विचार आणि मानसिक ताणतणाव

एकदा का मनात नकारात्मक विचार रुजायला सुरुवात झाली, तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर दिसणारच
विचार आणि मानसिक ताणतणाव

एकदा दोन मित्र बऱ्याच कालावधीनंतर भेटले. त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी पुन्हा पुन्हा भेटण्याचं ठरवलं. पहिल्या भेटीदरम्यान त्यांना इतका आनंद झाला होता की, ते जुन्या आठवणीतच रमले होते. एकमेकांच्या तब्येतीची चौकशीही त्यांनी केली नव्हती. ते परत भेटले, तेव्हा मात्र तब्येतपाणी या विषयावर बरीच चर्चा झाली. त्यांच्या वरचेवर भेटी होऊ लागल्या. एक दिवस पहिला मित्र दुसऱ्‍याला म्हणाला, ‘‘काय झालं रे.. जरा अशक्त वाटतोयस.’’ खरंतर दुसऱ्‍याला आतून अशक्त वगैरे काहीही वाटत नव्हतं. पुन्हा ते भेटले तेव्हा पहिला मित्र म्हणाला, ‘‘अरे हल्ली तू खूपच बारीक आणि आजारी असल्यासारखा जाणवतोयस. बघ तू चालतानाही लडबडत आहेस.’’ झालं, मित्राच्या बोलण्याने हा उदास झाला. आजारपणाचा विचार करू लागला आणि चालताना लडबडू लागला. लोक विचारू लागले काय झालंय. तो म्हणायचा, “काही नाही हल्ली जरा तब्येत बिघडलेलीच असते.” तब्येत बिघडण्याचं कारण ना तो मित्र होता, नाही त्याला कुठला शारीरिक आजार होता. कारण होतं कुणीतरी म्हटलं तू आजारी आहेस. त्यानंतर याच्या मनात नकारात्मकता रुजली आणि तो आजारी पडायला लागला.

एकदा का मनात नकारात्मक विचार रुजायला सुरुवात झाली, तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर दिसणारच. अंधारात एखादी लांबलचक एक-दीड फुटाची दोरी बघितली तर घाबरून दरदरून घाम फुटतो. भीती वाटायला लागते. जेव्हा कळतं, तो साप नव्हता तर साधा दोर होता; परंतु ती भीती बराच काळ मनामध्ये राहते. विचारांचे अजाणतेपणी शारीरिक हालचालींवर होणारे परिणाम अभ्यासण्यासाठी थिंकिंग फास्ट ॲण्ड स्लो या डेव्हिड कान्हमन या नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञाने एक प्रयोग केला होता. त्यांनी एका कॉलेजमध्ये ५-५ विद्यार्थ्यांचे दोन गट केले. एका गटाला पर्यावरण, प्रवास, आनंद, मैत्री असे शब्द दिले, तर दुसऱ्या गटाला आजारपण, वृद्ध, तणाव, एकटेपणा असे शब्द दिले. दोन्ही गटांना या शब्दांचा वापर करून एक गोष्ट तयार करायला सांगितले. तयार झालेली गोष्ट लिहून दोन्ही गटांना हॉलच्या बाहेरील कॉरिडॉरच्या शेवटी असलेल्या ऑफिसमध्ये सबमिट करायला सांगितले गेले. विद्यार्थ्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी कॉरिडॉरवर कॅमेरे बसवले होते. निष्कर्ष असा निघाला की, दु:खी शब्द ज्या गटाला मिळाले, त्या सदस्यांना कॉरिडॉर चालायला दुसऱ्या गटापेक्षा जास्त वेळ लागला, तसेच त्यांची देहबोलीसुद्धा संथ होती.

डेव्हिड कान्हमन असं म्हणतात की, विद्यार्थ्यांना नक्की काय तपासलं जाणार आहे, ह्याची जराही कल्पना नव्हती. आपल्या विचारांचा आपल्या शारीरिक हालचालींवर कसा थेट परिणाम होतो, हे ह्या प्रयोगामधून सिद्ध झालं होतं.

मनामध्ये आधी विचार येतो. त्यानंतर भावना येतात. त्यानंतर कृती होते. हा विचार विवेकनिष्ठ असेल तरच होणारे वर्तन सकारात्मक होते. मनात भीती, अपमान, राग, दु:ख, द्वेष, घृणा, मत्सर अशा भावनांना मनात किती वेळ ठेवतो, त्यावर मनाची दुर्बलता किंवा सक्षमता अवलंबून असते. वयाच्या चाळिशीनंतर जेव्हा विविध आजार सुरू होतात, तेव्हा वाटते इतक्या लहान वयात बी.पी, थायराॅइड, शुगरच्या गोळ्या सुरू होतात. खरंतर मनामध्ये साठवून ठेवलेला भूतकाळ, नकारात्मक विचार, असमंजसपणा, वेळोववेळी पटकन दिल्या जाणाऱ्या चुकीच्या प्रतिक्रिया यामुळे शारीरिक आजारांना कुठेतरी निमंत्रण दिलेलं असतं. धाप लागते. घाम येतो. अन्न घशात अडकतं. हातपाय कापतात. झोप लागत नाही. भूक लागत नाही. पित्त उसळून येतं.

