काँग्रेसला हवाय पराभवाची जबाबदारी घेणारा खांदा

कार्यकर्त्यांचा प्रचंड आग्रह असूनही राहुल गांधी आपल्या निर्धारापासून ढळले नाहीत
काँग्रेसला हवाय पराभवाची जबाबदारी घेणारा खांदा

सत्ता गेल्यावर आर्थिक ताकद कमी होते. पक्षसंघटनेवरील पकड ढिली होते. ज्यांची समोर उभे राहण्याची हिंमत नसते असे बाजारबुणगे समोरासमोर आव्हान देऊ लागतात. अशा प्रकारचे अनेक अनुभव कोणत्याही नेतृत्वाला येऊ लागतात. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याच्या आणि सत्तेपुढे नतमस्तक होण्याच्या आजच्या युगात ते स्वाभाविकही आहे. परंतु सत्ता गेल्यामुळे नेतृत्वाची बुद्धी भ्रष्ट होत असल्याचा अनुभव पहिल्यांदाच येऊ लागलाय. आणि तोही देशातील सर्वात जुन्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाबाबतीत. पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एवढे घोळ घातले गेले ते त्याचमुळे.

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होत असताना सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका वड्रा यांनी त्यापासून स्वतःला वेगळे ठेवले. कार्यकर्त्यांचा प्रचंड आग्रह असूनही राहुल गांधी आपल्या निर्धारापासून ढळले नाहीत. अशा परिस्थितीत पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक होत असताना त्या निवडणुकीत त्यांनी अप्रत्यक्ष हस्तक्षेप करणे टाळले असते तर ते त्यांच्या, पक्षाच्या आणि होणा-या अध्यक्षाच्याही प्रतिष्ठेला साजेसे ठरले असते. परंतु अध्यक्ष निवडीची चर्चा सुरू झाल्यापासून बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखा व्यवहार काँग्रेसच्या नेतृत्वाकडून होऊ लागलाय. जो कुणी अध्यक्ष होईल तो आपल्या ऐकण्यातला असावा, आपण बस म्हटले की बसणारा आणि ऊठ म्हटले की ऊठणारा असावा अशी काहीतरी गांधी कुटुंबीयांची इच्छा दिसते. त्यांच्या या इच्छेमुळेच अध्यक्षपदासाठी निवडणूक निष्पक्षपाती होताना दिसत नाही.

अशोक गेहलोत यांना आधी अध्यक्षपदाचे उमेदवार उभे करण्यात आले. त्यांनी अर्ज भरण्याच्या आधीच राजस्थानमधील त्यांचा उत्तराधिकारी नेमण्याची प्रक्रिया पक्षाने अधिकृत सुरू केली. अध्यक्षपदाची निवडणूक हा फार्स असल्याचे उघड होण्यासाठी एवढे पुरेसे होते. आपले आणि काँग्रेसचे पुरते हसे करून घेतल्यानंतर गेहलोत यांनी माघार घेतली. त्यानंतर दुस-या विश्वासार्ह नावाची शोधाशोध सुरू झाली. त्यातून मल्लिकार्जून खर्गे यांचे नाव पुढे आले. त्यांच्यामागे गांधी कुटुंबीयांची शक्ती एकवटली. खर्गे यांनी तातडीने राज्यसभेतील नेतेपदाचा राजीनामा दिला. म्हणजे इथेही पुन्हा काँग्रेस पक्षाकडून घाईने व्यवहार करण्यात आला. खर्गे अध्यक्ष होणारच आहेत, असे गृहित धरूनच सगळा व्यवहार झाला. असला पोरकटपणा काँग्रेस नेतृत्वाकडून का केला जातोय हे समजत नाही. गेहलोत यांच्याशी आधी सर्व गोष्टी स्पष्टपणे बोलून घेतल्या असत्या आणि त्यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा वगैरे गोष्टी घडल्या असत्या तर त्यातून हसे टाळता आले असते. किंवा आतासुद्धा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर खर्गे यांनी राज्यसभेतील नेतेपदाचा राजीनामा दिला असता तर आभाळ कोसळले नसते. परंतु एखादी लाट यावी तसे सगळेच वेडेपणाने वागू लागल्याचे दिसून येते. त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की शशी थरूर यांना अध्यक्षपदासाठी गांधी कुटुंबीयांचा पूर्ण विरोध आहे. त्यांना आपला होयबा अध्यक्ष हवा आहे. म्हणजे पक्षाची सूत्रे आपल्याच हातात ठेवायची आहेत, परंतु भविष्यातील पराभवांची जबाबदारी घेण्यासाठी एक विश्वासू मनुष्य हवा आहे. आतापर्यंतच्या घडामोडींवरून तेच दिसून येते.

