न आहे मुख्यमंत्रिपदाच्या प्रतिष्ठेचा

उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांना एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बरे बोललेले आवडणार नाही, रुचणार नाही, याची कल्पना आहे
प्रश्न आहे मुख्यमंत्रिपदाच्या प्रतिष्ठेचा

एकनाथ शिंदे हे भले गृहस्थ आहेत. त्यांनी बंड करून शिवसेनेत पाडलेली फूट, भाजपशी संधान साधून केलेला राजकीय खेळ या गोष्टींचे शिवसेनेचे अंतर्गत राजकारण म्हणून स्वतंत्रपणे वेगळे विश्लेषण करता येईल. त्यासंदर्भात दोन्हीकडून वेगवेगळे युक्तिवाद होताहेत. होत राहतील. जे मूळ शिवसेनेतून बाहेर पडले, त्यांना एकीकडे गद्दार म्हटले जात असताना ते स्वतः मात्र क्रांतिकारक असल्याचे सांगत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या या राजकारणात न पडता काही अन्य गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच या लेखाच्या प्रारंभी एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भातील विधान केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांना एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बरे बोललेले आवडणार नाही, रुचणार नाही, याची कल्पना आहे; पण एखाद्या कृतीवरून कुणाही माणसाचे काळ्या किंवा पांढऱ्या रंगात चित्रण करणे त्या माणसावर अन्याय करणारे ठरते, म्हणूनच एकनाथ शिंदे यांचे केवळ त्यांच्या एका राजकीय खेळीमुळे तसे चित्रण करणे योग्य वाटत नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणे, हा एका सामान्य कार्यकर्त्याचा गौरव होता. त्यांचा हा गौरव शिवसेनेच्या माध्यमातून झाला असता तर तो अधिक गौरवास्पद ठरला असता. दुर्दैवाने तो होऊ शकला नाही. शिवसेनेच्या विद्यमान नेतृत्वाला त्यांच्याबाबतीत वाटणारा अविश्वास हे त्याचे कारण असू शकेल. परस्पर अविश्वासाच्या भावनेतूनच पुढचे सगळे महाभारत घडले असावे. बंड करून त्यांनी मुख्यमंत्रिपद मिळवले, याचा अर्थ त्यांचे बंड यशस्वी झाले. तिथपर्यंतच्या त्यांच्या कृतीसंदर्भात शिवसेनेतील उद्धव ठाकरे समर्थकांना आक्षेप असणे, राग असणे स्वाभाविक आहे; परंतु बाकी कुणी त्यासाठी त्यांचा द्वेष करण्याचे कारण नाही. कारण राजकारणात असे खेळ चालत असतात. त्यालाच तर राजकारण म्हणतात.

खरा आक्षेप आहे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर त्यांचे जे वागणे आहे त्यासंदर्भात. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा सूडाग्नी शांत व्हायला हवा होता. दुर्दैवाने तो अधिकच भडकत चालला आहे आणि त्यासाठी ते सत्तेचा वापर करीत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहून त्या पक्षाचे गुण त्यांना लागल्याचेच हे लक्षण आहे. २०१४ साली भारतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्ता मिळवल्यानंतर खरेतर त्यांनी विकासाचे राजकारण करणे अपेक्षित होते. ‘सबका साथ सबका विकास’ म्हणत सत्तेचा आनंद उपभोगत वाटचाल करणे अपेक्षित होते; परंतु सत्ता मिळाल्यानंतर भाजपची हिंस्रता वाढत चालली. भाजपचे पर्यायाने नरेंद्र मोदी यांचे अदृश्य समर्थक ट्रोल्स आक्रमक आणि हिंसक बनू लागले. २०१५ मध्ये एकदा लालकृष्ण अडवाणी यांनी पंतप्रधानपदासंदर्भात काही सूचक विधान केले होते, तर त्यासंदर्भातील बातमीखाली अडवाणींच्या आई-बहिणीचा उद्धार करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया होत्या. जिथे अडवाणींसारख्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची नरेंद्र मोदी यांच्या राजकीय गुरूची ही हालत, तिथे इतर विरोधकांच्या परिस्थितीची कल्पना केलेली बरी. अल्पसंख्याकांवर हल्ले कर, दलितांवर हल्ले कर, असले उद्योग भाजप समर्थकांनी सुरू केले होते. उन्मादी हिंदुत्ववादी शक्तींना रोखण्याचा प्रयत्न सत्तेने केला नाही, उलट त्यांना मोकळे रान दिले. सोशल मीडियावरची त्यांची पगारी फौज त्या कृतीच्या समर्थनार्थ मैदानात उतरत होती. लेखक, कलावंत हे तर त्यांच्यासाठी पाकिस्तानहून कट्टर दुष्मन बनले होते. मोदींच्या विरोधात जो कुणी बोलेल त्याच्यावर झुंडीने हल्ला केला जाई. २०१४ला सत्तेत आल्यानंतर सत्तेचा आनंद घेण्याऐवजी भारतीय जनता पक्ष नुसता द्वेषाने फसफसत राहिला. आठ वर्षे देशाची सत्ता उपभोगल्यानंतरही त्यांना द्वेषाकडून प्रेमाकडे जाता आलेले नाही. मधला बराच काळ एकनाथ शिंदे त्यांच्या सानिध्यात राहिले असल्यामुळे त्यांनाही मुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर द्वेष टाकून देता आला नाही. तेही सूडाग्नीने धगधगत आहेत. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला म्हणजे नव्याने स्थापन झालेल्या ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाला प्रत्येक टप्प्यावर अपशकून करण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांना हरतऱ्हेने उपद्रव देणे सुरू ठेवले.

