बॅकफूटवर जाण्याची महायुतीवर वेळ

१९७८ नंतरच्या महाराष्ट्राच्या राजकीय चेहऱ्याला नवा रंग देणारा ‘चाणक्य’ म्हणून शरद पवार यांच्या नावाची तर २०१४ नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा बहुरंगी बनविणारा ‘दुसरा चाणक्य’ म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची नोंद इतिहासाने घेतली आहे.
बॅकफूटवर जाण्याची महायुतीवर वेळ
Published on

- राजा माने

राजपाट

१९७८ नंतरच्या महाराष्ट्राच्या राजकीय चेहऱ्याला नवा रंग देणारा ‘चाणक्य’ म्हणून शरद पवार यांच्या नावाची तर २०१४ नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा बहुरंगी बनविणारा ‘दुसरा चाणक्य’ म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची नोंद इतिहासाने घेतली आहे. गेली दहा वर्षे जे पेरले त्याचीच फळे आता या लोकसभा निवडणुकीत मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. अभूतपूर्व राजकीय उलथापालथीनंतर होऊ घातलेल्या पहिल्याच निवडणुकीत दुबळ्या विरोधकांनी एकजुटीने सामना करीत सत्ताधाऱ्यांना पळता भुई थोडी केली आहे. त्यामुळे भाजपासह शिंदे गट, अजित पवार गटाला बॅकफूटवर यावे लागत आहे. त्यामुळे जे पेराल ते उगवते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा कशी असेल याची चर्चा आताच सुरु झाली आहे. प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होतील असे म्हणून ते पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. त्यांनी टाकलेल्या या गुगलीचे कारण फडणवीसांनी आजवर केलेल्या पेरणीला या निवडणुकीत जी फळे मिळणार आहेत त्यामध्ये दडले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दहा वर्षांत आपल्या राजकीय गुणांची उधळण करीत राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ केली. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्राची ओळख आहे. परंतु या पुरोगामी महाराष्ट्रात आजपर्यंत ज्या गोष्टी झाल्या नाहीत, त्या मागच्या काही वर्षांत जाणीवपूर्वक केल्या गेल्या. मागच्या दीड वर्षात तर पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणाऱ्या राजकीय उलथापालथी झाल्या. ज्या राजकीय मुशीत वाढलो किंवा ज्या तत्त्वाचे राजकारण केले, ते सर्व बासनात गुंडाळून केवळ राजकीय सोय म्हणून जे काही केले गेले ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला कलंकित करणारे ठरले. त्याचीच परिणती म्हणून की काय, अभूतपूर्व राजकीय उलथापालथी नंतर होऊ घातलेल्या पहिल्याच निवडणुकीत दुबळ्या विरोधकांनी एकजुटीने सामना करीत सत्ताधाऱ्यांना पळता भुई थोडी केली आहे. त्यामुळे भाजपासह शिंदे गट, अजित पवार गट यांना बॅकफूटवर यावे लागत आहे. त्यामुळे जे पेराल ते उगवते, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

भाजपामधील राज्याच्या राजकारणावर मजबूत पकड असलेले एक अग्रणी नेते म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे. २०१४ मध्ये राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा आपल्या हातात येताच उत्कृष्ट संघटन कौशल्य, कायदेशीर अभ्यास, संसदीय कार्यपद्धतीची योग्य जाण, प्रश्न सोडविण्याची हातोटी आणि राजकीय डावपेच आखत प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्याची क्षमता याच्या जोरावर त्यांनी शरद पवारांनंतर तोडीस तोड राजकीय डावपेच आखणारे युतीचे नेते म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यांनी राजकीय डाव टाकून विरोधी पक्षातील बऱ्याच बड्या नेत्यांना सोबत घेऊन राज्यात आपली पकड मजबूत केली आणि त्याचवेळी स्वपक्षाशी पंगा घेणाऱ्या नेत्यांचे पंख छाटून त्यांचे नेतृत्त्व खुजे करायलाही त्यांनी मागे पाहिले नाही. अलीकडे तर त्यांनी विरोधी पक्षांतील तगड्या नेत्यांवर थेट झडप टाकून अनेक नेते आपलेसे केले. सुरुवातीला भ्रष्ट आणि बदनाम नेत्यांवर सातत्याने तुटून पडत त्यांना आरोपीच्या पिंज-यात उभे केले आणि त्यांची राजकीय कोंडी करून त्यांना आपल्याकडे खेचून आणत भाजपामध्ये त्यांचे शुद्धीकरण करण्याची नवी पद्धत रुढ केली आणि त्यातून पक्ष मजबूत केला. यातून पक्ष वाढला. परंतु भाजपाचा जो निष्ठावान कार्यकर्ता आहे, तो आपोआप दुरावत गेला.

