अंधार युगाकडे ?

आधीच श्रावण महिना सुरू असल्याने सर्वत्र आनंदी आनंद आणि चैतन्यदायी वातावरण आहे.
अंधार युगाकडे ?

देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठीची लगबग सुरू आहे. सरकारी पातळीपासून सर्वच स्तरांवर अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारी कार्यालयांपासून शाळा- महाविद्यालय, सरकारी, खाजगी इमारती विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाल्या आहेत. स्वतंत्र देशाचा प्रतीक आणि राष्ट्राभिमान असलेला राष्ट्रध्वज सर्वच नागरिकांनी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपापल्या घरांवर डौलाने फडकवावा याबाबत सरकारने आवाहन केल्याने आताच लोकांमध्ये घरांवर राष्ट्रध्वज लावण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.

आधीच श्रावण महिना सुरू असल्याने सर्वत्र आनंदी आनंद आणि चैतन्यदायी वातावरण आहे. त्यातच राष्ट्राभिमान, चैतन्य समाधान आणि आनंदाची भर पडली आहे. एखाद्या राष्ट्राच्या आयुष्यातील स्वातंत्र्याची ७५ वर्षे हा कालावधी फार मोठा नसला तरी देशातील प्रत्येक नागरिकासाठी हा कालावधी निश्चितच अभिमानास्पद, गौरवशाली, प्रेरणा व स्फूर्तिदायी आहे. स्वातंत्र्याचा अभिमान प्रत्येकाला आहे आणि तो असायला हवा. पारतंत्र्यातील आयुष्यापेक्षा स्वतंत्र देशातील जगणे कधीही सरसच ! याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. परंतु या स्वातंत्र्यातील जगणे सर्वांसाठीच सुसह्य झाले आहे काय ? पारतंत्र्यातील अन्याय, अत्याचार, शोषण, गुलामगिरी, विषमता, भेदभाव आदी माणूसपण नाकारणाऱ्या आणि मानवी हक्क हिरावून घेणाऱ्या काळया पाऊलखुणा स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात पुसल्या गेल्या ? की त्या पूर्वी इतक्याच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक ठसठशीत दिसू लागल्या आहेत ? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना याही गोष्टींचा लेखाजोखा मांडा वयास हवा.अनेक वेळा जे सारे छान छान दाखविले जाते त्याच्या मागे वेदनादायी आणि अब्रूची लक्तरे वेशीवर टांगणारे भयाण वास्तव दडलेले असते. हे भयाण वास्तव सर्वांना दिसत नाही असे कसे म्हणता येईल ? ते दिसते, परंतु न दिसल्यासारखे केल्यामुळेच सारा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असतानाच देशातील आदिवासी समाजातील ७५ आदिम जमातींत पैकी ९२ टक्के माडीयांना तर ७४ टक्के कोलामांना "स्वातंत्र्य म्हणजे काय"? हेच ठाऊक नसल्याबाबत एका सर्वेक्षणातून समोर आलेली धक्कादायक माहिती १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य ७५ वर्षांनंतर देखील ते या देशातील सर्वांना मिळालेले नाही, ते सर्वांपर्यंत पोहोचलेले नाही हे अधोरेखित करणारी आहे.

याच देशातील डोंगर -कपारीत, वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या विविध समाजातील असंख्य लोकांना अजून स्वातंत्र्य काय हे जेथे ठाऊक नाही तेथे घटनादत्त अधिकार ठाऊक असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तर दुसरीकडे ज्यांना स्वातंत्र्य ठाऊक आहे, परंतु त्या स्वातंत्र्यातील जगणे त्यांना मरण यातना देत छळत असल्याने या स्वातंत्र्यात आपले जगणे सुसह्य होईल याबाबत भ्रमनिरास झालेले अनेक जगाचे पोशिंदे, अन्नदाते असणारे शेतकरी गळ्याभोवती फास आवळून मृत्यूला कवटाळत आहेत. तर काही शेतकरी, गरीब ,सर्वसामान्य माणसे घरातील अठराविश्व दारिद्र्य उपासमार यापुढे शरणागती पत्करत घरातील खेळण्या-बागडण्याच्या वयातील कोवळ्या मुलींचा मिळेल त्या आणि जसा असेल तशा मुलांबरोबर लग्न लावून देत आहेत. बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा असला तरी तो गुन्हा करून अनेक जण याच स्वतंत्र देशात मोठ्या संख्येने बालविवाहाकडे वळावेत आणि त्यामध्ये पुरोगामी आणि प्रगत म्हणून देशभर बिरुदावली मिरवणारा महाराष्ट्र अग्रेसर असावा ही स्वतंत्र देशातील कशाची चिन्हे म्हणायची ? प्रकाशाची की अंधाराची ? याचा अर्थ आपण पुन्हा एकदा अंधार युगाकडे निघालोय हे आहे.

कविवर्य मंगेश पाडगावकर आपल्या गीतात म्हणतात , "आता उजाडेल, आता उजाडेल, खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार".... कवीवर्यांना अशी अपेक्षा होती की, स्वातंत्र्यानंतर तरी चोहोबाजूला पसरलेला खिन्न आंधळा अंधार ओसरेल आणि स्वातंत्र्याचा प्रकाश प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल की जो प्रकाश सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान देणारा, दुरितांचे तिमिर दूर करणारा, रंजल्या-गांजलेल्याचे दारिद्र्य हरण करणारा असेल. परंतु आज देखील अमृत महोत्सव साजरा करताना अनेकांच्या घरातील, आयुष्यातील अंधार संपलेला तर नाहीच उलट तो अधिक गडद होत जावा यापेक्षा स्वतंत्र देशातील नागरिकांचे दुर्दैवी ते काय असू शकते ? खरंतर आनंदाच्या वेळी आनंदाचे गुणगाण गायचे असते. परंतु त्या आनंदाच्या मागे घनघोर अंधार असेल आणि त्या अंधारात आपल्यासारख्याच माणसांच्या, परंतु ज्यांचे माणूस पण आम्ही नाकारले आहे, ज्यांचे मानवी हक्क आम्ही हिरावून घेतले आहेत, ज्यांना आम्ही किमान मूलभूत सोयी सुविधांपासून कित्येक योजने दूर ठेवले आहे, अशांच्या वेदनादायी किंकाळ्या ऐकू येत असताना त्याकडे दुर्लक्ष कसे करता येईल ?