या साऱ्या रोजच्या आजारांच्या परिणामांना सामोरं जाताना प्रचंड त्रास होतो. हा शारीरिक त्रास कधीकधी इतका वाढतो की, मृत्यू अचानक दारात येऊन उभा राहतो. अशा वेळी कळतही नाही, अचानक काय झालं. खरंतर अचानक काही होत नसतं. विचारांकडे दुर्लक्ष करणे. शरीराचं न ऐकणे, याचे दुष्परिणाम सहन करावे लागतात. अलीकडे प्रत्येकाला दररोज छोट्या-मोठ्या ताणांना सामोरं जावं लागतं. फारच थोड्या व्यक्ती ताणाचे चागल्या प्रकारे व्यस्थापन करू शकतात. एखाद्या घटनेला देण्यात येणाऱ्‍या नकारात्मक प्रतिसादाचे रूपांतर तणावात होते. आपलं कुणी ऐकत नाही. बाहेर पडताना नेमकी किल्ली सापडत नाही. स्वयंपाक करताना भाजी करपते. पेपर मिळायला उशीर झाला. आॅफिसमध्ये मिटिंग नीट झाली नाही. कुणीतरी स्वत:चा अहंकार पकडून ठेवलंय. हवं ते मिळत नाही. आपल्या मनाविरुद्ध वागणारी माणसं आजूबाजूला आहेत. अशा वेळी सकारात्मक राहणं, सहनशील असणं, शांतपणे घटनेला प्रतिसाद देणं, यामुळे समस्या योग्य पद्धतीने हाताळली जाते. नसेल तर व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन ताणाची किंमत मोजावी लागू शकते.

ताणतणावाचे व्यवस्थापन करायचे म्हणजेच स्वत:ला वेळ देऊन स्वत:च्या विचारांकडे सजगतेने बघणे होय. आपल्याच विचारांकडे स्वत:ला नीट बघता येत नसेल तर आपल्या आजूबाजूचे लोक, आपले डाॅक्टर ज्या उपाययोजना सांगतात, त्या अमलात आणायला हव्यात. बहुतांश वेळा व्यायाम, प्राणायाम याचं महत्त्व सांगितलं आहे. तिकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं जातं. अनेक वेळा दररोज व्यायाम करणारा, ध्यानधारणा करणारा व्यक्ती अचानक जातो, तेव्हा या व्यायामाचा काय उपयोग ही नकारात्मकता रुजते; परंतु व्यायाम करणारा माणूस गेला म्हणून इतरांनी व्यायाम सोडणं घातक ठरू शकतं.

मेंदू विज्ञानाने आता सिद्ध झालं आहे की, आपल्या मेंदूमध्ये विचार निर्माण होणं आपण थांबवू शकत नाही. पुढच्या क्षणी आपल्या मनात कोणता विचार येणार आहे, यावर आपला कंट्रोल नाही; मात्र त्या विचाराला किती महत्त्व द्यायचं आणि त्यावर अधिक विचार करत राहायचं की नाही, हे मात्र १०० टक्के आपल्या हातात आहे. विचारांचा विचार करण्याचे थांबवले तर आपले ताणतणाव बऱ्यापैकी कमी होऊ शकतात. जगभर सध्या प्रसिद्ध होत असलेल्या माईंडफुलनेस उपचार पद्धतीत हे छान प्रकारे शिकवलं जातं. विचार म्हणजे सत्य नव्हे, ह्या तत्त्वाचा माईंडफुलनेस उपचार पद्धतीत महत्त्वाचा वाटा आहे. विद्यार्थांच्या प्रयोगात किंवा लेखाच्या सुरुवातीला मांडलेल्या केसमध्ये त्यांच्या मनात आलेल्या विचारांचा खूप अधिक विचार केला गेला. त्यापासून मुक्त होण्यापेक्षा त्याच्या अर्थांवर विश्वास ठेवला गेला. त्यातून त्यांच्या शारीरिक हालचालींवर परिणाम झाला. कधीकधी फार काळ दुर्लक्ष केलं गेलं, तर त्याहून गंभीर आजार निर्माण होऊ शकतात. हे टाळायला हवे.

दिवसातून किमान काही काळ शांत बसून आपल्या श्वासाकडे लक्ष दिलं तर प्रामाणिक विचार समजतात. विचारांमध्ये सजगता येते. आपल्याला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. समजा की, तुमच्या ऑफिसमधल्या सहकाऱ्याने एका सकाळी गुड मॉर्निंग केलं नाही. ह्या विचारासोबत आता पुढे विचारांची मालिका सुरू होते की, त्याने मला मुद्दाम टाळले, स्वतःला खूप शहाणा समजतो, वगैरे. एक विचार आला, त्याला तुम्ही महत्त्व दिलं, त्याच्यातून अर्थ काढला आणि स्वतःचा ताण वाढवला. त्यापेक्षा मनात विचार आला. आज सकाळी त्याने मला गुड मॉर्निंग केलं नाही, तुम्ही त्या विचाराला महत्त्व दिलं नाही. तर पुढची विचारांची संपूर्ण मालिका आणि त्यातून निर्माण होणारा ताण तुम्ही टाळू शकता.

विचार करण्याची क्षमता मानवी मेंदूच्या अत्यंत उत्तम अशा बाबींपैकी एक आहे; मात्र त्याच्यातच गुरफटून जाणे कितपत योग्य आहे. आपल्या आयुष्यातील ताणतणाव वाढवायचे की, त्याच्यावर नियंत्रण आणून तणावरहित सुंदर आयुष्य जगायचं हे ज्याने त्याने ठरवायला हवं. शारीरिक मानसिक तणावमुक्तीचा ध्यासच घ्यायला हवा.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in