असंही सीमोल्लंघन व्हायला हवं...!

'पाकिस्तानी हात' घातपाती कारवायासाठी, हिंदुस्थानात अराजक माजावं यासाठी सदैव सिद्ध असतात.
असंही सीमोल्लंघन व्हायला हवं...!

देशातल्या राजकारणानं नीच पातळी गाठलीय. इतकं घाणेरडं राजकारण स्वातंत्र्यानंतर कधीच दिसलं नाही. काँग्रेसची 'भारत जोडो' पदयात्रा सुरू आहे. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातून याच्या बातम्या येत नसल्या तरी सोशल मीडियातून ती लोकांपर्यंत पोहोचतेय. पक्षांतर्गत निवडणुक होतेय पण जुन्यानव्यांचा खेळ सुरू झालाय. 'लाश वही है सिर्फ कफन बदला' अशी स्थिती आहे. सत्ताबदलानंतर नितीशकुमार विरोधकांची मोट बांधताहेत.भाजपही आक्रमक झालाय. शिवसेनेविरोधात अमित शहांनी मोर्चेबांधणी केलीय. तेलंगणात केसीआर, उत्तराखंडात सोरेन, दिल्लीत केजरीवाल, बंगालमध्ये ममता अशांची गोची केली जातेय. कर्नाटकात हिजाबनंतर टिपू सुलतान-सावरकर असा वाद रंगलाय. सरसंघचालकांनी ईमामांच्या प्रमुखांची, मुस्लिम नेत्यांची भेट घेतलीय. सरकारनं मुस्लिमांची संघटना 'पीएफआय'च्या मुसक्या आवळल्यात. अटकसत्र आरंभलंय.

हिंदुस्थानला मुस्लिम राष्ट्र करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. त्यासाठी मुस्लिम तरुणांना लष्करी शिक्षण, घातपाती कारवायाचं प्रशिक्षण दिलं जात होतं. देशात काही काळ अतिरेकी, घातपाती कारवाया थांबल्या होत्या, आता त्यांनी पुन्हा उचल खाल्लीय. विद्वेशाचा हा महासर्प पुन्हा वळवळायला लागलाय! 'पाकिस्तानी हात' घातपाती कारवायासाठी, हिंदुस्थानात अराजक माजावं यासाठी सदैव सिद्ध असतात. पण पैशासाठी वाट्टेल ते करायला सिद्ध असणाऱ्यांची फौज आपल्याकडंही सर्व क्षेत्रात उभीय. आपण काय करतोय याचा विचार न करता काहीही करायला पुढं येणाऱ्यांना वापरून काय करता येतं, हे आपण अनुभवतोय. 'पीएफआय'च्या कारवाया हा एक मामुली नमुना आहे पण असे दाणादाण उडवणारे, घातपात न करताही दाणादाण उडवून देण्याचं काम होऊ शकतं. मोक्याच्या जागी असणाऱ्या माणसांना फितवून प्रशासनाचा प्रवाह खंडीत करता येतो. ज्या गोष्टी टाळण्यासाठी धडपडायचं त्याच गोष्टी सहजपणे घडतील असा गोलमाल करून राष्ट्राच्या वैऱ्यांना जे हवं ते बिनबोभाट केलं जातंय. बँकांचे अधिकारी बँकांचा पैसा चोर-सटोडीयांच्या हातात देतात. त्यांचे हे सगळं कारस्थान बँकांतून कामं करणारे अधिकारी कुठलाही संशय न येता कसे तडीस जाऊ देतात? अट्टल गुन्हेगार आधी सापडत नाहीत. सापडले तर त्यांना डांबून ठेवणं शक्य होत नाही. सर्वसामान्य माणसाला जो आयुष्यभर रखडूनही न्याय मिळत नाही पण या अशा मंडळीना झटपट मिळतो. हे गुन्हेगार देशाबाहेर सुखरूप पोहचवण्याची व्यवस्था होते. त्यांच्या पलायनानंतर ते कसे पळाले याची साग्रसंगीत शोधवार्ता छापूनही आणल्या जातात. तोवर पुरावे नष्ट करण्याची, फायली गहाळ करण्याचीही चोख व्यवस्था होते आणि मग 'संबंधितांची गय केली जाणार नाही!' ही ठणठणीत घोषणा होते. पाळंमुळं खणून काढण्याचा निर्धारही होतो. हा सारा तमाशा कौतुकानं बघायची सवय आपण लावून घेतलीय. स्वातंत्र्यपूर्व काळात 'ब्रिटिश गेल्यावर हे सगळं बदलेल' हा मंत्र होता. त्यांना एकदा जाऊ द्या म्हणजे मग इथं रामराज्य आणता येईल, असं प्रत्येक रावणसुद्धा त्याकाळी सांगत होता. आता आपल्याला काही मंडळी नवा मंत्र देत होते. काँग्रेसची राजवट गेली की नक्की रामराज्य येईल, सगळे प्रश्न सुटतील, सगळे गुन्हेगार खडी फोडायला जातील वगैरे वगैरे. काँग्रेसची राजवट गेली अन भाजपची राजवट आली पण काहीही फरक पडला नाही! अन्याय, शिरजोरी आणि स्वार्थ यांना शरण जाण्याची सवय जडलेल्या कुणातच हे सारं बदलण्याची ताकद नाही. राज्यकर्त्यांनाही पाळंमुळं खणताना आपलीच मुळं तुटणार नाहीत ह्याची काळजी घेण्याची जरुरी पडतेय, हे त्याहून मोठं दुर्दैव आहे.