एका बाजूला या स्वतंत्र देशातील काही टक्के लोक विकास आणि प्रगतीचे वाटेकरी होत अधिकाधिक सुख,संपत्तीच्या शोधात प्रकाशातून मार्गक्रमण करीत असतानाच दुसरीकडे मात्र असंख्य लोकांचा प्रवास पुन्हा एकदा मागच्या दिशेने अंधाराकडे सुरू असावा ही बाब मिळालेल्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी, "खेड्याकडे चला" असे सांगत खेड्यांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्याविषयी सूचित केले होते. स्वातंत्र्यापासून देशात आणि देशातील सर्व राज्यांमध्ये सत्तास्थानी आलेल्या राज्यकर्त्यांनी विकासाची सुरुवात खेड्यांपासून, वाड्या -वस्त्या आणि डोंगर कपारीत राहणाऱ्या विविध समाजापासून केली असती तर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अंधाराऐवजी प्रकाश दिसला असता. देशातील सारेजण प्रकाशाचे सोबती झालेले दिसले असते. दारिद्र्य, कुपोषण, उपासमार, आत्महत्या अशा गोष्टींपासून समाज दूर गेलेला दिसला असता; परंतु जगण्यात जर - तर ला महत्त्व नसते. वास्तव महत्त्वाचे असते. पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्रात सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या, आदिवासी पाड्यांवर सुरू असलेले कुपोषणाचे थैमान, उपासमार, बाल विवाहासारख्या कुप्रथेला पुन्हा एकदा जवळ करत बालविवाहाकडे गतीने निघालेला समाज, या बाबी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना राज्य किती वेगाने अंधाराकडे चालले आहे हे दर्शविणार्‍या आहेत.

राज्यात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न गंभीर बनलेला आहे .या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी, पिकविमा योजना आदी देऊन सातत्याने सरकारी पातळीवरून प्रयत्न केले जात असले तरी त्याला म्हणावे तसे यश आलेले नाही .पाणीटंचाई आणि या ना त्या कारणाने सतत घोंगावणारे दुष्काळ असे समीकरण असलेल्या मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे .जानेवारी ते जुलै २०२२ या सात महिन्यात मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील ५४७ शेतकऱ्यांनी विविध कारणांनी जगणे नाकारत गळफास लावून मृत्यूला जवळ केले आहे. यात बीडमध्ये सर्वाधिक म्हणजे १५५ तर औरंगाबाद मध्ये ९२ आत्महत्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत ४५३ शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली होती. मराठवाड्यातील औरंगाबाद ,जालना, परभणी, हिंगोली ,नांदेड, बीड लातूर ,उस्मानाबाद या सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे थैमान सुरू आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून मराठवाड्यात दमदार पाऊस झाला आहे. परंतु या दोन तीन वर्षात पीककाढणीवर असतानाच झालेल्या पावसामुळे पिकांना जबर फटका बसला आहे.त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.विदर्भात यापेक्षा वेगळी स्थिती नाही. राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेला जनतेचा पोशिंदा आज संकटात आहे. आदिवासी आणि तळागाळातील मोठा समाज दारिद्र्याच्या खाईत खितपत पडलेला आहे. प्रचंड वाढलेली महागाई, हातच्या गेलेल्या नोकऱ्या, त्यातून उभा राहिलेला रोजीरोटीचा प्रश्न, बालविवाहासारख्या प्रथेचा होऊ पाहत असलेला पुनर्जन्म या साऱ्या बाबी महाराष्ट्र आणि देश पुन्हा एकदा अंधार युगा कडे चालल्याची साक्ष देणाऱ्या आहेत. गेल्या अडीच वर्षात पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या एकट्या नंदुरबार जिल्ह्यात तब्बल साडेनऊ हजार बाल विवाह झाल्याची समोर आलेली धक्कादायक माहिती राज्याच्या पुरोगामित्वाचा आणि प्रगतीचा बुरखा टरटरा फाडणारा आहे. एका जिल्ह्यातील ही भीतीदायक माहिती राज्य किती वेगाने अंधारयुगा कडे चालले आहे याची प्रचिती देणारे आहे. ज्या महाराष्ट्रात दोन शतकापूर्वी सामाजिक सुधारणांच्या चळवळीच्या रुपाने स्त्री शिक्षण व बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केले गेले त्याच राज्यात आजही २५ टक्क्यांहून अधिक बालविवाह व्हावेत ही बाब पुन्हा एकदा आपण अंधार युगाकडे निघालो आहोत हे सांगणारी आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव एकीकडे साजरा होत असताना समाज अंधार युगाकडे निघाल्याचे दिसावे ही बाब अजून सर्वांपर्यंत स्वातंत्र्य न पोहोचल्याचे सांगणारी आहे. या अमृत महोत्सवी वर्षात तरी या साऱ्या बाबींचा आम्ही गांभीर्याने विचार करणार आहोत का हा खरा प्रश्न आहे !

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in