भारतीय संस्कृतीची तीन प्रतीके! सम्राट अशोक, अकबर आणि शिवाजी महाराज

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व राज्य अभ्यास आराखडा २०२४ यात भारतीय संस्कृतीचा अभिमान विद्यार्थ्यांनी बाळगावा असे शिकविण्याचे उद्दिष्ट शिक्षण धोरणात ठरविण्यात आले आहे; पण भारतीय संस्कृती म्हणजे काय हे मात्र या धोरणात स्पष्ट करण्यात आलेले नाही. भारतीय संस्कृती म्हणजे हिंदू उच्च जातींची संस्कृती असे गृहीत धरून धोरणात पुढील मांडणी केली आहे.
भारतीय संस्कृतीची तीन प्रतीके! सम्राट अशोक, अकबर आणि शिवाजी महाराज
Pinterest
Published on

- डॉ. शरद जावडेकर

शिक्षणनामा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व राज्य अभ्यास आराखडा २०२४ यात भारतीय संस्कृतीचा अभिमान विद्यार्थ्यांनी बाळगावा असे शिकविण्याचे उद्दिष्ट शिक्षण धोरणात ठरविण्यात आले आहे; पण भारतीय संस्कृती म्हणजे काय हे मात्र या धोरणात स्पष्ट करण्यात आलेले नाही. भारतीय संस्कृती म्हणजे हिंदू उच्च जातींची संस्कृती असे गृहीत धरून धोरणात पुढील मांडणी केली आहे.

भारतीय संस्कृती ही द्रविड, आर्य, मुस्लिम, ख्रिश्‍चन, बौद्ध, जैन, आदिवासी, शीख, पारशी इत्यादींच्या आदानप्रदानातून तयार झालेली संमिश्र संस्कृती आहे. यात एकारलेपणा नाही तर विविधता आहे ! अशा स्थितीत भारतीय संस्कृतीला हिंदू संस्कृती म्हणणे हे समृद्ध संस्कृतीला संकुचित करण्यासारखे आहे किंवा एक विशिष्ट संस्कृती इतरांवर लादण्याचा, वर्चस्ववादाचा हा प्रयत्न आहे. हा देश एकात्म ठेवायचा असेल, तर या देशातल्या विविधतेचा सन्मान करणे आवश्यक आहे. खरे तर आपल्या दररोजच्या जीवनात आपण ही संमिश्रता सहजपणे स्वीकारली आहे.

आपल्या जीवनातील पोशाख, भाषा, सण, खाद्यपदार्थ, कला, संगीत, साहित्य, परंपरा, धर्म इत्यादी सर्व क्षेत्रात संमिश्रता आपण अनुभवत असतो. पंडित जवाहरलाल नेहरूंनी ‘भारताचा शोध’ या पुस्तकात भारताच्या संमिश्र संस्कृतीचे विहंगम चित्र रेखाटले आहे. म्हणून भारतीय संस्कृतीची तीन प्रतीके आहेत. सम्राट अशोक, अकबर आणि शिवाजी महाराज!

मुळात ‘हिंदू’ हे नावच परक्यांनी भारतीयांना दिलेले आहे. सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे लोक म्हणून हिंदू हे नाव अपभ्रंशातून आलेले आहे. प्रामुख्याने बहुजन समाजाची दैवते यांच्या नावामागे बा हे अक्षर आहे. उदा. विठोबा, खंडोबा, ज्योतिबा, म्हसोबा इ. ही द्रविडांकडून आलेली दैवते आहेत. उपासाला म्हणून साबुदाण्याची खिचडी खाल्ली जाते. त्या साबुदाण्याचे झाड मुळात जपानमधले व नंतर ते भारतात आले. हिंदूंमध्ये काही देवांना शुद्ध शाकाहारी नैवेद्य दाखवला जातो, तर काही देवांसाठी बोकड किंवा कोंबडी कापली जाते. भारताच्या राजमुद्रेखाली असलेले ‘सत्यमेव जयते’ हे शब्द सारसनाथाच्या अशोक स्तंभावरून घेतलेले आहेत, तर राष्ट्रध्वजावरील अशोक चक्र हे गौतम बुद्धांची आठवण करून देते. भारतातील भक्ती परंपरा, संत परंपरा व सुफी परंपरा यात समान सूत्र आहे ते म्हणजे अध्यात्मिक उदारमतवाद, बहुजनवाद, अंधश्रद्धा व कर्मकांडाला विरोध. संत कबीर हे त्याचे उदाहरण आहे. महाराष्ट्रात १६ व्या शतकात संत तुकाराम यांच्या समकालीन शेख मोहम्मद, श्रीगोंदेकर (जि. अहमदनगर) यांनी अनेक मराठी अभंग लिहिले आहेत. पुरुषप्रधान असलेल्या धर्मपरंपरेत अनेक स्त्री संत जनाबाई, मुक्ताई, कान्होपात्रा इत्यादींनी भक्ती परंपरा समृद्ध केली.

