ब्रिटिशांच्या विरोधात सांगलीत घडलेला थरार

शरणागती पत्करुनही पोलिसांना दया आली नाही
ब्रिटिशांच्या विरोधात सांगलीत घडलेला थरार

पोस्ट जाळणे, रेल्वेचे नुकसान करणे, पिस्तुल वापरून ब्रिटिशांमध्ये दहशत निर्माण करणं इत्यादी कामांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात, १९४२ मध्ये आपला ब्रिटिश विरोध प्रकट करणारे ‘प्रतिसरकार’ हे असे होते की, त्यातील प्रत्येक शिलेदार हा स्वतंत्रपणेही ब्रिटीशांना घाम फोडू शकेल. सांगली जिल्ह्यातील, मिरज तालुक्यातील ‘पद्माळे’ या छोट्या गावी जन्मलेल्या अशाच एका शिलेदाराच्या कामाची आज आपण दखल घेणार आहोत. सारा देश वसंतदादा पाटील यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ओळखत असेल पण १९४० पासून स्वत:च्या तरुण वयात देशासाठी बलिदानास तयार असलेल्या दादांची आज कर्तृत्व गाथा येथे सांगत आहे.

२२ जून १९४३ रोजी रात्री वसंतदादा पाटील आणि हिंदूराव पाटील सांगली शहरातील जयश्री टॉकीजला सिनेमा पाहायला गेले होते. सिनेमा पाहून रात्री फौजदार गल्लीतील आपल्या मुक्कामावर आले. ‘प्रतिसरकार’च्या कारवाया थांबवण्यासाठी दादांवर पकड वॉरंट निघालेले होते. त्यांच्या शोधासाठी कित्येक दिवसरात्र एक करुन कंटाळलेल्या पोलिसांना वसंतदादा तिथे असल्याची बातमी कोणीतरी दिली. पोलीस सशस्त्र फौजफाटा घेवून फौजदार गल्लीत आले.

एकंदर परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा दादांना अंदाज येताच त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन होण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी दादांसह सर्वांना अटक करून सांगलीच्या तुरुंगात नेलं. देशात स्वातंत्र्यासाठी चाललेले क्रांतियुद्ध आणि त्यात स्वतः उतरून लढण्याची त्यांची तळमळ आणि जिद्द यामुळं दादा तुरुंगात अडकून पडणे शक्यच नव्हतं. दादा व क्रांतिवीरांच्या विरोधात खटले दाखल करून त्यांना कडक शिक्षा व्हावी, या प्रयत्नात पोलीस होते. तर दादा मात्र कोणत्याही परिस्थितीत तुरुंग फोडून बाहेर पडण्याच्या तयारीला लागले होते. अखेर तो दिवस उजाडला. शनिवार तारीख २४ जुलै १९४३.

सांगलीच्या राजवाड्याबाजूस खंदकाजवळ असलेल्या जेलमध्ये दादांना ठेवले होते, जेलमध्ये ठेवले म्हणून गप्प बसून राहणारे ते स्वातंत्र्यसैनिक नव्हते, दादा पलायनचा विचार करत होते. त्यांनी नियोजन केले आणि भर पावसात पोलीस अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन त्यांनी एकट्याने नव्हे तर सर्व सहकाऱ्यांना घेऊन पळ काढण्याची योजना बनवली. दादांचे वकील पाटणकर यांना सेशन्स कोर्टाने सोमवार २६ जुलै १९४३ ची तारीख निकालासाठी दिली होती. निकाल लागण्यापूर्वीच दोन दिवस आधी तुरुंगातून पळून जाण्याचा निर्धार दादांनी केला. दुपारी अडीचच्या सुमारास शौचाचे निमित्त करून दादा खोलीच्या बाहेर पडले. तुरुंगातील इतरही क्रांतिवीरही काही न काही कारणाने बाहेर पडले. नियोजनाप्रमाणे

सर्व क्रांतीकारी बराकीतून बाहेर आले. दादांच्या बरोबर बंदूकधारी पहारेकरी आणि हिंदुराव पाटील होते. त्याच संधीचा फायदा घेत दादांनी पहारेकऱ्यास घट्ट पकडले. हिंदुराव पाटलांनी त्याची बंदूक हिसकावून घेतली आणि ते तुरुंगाच्या प्रवेशद्वाराकडे धावले. इतरांनी तुरुंगाच्या तटावरील व घंटीजवळील बंदूकधाऱ्यांकडील बंदुकाही हिसकावून घेतल्या. वसंतदादांसह सर्वजण तटाकडे धावत सुटले. तटावर गेले. तटाभोवतीच्या खंदकात भरपूर पाणी होतं. त्यामुळे पोहून जाणं सोपं होतं. दादांसह सर्वांनी खंदकात उड्या मारल्या.

