विचार संपत नाहीत

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या हातांना कदाचित शासन होईलही; पण त्यामागील मेंदूंना कधीही शासन होणार नाही.
विचार संपत नाहीत

नरेंद्र दाभोलकर यांच्यावर सनातन्यांनी गोळ्या झाडल्या. त्याला आता नऊ वर्षे पूर्ण झाली. गोळ्या झाडणारे काही संशयित हात सापडले. त्यांची चौकशी सुरू आहे, असं सरकारतर्फे सांगण्यात येते. त्या हातांना गोळ्या झाडण्याचा आदेश ज्या मेंदूनी दिला होता, तो मेंदू मात्र पोलीस शोधू शकले नाहीत. डॉ. नरेंद्र दाभोलकर हा केवळ एक हाडामांसाचा माणूस नव्हता, तर तो एक विवेकी विचार प्रवाह होता. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या हातांना कदाचित शासन होईलही; पण त्यामागील मेंदूंना कधीही शासन होणार नाही. हे जितके खरे आहे, तितकेच हेही खरे आहे की, डॉ. दाभोलकरांचा देह संपला आहे; पण त्यांचे विचार संपलेले नाहीत.

दाभोलकरांच्या विज्ञान आणि विवेक वादाच्या अनेक घटना आहेत. त्यापैकी एक घटना आहे, ३० वर्षांपूर्वीची. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर जवळील खंजिरे मळ्यातील आहे. भुते दाखवणाऱ्या नाथपंथीय मांत्रिक गुरूने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान स्वीकारले होते. महादेव चव्हाण नावाच्या ६५ वर्षांच्या मांत्रिकाने सांगली अंनिसचे आव्हान स्वीकारले होते. हे आव्हान होते भूत दाखविण्याचे. सांगली-कोल्हापूर परिसरातील अंनिसचे आव्हान स्वीकारणारा हा पहिलाच मांत्रिक होता!

६ डिसेंबर १९९० रोजी गुरुवारी सकाळी ११ वाजता भूत दाखवीन, असे त्यांनी पत्रकारांसमोर जाहीर केले. या चव्हाण मांत्रिकास गुरू मानणारा ज्योतिषी क्षितिज शिंदेने भूत दर्शन निश्चित होणार असे सांगून वृत्तपत्रातून आव्हान स्वीकारले असे जाहीर सांगितले. भूत पाहायला मिळणार या आशेने जवळपास दोन हजार लोक त्यादिवशी मांत्रिकाच्या घरासमोर सकाळीच जमा झाले होते. हे घर खंजिरे मळा, शिरोळ रोड येथे उघड्या माळरानावर होते. जत्राच भरलेली होती तेथे. सांगली अंनिसने हा कार्यक्रम अतिशय नेटकेपणाने करायचे ठरविले होते. प्रश्न समितीच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या कसोटीचा होता. 

एक आठवडा अगोदर डॉक्टर दाभोलकर यांना याची कल्पना दिली. भूत दाखवण्यासाठी एक तास देण्यात आला होता. तो तास सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या दरम्यानचा होता. भुताचे अस्तित्व मांत्रिकाने टाळी देऊन किंवा समिती कार्यकर्त्यांना इजा करून दाखवायचे होते. या मसुद्यावर मांत्रिकातर्फे क्षितिज शिंदे व ज्योतिषांनी सही देखील केली होती. प्रत्यक्ष आव्हान स्वीकारण्याच्या दिवशी समितीचे सर्वजण सकाळी ९ ला पोहोचले. ११ वाजेपर्यंत जवळपास पाच हजार लोक जमा झाले होते. ते फक्त भूत बघण्यासाठी. डॉ. प्रदीप पाटील ११ वाजता मांत्रिकाच्या कुटीत गेले आणि चला भूत दाखवायला लोक बाहेर जमलेत असे म्हणाले. तसा तो पटकन म्हणाला, “डॉक्टर, भूत बित काय नसतं. माझी चूक झाली डॉक्टर.” डॉ. पाटील म्हणाले, “जमावासमोर हे सांगा की, भूत असतं हे मी खोटं बोललो. मला माफ करा, असं तुम्ही सांगणार असाल तर आम्ही जातो.”

महादेव चव्हाण आणि क्षितिज शिंदे माळरानावर उभ्या असलेल्या त्या प्रचंड जनसमुदायासमोर येऊन म्हणाले... “भूत नसतं. मला माफ करा...” तसे लोक ओरडू लागले. आरडाओरडा करू लागले.  एक जण ओरडून म्हणाला, “हम तो देल्ही से आये हैं। और आप हमे उल्लू बना रहे हैं?” लोकांमध्ये संतापची लाट पसरली. बातमी पसरली की, चव्हाण-शिंदे जोडीने भूत नसतं हे कबूल केलं आहे. अशा गोंधळातच साताऱ्याहून डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आले.