केंद्रात आणि राज्यात सत्ता आणि वरून ईडी, सीबीआय, आयकर यासारख्या तपास संस्थांचा दबाव यामुळे अनेक बड्या नेत्यांवर, पदाधिकाऱ्यांवर तसेच मूग गिळून बसण्याची वेळ आली आहे. विरोधी पक्षांतील नेत्यांबाबतही याच यंत्रणांचा पुरेसा वापर करून अनेकांना जेरीस आणले गेले. एवढेच नव्हे, तर त्यांना शरण यायला भाग पाडले. त्यामुळे वैचारिक भूमिकेवर चालणारे महाराष्ट्रातील राजकारण राजकीय वैरत्व निर्माण करणारे ठरले. दबावाच्या माध्यमातून जसा राजकीय प्रभाव वाढत गेला, तसे विरोधकांना नामोहरम करण्यासाठी नवनवी रणनीती आखली गेली आणि प्रत्येक खेळीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी होत गेले. यातून त्यांचा आत्मविश्वास दुणावला आणि त्यानंतर त्यांनी राजकीय शुचिर्भूतता बाजूला सारून राजकीय सोय पाहून प्रसंगी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी ठेवली. त्यामुळे त्यांचा सन्मान वाढण्याऐवजी राजकीय नेते आणि सर्वसामान्यांमध्ये त्यांची एक वेगळी प्रतिमा बनत गेली.

मागच्या पावणेदोन वर्षांतील राजकीय उलथापालथी पाहिल्या तर प्रत्येक राजकीय घडामोडीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रभागी राहिले. त्यामुळे त्यांची राजकीय प्रतिमा उजळ होण्याऐवजी अधिक मलिन होतच गेली. गेल्या वर्षी प्रथम भाजपासोबत २५ वर्षे राहिलेली शिवसेना फोडली आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून राज्यात सत्ता स्थापन केली. हे कमी होते म्हणून की काय बहुमत असतानादेखील लोकसभा निवडणुकीत ‘मिशन ४५’ यशस्वी करण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीवरही घाव घातला. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली. यामागे विरोधी पक्ष दुबळा करण्याचा डाव होता. मुळात या दोन्ही पक्षांतील बरीच नेतेमंडळी भ्रष्टाचाराच्या आरोपांत अडकली होती. त्यांना सन्मान दिला. यासोबतच ते काँग्रेस पक्षालाही धक्के देत राहिले. धक्कादायक बाब म्हणजे विरोधी पक्षांत बदनाम असलेल्या लोकांसाठी तर भाजपा म्हणजे वॉशिंग मशिन वाटावी इतपत बदनाम राजकीय नेत्यांना पवित्र करून टाकण्याचे काम फडणवीस यांच्या कार्यकाळात घडत गेले. मोडून-तोडून सत्तेचा सोपान गाठणे, त्यासाठी कायद्याचा किस पाडून सोयीचे राजकारण करणे, कायद्याच्या चौकटीत बसवून जे हवे ते मिळविणे असा नवा प्रघात पाडला गेला. याच भूमिकेतून शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्षही ज्यांनी बंड केले त्यांच्याच हाती दिले गेले. एवढेच काय तर गरज नसतानाही विरोधी पक्षांतील बड्या प्रस्थांची खोगीर भरती सुरूच ठेवली आणि त्यांच्या गुन्ह्यांवर पांघरून टाकण्याचे काम केले. भाजपाची सगळी तत्त्वे बाजूला सारली गेली आणि जे जे करायला नको होते ते ते सगळे करून बसले.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ करून कुठलीही राजकीय मर्यादा पाळली न गेल्याने याचा स्फोट सामाजिक स्तरावर होत गेला आणि ऐन लोकसभा निवडणुकीत या अतिरेकाचे तीव्र पडसाद उमटले गेले. राजकीय उलथापालथीनंतर होऊ घातलेल्या पहिल्याच निवडणुकीत कागदावर मजबूत असलेल्या महायुतीवर सातत्याने बॅकफूटवर जाण्याचीच वेळ आली. एवढेच काय, भाजपाचे तगडे नेते, केंद्राचे पाठबळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा आक्रमक नेता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारखे बडे नेते आणि आता मनसेचीही साथ असताना व एवढी मोठी मजबूत महायुती असतानादेखील बॅकफूटवर येण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचे चित्र आहे.

राज्यात महायुतीचे तगडे नेते असताना आणि ते संपूर्ण राज्य पिंजून काढत असतानाही लोकमानसावर त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाहीए. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिरावे लागत आहे. ठिकठिकाणी पंतप्रधान मोदी मोठ्या सभा घेत आहेत. परंतु २०१४ आणि २०१९ चा परिणाम दिसत नाही. उलट एवढ्या सभा घेऊनही मोदींच्या सभांचा म्हणावा तसा सकारात्मक परिणाम होताना दिसत नाही.

राज्यात आतापर्यंत तीन टप्प्यांत लोकसभा निवडणुका पार पडल्या. आता फक्त दोन टप्पेच बाकी राहिले आहेत. अर्थात जवळपास अर्धा महाराष्ट्र संपत आला. मात्र आतापर्यंत झालेल्या तिन्हीही टप्प्यांत भाजप महायुतीला बॅकफूटवर जाण्याचीच वेळ आल्याचे चित्र आहे. उलट खिळखिळा झालेला विरोधी पक्षच अधिक मजबुतीने पुढे जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा राजकीय स्तर अत्यंत खालच्या पातळीवर नेऊन ठेवला आणि सत्तेच्या जोरावर जी काही मनमानी, हुकूमशाही प्रवृत्ती रुजवली, हीच प्रवृत्ती उलथून टाकण्यासाठी तर जनता सज्ज झाली नाही ना... अशी शंका येण्याइतपत महाराष्ट्राचे चित्रं बदलले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अलीकडच्या कारकिर्दीत राज्याच्या राजकारणात जे पेरले, तेच उगवण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

(लेखक नवशक्ति व फ्री प्रेस जर्नल समूहाचे राजकीय संपादक आहेत)

logo
marathi.freepressjournal.in