यशाचा ‘कोटा’ अवघड ठरतोय...

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मध्यंतरी कोटा जिल्हा प्रशासनाने कोचिंग संस्थांसाठी एक आदेश जारी केला होता.
यशाचा ‘कोटा’ अवघड ठरतोय...

-अमृता वाडीकर

लक्षवेधी

राजस्थानमधील कोटा शहरात आयआयटी, आयआयएम तसेच वैद्यकीय शाखांच्या पात्रता परीक्षांची तयारी करण्यासाठी देशाच्या विविध भागांमधून बरेच विद्यार्थी येतात. मात्र वाढती स्पर्धा, न पेलणारा अभ्यासक्रम, अपयशाचे भय आणि यातून येणारे नैराश्य या कारणांमुळे विद्यार्थी जीव देण्याचा मार्ग अनुसरतात. शिक्षणापेक्षा यशासाठी झगडणारे विद्यार्थी जणू आत्मविकासाचा कोटा ठरवूनच इथे येतात. त्यातूनच त्यांची फसगत होते.

आयआयटी आणि एनईईटीच्या तयारीसाठी प्रसिद्ध असणारे राजस्थानमधील कोचिंग हब कोटा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच आत्महत्यांच्या वाढत्या प्रकरणांमुळे चांगलेच चर्चेत आहे. २०२३ मध्ये २६ विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या ओझ्याखाली आत्महत्या केल्याची बाब निश्चितच डोळेझाक करण्यासारखी नाही. हा आकडा थोडा अधिक असल्याची शक्यताही व्यक्त केली जाते. कोटा प्रशासन आणि कोचिंग ऑपरेटर विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबवण्याचे अनेक दावे करत असले तरी आत्महत्येच्या आकड्यावर कोणताही परिणाम होताना दिसत नाही. मध्यंतरी कुन्हडी येथील लँडमार्क परिसरात राहणारा आदर्श (वय १८) हा विद्यार्थी खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र हे काही एकमेव उदाहरण नाही. आदर्श ‘नीट’च्या तयारीसाठी चार महिन्यांपूर्वी कोटा येथे आला होता. पण अभ्यासाचा ताण तसेच परीक्षेच्या दडपणामुळे त्याने आत्महत्या केली. अविष्कार संभाजी कासले या १६ वर्षीय विद्यार्थ्यानेही जगण्याच्या स्पर्धेपेक्षा मृत्यूला कवटाळणे पसंत केले. त्याने कोचिंग क्लासच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. महाराष्ट्रातील लातूर येथे राहणारा अविष्कार गेल्या तीन वर्षांपासून कोटा येथील तलवंडी भागात राहून ‘नीट’ची तयारी करत होता.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मध्यंतरी कोटा जिल्हा प्रशासनाने कोचिंग संस्थांसाठी एक आदेश जारी केला होता. रविवारी अभ्यास वा चाचण्या न घेण्याबाबत त्यात सूचित करण्यात आले होते. तसेच कोचिंग संस्थांना विद्यार्थ्यांना रविवारचा दिवस मजेत घालवता यावा यासाठी संपूर्ण व्यवस्था करावी लागेल, असेही या आदेशात म्हटले. मात्र एकाही कोचिंग संस्थेने हा आदेश मान्य केला नसल्याची परिस्थिती आहे. आता खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि कोचिंगच्या पंख्यांमध्ये स्प्रिंग बसवण्यात आल्या आहेत. मात्र यामुळे आत्महत्या थांबतील का, हा खरा प्रश्न आहे. संरक्षणात्मक बाब म्हणून शिक्षण संस्थांमध्ये आत्महत्याविरोधी रॉड बसवण्यास सांगितले गेले होते. पण ही बाबही चर्चेतच राहिली. आत्महत्याविरोधी रॉडची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की तो केवळ पंख्याचे वजन सहन करण्यास सक्षम असेल. पंख्यापेक्षा कोणत्याही जड वस्तूचे वजन रॉडवर पडले तर पंखा खाली येऊन आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे पाय जमिनीला भिडतील. खेरीज वाढत्या आत्महत्येच्या घटना पाहता कोटा पोलिसांनी विद्यार्थी सेलही तयार केला. याअंतर्गत स्टुडंट सेल हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आला. परंतु त्याचे कोणतेही सकारात्मक परिणाम दिसून येत नसल्याने हा काळजीचा तसेच चर्चेचा विषय बनला.

कोटा येथील एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाच्या मते, २०२३ मध्ये तयारीसाठी आलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया खूपच कमकुवत आहे. याचे कारण कोविडच्या काळात या मुलांच्या शिक्षणाचे खूप नुकसान झाले आहे. यामुळे मुले अधिक नैराश्यात असतात. त्याच वेळी, कोचिंग संस्थांची चाचणी पद्धत खूपच कठीण आहे. हे बघता परीक्षेत चांगली कामगिरी करता आली नाही की विद्यार्थी हतबल होतात आणि निराश्यातून नको ते पाऊल उचलतात. आणखी एक मुद्दा असा की, येथे शिकणारे विद्यार्थी खूपच लहान आहेत. त्यांना आपल्याला काही मानसिक समस्या आहे हेच समजत नाही. हे लक्षात घेता येथील कोचिंग इन्स्टिट्यूट आणि वसतिगृह चालकांना आपापसात समन्वय साधून नैराश्याने ग्रासलेले विद्यार्थी ओळखण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पण पैसा कमावणे हे या दोन्ही घटकांचे एकमेव उद्दिष्ट असल्यामुळे या सूचनेकडेही गांभीर्याने बघितलेले दिसत नाही.