ते येण्यापूर्वीच हे सर्व घडून गेले होते. त्यांनी आल्या आल्या विचारले, “काय झालं?” डॉ. पाटील म्हणाले, “त्यांनी पळ काढला.” क्षितिज शिंदे तोवर बाहेर आले. ते पाहून काही लोक ‘भूत दाखवा भूत’ म्हणत त्यांच्या अंगावर धावून गेले. परिस्थिती चिघळत गेली. या संपूर्ण कार्यक्रमासाठी ५००० लोकांसमोर फक्त एकच पोलीस बंदोबस्तासाठी हजर होता. तोही शिट्टी वाजवत इकडे-तिकडे पळत होता. परिस्थिती आटोक्याबाहेर गेली. डॉक्टर दाभोलकर आणि समितीचे कार्यकर्ते जवळच्या गवताच्या गंजीवर चढून लोकांना शांत करू लागले. लोक ऐकत नव्हते.

डॉक्टर दाभोलकर आणि डॉ. पाटील खाली उतरून कुटीत शिरले. चव्हाण आणि क्षितिज शिंदे पूर्ण भेदरलेले होते. त्यांना पर्याय सुचवला. “तुम्ही लेखी स्वरूपात भूत नसतं हे लिहून द्या, ते आम्ही लोकांना दाखवतो, म्हणजे लोक शांत होतील!” दोघेही तयार झाले. त्यांनी लेखी लिहून दिले. ते पत्र घेऊन डॉ. बाहेर आले, लोकांना दाखवलं; पण अचानक लोकांनी दगड उचलून चव्हाण यांच्या घराच्या दिशेने भिरकवायला सुरुवात केली. शिंदे-चव्हाण दोघेही कुटीत घाबरलेल्या अवस्थेत बसले होते. तुफान दगडफेक चालू झाली. महादेव चव्हाण मांत्रिकाचे छप्पर पूर्ण फाटलं. 

त्याच्या कुटीत डॉ. प्रदीप पाटील व डॉ.  दाभोलकर त्या दोघांच्या जवळ उभे होते. इतक्यात पोलिसांची जीप आली. त्या जीपमध्ये शिंदेला आणि चव्हाणला दगड चुकवत अक्षरश: गाडीत कोंबले. गाडीवर लोकांनी दगडफेक चालू केली. दगड चुकवत रानारानातून नांदणी गावांमध्ये सर्वजण पोलीस ठाण्यांमध्ये पोहोचले. पोलीस स्टेशनमध्ये दोघांनी भूत नसतं, हे इन्स्पेक्टर समोर सांगितले; परंतु चव्हाण मांत्रिक मात्र रडत म्हणू लागला, “माझे छप्पर पूर्णपणे लोकांनी उद‌्‌ध्वस्त केले आहे.” डॉक्टर नरेंद्र दाभोलकर म्हणाले, “आपण त्याच्या घराच्या डागडुजीचा खर्च उचलूया.

आमचा लढा अंधश्रद्धांविरुद्ध आहे. आमचा लढा हा कोणत्याही एका व्यक्तीविरोधात नाही. अंधश्रद्धा विरोधाच्या लढाईत व्यक्ती ही अंधश्रद्धांची वाहक व बळी असते, हे आम्ही मानतो आणि मांत्रिक हासुद्धा एक माणूस आहे. त्यामुळे त्याच्या घराच्या संपूर्ण डागडुजीची जबाबदारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती घेईल. तसे या ठिकाणी मी लेखी आश्वासन देईन.” डॉक्टर दाभोलकर यांच्या या बोलण्याने मांत्रिक चव्हाण आणि शिंदे दोघेही अवाक झाले. अंधश्रद्धांचे निर्मूलन करत असताना व्यक्तीवर हल्ला चढवण्याऐवजी व्यक्तीच्या अंधश्रद्धा कृत्यांवर हल्ला चढवला जाणे हे जास्त विवेकी असतं हे दाभोलकरांनी तिथे जमलेल्या सर्वांच्या लक्षात आणून दिलं. आज परिस्थिती काय आहे? 

खुद्द दाभोलकरांच्या या संदेशाच्या विपरीत कृत्य धर्मांधांनी केलेले आहे. दाभोलकर यांच्या विचारांवर हल्ला चढवण्याऐवजी दाभोलकरांवर हल्ला करत खून करून स्वतःच्या धार्मिक वृत्तीचं हिणकस प्रदर्शन केलेलं आहे. दाभोलकर यांच्या खुनानंतर चळवळ कमी झाली नाही तर वाढली. अनेक विवेकी कार्यकर्ते कामाला लागले. चळवळ वाढत चालली. म्हणून माणूस मारता येतो; पण विचार मारता येत नाहीत, हेच अधोरेखित होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in