तक्षशिला विद्यापीठाचे वैश्विकत्व

बुद्धाने प्रतित्य समुत्पाद हे तत्त्वज्ञान मांडून वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला. दु:ख आहे, दु:खाचे कारण आहे, कारणाचे निराकरण आहे, निराकरणाचा मार्ग आहे. अनित्यतेचा सिद्धांत मांडून ‘ब्रह्म सत्य, जगत मिथ्या’ ही अद्वैत तत्त्वज्ञानातील संकल्पना खोडून काढली. बदल हा निसर्ग नियम आहे. वर्ण व्यवस्था नित्य नाही, ती बदलू शकतो. हे द्वैत तत्त्व बुद्धाने मांडले.
तक्षशिला विद्यापीठाचे वैश्विकत्व
एक्स @BattaKashmiri
Published on

शिक्षणनामा

रमेश बिजेकर

बुद्धाने प्रतित्य समुत्पाद हे तत्त्वज्ञान मांडून वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला. दु:ख आहे, दु:खाचे कारण आहे, कारणाचे निराकरण आहे, निराकरणाचा मार्ग आहे. अनित्यतेचा सिद्धांत मांडून ‘ब्रह्म सत्य, जगत मिथ्या’ ही अद्वैत तत्त्वज्ञानातील संकल्पना खोडून काढली. बदल हा निसर्ग नियम आहे. वर्ण व्यवस्था नित्य नाही, ती बदलू शकतो. हे द्वैत तत्त्व बुद्धाने मांडले. वैज्ञानिक दृष्टिकोन व अनित्यतेचा सिद्धांत ज्ञानाचा नवा स्फोट होता.या वैश्विक, अपूर्व ज्ञानाचा प्रभाव तक्षशीला विद्यापीठावर होता.

तक्षशिला हे जगातील पहिले विद्यापीठ होते. या विद्यापीठाला जगातील सर्वात पहिले व प्राचीन विद्यापीठ म्हणून वैश्विक मान्यता आहे. जगभरातील विद्यार्थी या विद्यापीठात शिकायला येत होते. जगातील सर्वात प्राचीन व पहिले एवढेच याचे महत्त्व नाही, तर प्रवेशाची व ज्ञानाची वैश्विकता हे मूलभूत वैशिष्ट्य तक्षशिला विद्यापीठाचे होते. बौद्ध ज्ञान परंपरेतून उदयाला आलेले हे विद्यापीठ वैश्विक का होऊ शकले, हे समजून घेण्यासाठी बौद्धकाळातील समाजव्यवस्था, त्यातील तात्त्विक व सांस्कृतिक संघर्ष समजून घेणे गरजेचे आहे. बौद्ध काळातील ब्राह्मणी-अब्राह्मणी तात्त्विक संघर्ष हा मूलभूत संघर्ष होता. या दोन परस्परविरोधी ज्ञान शाखा, परस्परविरोधी व्यवस्थांचे दर्शन मांडत होते. अधिक स्पष्ट सांगायचे झाल्यास पुरुषसत्ताक वर्णजाती समर्थक व विरोधक व्यवस्थांचा मूलभूत संघर्ष होता. या संघर्षाचे काही प्रमुख बिंदू समजून घेतल्यावर तक्षशीला विद्यापीठाचे वैश्विकत्व स्पष्ट होईल.

