
मत आमचेही
शिवप्रकाश
या विधानसभा निवडणुकीत भाजपला आतापर्यंतचे सर्वात घवघवीत यश मिळाले. महायुतीला मिळालेल्या या जनादेशाने काही सामाजिक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेने जातीपातीचे राजकारण नाकारले आहे. विकास, सुरक्षा आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाला समर्पित असे सरकार लोकांनी निवडले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमताने विजय मिळवला. महायुतीला ४९.८% मते आणि २३४ जागा मिळाल्या. महायुतीतील भारतीय जनता पक्षाने १४८ जागा लढवल्या आणि त्यापैकी १३२ जागा जिंकल्या. हा स्ट्राइक रेट ९० टक्के इतका आहे. भारतीय जनता पक्षाचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे यश आहे. महाराष्ट्रातील या घवघवीत यशामुळे लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.
२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता, विधानसभेचे निकालही आपल्याच बाजूचे असतील असा विश्वास महाविकास आघाडीला होता. लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या होत्या, तर १५१ विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली होती. मात्र आता विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेला हा जनादेश महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव टाकणारा आहे हे नक्की. त्याचबरोबर देशातील जनतेलाही अनेक अर्थांनी धडे देणारा ठरला.
महाराष्ट्र हे देशातील असे एक राज्य आहे, ज्याने विषमतेने भरलेल्या अनेक कुप्रथा मोडून काढत एकोपा असलेला समाज निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र ही विविध प्रकारचे भक्तिमार्ग सांगणाऱ्या संतांची भूमी आहे. मुघल साम्राज्याला धूळ चारणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रातूनच संपूर्ण देशाला स्वराज्य आणि स्वधर्म रक्षणाची प्रेरणा दिली. समतेवर आधारीत समाज घडविण्याच्या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे महात्मा जोतिबा फुले, स्त्री शिक्षणाला वाहून घेतलेल्या सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांचीही कर्मभूमी हेच राज्य आहे. दलितोद्धाराच्या चळवळीचे महानायक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही प्रारंभिक कर्मभूमी महाराष्ट्रच आहे. क्रांतिकारी आणि अहिंसक अशा दोन्ही मार्गांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणाऱ्या महापुरुषांची ही भूमी आहे. थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील तरुणांना प्रेरणा देण्याचे कार्य केले आहे. या सर्व महापुरुषांची प्रेरणा आत्मसात करून, देशभक्ती आणि हिंदुत्वाचे संस्कार एकवटून तयार झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जन्मभूमी नागपूरही याच राज्यात आहे, जो सज्जनशक्तीच्या आस्थेचे केंद्र बनून केवळ आपल्या देशालाच नाही तर संपूर्ण जगाला प्रकाशमान करत आहे.
मात्र सत्तेच्या लालसेपायी महाराष्ट्रातील काही नेते सातत्याने या सर्व महापुरुषांना नाकारण्याचे काम करत आहेत. स्वतःला जातीयवादी राजकारणाचा केंद्रबिंदू मानणारे लोक छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित महापुरुषांचे अस्तित्व नाकारण्याचे काम करत आहेत. शिवाजी महाराजांना घडवण्यात समर्थ रामदास स्वामी आणि दादाजी कोंडदेव यांचे काहीच योगदान नव्हते, असा सिद्धांत मांडण्याचाही प्रयत्न सातत्याने केला जात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करणे ही जणू परंपराच झाली आहे. महापुरुषांकडे जातीच्या चष्म्यातून पाहणे आणि याच आधारावर जातीभेद निर्माण करून मते मिळवणे हे राजकीय कौशल्याचे उदाहरण ठरत आहे. महाराष्ट्रातील जनतेने या जातीद्वेषाच्या राजकारणाला नाकारत जातीपातींच्या पलीकडे जाऊन सर्वांचा समान सन्मान राखणाऱ्यांना यावेळी पाठिंबा दिला आहे.
देशात विकास आणि समृद्ध वारशांच्या संवर्धनाचे मोलाचे कार्य एकाचवेळी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी काही अतिरेकी विचारसरणीचे घटक २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत इंडी आघाडीच्या समर्थनार्थ उभे राहिले होते. त्यांची हीच मानसिकता ‘व्होट जिहाद’च्या रूपाने समोर आली. महाराष्ट्रातील धुळे लोकसभा मतदारसंघासह देशातील अनेक लोकसभा मतदारसंघांतील निकालांतून याचा प्रत्यय आला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचा उमेदवार जवळपास १,९०,००० मतांनी आघाडीवर होता. केवळ मालेगाव मध्य या मुस्लिमबहुल मतदारसंघात व्होट जिहादमुळे तो १,९४,००० मतांनी पिछाडीवर गेला. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी अवघ्या चार हजार मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला. सर्वांगीण, सर्वसमावेशक विकासाचे ध्येय ठेवून केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्व घटकांना सगळ्या सुविधा मिळाल्यानंतरही मतदानाची ही पद्धत लोकशाही आणि संविधानासाठी अत्यंत चुकीची आहे. ही मानसिकता लोकशाहीला कमकुवत बनवेल. याच मानसिकतेला तीव्र विरोध करत महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहादविरोधात मतांचे धर्मयुद्ध पुकारले होते. व्होट जिहादी मानसिकतेच्या या लोकांनी उत्तरमध्य मुंबईमधील लोकसभेचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना आणि मराठा आरक्षण आंदोलनात आघाडीवर असलेल्या नेत्यांशी हातमिळवणी करून भाजपला पराभूत करण्याचा विडा उचलला होता. आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन महाविकास आघाडीसोबत मतांची सौदेबाजी याच मानसिकतेचे लोक करत होते, ज्यामध्ये २०१२ ते २०२४ दरम्यान राज्यात झालेल्या दंगलीतील मुस्लिमांविरोधातील खटले काढून घ्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या राष्ट्रवादी संघटनांवर बंदी घाला, इत्यादी मागण्यांचा समावेश होता. व्होट जिहादच्या माध्यमातून निवडणुका जिंकून सत्तेपर्यंत पोहचणारे हे लोक बांगलादेशात होत असलेल्या हिंदू नरसंहारावर चकार शब्दही काढत नाहीत. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या बाजूने दिलेले कौल म्हणजे त्यांना दिलेले चोख प्रत्युत्तर आहे.