दाऊदचे हस्तक पाकिस्तानातच नाही तर नेपाळात ठाण देऊन असतात. पाकिस्तान नेपाळचा वापर आपल्या हस्तकांचा सुरक्षित तळ असा करतोय. नेपाळात जाऊन राजरोस पाकिस्तानात नि तिथून जगात कुठंही जाण्याची उत्तम सोय गुन्हेगारांना झालीय. नेपाळ हे एकमेव हिंदूराष्ट्र म्हटलं जातं आणि हे हिंदुराष्ट्र हिंदूद्वेष्ट्या पाकिस्तानाला उपकारक असं वागतं. हिंदुराष्ट्रात हिंदुस्थानला नष्ट करू बघणाऱ्यांचे अड्डे जमतात आणि तो पशुपतिनाथ त्यांचं पारिपत्य करण्याची बुद्धी तिथल्या हिंदूना देत नाही आणि इथल्या हिंदुत्ववाद्यांना, हिंदुराष्ट्र प्रमुखालाही तिथल्या हिंदू प्रजेला आपल्या बाजूनं उभं करण्यासाठी 'धर्मसंसदे'द्वारा काही करण्याची बुद्धी होत नाही. विश्व हिंदू परिषद एकमेव हिंदुराष्ट्रात दडणाऱ्या हिंदू द्रोह्यांवर लक्ष ठेवण्यासाठी काही करू शकत नाही ह्याला काय म्हणायचं? जे कोणी हा देश नष्ट करायला निघालेत त्यांना हुडकून वेचून काढण्याच्या दृष्टीनं काही होतंय असं दिसत नाही. ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे, ते ही पर्वणी समजून असा काही नंगा नाच घालू लागलेत की, ज्यांच्या मनात कधी देशद्रोह आला नव्हता असे नागरिकही 'कशाला हा देश आपला म्हणायचा...!' असे वैतागलेत. सगळा हिरवा रंगच देशद्रोहाचा रंग मानणारे पेडचाप राजकारणात आहेत, तसंच मुसलमानांना बकरा बनवून निष्कारण लुबाडणारे प्रशासकीय यंत्रणेत आहेत. या दोघांना आवरायला हवं. मुसलमानातही बहुसंख्य या देशाशी, मातीशी आपलं नातं, इमान राखणारे आहेत. त्यांचं सहाय्य घेऊन मुसलमानांतल्या दुष्प्रवृत्तीना, दुष्टशक्तीना आवर घालण्याचं काम होऊ शकतं. भाजपतही मुस्लिम कार्यकर्ते आहेत. त्यांनी त्या पक्षात आपलं स्तोम राहावं, सत्तेत आपला पाट राखला जावा या स्वार्थानं वागण्याचं धोरण आता सोडावं. त्यांचा पाट कुठं जाणार नाही. पण त्यांनी मुसलमानातल्या राष्ट्रवादीशक्तीना बळ देण्याचं नाकारलं. मुल्ला मौलवींच्या कारस्थानापासून दूर होण्याची मानसिक ताकद संघटितपणेच येऊ शकते, हे सत्य ओळखलं नाही तर सत्ता या पक्षांच्या हातात आज जेवढी आहे तेवढी राहणार नाही. मुसलमानांचं लांगूलचालन करण्याची जरुरी नाही, पण त्यांच्याबरोबर आपलेपणाचा व्यवहार हवा आणि त्यांच्याबद्धल अविश्वास नाही हाही दिलासा व्यक्त व्हायला हवा. राष्ट्रनिष्ठा सिद्ध करा अशी दमदाटी करून हे साधणार नाही. धर्मानं हिंदूना राष्ट्रनिष्ठा जन्मजात प्राप्त झालीय हा भ्रम वर्णश्रेष्ठत्व सिद्धान्तात मुरलेल्या मनातून आहे. पण ह्या राष्ट्रविरोधी कारवायात उघड वावरणाऱ्या प्रत्येक मुस्लीम गुन्हेगारामागे राष्ट्रनिष्ठेची कातडी पांघरलेले दहा हिंदू लांडगे आहेत, हे अनेकदा सिद्ध झालंय. पैसा घेऊन, हप्ते खाऊन अतिरेकी कारवाया सर्वत्र बिनबोभाट करू देणारे कस्टम अधिकारी, पोलीस अधिकारी आणि त्यांचे सहाय्यक हिंदूच आहेत, ही गोष्ट आपण का विसरत आहोत?

