समुद्र

समुद्र बिलोरी आईना, सृष्टीला पाचवा महिना... असं बाकीबाब बोरकर म्हणून गेलेत
समुद्र

समुद्र बिलोरी आईना, सृष्टीला पाचवा महिना... असं बाकीबाब बोरकर म्हणून गेलेत. समुद्र, सागर ही जगातील अशी गोष्ट की जिथं पोचताच मन अगदी वेगळ्या अवस्था अनुभवते. लहानपणी कधीतरी पहिल्यांदा समुद्र पाहिला होता रत्नागिरीला. त्या निळाईने मनात घर केलंय आजपर्यँत. अवघ्या पृथ्वीला कवेत घेणारा हा सागर. कधी आवेगाने बेभान होऊन किनाऱ्याकडे झेपावणाऱ्या लाटा तर कधी मऊशार पुळणीवर येऊन अलगद विसावणाऱ्या सागरलाटा... कधी संतापून किनाऱ्यावरील झाडं, घरं उध्वस्त करणाऱ्या रौद्र लाटा तर कधी चांदण्या रात्री लहानशा होडक्यालादेखील सुखरूप किनाऱ्यावर घेऊन जाणाऱ्या मायाळू लाटा.. ओहोटीच्या वेळी कित्येक मैल दूर दूर गेलेला आणि भरतीच्या वेळी शहरात देखील बिनदिक्कत घुसणारा समुद्र...किती त्याची रूपं. किती वेगळे किनारे.!

एखाद्या सागरकिनारी जायचं ठरलं की तिथं जाईतो जीव अगदी उतावीळ होऊन जातो. किनाऱ्यावर पोचताच अंगावरचे कपडे भिरकावून त्या थंड पाण्यात उतरून जायची अधीरता वेगळीच. समुद्रात पोहता येणें ही वेगळीच गोष्ट. ती सर्वांना जमतेच असं नाही. पण कमरेइतक्या पाण्यात उभं राहणं देखील सुखावून जातं. आसपास लाटा फुटत असतात. कधी मागे ढकलतात कधी आत ओढून नेऊ पाहतात. कधी त्यांचं अंगाभोवती वेढून टाकणं हवंहवंसं वाटतं तर कधी त्यांचं बेभानपणे उसळत राहणं भीती दाखवतं. म्हटलं तर भीती आणि म्हटलं तर ओढ असं काहीसं विचित्र अवस्थेत सापडतं आपलं मन!

मऊमऊ पुळणी असलेल्या किनाऱ्यापेक्षा मला खडकाळ किनारे अधिक आवडतात. तिथं जवळच्या खडकावर बसून राहावं. लाटा आसपास दगडातून फुटत राहतात. अंगावर तुषार उडवत राहतात. ठरविक क्रमाने मग एक मोठी लाट येते,आपल्यावर

उदंड पाणी उधळत आपल्या पलीकडे जाते. मग त्या तशाच लाटेची पुन्हा वाट पाहायची. हा खेळ कितीही वेळ सुरु राहतो. त्या फेनधवल लाटा, त्यांचा तो आवाज, माथ्यावर सीगल पक्ष्यांचे भिरभिरणं हे सगळं जणू मला संमोहित करतं!

कामानिमित्त अनेकदा परदेशी राहावं लागलं. तेही उष्ण प्रदेशातून. प्रत्येक जागा अशी मिळाली गावाला छान समुद्रकिनारा होता. पण दिवसभर थकल्यावर उन्हातून तिथं जाणं देखील नको वाटावं असे उन्हाळ्याचे दिवस असायचे. उन्हाळा सरत आला की मग लोक किनाऱ्यावर यायचे. माझ्या मनात मात्र आपला देश, आपली माणसं आठवायची. आणि मग अपरिहार्यपणे सावरकरांचे शब्द ओठांवर यायचे...*ने मजसी ने.. परत मातृभूमीला..सागरा प्राण तळमळला...* त्यांना जे वाटलं होतं ते खूप भव्य, खूप वेगळं असंच! मात्र आपली, आपल्या आयुष्यतील जिवलगाना भेटायची ओढदेखील तितकीच सच्ची असते हेही खरं.

निळा समुद्र, दूर लांबवर पसरलेली शुभ्र वाळू, एका लयीत येणाऱ्या जाणाऱ्या लाटा, किनाऱ्यावरची माडा पोफळीची बने, त्यापलीकडे असणारे हिरवेगार डोंगर हे दृश्य निवतीच्या किल्ल्यासारख्या एखाद्या उंच ठिकाणावर बसून पाहत राहावं. अशी अनेक फार आवडती ठिकाणं आहेत माझी ! तिथून समुद्र पाहताना जीं काही तंद्री लागते त्याचं वर्णन शब्दांत सांगणं अवघडच. काही काही गोष्टी फक्त अनुभवत राहणं जास्त छान असतं ना?

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in