कोरी पाने असलेले संविधान हातात घेऊन संविधान वाचविण्याची हाकाटी करत बिनबुडाचा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न काँग्रेससहीत इंडी आघाडीने केला. भाजप सत्तेत आली तर संविधान आणि आरक्षण संपुष्टात येईल, अशी भीती जनमानसात पसरवण्याचा प्रयत्न विरोधक करत राहिले. लोकसभा निवडणुकीत याला काही अंशी यश मिळाल्याचेही दिसून आले. ज्यांनी स्वतः निवडून आलेली सरकारे बरखास्त करून घटनेचा गळा घोटला आहे, ज्यांना बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात लोकशाही दिसत आहे, ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना निवडणूक जिंकू दिली नाही, ज्यांच्या एकाधिकारशाहीच्या मानसिकतेमुळे बाबासाहेब आंबेडकरांना मंत्रिमंडळाचा राजीनामा देण्यास भाग पाडले, ज्यांनी बाबासाहेबांना योग्य आदर दिला नाही, अशा लोकांना महाराष्ट्रातील जनतेने अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव असलेल्या ५४ पैकी ४२ जागा महायुतीला देऊन या खोट्या नरेटिव्हला सडेतोड उत्तर दिले आहे.
स्वतः सत्तेत असताना ज्यांनी मराठा समाजाच्या विकासासाठी कोणतेही धोरण आखले नाही, त्यांनी भाजप सरकार सत्तेवर आल्यावर समाजाला विभाजनाच्या मार्गावर नेऊन आंदोलन उभे करण्याचा आणि पडद्यामागून त्याला पाठिंबा देऊन विविध समाजांमध्ये भिंती उभ्या करण्याचा हीन प्रयत्न केला. या शक्तींना मराठा समाजाचे वर्चस्व असलेल्या बहुतांश जागा महायुतीला देऊन महाराष्ट्रातील जनतेने सणसणीत चपराक लगावली आहे.
या देशविघातक शक्ती महाराष्ट्रात विषाची बीजे पेरून समाजात द्वेष निर्माण करण्याचे काम दीर्घकाळापासून करत होत्या. भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात शहरी नक्षलवाद्यांचा देशात दंगल घडवून सरकार उलथवून टाकण्याचा डाव उघड झाला आहे. सवर्ण-दलित संघर्ष निर्माण करणे, हा त्यांचा उद्देश होता. एका दैनिकाच्या वृत्तानुसार, मुस्लिम सेवक संघाद्वारे संघटित केलेल्या शेकडो स्वयंसेवी संस्था यंदाच्या निवडणुकीत महायुतीला पराभूत करण्याच्या प्रयत्नात होत्या. महायुतीचा पराभव करण्याचे स्वप्न उराशी बाळगून परदेशी अनुदान मिळणारे अनेक गट व व्यक्ती महाराष्ट्रात सक्रिय झाल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर महायुतीचा हा विजय म्हणजे विरोधकांना दिलेले चोख प्रत्युत्तर आहे.
विरोधकांकडे महाराष्ट्राच्या विकासाची ना नीती होती, ना नियत होती. नकारात्मकतेच्या भावनेतून जनतेत भ्रम पसरवून त्यांची दिशाभूल करून महाराष्ट्राच्या विजयाची स्वप्ने ते पाहत होते. हीच मंडळी विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडत आहेत. हा जनादेश म्हणजे त्या सर्व नकारात्मक शक्तींवर सकारात्मकतेचा विजय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली डबल इंजिन सरकारच्या सहाय्याने महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या आणि जनतेच्या कसोटीवर खऱ्या उतरलेल्या नेतृत्वावरील जनतेचा विश्वास, महायुतीचे संघटित प्रयत्न, सज्जनशक्तींचे सहकार्य, भाजप आणि महायुतीच्या असंख्य कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम यामुळे हा विजय साध्य झाला आहे. विकास, सुरक्षा आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाला समर्पित सरकारची निवड केल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे शतश: आभार.
राष्ट्रीय सहसंघटन मंत्री, भाजप.