जनतेचा निकाल एकाधिकारशाहीकडून आघाडीकडे

लोकसभा निवडणुकीचा निकाल अनेक गोष्टी स्पष्ट करणारा आहे. जनतेने आपले शहाणपण या निकालातून दाखवले आहे. सत्तेचा माज दाखवणाऱ्या प्रत्येकाला जनतेने इशारा दिला आहे.
जनतेचा निकाल एकाधिकारशाहीकडून आघाडीकडे

रघुनाथदादा पाटील

मत आमचेही

लोकसभा निवडणुकीचा निकाल अनेक गोष्टी स्पष्ट करणारा आहे. जनतेने आपले शहाणपण या निकालातून दाखवले आहे. सत्तेचा माज दाखवणाऱ्या प्रत्येकाला जनतेने इशारा दिला आहे. मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांना म्हणूनच आता राजीनामा द्यावा लागत आहे. काकांना घरी बसा सांगणाऱ्यांवर आता स्वत:लाच घरी बसावे लागेल, अशी वेळ आली आहे. हिंदू-मुस्लिम करणाऱ्यांना, ‘अबकी बार चारसौ पार’ची गर्जना करणाऱ्यांना आता धर्मनिरपेक्ष पक्षांची साथ घेऊन आघाडी सरकार बनवावे लागणार आहे. जनतेने या देशाला एकाधिकारशाहीकडून आघाडीच्या रस्त्याकडे आणत आपणच या देशाचे रक्षणकर्ते आहोत, हे दाखवून दिले आहे.

या लोकसभेचा निकाल ‘आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि आम्ही या देशाची घटना वाचवायला सक्षम आहोत’, ही ग्वाही देत आहे. हा निकाल म्हणजे इथल्या सर्वसामान्य माणसाचे शहाणपण आहे. मधला मोदी सरकारच्या एककल्ली कारभाराचा कार्यकाळ सोडला तर १९८९ नंतरचा आघाडी सरकार स्थापनेचा कालखंड परत आल्याच्या या खुणा आहेत. एकतर्फी एकाच पक्षाला बहुमत मिळाले की त्याचे होणारे दुष्परिणाम देशाने पाहिले आहेत. आपल्या या विविध भाषा आणि विभिन्न संस्कृतीच्या देशासाठी आघाडी सरकार हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

या निवडणुकीत काँग्रेसने मोठ्या ताकदीने पुनरागमन करत राहुल नावाचा बलाढ्य युवा नेता देशाला दिला. या भूमीचा हा विशेष गुणधर्म आहे की, या भूमीवर जो चालतो, त्याला एक वलय प्राप्त होते. गांधीजी या भूमीवर चालले आणि राष्ट्रपिता झाले. आता राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे त्यांना सर्वसामान्य लोकांशी नाळ जोडता आली. काँग्रेस कमबॅक करू शकते आणि जिंकू शकते याची खात्री केवळ एकट्या राहुल गांधी यांनाच होती. बाकी त्यांचे नेते आणि कार्यकर्ते विश्वास गमावून बसले होते. याबाबत राहुल गांधींनीच स्वतः खुलासा केला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भाजपला हरवता येऊ शकते, हा धडा या देशातील जनतेनेच दिला आहे.

सरकारी यंत्रणांचा हैदोस पाहून लोकशाही आणि न्यायाची अपेक्षा जनतेने सोडून दिली होती. भाजपने केलेले आरोप किती खोटे आणि बनावट होते याची खात्री देशाला पटली. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने आज जाहीर खोटे आरोप करावे आणि सरकारी यंत्रणेच्या बळावर विरोधी पक्षातील मोठमोठ्या नेत्यांना वेठीस धरून दुसऱ्या दिवशी आपल्यासोबत उभे करावे ही बाब त्या पदाचा गरिमा कमी करणारी ठरली. विरोधी पक्ष फोडले, त्यांचा पक्ष हिरावला, पक्षाचे चिन्ह हिसकावून भलत्याच गटाला खरा पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली. ‘नकली’ असे म्हणत मूळ पक्षाच्या लोकांना चक्क पंतप्रधानांनी हिणवले. विरोधी पक्षांच्या चिन्हाशी मिळतेजुळते, दिसायला सारखे चिन्ह देऊन आणि सारख्या नावाच्या व्यक्तींना निवडणुकीत उभे करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा भ्रम निर्माण करणाऱ्या बाबींमुळे सातारा आणि बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पिपाणी चिन्हाला भरपूर मते मिळाली. मतदारांमध्ये चिन्हाचा संभ्रम निर्माण झाला.

विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग आणि न्यायालयांनी मिळून पक्ष आणि चिन्ह याबाबत मूळ पक्ष ज्यांचा आहे त्यांच्यावर अन्याय केल्याची भावना जनमानसात निर्माण झाली. सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनलेल्या संवैधानिक यंत्रणांनी वेळकाढू भूमिका घेत अन्याय केला. या सर्व घडामोडींमुळे इथला सर्वसामान्य माणूस भाजप, मोदी आणि फडणवीस यांच्यावर नाराज झाला. परिणामी राज्यात भाजपची कामगिरी खूपच खराब झाली. भाजपला देशभरच मोठा झटका मिळाला. हिंदी भाषिक राज्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यांत विरोधी इंडिया आघाडीला लोकांची पसंती मिळाली. भाजप आपल्या बळावर सरकार बनवू शकत नाही. कालपर्यंत ‘मोदी सरकार’ असलेले आता स्वतःला ‘रालोआ सरकार’ म्हणून संबोधू लागले. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू आता मध्यवर्ती भूमिकेत आले आहेत.

