हे घडणारच होते..!

खासदार संजय राऊत हे ‘ईडी’च्या कार्यालयात हजर न झाल्याने ‘ईडी’चे पथक रविवारी संजय राऊत यांच्या निवासस्थानी धडकले.
 हे घडणारच होते..!

शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांची सुमारे १५ तास चौकशी केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने त्यांना अटक केली. सक्तवसुली संचालनालयाने समन्स बजावूनही खासदार संजय राऊत हे ‘ईडी’च्या कार्यालयात हजर न झाल्याने ‘ईडी’चे पथक रविवारी संजय राऊत यांच्या निवासस्थानी धडकले. तेथे दिवसभर चौकशी केल्यानंतर संजय राऊत यांना ‘ईडी’च्या कार्यालयात नेण्यात आले. खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानामधून सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ११.५ लाख रुपयांची रोकड जप्त केली. ‘ईडी’च्या कार्यालयात नेण्यात आल्यानंतर तेथेही संजय राऊत यांची चौकशी झाली आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. ‘माझा आवाज बंद करायचा आणि उद्धव ठाकरे यांना कमकुवत करायचे आहे, हे ठरले आहे. त्यासाठीच ही कारवाई सुरू आहे’, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ‘ईडी’ने आपल्यावर काही आरोप केले असले तरी आपल्या हातून काहीच चुकीचे घडलेले नाही, केवळ सूडबुद्धीने आपल्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे जनतेला दाखवून देण्याच्या हेतूने खासदार संजय राऊत हे आपल्या समर्थकांच्या गराड्यात उजळ माथ्याने, ‘मरेन; पण झुकणार नाही’, असे म्हणत ‘ईडी’च्या कार्यालयाकडे गेले! जे काही सुरू आहे, ते शिवसेना तोडण्यासाठीच, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही, संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘हे सगळे कारस्थान लाज, लज्जा, शरम सोडून चाललेले आहे, ही सर्व कारस्थाने उलथून टाकण्याची आज गरज आहे. शेवटच्या क्षणापर्यंत या जुलूमशाहीविरुद्ध लढत राहू’, असा इशाराही शिवसेना पक्षप्रमुखांनी दिला आहे. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठी माणसाविरुद्ध केलेल्या वक्तव्यामुळे जो असंतोष निर्माण झाला, त्यावरून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी ‘ईडी’ने कारवाईसाठी हा मुहूर्त निवडला, असा आरोप शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. खासदार संजय राऊत यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने जी कारवाई केली, ती गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकासासंबंधात झालेल्या कथित प्रचंड आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित आहे. या सर्व प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत, हौसिंग डेव्हलपमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चरचे राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि अन्य संचालकही गुंतले आहेत. पत्राचाळ पुनर्विकासाद्वारे चटई क्षेत्र निर्देशांकाची अन्य बांधकाम विकासकांना परस्पर विक्री करून त्याद्वारे १,०७४ कोटी बेकायदेशीरपणे जमविल्याचे तपासात दिसून आले आहे. प्रवीण राऊत यांनी हा पैसा मित्र आणि नातलग यांच्याकडे वळविला, असे तपासात आढळून आले. यातील जे ८३ लाख रुपये प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या मार्फत संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा केले होते, त्यातूनच संजय राऊत यांनी दादरचा फ्लॅट खरेदी केल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. या शिवाय आर्थिक गैरव्यवहाराचे अन्य आरोपही संजय राऊत यांच्यावर आहेत; पण आपल्याविरुद्धचे पुरावे बोगस असल्याचे खासदार संजय राऊत यांचे म्हणणे आहे. दरम्यान, संजय राऊत निरपराध असतील तर त्यांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली असली तरी विविध पक्षातील जे वादग्रस्त नेते भाजपच्या आश्रयाला गेले, त्यांना ‘ईडी’सारख्या संस्थांकडून अभय कसे काय मिळते, हे न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही! ज्यांच्या हातून गुन्हे घडले, त्या सर्वांवर भेदभाव न करता कारवाई व्हायलाच हवी. सक्तवसुली संचालनालय कोणत्याही दबावाशिवाय स्वतंत्रपणे कार्य करीत असल्याचे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात तसे दिसून येत नाही, हे अमान्य करता येणार नाही. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना अटक झाल्याने शिवसेनेची बाजू आक्रमकपणे कोण मांडणार, हाही त्या पक्षापुढे मोठा प्रश्न आहे. खासदार संजय राऊत हे समन्स बजावूनही ‘ईडी’च्या चौकशीस सामोरे जाण्यास टाळत होते. शेवटी ‘ईडी’लाच त्यांचे निवासस्थान गाठावे लागले! खासदार आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्याबाबत असे काही घडेल याची चर्चा होतीच! अखेर तसे घडले! आपण निर्दोष असल्याचा दावा करणारे खासदार संजय राऊत या सर्व प्रकरणातून तावून सुलाखून बाहेर पडतात का, ते पाहायचे!

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in