संविधान बदलण्याची अफवा काँग्रेसची घोडचूक

भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी बहुमताने पुन्हा सत्तेत आली तर देशाचे संविधान बदलले जाईल, असा आरोप विरोधी पक्षांकडून या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सातत्याने केला गेला.
संविधान बदलण्याची अफवा काँग्रेसची घोडचूक
Published on

- हेमंत रणपिसे

मत आमचेही

भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी बहुमताने पुन्हा सत्तेत आली तर देशाचे संविधान बदलले जाईल, असा आरोप विरोधी पक्षांकडून या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सातत्याने केला गेला. काँग्रेस नेते राहुल गांधी हा असा आरोप करणाऱ्यांमध्ये आघाडीवर होते. दलितांची मते मिळवण्यासाठी हा अपप्रचार केला जात आहे. पण आंबेडकरी जनता सुबुद्ध आहे. ती या अपप्रचाराला बळी पडणार नाही.

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. संविधानामुळे विविधतेने नटलेल्या भारत देशाची एकता आणि अखंडता मजबूत आहे. संविधानाची निर्मिती करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाला भविष्यात कधीही कोणीही धोका निर्माण करु नये म्हणून संविधानाच्या रक्षणासाठी संविधानातच संविधानिक मुल्यांची चौकट उभी केली. यालाच संविधानाचा ढाचा असे म्हटले जाते. संविधानाच्या ढाच्याला धक्का न लावता त्यात वेळोवेळी काळानुरुप कायदेदुरुस्तीचा अधिकार संविधानाने संसदेला दिला आहे. या तरतुदीमुळे संविधानाला कोणताही धोका नाही. संविधान कधीही कोणीही बदलू शकत नाही. या सत्याची जाण भारतीय राजकारणातील सर्व राजकीय पक्ष आणि राजकीय धुरिणांना आहे. तरीही विरोधी पक्षातील काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष संविधान बदलले जाईल, असा धादांत खोटा प्रचार करुन दलितांची सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. त्यांचा हा प्रयत्न म्हणजे काँग्रेसरुपी मगरीच्या डोळ्यातील अश्रू आहेत. दलित-बहुजनांनी हे ओळखले आहे.

काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांना दलित-बहुजनांच्या राजकीय आणि सामाजिक जागृतीची कल्पना नाही. त्यामुळे त्यांना वाटते की संविधानाला धोका असल्याचा अपप्रचार करुन दलितांची मते आपण मिळवू शकू. त्यांचा हा मनसुबा दलित मतदार धुळीत मिळविल्याशिवाय रहाणार नाहीत. संविधान बदलाची अफवा पसरवून दलितांमध्ये भीती निर्माण करण्याचा काँग्रेसचा डाव यशस्वी होईल, एवढी दलित जनता अजाण राहिलेली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांपेक्षा आंबेडकरी-रिपब्लिकन-बहुजन चळवळीतील कार्यकर्ते आणि चळवळीतील सामान्य माणूससुध्दा वाचनाची प्रचंड आवड असणारा आहे. सर्व समाजात आंबेडकरी समाज राजकीय आणि सामाजिकदृष्टया प्रचंड जागृत आणि अभ्यासू समाज आहे. इतिहास, संस्कृती, राजकारण आणि समाजकारणाची आवड असणारा हा समाज आहे. राजकारणाची नस ओळखणाऱ्या आंबेडकरी समाजाने काँग्रेसचा डाव ओळखला आहे. म्हणूनच घटना बदलण्याच्या अफवेचा फुगा या निवडणुकीत फुटणार आहे.

भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आणि संविधानाबद्दल देशभरातील दलित-आदिवासी-बहुजन आणि आंबेडकरी समाजाला प्रचंड आस्था आहे, श्रध्दा आहे. आंबेडकरी समाजाच्या भावना संविधानकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांशी जोडल्या गेल्या आहेत. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी साकारलेल्या संविधानाला धोका आहे, अशी अफवा पसरवून आंबेडकरी जनेतच्या भावनांना हात घालून दलितांची एकगठ्ठा मते मिळविण्याचा काँग्रेसचा डाव उघड झालेला आहे. मुळात काँग्रेसचे दुखणे हे आहे की त्यांच्यापासून दूर गेलेल्या दलित-बहुजन-आंबेडकरी मतदाराला त्यांना पुन्हा आपल्या सोबत जोडायचे आहे. परंतु दलित-बहुजनांचे प्रमुख रिपब्लिकन नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, बसपाप्रमुख माजी मुख्यमंत्री मायावती आणि वंचित-बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि लोकजनशक्तीचे नेते चिराग पासवान हे सर्व नेते आता काँग्रेससोबत नाहीत. रिपब्लिकन नेते रामदास आठवले हे भाजपसोबत आहेत. काँग्रेस पक्षाची लाईफ लाईन म्हणजे दलित आणि मुस्लिम मतदार. दलित-मुस्लिम मतदानाच्या जीवावर काँग्रेस पक्षाने अनेक वर्षं बहुमत मिळवत देशावर राज्य केले. काँग्रेसच्या सत्ता काळात त्यांना कधीही संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा ‘भारतरत्न’ देऊन सन्मान करावा, असे वाटले नाही. संसदेत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र लावण्याची सद्बुध्दी काँग्रेसला सुचली नाही. देशाच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव काँग्रेसने घडवला. खरे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची निवडणूक काँग्रेसने बिनविरोध होऊ द्यायला पाहिजे होती. जेव्हा-जेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा सन्मान करण्याची वेळ आली तेव्हा-तेव्हा काँग्रेसने पाठ दाखवली आहे. अलीकडे मुंबईत चैत्यभुमीच्या लगतची इंदू मिलची साडेबारा एकर जमीन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी द्यावी, अशी मागणी आंबेडकरी जनतेने काँग्रेस-युपीए सरकारकडे केली होती. तेव्हा काँग्रेसने ती मागणी पूर्ण केली नाही. २०१४ साली सत्तांतर झाल्यानंतर भाजपप्रणित एनडीए सरकार सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदू मिलची जमीन स्मारकासाठी दिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावर आभाळाएवढे उपकार आहेत. याची जाणीव मोदींना असल्यामुळे मोदींनी इंदू मिल स्थळी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचे काम सुरु केले आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा ४५० फूट उंच ‘स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी’ इंदू मिलच्या जागेवर उभा राहत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने लंडनमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे घर घेऊन तिथे संग्रहालयरुपी स्मारक उभे केले आहे. महू येथे उभारलेले भीमजन्मभूमी स्मारक तसेच दिल्लीतील २६ अलीपुर रोड या निर्वाणभुमीवर संविधान ग्रंथाच्या आकाराचे भव्य स्मारक उभारले आहे. तसेच दिल्लीत १५ जनपथ येथे ‘आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर’ हे भव्य स्मारक उभे केले आहे. २६ नोव्हेंबर हा दिन ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. तसेच मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने संसदेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन घेऊन संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव केला आहे.

रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाची किमया आहे. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून आलेल्या भाजप खासदारांसोबत संविधान ग्रंथाला अभिवादन करुन शपथ घेतली. त्यामुळे नरेंद्र मोदी हे खरे संविधान समर्थक नेते आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी हे मोदींवर संविधान बदलणार असल्याचा खोटा खोडसाळ आरोप करीत आहेत. दूर गेलेल्या दलित मतांना मिळविण्यासाठी काँग्रेस दलितांमध्ये संविधानाला धोका असल्याचा अप-प्रचार करीत आहे. संविधानाला धोका नसताना संविधानाला धोका आहे, असा अप-प्रचार करुन काँग्रेस दलितांची नाराजीच ओढवून घेत आहे, आंबेडकरी जनतेच्या भावना दुखवत आहे. त्यामुळे बुडत्याचा पाय अधिक खोलात अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे.

एखाद्या व्यक्तीमध्ये, समाजामध्ये, पक्षाच्या आणि संघटनेच्या विचारसरणीमध्ये कालांतराने परिवर्तन होऊ शकते. वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. भगवान बुध्दांनी परिवर्तन हा निसर्गाचा नियम असल्याचे म्हटले आहे. एखाद्या व्यक्तीत परिवर्तन झाले तर ते आपण स्वीकारले पाहिजे. जे परिवर्तन स्वीकारत नाहीत त्यांना आंबेडकरी विचारवंत कसे म्हणायचे? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कडेवर बसलेले काही विचारवंत काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यालयात बैठका घेऊन मोदींवर संविधान बदलणार असल्याचा खोटा आरोप करीत आहेत. १९८४ मध्ये असलेला भाजप आणि २०२४ सालचा आजचा भाजप यात प्रचंड परिवर्तन झालेले आहे. ‘सबका साथ,सबका विश्वास और सबका विकास’ हा नारा देऊन नरेंद्र मोदी काम करीत आहेत. नरेंद्र मोदी खरे संविधान समर्थक म्हणून काम करीत आहेत. जे साहित्यिक-विचारवंत परिवर्तन स्वीकारत नाहीत, त्या साहित्यिक-विचारवंताना कोणी आंबेडकरवादी मानणार नाही. संविधान बदलाची अफवा पसरवून काँग्रेसने मोठी चूक केली आहे. लोकसभेच्या या निवडणुकीत आंबेडकरी जनता काँग्रेसला पुन्हा पराभवाची धूळ चारेल. संविधान समर्थक नरेंद्र मोदींना त्यांच्या दहा वर्षांतील चांगल्या कामाचे बक्षीस म्हणून जनता पुन्हा मोदींना पंतप्रधानपदाचा बहुमान देणार आहे. घटनेला धोका नाही, लोकशाहीला धोका नाही आणि आरक्षणालाही धोका नाही. त्यामुळे काँग्रेसने कितीही आरोप केले तरी काँग्रेसला सत्तेत परतण्याचा मोका नाही.

(लेखक रिपाइंचे (आठवले गट) प्रसिध्दी प्रमुख आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in