संविधान वाचवायचे आहे...

आज स्वतःला आंबेडकरी समजणारे जातीवादी पक्षांच्या आणि नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात; त्यांच्या हो ला हो करतात; संविधानाची वाट लागत असताना मूग गिळून गप्प बसतात; सत्तेसाठी आणि संपत्तीसाठी बाबासाहेबांच्या तत्त्वांना हरताळ फासला, तरी त्यांच्यासोबत सत्ता स्थानावर राहतात, तेव्हा अधिक चीड येते. यांच्या बुद्धीची आणि वैचारिक पातळी घसरलेल्या 'या' नेत्यांची कीव करावीशी वाटते.
संविधान वाचवायचे आहे...
Published on

भवताल

ॲड. वर्षा देशपांडे

आज स्वतःला आंबेडकरी समजणारे जातीवादी पक्षांच्या आणि नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात; त्यांच्या हो ला हो करतात; संविधानाची वाट लागत असताना मूग गिळून गप्प बसतात; सत्तेसाठी आणि संपत्तीसाठी बाबासाहेबांच्या तत्त्वांना हरताळ फासला, तरी त्यांच्यासोबत सत्ता स्थानावर राहतात, तेव्हा अधिक चीड येते. यांच्या बुद्धीची आणि वैचारिक पातळी घसरलेल्या 'या' नेत्यांची कीव करावीशी वाटते.

आपण ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी नुकतेच डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या संविधानाचे शिल्पकार. जेव्हा त्यांनी देशाला संविधान अर्पण केले. त्यावेळच्या त्यांच्या भाषणात ते म्हणाले होते की, कितीही चांगले संविधान केले आणि जर ते चुकीच्या लोकांच्या हातात गेले, तर देशाचे वाटोळे होईल आणि जर संविधान फारसे चांगले नसले, पण जर माणसे चांगली असतील, तर देशातल्या लोकांचे भले होईल. याचाच अर्थ स्वतः बाबासाहेबांना सुद्धा मान्य होते की, संविधान हे इथल्या समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय या सगळ्यासाठीच माध्यम आहे. ते एक महत्त्वाचे शस्त्र आहे. ज्या काळामध्ये बाबासाहेब किंवा महात्मा गांधींच्या हातामध्ये संविधानासारखे शस्त्र हाती नव्हते; त्यांच्या बाजूने मानवी मूल्यांवर आधारित कायदा नव्हता; त्या काळात मानवाधिकारासाठी आपापल्या पातळीवर जगाने अचंबित व्हावे, अशा पद्धतीचे आंदोलन या दोघांनी चालवले. महात्मा गांधींनी राजकीय स्वातंत्र्य मिळवून दिले आणि बाबासाहेबांनी सामाजिक स्वातंत्र्यासाठीचा मार्ग प्रशस्त करून दिला.