स्त्रीसत्ताक व मातृसत्ताक व्यवस्थेच्या शवावर चातुर्वर्ण व्यवस्था उदयाला आली. ज्याचे प्रतिबिंब रामायण आणि महाभारतात उमटल्याचे शरद पाटील सांगतात. रामायण, महाभारताचा काळ अनुक्रमे इ.स.पूर्व ११००, १००० मानला जातो. बुद्धपूर्व ६०० ते ५०० वर्षांचा हा काळ होता. स्वाभाविकपणे चातुर्वर्ण व्यवस्था आणि स्त्रीसत्ताक-मातृसत्ताक व्यवस्थेच्या संघर्षाचे प्रतिबिंब समाज रचनेमध्ये बुद्धाने अनुभवले. भौतिक शोषण विहीन व स्वातंत्र्य, समता, लोकशाही मूल्याधिष्ठित स्त्रीसत्ताक व्यवस्था नष्ट होऊन शोषणाधिष्ठित स्वातंत्र्य, समता व लोकशाही नाकारणारी चातुर्वर्ण व्यवस्था अस्तित्वात आली. चातुर्वर्ण व्यवस्था मालकी अमालकीवर उभी होती. मुख्यत: जमिनीची, उत्पादित मालाची मालकी अमालकी व मानवी वंशाची पुरुषसत्ताकता यावर आधारित होती. या व्यवस्थेत नवे उत्पादन संबंध अस्तित्वात आले. हे नवे उत्पादन संबंध स्वामी-दास उत्पादन संबंध होते. दास व शूद्राची निर्मिती उपनयन संस्कार नाकारण्यातून झाली. उपनयन संस्कार हा केवळ आध्यात्मिक वा धार्मिक विधी नव्हता, तर स्वगणाचे नागरिक हक्क मिळण्याचा सामाजिक विधी होता. गणसभेला कायदे करण्याचा, झालेले कायदे नाकारण्याचा व दुरुस्त करण्याचा अधिकार होता. या गणसभेत मतदान करायचा वा निवडून येण्याचा अधिकार उपनयन संस्कारातून प्राप्त होत होता. उपनित हा गणांतर्गंत लोकशाहीचा लाभार्थी होत होता. दास व शूद्रांना उपनयनाचा अधिकार नव्हता. हा उपनयनाचा अधिकार नाकारल्यामुळे सामाजिक निर्णय प्रक्रियेतील अधिकार दास व शूद्रांना नाकारले गेले. ज्ञानाचा (शिक्षणाचा) अधिकारही नाकारला गेला. या अधिकार वंचिततेमुळे समाजाचा मोठा वर्ग दास व शूद्र होण्यापर्यंत निम्न स्तराला गेला. जिवंत राहण्याच्या धडपडीत उर फुटेपर्यंत कष्ट त्यांच्या वाट्याला आले.

सर्व अधिकार संपन्न स्वामी वर्ग व सर्व अधिकार विहीन दास व शूद्र वर्ग अशी टोकाची समाज रचना बुद्धाने अनुभवली. ही व्यवस्था बुद्धाने नाकारली. टोकाची विषम व्यवस्था बदलण्यासाठी वर्ण निर्मितीचा शोध बुद्धाने घेतला. हा शोध घेताना विज्ञान व सामाजिक सिद्धांताचा आधार त्याने घेतला. वैज्ञानिक विचार करताना डार्विन पूर्व उत्क्रांतीचा विचार बुद्धाने मांडला. पृथ्वी पहिल्यांदा रसा (रस किंवा पातळ द्रव्य) होती, मग पापळी आली, पापळीनंतर पदालता (वनस्पती), नंतर साळ खाऊन माणसे जगली. असा पृथ्वी व माणसाचा उत्क्रांतीचा वैज्ञानिक विचार बुद्धाने मांडला. अमिबापासून माणूस होण्यापर्यंतचा नैसर्गिक क्रम व प्रक्रिया बुद्धाच्या उत्क्रांतीच्या विचारात अध्याहृत असल्याची संगती आपण जोडू शकतो. यातून पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर उभी आहे, ईश्वराने सृष्टी निर्माण केली, तोंडातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रीय, मांड्यांतून वैश्य व पायातून शूद्र जन्माला आले. या वर्णनिर्मितीच्या ब्राह्मणी विचाराला बुद्धाच्या उत्क्रांती विचाराने तगडे आव्हान उभे केले. वर्णनिर्मितीच्या सामाजिक प्रक्रियेची चर्चा करताना मोह-लोभ-तृष्णेतून संग्रहाची प्रवृत्ती वाढली. ती खासगी मालमत्तेपर्यंत विस्तारली. मालमत्ता टिकवण्यासाठी नियमावली आली. नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी दंडविधान आले. ही राजकीय व्यवस्था लोकशाही, समता स्वातंत्र्य नाकारणारी होती.