‘मी पुन्हा येईन’ हे आपले म्हणणे खरे करण्यासाठी फडणवीस यांनी मोदी-शहा यांच्या जोडीने जो गोंधळ घातला त्याचा परिणाम असा झाली की, आज फडणवीस स्वतःच उपमुख्यमंत्रीपद सोडतो म्हणत पराजयाची जबाबदारी घेण्याच्या निमित्ताने आपले राज्यातील स्थान आणि मोदी-शहांच्या नजरेतील आपली किंमत पडताळून पाहत आहेत. फडणवीस-बावनकुळे ही जोडी वाट्टेल तसे कारनामे करत मतदारांच्या विश्वासाला पायदळी तुडवत होती. महाराष्ट्रात या अशा बेबंद वागण्याला वेसण घालण्याचे कसब शरद पवार नावाच्या या योद्ध्यात आहे, याचे भान देखील त्यांना राहिले नाही. पक्ष हिरावला, चिन्ह काढून घेतले, निवडून आलेले बहुतांश आमदार आणि खासदार पळवले, कौटुंबिक हल्ले केले, घरात फूट पाडली. सुप्रिया सुळे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. या वयात पवारसाहेब हताश होतील अशी योजना आखत फडणवीस मोदी-शहांच्या मदतीने पवारांना संपवू इच्छित होते. पण जनतेच्या मनात काय सुरू आहे याची जराही चाहूल या मदांध मंडळींना लागली नाही. यांच्या अहंकाराचे वारे एवढ्या गतीने वाहत होते की, त्यांना इतर कुठलाही सूर ऐकू येणे शक्यच नव्हते. त्याचवेळी पवार साहेब मात्र कंबर कसून राज्यात फिरत होते. उमेदवारांची चाचपणी करण्यापासून तिकीट फायनल करेपर्यंत सर्व घटनांना गती देत होते. कुठल्याही आघाताने खचून जातील ते पवार कसले! उलट अशा संकटात जास्तीच्या जोमाने हा बाबा उभा राहतो. संकटाच्या डोक्यावर उभा राहून आपली उंची वाढवतो. शांत डोक्याने एक एक कडी जोडत आपली साखळी निर्माण करत पुन्हा जनतेत जातो. कुठल्याही घटनेने विचलित न होता कायम सर्वांना सोबत घेण्याची किमया साधणारा हा किमयागार वेळेचे चक्र आपल्या पद्धतीने फिरवतो. पवार साहेबांची वेळ कुण्या घड्याळाची दासी नाही. त्यांच्या श्वासात आजही एवढे बळ आहे की ते एका दमात तुतारी फुंकून विजयाची सलामी देण्याची ताकद ठेवतात.

राजकारणात केवळ निवडून आलेल्या मूठभर लोकांना कंत्राटे देऊन, निधीची लालूच देत आर्थिक मदत करत सोबत घेणे सोपे आहे; पण अशाने राजकारण होत नाही. राजकारणात सामाजिक बांधिलकी, नेत्यांची नवीन फळी उभी करण्याची क्षमता, विरोधकांशी देखील संवाद साधण्याची कला आणि एक नैतिक भूमिका असावी लागते. निवडून आलेले लोक आपापल्या मतदारसंघात काम करायला अधिक निधी मिळावा यासाठी आणि व्यक्तिगत लोभासाठी पक्षांतर करणे किंवा नेता बदलणे अशा हरकती करतात. त्याचा लाभ उठवत इतरांचे राजकारण संपवणे ही फडणवीस यांची वृत्ती सर्वांना परिचयाची झालेली आहे. पण तुम्ही संपवू म्हटल्याने संपतील ते शरद पवार कसले! मोडलेले घरटे पुन्हा बांधायची ताकद असणारा हा माणूस कोणत्या मातीचा बनलेला आहे याची कल्पना एवढी वर्षं सोबत राहून अजित पवारांना देखील आली नाही. याचा अर्थ मडके अजून कच्चे आहे. अजित पवार यांना जेलमध्ये टाकू अशी भीती घालत भाजपने त्यांना सोबत घेऊन क्लीनचिट दिली असली तरी बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना उभे करावे, अशी अटही घातली असावी. लोकसभा निकालानंतर फडणवीस यांनी अजित पवार यांच्या मागे पुन्हा चौकशीचे शुक्लकाष्ठ लावले आहे. जरंडेश्वर कारखान्याच्या व्यवहारात त्यांची चौकशी पुन्हा सुरू करून वेगळीच खेळी केली जात आहे.

एक मात्र निश्चित झाले की, आता आघाडी सरकार चालवताना एवढा हैदोस घालता येणार नाही. पोटापाण्याच्या प्रश्नांना सत्ताधाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्याऐवजी धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण करण्याकडे त्यांचा ओढा होता. या निवडणुकीत आणि मागील दहा वर्षांत देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे. देशातील सामाजिक वीण विस्कटण्याचे प्रयत्न झाले. लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवत आक्रस्ताळेपणा करत हुकूमशाही वृत्तीचे प्रदर्शन केले गेले. जनतेने आता सत्तेच्या चाव्या सोपवताना अटी-शर्ती घातल्या आहेत. खुर्चीवर बसताना आता भान ठेवावे लागेल की आता खुर्चीला दोन पाय आहेत. ज्यात एक पाय नितीशकुमार यांचा आणि दुसरा पाय चंद्राबाबू नायडू यांचा असेल. हे दोघेही तसे धर्मनिरपेक्ष आहेत. आता हिंदू-मुस्लिम करता येणार नाही. आता समन्वय साधत सरकार चालवावे लागेल. ही पायखुटी मोदी आणि शहा यांना किती रुचेल हे दिसेलच. पण पुढचा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नसेल.

एकंदरीत या देशाचे नागरिक हेच घटनेचे रक्षणकर्ते आहेत, हे सिद्ध झाले आहे.

(लेखक शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in