आज जेव्हा रोज संविधानिक मूल्यांची बरबादी करणारे लोक, त्याच्याशी कोणतीही सहमती नसणारे लोक, ज्यांना जातीची उतरंड हवी आहे, जे स्त्रियांना कमी लेखतात, धर्माधर्मांमध्ये भांडणे लावतात; ज्यांना मनुस्मृती मान्य आहे. किंबहुना तिच्यावर आधारित राज्य इथे ज्यांना स्थापित करायचे आहे, ती मंडळी चैत्यभूमीवर जाऊन जेव्हा बाबासाहेबांना अभिवादन करतात, तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते. वेगवेगळ्या जातीच्या संघटना चालवणारे जेव्हा यांच्या कच्छपी लागतात आणि त्यांच्याप्रमाणेच केवळ कर्मकांड म्हणून बाबासाहेबांना अभिवादन करतात. तेव्हा प्रचंड संताप होतो. त्यांनी स्वतःचा अजेंडा कार्यक्रम कधीच लपवून ठेवलेला नाही. त्या दिशेने टप्प्याटप्प्याने राजकीय सत्ता काबीज करत ते त्या दिशेने शांतपणे वाटचाल करत आहेत. त्यांच्यासोबत त्यांना मान्य असलेल्या मूल्यांवर खरोखरीच श्रद्धा असणाऱ्या लोकांची प्रचंड मोठी फौज आहे. ते स्वतःला सैनिक म्हणवतात. ते चुकीच्या विचारांच्या दिशेने निघाले असतील, तुमच्या-माझ्या मते, परंतु त्यांची कमिटमेंट, त्यांची त्यांच्या विचारांशी असलेली बांधिलकी, त्याला मिळालेल्या प्रचंड अशा सत्ता, संपत्ती आणि सरकारी संस्थांची जोड, यामुळे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ते आपले राजकीय विचार आणि त्या पद्धतीची व्यवस्था आणण्यासाठी कार्यरत आहेत; मात्र बाबासाहेबांना आपण मानतो असे सांगणारे, त्यांच्या पक्षाची अनेक शकले करून माझाच पक्ष कसा खरा आहे असे सांगणारे कोण पुढच्या दाराने, तर कोण मागच्या दाराने केवळ काँग्रेस विरोध म्हणून यांच्या कच्छपी लागलेले आहेत. बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर, चैत्यभूमीवर, संविधानासमोर कर्मकांड केल्यासारखे नतमस्तक होतात आणि यांचा व्यवहार मात्र मनुस्मृतीवाल्यांच्या बरोबर असतो. सत्तेसाठी काही पण; पैशासाठी काही पण. अशी यांची कथनी आणि करणी आहे. तेव्हा या तथाकथित आंबेडकरवाद्यांना सांगावेसे वाटते की, बाबासाहेबांच्या विचाराला हरताना पाहणे हे प्रचंड क्लेशकारक आहे आणि तुम्ही बाबासाहेबांचे आणि संविधानाचे कर्मकांड करू नका; थांबवा ही वैचारिक विटंबना. तुमची कथनी आणि करणी, तुमच्या भूमिका आणि तुमचे वर्तन हे बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात आहे. जाती-धर्माचे राजकारण करणारे, स्त्रियांना कमी लेखणारे, धर्मा-धर्मात भांडणे लावणारे, मनुस्मृतीचे राज्य आणू पाहणारे यांच्यासोबत जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला ‘जय भीम’ म्हणण्याचा अधिकार राहत नाही, असे यांना निक्षून सांगावे लागेल, अन्यथा इतिहास आपल्याला माफ करणार नाही. एक वेळ बाबासाहेबांना आणि संविधानाला न मानणारे आणि उघडपणे आपला अजेंडा चालवणारे क्षम्य ठरू शकतात; परंतु बाबासाहेबांना मानत असल्याचा आव आणणारे आणि रोज बाबासाहेबांच्या संविधानिक मूल्यांचा खात्मा करणारे यापुढे देशाला जास्त घातक ठरतील.

२५ डिसेंबर १९२७ रोजी बाबासाहेबांनी रायगडावर मनुस्मृतीचे दहन केले. शिवाजी महाराजांची राजधानी राहिलेल्या रायगडाची निवड मनुस्मृती दहनासाठी करताना बाबासाहेबांना वैचारिक स्पष्टता होती. अठरापगड जाती धर्माला एकत्र घेऊन महाराष्ट्र धर्माची निर्मिती करणाऱ्या शिवरायांच्या विचारांनीच पुढे जाऊन येथे सामाजिक न्याय आणि समतेची लढाई लढावी लागेल याचे भान असणारे बाबासाहेब खूप मोठे द्रष्टे नेते होते आणि पुढे जाऊन त्यांनीच संविधानाची निर्मिती केली, हा केवळ योगायोग नव्हता. गांधींच्या राजकीय चळवळीला बाबासाहेबांनी संविधान निर्माण करून एक खुबसूरत मोड दिला आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्याचा पाया रचला आहे. समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा भक्कम पाया जरी घातला, तरी पुढे जाऊन हिंदू कोड बिल बनवले आणि ते अस्तित्वात येत असताना विरोध झाला म्हणून भारताचे पहिले कायदेमंत्री असताना देखील बाबासाहेबांनी त्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यावेळच्या काँग्रेसमधीलच जातीवादी मनुवाद्यांना कृतिशील विरोध केला आणि आज स्वतःला आंबेडकरी समजणारे या जातीवादी पक्षांच्या आणि नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात; त्यांच्या हो ला हो करतात; संविधानाची वाट लागत असताना मूग गिळून गप्प बसतात; सत्तेसाठी आणि संपत्तीसाठी बाबासाहेबांच्या तत्त्वांना हरताळ फासला तरी त्यांच्यासोबत सत्ता स्थानावर राहतात, तेव्हा अधिक चीड येते. यांच्या बुद्धीची आणि वैचारिक पातळी घसरलेल्या या नेत्यांची कीव करावीशी वाटते.