हिंदुत्ववादी हिंदू सहिष्णुतेला स्मरून उदारतेचं राजकारण करतील तर देशातल्या राजकारणाचं चित्र बदलेल, पण कर्मफलाच्या सिद्धान्तावर बसलेल्या धर्मसंसदेच्या संन्याशांना हिंदुत्ववादी समाजाच्या माथ्यावर बसवू बघतील तर हे सोवळं राजकारण फलदायी होणार नाही. पाकिस्तानातल्या धर्मांध, हुकूमशाही, अरेरावी राजकारणाला हसता हसता तशाच गोष्टी इथल्या राजकारणातही आणल्या गेल्या आहेत आणि हिंदुत्ववादीच त्याला कारण आहेत. लोकशाही संकल्पनेचं हसं व्हावं, लोकशाही नकोच अशी लोकभावना व्हावी असे लोकशाहीचे धिंडवडे काढण्याचं काम ह्या देशात घडतंय. उघडपणे फॉसिझमचे गोडवे गाणारे आणि प्रत्यक्षात लोकशाहीचे सर्व लाभ घेत लोकशाहीच संपवू बघणारे महासर्प आपले विळखे दिवसेंदिवस आणखी मजबूत करताहेत. लोकशाही आणि सर्वधर्मसमभाव यांच्या रक्षणार्थ देशव्यापी आघाडी उघडण्याचं काम मध्यंतरी काही मंडळींनी हाती घेतलं होतं. हा देश टिकायचा असेल तर समता, बंधुता मानणारी लोकशाही इथं समर्थ व्हायलाच हवी ही गोष्ट आमच्या राजकारण्यांना का पटत नाही? लोकशाही न मानणारे, झुंडशाहीनं समाजावर नियंत्रण ठेवणारे, लोकशाहीला विकृत बनवणारे, धर्मांधतेचे स्तोम माजवणारे जे कोणी आहेत त्यांना नामोहरम करण्याचा कार्यक्रम घेऊन ताकदीनं उभं व्हायला लोकशाहीनिष्ठ एकत्र का येत नाहीत? कुणीतरी 'संजीवनी' दिली की 'यवं करू त्यंव करू'चा गाजावाजा करायचा. त्यांना आज कसली पेंग आलीय?

तुम्हाला थोर परंपरा, उदार मूल्यं आणि प्रत्यक्ष कार्यान्वित असलेल्या लोकशाहीचा वारसा लाभलेला आहे. त्याचा केविलवाणा विध्वंस मागे ठेवून जाऊ नका. कारण पुन्हा ते सगळं स्थिरस्थावर करायला फार काळ लागेल....!" हीच विनवणी आज पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना करावीशी वाटावं असं वातावरण आहे. मात्र ही विनवणी फक्त कुणा एका नेत्यापुरती नाही, तर ती तमाम भारतीयांसाठी आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in