आघाडीचे तीनतेरा, भाजपमध्ये अस्वस्थता!

काँग्रेसने निष्ठावंत असे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली त्याचे कारणही अशाच पद्धतीचे आहे.
आघाडीचे तीनतेरा, भाजपमध्ये अस्वस्थता!

-अरविंद भानुशाली

सह्याद्रीचे वारे

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती ही अत्यंत शोचनीय झाली आहे. विरोधी पक्षाचे अस्तित्व भाजपने जवळ जवळ संपवले आहे, तर भाजपमध्येही आयाराम- गयाराम यांच्या उपस्थितीमुळे निष्ठावंतांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. भाजपने मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठविले असले तरी त्यामागे २०१९ चे राजकारण हे महत्त्वाचे आहे. भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता असून काही नेते बाहेर पडण्याच्या मनःस्थितीत असल्याचे बोलले जाते. भाजपचे गोपीनाथ मुंडे कन्या व माजी मंत्री पंकजा मुंडे, भाजपचे अनेक वर्षे प्रवक्ते राहिलेले माधव भांडारी व इतर काही सदस्यही आज उघडपणे भाजपविरोधात बोलू लागले आहेत.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी बिनविरोध निवडून आलेले तीन जण हे मूळचे काँग्रेसचेच आहेत. फक्त मुलामा विरोधी पक्षाचा आहे. रा. स्व. संघाचे पुण्यात असंख्य एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. विशेष म्हणजे अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल हे तसे पाहू गेल्यास अन्य पक्षातून आले असले तरी ते खरे काँग्रेसवासीच आहेत आणि रा. स्व. संघाचे डॉ. अजित गोपचडे, मेधा कुलकर्णी यांचा नंबरही एक वेगळ्या घटनेतून झाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील ४८ जागांबाबत जो सर्व्हे आलेला आहे त्यामुळे घाबरून हे सर्व केले असल्याचे बोलले जाते. प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. निष्ठावंतांना डावलून काल आलेल्यांना राज्यसभेवर पाठवणे म्हणजे हा भाजप कार्यकर्त्यांचा अवमान आहे. ज्यांनी कालपर्यंत भाजपविरोधात भूमिका घेतली ते आज भाजपचे उमेदवार आहेत. त्यामुळे निष्ठावंतांमध्ये प्रचंड चुळबुळ सुरू आहे. दक्षिण मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रबळ उमेदवार हवा होता म्हणून मिलिंद देवरा यांचे नाव मोठ्या उद्योगपतीकडून पुढे आले. शिवसेनेचा झेंडा हातात घेत असताना त्यांची उमेदवारी एकनाथ शिंदेंनी जाहीर केली. अशोक चव्हाण हे तीनवेळा माजी मुख्यमंत्री राहिलेले, कालपर्यंत ते सोनिया गांधी, राहुल गांधी यांची तळी उचलणारे नेते म्हणून गणले जात होते, मात्र ते आज भाजपचा झेंडा हातात घेऊन राज्यसभेला सामोरे जात आहेत.

काँग्रेसने निष्ठावंत असे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली त्याचे कारणही अशाच पद्धतीचे आहे. विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यामुळे काँग्रेसश्रेष्ठी अत्यंत संतप्त होते. यावर चौकशी कमिटीही नियुक्त झाली आणि भाई जगताप यांच्याऐवजी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली. मेधा कुलकर्णी यांना भाजपने नाक मुठीत धरून तिकीट दिले आहे. २०१९मध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघातून कुलकर्णी यांना डावलून भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांना उमेदवारी दिल्यापासून ब्राह्मण समाज भाजपकडून दूर गेला होता. परिणामी, कसबा या विधानसभा मतदारसंघात भाजपला पराभव पत्करावा लागला, याला मुख्य कारण म्हणजे या मतदारसंघातील ब्राह्मणांनी भाजप उमेदवाराला मते दिली नाहीत. कोथरूड हा विधानसभा मतदारसंघ भाजपचाच होता, तर कसबा म्हणजे त्याच्या पुढे जाऊन आजपर्यंत जनसंघ भाजपने कधी पराभव या मतदारसंघात पाहिला नव्हता; परंतु केवळ मेधा कुलकर्णी या ब्राह्मण महिलेस उमेदवारी न दिल्याने त्याचा हिसका कसबामध्ये भाजपला दाखवण्यात आला होता. ती चूक दुरुस्त व्हावी म्हणून मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले. विशेष म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता दोन महिन्यांवर आली आहे. तेथे दगाफटका होऊ नये म्हणूनच मेधा कुलकर्णी यांचा नंबर लागला. डॉ. अजित गोपचडे यांचा नंबर हे संघाचे पुण्यामधील ज्येष्ठ स्वयंसेवक असल्याकारणाने त्यांचे अचानकपणे नाव या यादीत आले.

शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर मुंबईमध्ये एकनाथ शिंदे गटाचे फारसे वर्चस्व असल्याचे दिसून आले नाही आणि म्हणूनच मिलिंद देवरांसारखा काँग्रेसचा एक मोठा चेहरा एका उद्योगपतीच्या मदतीने शिवसेनेत आला आणि दुसऱ्या दिवशी राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. मिलिंद देवरा यापूर्वी दक्षिण मुंबईतून दोन वेळा विजयी झाले होते, तर विशेष म्हणजे ते सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून गणले जात होते. आश्‍चर्याची बाब म्हणजे निवडणूक निधीसाठी काँग्रेसला सर्वात जास्त निधी मिळवून देणारे मिलिंद देवरा हे होते. विशेष म्हणजे ते काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, खजिनदार म्हणून त्यांनी चार वर्षे काम केले. उद्योगपती शिवाय मुस्लीम, गुजराती, मारवाडी अशा समाजामध्ये त्यांचा चेहरा होता. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचे तर आश्‍चर्य वाटते. त्यांची राज्यसभेची मुदत साडेचार वर्षे शिल्लक असताना त्यांनी ही राज्यसभेची उमेदवारी घेतली याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. पक्षांतर कायद्यांतर्गत आपले पद जाऊ नये या अनुषंगाने त्यांनी हे राज्यसभेचे खासदारपद घेतल्याचे सांगण्यात येते.

महाराष्ट्रात सध्या कोण कुणाकडे आहे याचा पत्ताच नाही. काँग्रेसचे १५ आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात काही नावेही वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाली होती. त्याबाबत कोणीही अजूनपर्यंत तरी इन्कार केला नाही. यामध्ये अनेक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांचे चिरंजीव, कन्या असल्याचे बोलले जाते. हे जरी सत्य असले तरी नारायण राणेंसारख्या तगड्या नेत्याला डावलण्यात आले.

पंकजा मुंडे यांचे नाव वारंवार घेतले जात होते, परंतु त्यांनाही उमेदवारी देण्यात आली नाही. माधव भांडारी यांना उमेदवारी न दिल्याबद्दल त्यांच्या चिरंजीवाने जाहीर खंत व्यक्त केली. याशिवाय अनेक निष्ठावंत भाजप कार्यकर्ते या सर्व प्रकाराने संतप्त आहेत. भाजपची जी अवस्था आहे तीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची असून राष्ट्रवादीमध्ये सुद्धा फारसे आलबेल आहे असे नाही. प्रफुल्ल पटेल यांची मुदत शिल्लक असताना त्यांना राज्यसभेवर देणे योग्य नव्हते, परंतु भाजपने गोंदिया ही लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास नकार दिल्याने प्रफुल्ल पटेल यांनी आपले स्थान पक्के करून घेतले. कारण शरद पवार, अजित पवार या काका-पुतण्याच्या दुफळीत महत्त्वाची भूमिका प्रफुल्ल पटेल यांनी स्वीकारली होती. खरं पाहू गेल्यास प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांचे दिल्लीतले उजवे हात म्हणून ओळखले जात होते, परंतु त्यांनीही शरद पवारांचा हात सोडला. याबाबत मला आठवते, सुरेश कलमाडी हे शरद पवारांचे उजवे हात म्हणून १९९०-९१ पर्यंत ओळखले जात होते. नरसिंह राव पंतप्रधान होण्याच्या स्पर्धेत शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते आणि त्यांची सर्व सूत्रे ही सुरेश कलमाडी यांच्याकडे होती; परंतु पवारांना त्यावेळी ७२ मतांच्या पुढे जाता न आल्याने नरसिंह राव पंतप्रधान झाले हा ताजा इतिहास आहे.

महाराष्ट्रात सध्या जे काही चालले आहे, त्याने राज्यातील जनताही अस्वस्थ आहे. विशेष म्हणजे प्रथमच राज्यसभेवर उद्धव गटाच्या शिवसेनेचा व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवारच स्पर्धेत नाही. याउलट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातवा उमेदवार देणार होते; परंतु पुढच्या काळात काही वेगळे घडू नये म्हणून सातवी जागा लढण्यास भाजप हायकमांडने नकार दिला. सध्या तरी महाराष्ट्राचे सगळे राजकारण हे देवेंद्र फडणवीस हेच चालवतात अशी उघडपणे सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. एकूण सगळा निचोड पाहता विरोधी पक्षाचे अस्तित्व संपले असून महाराष्ट्रात विरोधी पक्ष राहतो की नाही, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू होत असतानाच भाजप कार्यकर्त्यांमधील असंतोष हा पक्षाला परवडणारा नाही. निष्ठावंतांना डावलून जे राजकारण देवेंद्र फडणवीस हे करत आहेत त्याबद्दल पक्षामध्ये प्रचंड नाराजी आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी मंत्री व गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील यांना साखर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आल्याने सहकार क्षेत्रांतील भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी हे नाराज झाले आहेत. हर्षवर्धन पाटील यांना केंद्रातील हे पद देताना फडणवीस यांनी बारामतीची जागा एनडीए आघाडीला मिळावी यासाठी हर्षवर्धन यांना दिल्लीत पाठविले आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळजवळ जाहीर झाली असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व अध्यक्ष शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे या आहेत. त्यामुळे ही लढत महत्त्वाची ठरत असल्याने हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघातून दिल्लीत पाठविले आहे. कारण इंदापूर हा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात मोडतो. त्याचे सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी भाजपने राजकारण केले असल्याचे उघडपणे बोलले जाते. ही सर्व परिस्थिती पाहता सर्वच राजकीय पक्षांत अस्वस्थता आहे हे नाकारता येणार नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in