मध्ययुगात सम्राट अकबर व छत्रपती शिवाजी महाराज हे या संमिश्र संस्कृतीची दोन मोठी प्रतीके आहेत. अकबराने हिंदूंवरचा जिझिया कर रद्द केला, सती प्रथेला बंदी घातली, त्यांनी गोमांसाचा त्याग केला व राजपूत घराण्याशी विवाहसंबंध जोडले, राखी पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा सुरू केली आणि सर्व धर्मातील चांगली मूल्ये एकत्र करून ‘दीन-इ-इलाही’ हा पंथ स्थापन केला. त्या काळातील स्थापत्यावर मुस्लिम व जैन संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडात, राज्य धोरणात हाच सांस्कृतिक मिलाफ दिसून येतो. शिवाजी महाराजांनी अनेकांना गुरू मानले. यात याकूतबाबा हा एक मुस्लिम संत होता. त्याच्या दर्ग्याच्या दिवाबत्तीची सोय महाराजांनी सरकारी खजिन्यातून केली होती. शिवाजी महाराजांच्या स्वाऱ्यांमध्ये त्यांच्या फौजांनी मशिदीला धक्का लावल्याचे एकही उदाहरण नाही. अनेक मुस्लिम सरदार शिवाजी महाराजांच्या दरबारात होते. शिवाजी महाराज अफजलखानाला भेटायला गेले तेव्हा महाराजांचा वकील होता काझी हैदर, तर अफजलखानाचा वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. मध्ययुगात हिंदू राजांकडे मुस्लिम सरदार होते, तर मुस्लिम राजांकडे हिंदू सरदार होते. यात धर्माचा काहीही संबंध नव्हता. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात त्याला अकबराच्या कार्याची आठवण करून दिली आहे व त्याचा आदर्श औरंगजेबाने ठेवावा, असा सल्ला महाराजांनी दिला आहे. औरंगजेबाचा भाऊ दाराशुको हा संस्कृत पंडित होता व त्याने अनेक संस्कृत ग्रंथांचे पर्शियन भाषेत भाषांतर केले आहे. स्वातंत्र्य चळवळ ही एकात्म संस्कृतीचे उत्तम उदाहरण आहे. १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे बहादूर शाह जफर याच्या नेतृत्वाखाली लढले गेले. तसेच बेगम हजरमल, टिपू सुलतान, अश्रफ उल्ला खान, खान अब्दुल गफार खान, मौलाना आझाद यांचे योगदान विसरता येणार नाही. चिरोल खटल्यात मोहम्मद अली जिना लोकमान्य टिळकांचे वकील होते. भारतीय चित्रपट व भारतीय संगीत हे गंगा-जमनी संस्कृतीचे संपन्न उदाहरण आहे. राज कपूर, देवानंद, लता मंगेशकर यांच्याबरोबर दिलीप कुमार, मोहम्मद रफी, नौशाद, कमाल अमरोही, एम. के. अब्बास, मेहमूद, ए. आर. रहमान, नर्गिस, वहिदा रहमान, तलत मेहबूब, आताचे तीन खान यांनी चित्रपटसृष्टी संपन्न केली आहे.

‘मोहे पनघट पे नंदलाल...’ हे भजन शकील बदायुनी यांनी मधुबालासाठी लिहिले, संगीत दिले नौशाद यांनी व हे भजन गायले आहे लता मंगेशकर यांनी. मोहम्मद रफी यांनी असंख्य मराठी भजने गायली आहेत. बडे गुलाम अली खान, हजरत जान, बिलायत खान, बिस्मिल्ला खान यांचे भारतीय संगीतातील योगदान अमूल्य आहे. आपल्याकडे लग्नसमारंभ बिस्मिल्ला खान यांच्या सनईशिवाय व अफगाणिस्तानातून आलेल्या पण भारतीय झालेल्या ‘जिलेबी’शिवाय संपन्न होत नाही. ‘बिर्याणी’ हा खाद्यपदार्थ सर्व जाती-धर्मांचा झाला आहे. मराठी भाषेतील जमीन, मर्जी, शिफारस असे शब्द पर्शियन भाषेतून आले आहेत तर कायदा, जाहिरात हे शब्द अरबी भाषेतून आले आहेत. थोडक्यात भारतीय संस्कृती ही या अनेक संस्कृतींच्या घुसळणीतून आलेले ‘नवनीत’ आहे. या गंगा-जमनी तहेजीबची ओळख शिक्षण धोरणातून मुलांना होणे आवश्यक आहे, ही खरी ‘आयडिया ऑफ इंडिया’ची संकल्पना आहे.

(लेखक अ. भा. समाजवादी शिक्षण हक्क सभेचे कार्याध्यक्ष आहेत.)

sharadjavadekar@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in