वसंतदादा पाटील आपल्या बारा सहकाऱ्यांसह जेलमधून निसटले. बाहेर पाऊस कोसळत होता. शनिवारचा दिवस असल्याने कापड पेठेतून नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आठवडी बाजार भरला होता. या स्वातंत्र्यसैनिकांनी भर बाजारातून पळ काढला. पोलीस मागे लागले होते. सर्वांनी टिळक चौकातून कृष्णा नदीकडे पळ काढला. नदीला पूर आला होता, मागे पोलीस लागले होते. गोळ्यांची चाळण होत होती. आता एकच मार्ग होता. पुरात उड्या ठोकायच्या आणि हरिपूरच्या दिशेने पोहत कृष्णा वारणा नद्यांच्या संगमाकडे जायचे. तेथून कवठेसारच्या दिशेने कोल्हापूर संस्थानात धूम ठोकायची... पोलिसाचा गोळीबार चुकवीत कृष्णा नदीत उड्या मारताना वसंतदादा आणि बाबूराव जाधव यांना गोळ्या लागल्या. बाबूराव जाधव यांना लागलेल्या गोळ्यांमुळे त्यांचा कृष्णेच्या वाहत्या पाण्यातच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेहही सापडला नाही. बाबूराव जाधव यांचा मूळचा ठावठिकाणाही समजत नाही. ते मूळचे बेळगावचे अशी माहिती नोंद आहे. ते कामानिमित्त सांगलीत आले होते आणि वसंतदादा पाटील यांच्या सहवासात येऊन स्वातंत्र्यलढयात त्यांनी भाग घेतला, असे एका निवेदनात वसंतदादा पाटील यांनीच सांगितले होते. दादांच्या खांद्यात गोळी घुसली होती. त्या जखमेसह

त्यांनी कसाबसा पैलतीर गाठला. या स्वातंत्र्य सैनिकांच्या गटात आण्णासाहेब पत्रावळे होते. त्यांना नदीकाठावर पळताना दम लागला. नदीकाठच्या रानात चिखल होता. त्यांचा पाय चिखलात अडकला. पुराच्या पाण्यात त्यांना सूर मारता आला नाही. धावून धावून थकलेले आण्णासाहेब एका ठिकाणी थांबले. त्यांनी शरणागती पत्करुनही पोलिसांना दया आली नाही. ते पोलिसांच्या गोळीचे शिकार बनले.

असा प्रकारे या ऐतिहासिक उडीमुळे हे दोन हुतात्मे झाले. कामेरीचे हिंदुराव पाटील यांचे धैर्य वाखाणण्याजोगे आहे. जेलच्या भिंतीवरून उडी मारताना ते दगडावर पडले. त्यांचा गुडघा फुटला. रक्तबंबाळ झाले. तसेच पळत जाऊन पुरात उडी मारून त्यांनीही पैलतीर गाठला होता. दादा मात्र मोठ्या हिंमतीनं आलेल्या प्रसंगाला सामोरे जात पोलिसांशी लढत होते. त्यांनी एका उंबराच्या झाडाचा आश्रय घेतला. दुर्दैवाने त्यांच्या बंदुकीची कळ खराब झाली. झाडाच्या बुंध्यामागे दादा रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडले आणि पोलिसांच्या हाती लागले. दादांना उपचारासाठी सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या जीवावरचा धोका टळला. दादांच्या विरोधात न्यायमूर्ती दिवेकर यांच्यापुढे खटला चालला. २१ सप्टेंबर १९४४ रोजी तुरुंग फोडण्याच्या गुन्ह्याखाली वसंतदादांना सहा वर्षे कोठडी आणि ५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. वसंतदादांना येरवड्याच्या तुरुंगात पाठवण्यात आलं. मात्र, सांगलीत घडलेल्या या थरारक घटनेची एकही नोंद कोठे शासन दफ्तरी नोंदवून ठेवण्यात आलेली नाही. बेळगावच्या बाबूराव जाधव यांचा कोणी उल्लेखही करीत नाहीत. आण्णासाहेब पत्रावळे यांचा पुतळा मात्र सांगलीच्या आमराई उद्यानाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आला आहे. असे अनेक अनाम वीर या संग्रामात गावागावात होते, तेच या लेखनमालेची प्रेरणा आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in