बुद्धाने प्रतित्य समुत्पाद हे तत्त्वज्ञान मांडून वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला. दु:ख आहे, दु:खाचे कारण आहे, कारणाचे निराकरण आहे, निराकरणाचा मार्ग आहे. या कार्यकारणभावातून शोषणाच्या मुक्तीचा मार्ग बुद्धाने दिला. अवैतनिक गुलामगिरीतून दास व शूद्रांची मुक्ती करून वर्ण व्यवस्था नष्ट केली. अनित्यतेचा सिद्धांत मांडून ‘ब्रह्म सत्य, जगत मिथ्या’ ही अद्वैत तत्त्वज्ञानातील संकल्पना खोडून काढली. हे जग अनित्य आहे. नित्य असे काहीच नाही. हे चराचर विश्व दर क्षणाला बदलत आहे. बदल हा निसर्ग नियम आहे. वर्ण व्यवस्था नित्य नाही, ती बदलू शकतो. हे द्वैत तत्त्व बुद्धाने मांडले. वैज्ञानिक दृष्टिकोन व अनित्यतेचा सिद्धांत ज्ञानाचा नवा स्फोट होता. या वैश्विक, अपूर्व ज्ञानाचा प्रभाव तक्षशीला विद्यापीठावर होता.

संकुचित व एकसुरी गुरुकुल शिक्षण पद्धतीला पहिले आव्हान जैन ज्ञान परंपरेने उभे केले. ही परंपरा तक्षशिला विद्यापीठाने विकसित केली. सर्वांना प्रवेश खुला असणे व शिक्षण आशयात वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक अध्ययन-अध्यापन पद्धती तक्षशिला विद्यापीठाचा मूलाधार होती. पाणिनी, कोसलचा राजा प्रेसनजीत, चाणक्य, इत्यादी विद्वान या विद्यापीठातून तयार झालेत. व्यक्ती व समाजाचे आमूलाग्र परिवर्तन करण्याची क्षमता बौद्ध ज्ञान पंरपरेत व तक्षशिला विद्यापीठात होती याची उदाहरणे सापडतात. डाकू अंगुलीमाल बुद्धाच्या उपदेशाने परिवर्तित झाला. पुढे तक्षशिलेत आयुर्वेदाचे शिक्षण घेऊन अगुलिमाल आयुर्वेदात पारंगत झाला. जीवक आयुर्वेदाचा प्राध्यापक झाला. आयुर्वेदाचे शिक्षण प्राचीन काळात महत्त्वाचे मानले जात होते. गुरुकुल, जैन व बौद्ध शिक्षण पद्धतीत आयुर्वेदाचा समावेश केला गेला आहे. ब्राह्मणी व जैन परंपरेने आयुर्वेदाचा शोध लावल्याचा दावा केला आहे. अभ्यासक हा दावा खोडून काढतात व स्त्रीसत्ताक काळातच आयुर्वेदाचा शोध लागल्याचा पुरावा देतात. श्रेयाच्या वादात न पडता वास्तव नजरेपुढे घेतल्यास आयुर्वेद सतत विकसित झाल्याचे निदर्शनास येते. बौद्ध काळात शल्यचिकित्सेपर्यंत आयुर्वेदाचा विकास झाला. तक्षशिलेत शल्यचिकित्सा विषय शिकवल्या जात होता.

रूढी, परंपरेच्या बंधनातून मुक्त होऊन, ज्ञान संपूर्ण, अंतिम या संकल्पनांचा त्याग करावा लागतो. समावेशक व चिकित्सक ज्ञान वारसा स्वीकारावा लागतो. त्यातूनच वैश्विकतेकडे जाता येते. हे तक्षशिला विद्यापीठाने सिद्ध केले. साख्य, (स्त्रीसत्ताक काळातील एकात्म व स्वातंत्र्य, समता, लोकशाही ज्ञान) वैदिक ज्ञान, (ब्राह्मणी वर्णाधिष्ठित ज्ञान) जैन ज्ञान शाखा (अनेकांत सर्वजीववाद) व बौद्ध ज्ञान शाखा या सर्व ज्ञान शाखांचा अभ्यास तक्षशिला विद्यापीठात होत होता. साख्य व जैन तत्त्वज्ञानाचा वारसा विकसित करून, वेदांतिक तत्त्वज्ञानाशी संघर्ष करून बौद्ध तत्त्वज्ञान उदयाला आले व विकसित झाले. यातून अनेक नव्या ज्ञान शाखा उदयाला आल्या व तक्षशिला विद्यापीठाचा भाग बनल्या. हे ज्ञान केंद्र जगभरातील विद्यार्थ्यांचे आकर्षणाचे केंद्र बनले. भारतातील व जगभरातील विद्यार्थी व शिक्षक एकमेकांशी वादविवाद, चर्चा करून ज्ञानार्जन करत. ज्ञानार्जनाचा हा मूलभूत सिद्धांत ज्ञान निर्मितीसाठी महत्त्वाचा ठरला. (क्रमश:)

Ramesh.bijekar@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in