अमेरिकेत बालवाडी टाळण्याचा कल

आता ही केवळ भारतीयांची समस्या राहिली नसून अमेरिकेसारख्या प्रगत देशांतील पालकही केजीपासून आपल्या पाल्यांना दूर ठेवण्याचा विचार करत आहेत.
अमेरिकेत बालवाडी टाळण्याचा कल
PM

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जगभरातील समाजावर अनेक परिणाम झाले. कित्येक जणांच्या नोकऱ्या गेल्या. व्यवसाय बंद पडले. उपजिविकेची साधने नाहीशी झाली. घटलेल्या कमाईपोटी लोकांना बरेच अवघड निर्णय घ्यावे लागले. त्यातूनच अमेरिकेत सध्या एक नवा ट्रेंड दिसू लागला आहे. बरेचसे पालक आपल्या लहान मुलांना किंडरगार्टन (केजी) किंवा बालवाडीत पाठवण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यापेक्षा मुलांना घरी ठेवलेले किंवा अन्य कार्यक्रमात व्यग्र ठेवलेले बरे, असे पालकांना वाटत आहे.

भारतातही काही वर्षांपूर्वी लहान मुलांना वयाची सहा वर्षे पूर्ण केल्याशिवाय पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जात नसे. पण सध्या पाश्चिमात्य जीवनशैलीचा प्रभाव आपल्या शिक्षण व्यवस्थेवरही पडत आहे. त्यामुळे लहान मुले अडीच-तीन वर्षांची झाली की पालकांची त्यांना प्ले-स्कूल, नर्सरी, केजी आदी वर्गांना  प्रवेश घेण्यासाठी लगबग उडालेली दिसते. आता मोठ्या शहरांबरोबरच लहान गावांतही त्याचे लोण पसरू लागले आहे. यापैकी बहुतांश वर्गांचा वेळ तीन ते चार तासांचा असतो. त्यात मुलांचा बराचसा वेळ खेळणे, खाणे-पिणे यातच जातो. त्यांच्यावर फारसे संस्कार घडत नाहीत किंवा शिक्षण होत नाही. असे वर्ग चालवणाऱ्यांकडे प्रशिक्षित आणि अनुभवी मनुष्यबळाचा अभाव असतो. त्यामुळे लहान मुलांना घरात, शाळेत किंवा समाजात वावरण्यासाठी लागणारी प्राथमिक कौशल्येही तेथे विकसित होत नाहीत. मात्र, या वर्गांची फी भरमसाठ असते. सामान्य पालकांना ही फी भरण्यासाठी बरीच कसरत करावी लागते.

आता ही केवळ भारतीयांची समस्या राहिली नसून अमेरिकेसारख्या प्रगत देशांतील पालकही केजीपासून आपल्या पाल्यांना दूर ठेवण्याचा विचार करत आहेत. विशेषत: कोरोनापश्चात काळात हा ट्रेंड वाढू लागला आहे. अमेरिकेच्या अनेक राज्यांतील सरकारी किंडरगार्टनमधील मुलांची संख्या १६ ते ४० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. कोरोनाकाळात पालकांचे कमी झालेले उत्पन्न हे त्यासाठी एक प्रमुख कारण आहे. शिवाय मुलांना केजीत पाठवण्यापेक्षा घरीच मूलभूत अक्षर-अंकओळख करून देणे पालकांना सोयीचे वाटत आहे. काही ठिकाणी तर पालक ही जबाबादारी लहान मुलांच्या थोड्या मोठ्या भावंडांवर सोपवत आहेत. मुलांचे दादा-ताईच त्यांना ए, बी, सी, डी आणि अंक शिकवत आहेत. याशिवाय कमी वयात मुलांवर अभ्यासाचे ओझे टाकण्यास पालक आता तयार नाहीत. लहान वयात मुलांना खेळण्याचा पुरपूर आनंद घेऊ द्यावा, असा विचारही पालकांमध्ये वाढीस लागत आहे.

logo
marathi.freepressjournal.in