स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या काळात लोकशाहीवर आधारित भारताच्या निर्मितीसाठी राजकीय लढाई लढणारे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेस आणि बाबासाहेबांचा नेहमीच एकमेकाला विरोध होता. अगदी पुणे करारचा इतिहास आपणा सर्वांना माहीतच आहे. पण गांधी आणि आंबेडकर यांच्यातील मतभेद नीटपणे समजून न घेता या तथाकथित जातीवाद्यांनी आणि आंबेडकरवाद्यांनी देखील गांधी-आंबेडकर यांच्यातील विरोधाला खतपाणी घालत दलितांना काँग्रेसच्या सोबत कधीही राहू दिले नाही. काँग्रेसचा- म्हणजे महात्मा गांधींच्या काँग्रेसचा- संविधानिक मूल्यांचा आणि बाबासाहेबांच्या चळवळीचा साकल्याने कोणीच नीट अभ्यास केला नाही; त्याची मांडणी केली नाही; त्यामुळे विरोधासाठी विरोध म्हणून काँग्रेस विरोध करता -करता या तथाकथित जातीवाद्यांच्या छावणीत आंबेडकरवादी कधी पोहोचले हे त्यांचे त्यांनाच कळले नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आज दलित समूहाला सक्षम नेतृत्व राहिलेले नाही. बाबासाहेबांना मानणारे त्यांना देवासारखे पूजत आहेत. खरेतर आज देशाला आणि संविधान वाचवण्यासाठी आणि आपल्या वंचित घटकांना, स्त्रियांना, अल्पसंख्याकांना, ओबीसींना नेतृत्व देण्यासाठी विचाराने खरे आंबेडकरी असणाऱ्यांची गरज आहे. संविधान वाचवण्याची ती लीगसी काँग्रेसपेक्षा ही आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्यांकडे, स्त्रीवादी विचारांच्या कार्यकर्त्यांकडे जाते आणि म्हणूनच विचाराने आंबेडकर आणि विचारांनी गांधी आणि विचाराने स्त्रीमुक्ती समजून घेऊन खऱ्या अर्थाने संविधान वाचवण्यासाठी कृतिशील होण्याचा काळ आला आहे. संविधानाला अपेक्षित असलेल्या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी चळवळीच्या आयुधांचा वापर करत सविनय कायदेभंग असेल, निवेदन देणे असेल, कोर्टाचे दरवाजे ठोठावणे असेल, त्यासाठी आंदोलन उभारण्याची गरज आहे. सत्ता योग्य हाती द्यावी लागेल. सत्तेतल्या लोकांबरोबरच विरोधी पक्ष अस्तित्वात राहील यासाठीही प्रयत्न करावे लागतील आणि नोकरदारांनाही जागेवर ठेवावे लागेल आणि हे सगळे फक्त जन चळवळीतून आणि लोक चळवळीतूनच होऊ शकते. याचे भान देण्यासाठी संविधानिक मूल्यांवर विश्वास असणाऱ्या तरुणांची फौज आता पुढे आणावी लागेल. महात्मा गांधी आणि बाबासाहेब एकाच वेळेला समजून घेऊन हा देश वाचवण्यासाठी सक्रिय व्हावे लागेल. महाराष्ट्रातील निवडणुकीनंतरच्या निकालाने तर आता फक्त जन चळवळच महाराष्ट्र आणि देश वाचवू शकतो हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. तेव्हा संस्था-संघटनांमध्ये सक्रिय असणाऱ्या, महात्मा गांधींना मानणाऱ्या, बाबासाहेबांना मानणाऱ्या दलित, वंचित, अल्पसंख्यांक आणि स्त्रियांना नेतृत्व करण्यासाठी पुढे यावे लागेल. हे सगळे आव्हानात्मक नक्कीच आहे, पण अशाच काळात आपल्या नेतृत्वाची कसोटी असते आणि म्हणून हे आव्हान स्वीकारून निराश न होता भिडायची वेळ आली आहे. महाराष्ट्राला पुरोगामी चळवळीचा फार मोठा वारसा आहे तो वारसा आणि संविधानाचा वसा घेऊन बाबासाहेब आणि गांधींच्या विचारातून ऊर्जा घेऊन आपण लढायचे आहे, जिंकायचे आहे. परिवर्तन घडवायचे आहे; संविधान वाचवायचे आहे.

लेखिका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या असून, लेक लाडकी अभियानच्या संस्थापक सदस्य आहेत.

logo
marathi.freepressjournal.in