भारतीय जनता पक्षाविरुद्ध लढण्यासाठी काँग्रेस हाच सशक्त पर्याय असल्याचे चित्र निर्माण करण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेद्वारे शक्तिप्रदर्शन सुरू केले असताना दुसरीकडे अशोक गेहलोत प्रकरणाने झालेली शोभा काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करणारी आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे गांधी कुटुंबाचे पसंतीचे उमेदवार होते आणि त्यांच्यासाठी गांधी परिवाराकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मोर्चेबांधणी सुरू झाली होती. एका चर्चेच्या कार्यक्रमात काँग्रेस प्रवक्त्याने गेहलोत यांचे समर्थन करताना अध्यक्षपदाचे दुसरे इच्छुक उमेदवार शशी थरूर यांच्यावर टीका केली. त्यानंतर मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांना, प्रवक्त्यांनी अध्यक्षपदाबाबत टिपणी न करण्याबाबतचा फतवा काढावा लागला. गेहलोत अध्यक्ष होण्याची औपचारिकता बाकी असताना गांधी परिवार आणि दस्तुरखुद्द गेहलोत यांच्याबाजूने जे काही राजकारण झाले, ते अत्यंत सुमार दर्जाचे होते. सर्वात जुना राजकीय पक्ष किती पोरकट वर्तन करतो, हेच यावरून दिसून आले. अशोक गेहलोत यांनी आपल्या आमदारांची परस्पर बैठक घेऊन, अध्यक्षपदानंतरही आपणच मुख्यमंत्री राहणार असल्याचे सांगितले. त्यानंतर राहुल गांधी यांनी जाहीरपणे त्यांना एक व्यक्ती एक पद या पक्षाच्या धोरणाची आठवण करून दिली. गांधी परिवार आणि अशोक गेहलोत यांच्यातील मतभेदाची पहिली ठिणगी इथेच पडली. खरेतर अशोक गेहलोत हे गांधी परिवाराच्या विश्वासातील असतील तर दोहोंमधील संवाद व्यक्तिगत पातळीवर होणे प्रतिष्ठेला साजेसे ठरले असते. परंतु दोन्ही बाजूंनी आपली भूमिका मांडण्यासाठी प्रसारमाध्यमांचा आधार घ्यावा लागणे यातून विसंवाद ठळकपणे समोर आला. त्यामुळे त्यांची अध्यक्षपदाची उमेदवारी धोक्यात आली आहे आणि त्यांना हेच अपेक्षित असावे. परंतु आता त्यांचे मुख्यमंत्रिपदही धोक्यात आल्याची चिन्हे दिसत आहेत.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीआधी अशोक गेहलोत आणि काँग्रेस नेतृत्व या दोन्ही बाजूंनी जी घाई केली, ती संबंधितांच्या आणि काँग्रेससारख्या जुन्या पक्षाच्या प्रतिष्ठेला शोभणारी नव्हती. अध्यक्षपदाची निवडणूक निष्पक्षपाती होणार नसल्याचे आणि काँग्रेस नेतृत्वाला गेहलोत अध्यक्ष होण्यातच रस असल्याचे स्पष्ट दिसत होते. नेतृत्वाकडून अतिउत्साहाचे दर्शन घडवले जात असताना गेहलोत यांनाही संयम राखता आला नाही. त्यांचा जीव राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदामध्ये अडकला होता. एक व्यक्ती एक पद धोरणानुसार मुख्यमंत्रिपद सोडावे लागले तर सचिन पायलट मुख्यमंत्री न होता आपल्या अन्य समर्थकाची वर्णी लागावी असा गेहलोत यांचा आग्रह होता. सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपद मिळू नये यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असल्याचे एकूण हालचालींवरून दिसून येत होते. त्याचमुळे केंद्रीय निरीक्षक जयपूरमध्ये बैठकीसाठी आले असताना गेहलोत समर्थक आमदारांनी स्वतंत्र बैठक घेतली आणि परस्पर विधानसभा अध्यक्षांकडे जाऊन राजीनामे देण्याचे नाटक केले. विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी हे अशोक गेहलोत यांचे समर्थक आहेत आणि गेहलोत यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते. काँग्रेस नेतृत्व म्हणजे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी गेहलोत यांच्यावर विश्वास टाकून आपली खुर्ची त्यांच्यासाठी देण्याची तयारी चालवली असताना गेहलोत यांना मात्र त्यांच्या विश्वासाला पात्र ठरता आले नाही. या विश्वासापलीकडे आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची त्यांना अधिक मोलाची वाटली आणि ती वाचवण्यासाठी नेतृत्वाच्या विश्वासाला तडा देणारी पावले त्यांनी उचलली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली तेव्हा, आमदारांच्या बंडाशी आपला संबंध नाही आणि ते आपले ऐकत नाहीत, अशी सारवासारव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या सगळ्या नाट्यानंतर काँग्रेस पक्षाची पुरती शोभा झाली. काँग्रेसकडे सध्या दोनच राज्यांची सत्ता आहे आणि त्यात राजस्थान हे मोठे आणि महत्त्वाचे राज्य आहे. तिथेही काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातील नेतृत्वाने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. एकीकडे भाजपशी लढण्याच्या वल्गना करायच्या आणि दुसरीकडे आपसात लढत बसायचे ही वृत्ती काँग्रेसला गाळात घातल्याशिवाय राहणार नाही. असेच चालत राहिले तर राहुल गांधी यांनी कितीही तंगडेतोड केली तरी ती वायाच जाईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in