वसतिगृहांमध्ये नेमण्यात आलेले वॉर्डन सुशिक्षित, प्रशिक्षित आणि संवेदनशील असतील तर आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करता येतील. मात्र वसतिगृह मालक अवघ्या सात ते आठ हजार रुपयांच्या पगारामध्ये कोणत्याही व्यक्तीला वॉर्डन म्हणून नियुक्त करताना दिसतात. वॉर्डन मुख्यतः विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवतो. कोणता विद्यार्थी नियमित वर्गात जात नाही, कोणता विद्यार्थी मेसमध्ये जेवणासाठी वेळेवर येत नाही, त्याच्या समस्या काय आहेत हे तो बघत नाही. यासाठी योग्य प्रशिक्षण दिल्यास संबंधित व्यक्ती विद्यार्थ्यांची बदलती मानसिकता ओळखू शकते. वॉर्डनची पात्रता किमान पदवीधर असावी, असे पालकांचे म्हणणे आहे. मात्र त्याकडेही सोयिस्कर दुर्लक्ष केले जाते. हा गलथानपणा म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रकार असल्याचे लक्षात घ्यायला हवे.

नववीपर्यंत बराच मोठा मित्रपरिवार असलेले युवक अचानक कोटासारख्या दूरच्या शहरामध्ये येतात, तेव्हा त्यांचा मित्रपरिवार संकुचित होतो. बाहेरच्या राज्यात मैत्रीचे धागे लवकर बळकट होत नाहीत. कुटुंबापासून क्वचितच इतका काळ दूर रहावे लागल्यामुळे मुले ‘होमसीक’ होतात. एकाकीपणाची भावना त्यांना पोखरत राहते. त्यात अभ्यासाचा ताण पुरेशी झोपही होऊ देत नाही. या कारणांमुळे विद्यार्थी सतत तणावाखाली असतात. त्यांची मानसिक अवस्था कधीच कुटुंबापर्यंत जात नाही. ताण वाढत जातो. त्यातून स्थिती अतिशय चिंताजनक बनत जाते. घरी चांगला अभ्यास करणारे युवक एकदा कोटामध्ये आले की अन्य स्पर्धक युवकांना भेटतात. त्यांच्या हुशारीपुढे दबून जातात. त्यांच्याशी आपण स्पर्धा करू की नाही, या चिंतेत या मुलांचा ताण वाढत जातो. या युवकांमध्ये इन्फिऑरिटी कॉम्प्लेक्स वाढत जातो. ती एकलकोंडी होत जातात. शिक्षक, पालकांनी ही स्थिती ओळखून त्यांना तणावातून बाहेर काढायचे तर पालक कामात आणि दुसऱ्या शहरात असतात. वर्षातून एक-दोनदा मुलांची आणि त्यांची भेट होत असते. तेवढ्या काळात मुलांच्या मनात काय चालले आहे, हे पालकांना कळत नाही.

कोटातील अनेक संस्थांमध्ये बाहेरच्या राज्यातील मुले शिकायला येतात. हा प्रकार लक्षात आला तरी त्यांचे नाते फक्त पैशाशी असते. फारसा भावनिक संबंध नसतो. यदाकदाचित पालकांना कळवले किंवा मुलांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला आणि ती क्लास सोडून गेली तर काय करायचे, किंबहुना तसे झाले तर नुकसानच आहे, हे ठाऊक असल्यामुळे ते या फंदात पडत नाहीत. या विद्यार्थ्यांच्या जीवावर लाखो रुपये पगार घेणारे शिक्षक एक-एक विद्यार्थी कमी झाला तर लाखो रुपयांचे नुकसान कसे सहन करतील, हा प्रश्न उरतोच. मुले क्लासला दांड्या मारायला लागली, एकाकी वाटू लागली, शांत बसू लागली किंवा क्लासपेक्षा खेळात जास्त रमू लागली की काहीतरी बिघडले आहे, हे लक्षात येते. मुलांच्या आत्महत्यांचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास कोटाची प्रतिमा मलीन होईल, शिक्षणाच्या हबऐवजी आत्महत्यांचे हब म्हणून कोटाची ओळख निर्माण होईल, अशी भीती क्लासचालक तसेच या विद्यार्थ्यांच्या जीवावर व्यवसाय अवलंबून असणाऱ्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला विश्वासात घेऊन उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे.

कोटा शहरात दरवर्षी सुमारे सव्वा लाख विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. मुलांमध्ये असलेला तणाव, दडपण, त्यांची मानसिक स्थिती आणि आत्महत्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. मानसिकदृष्ट्या खचलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘होप सोसायटी’चा उपक्रम मानसोपचार तज्ज्ञांमार्फत राबवला जातो. यापूर्वी याच उपक्रमाने विश्वास देत अनेक मुलांचे प्राण वाचवले. दरवर्षी सव्वा लाख विद्यार्थी क्लासेसमध्ये प्रवेश घेत असले तरी त्यापैकी फक्त २५ टक्के मुलांनाच व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो, ही वस्तुस्थिती उरते. कोटामधील क्लासची किमान फी एक लाख रुपये असते. क्रॅश कोर्ससाठी किती फी मोजावी लागते याची कल्पना त्यावरून यायला हरकत नसावी. अतिशय सामान्य कुटुंबातील मुले गुणवत्तेच्या बळावर या परीक्षांचे शिखर सर करतात. परंतु, लाखो रुपये मोजूनही काहींना ते जमत नाही. त्यांना ते ओढूनताणून सर करायला लावले तर दडपण येणारच. म्हणूनच कोटाच्या उदाहरणातून पालकांनीही मुलांवर आपल्या अपेक्षांचे ओझे लादले नाही तर बरे होईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in