मुख्यमंत्रिपद मिळवल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांना शिवसेनाप्रमुख बनायचे असल्याचे त्यांच्या वेळोवेळच्या कृतींवरून स्पष्ट झाले. आनंद दिघेंची नक्कल करून त्यांनी ठाणे जिल्ह्यात राजकारण काबीज केले. त्यांच्यासारखे दिसणे, त्यांच्यात आणि आपल्यात काहीच फरक नाही, अशा प्रकारची पोस्टर्स तयार करून घेणे, आनंद दिघे यांना धर्मवीर विशेषण लावले होते, तर यांच्या समर्थकांनी यांना कर्मवीर हे विशेषण लावले. फोटोमध्ये, जाहिरातींमध्ये, चित्रामध्ये या गोष्टी करता येतात; परंतु प्रत्यक्ष मैदानी लढतीत नकली गोष्टी उघड्या पडतात. बीकेसीवर घेतलेल्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे उघडे पडले. नको ते करायच्या फंदात पडले आणि हसे करून घेतले. त्यांच्या या जाहीर नामुष्कीच्या प्रयोगाचे अदृश्य पुरस्कर्त्यांना हेच हवे असावे. यांच्याकडे ओरिजिनल काही नाही. मुख्यमंत्रिपदावरही यांचा रिमोट देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहे आणि जाहीर समारंभात त्यांच्या हाती जे भाषण असते, तेही तिकडूनच आलेले असते. या सगळ्या गोष्टी उघड्या पडल्या आहेत. नाहीतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी टोकाचे मतभेद असले तरी एकनाथ शिंदे यांनी वकिली करावी, एवढी वेळ अजून संघावर आलेली नाही.

एकनाथ शिंदे यांना पूर्वीपासून जे लोक ओळखतात त्यांच्यापैकी अनेकांचे म्हणणे हेच आहे की, एकनाथ शिंदे असे नव्हते. मग ते असे का वागताहेत? मुख्यमंत्रिपदावरून उद्धव ठाकरे यांना खाली खेचले, त्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले, हिशेब बरोबर झाला होता; पण एकनाथ शिंदे मात्र बरेच हिशेब चुकते करीत असल्यासारखे वागताना दिसतात. याचे कारण ते जे काही करताहेत ते स्वतःच्या मनाने काहीच करता येत नाही. शिवसेना संपवणे हा एकनाथ शिंदे यांचा अजेंडा कधीही नव्हता आणि तो असण्याचे कारणही नव्हते; परंतु एकनाथ शिंदे यांचा वापर करून ती संपवण्याचा प्रयत्न भाजपने केला आणि मुख्यमंत्रिपद दिल्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली वाकलेल्या शिंदे यांनी भाजपकडून जो जो इशारा मिळाला त्यानुसार कृती केली. मग ती दसरा मेळाव्याची असो किंवा शिवसेनेवर दावा करण्याची असो.

महाशक्ती तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही काहीही केले तरी चालेल, असा संदेश प्रारंभी एकनाथ शिंदे यांना दिला आहे आणि त्याबरहुकूम हुकमाचे ताबेदार बनून शिंदे यांचा कारभार सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचे अवमूल्यन होत आहे, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती रसातळाला जात आहे, याचे भान एकनाथ शिंदे यांना नाही, अर्थात त्यांना ते असण्याचे कारणही नाही. शिवसेनेवर ताबा मिळवला म्हणून आपण शिवसेनेची राज्यातील जागा व्यापू, असा काहीतरी गैरसमज त्यांचा झालेला दिसतोय किंवा उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हापासून बेदखल केले तर उद्धव ठाकरे यांचे राजकारण संपुष्टात येईल, असाही कुणीतरी त्यांचा समज करून दिलेला दिसतोय. त्याच गैरसमजातून त्यांचे सगळे उद्योग सुरू आहेत. या सगळ्या खेळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचे मात्र धिंडवडे निघताहेत. राजकारण हा अव्याहत चालणारा खेळ आहे, यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या प्रतिष्ठेचे भान राखण्याची आवश्यकता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in