आज अर्धे जग होरपळतेय,उद्या आपण असू

पर्यावरणाची बेसुमार हानी करत संपत्ती आणि समृद्धीच्या हव्यासापोटी विकासाच्या नावाखाली निसर्गाचे संतुलन धोक्यात आणले आहे
आज अर्धे जग होरपळतेय,उद्या आपण असू

जागतिक पर्यावरण बदलाचे भयावह परिणाम लवकरच मानव जातीसह साऱ्या सजीव सृष्टीला भोगावे लागतील याविषयी विविध पर्यावरण तज्ज्ञ आणि पर्यावरण अभ्यासकांनी वेगवेगळ्या अहवालातून दिलेले इशारे जगातील बहुतांश देशांनी फारसे गांभीर्याने घेतलेले दिसत नाहीत. उलट या इशाऱ्यांकडे कानाडोळा करत मानवाने निसर्ग आणि पर्यावरणाची बेसुमार हानी करत संपत्ती आणि समृद्धीच्या हव्यासापोटी विकासाच्या नावाखाली निसर्गाचे संतुलन धोक्यात आणले आहे. मानवाच्या या राक्षसी हव्यासापोटी प्रदूषण, मग ते कोणतेही असो, हवा, पाणी, ध्वनीच्या प्रदूषणाने कधीच मर्यादा ओलांडली आहे. २०१९ मध्ये जगभरात कोरोना थैमान घालत असताना तब्बल नव्वद लाख लोकांचा केवळ प्रदूषणाने मृत्यू व्हावा ही बाब जगातील सर्व देशातील प्रदूषणाने कोणती पातळी गाठली आहे हे दर्शवण्यासाठी पुरेशी आहे. प्रचंड वेगाने होणारे औद्योगिकीकरण, वायू वेगाने उभी राहणारी सिमेंटची जंगले, विकासाच्या नावाखाली केली जाणारी अमर्याद वृक्षतोड, परिणामी उघडेबोडके होणारे डोंगर, जलसाठ्यांचे वेगाने होणारे प्रदूषण ,कार्बन-डाय-ऑक्साइडचे मोठ्या प्रमाणात होणारे उत्सर्जन, आदी अनेक कारणांमुळे पर्यावरणाचे संतुलन पूर्णतः बिघडले आहे. परिणामी जगातील उष्णतेचे तापमान नुसते वाढू लागले आहे असे नाही तर त्या उष्णतेने पृथ्वीतलावरील अनेक गोष्टी जाळण्यास सुरुवात केली आहे. प्रचंड वेगाने वाढणाऱ्या या उष्णतेने अर्धे जग होरपळत आहे. युरोप जळतो आहे, उद्या या आगीच्या भक्ष्यस्थानी आपण असू !

सूर्य देवाचा प्रकोप सध्या जगातील अर्ध्या अधिक देशांवर होत असला तरी तो उद्या भारतावर होणार नाही अशा भ्रमात असू तर तो आत्मघात ठरेल. ढासळते पर्यावरण आणि वेगाने वाढणारे उष्णतामान यांनी अक्राळ-विक्राळ रूप धारण करण्यापूर्वी आपण त्याची दखल घेणार नसू तर मानवाचा विनाश अटळ आहे. आज वाढते प्रदूषण आणि उष्णता वाढीच्या भयावह परिणामांची धोक्याची घंटा वाजू लागली आहे. त्याचा आवाज ऐकून आताच सावध होऊन आपल्याकडून सुरू असलेल्या पर्यावरणाच्या विनाशकारी कृत्याला वेळीच पायबंद घालून निसर्गाचे ओरडणे थांबवावयास हवे." क्रिया तशी प्रतिक्रिया" हा निसर्गाचा नियमच आहे. आम्ही निसर्गाला ओरबडून त्याच्याच छाताडावर बेधुंद होऊन नाचणारा असू तर निसर्ग आपला प्रताप दाखविल्याशिवाय कसा राहील ? महाप्रलय, भूकंप, ज्वालामुखी, भीषण दुष्काळ, चक्रीवादळ असे प्रताप निसर्ग मानवाला दाखवतच आहे. आता उष्णतेच्या रूपाने त्याने अनेकांना भाजून काढण्यास सुरुवात केली आहे. पृथ्वीवरील अनेक भागात सध्या उष्णतेचा कहर सुरू आहे. युरोप ,अमेरिका आणि चीन मध्ये या संकटाने भीषण रूप धारण केले आहे. फ्रान्स ,स्पेन, पोर्तुगाल सह 20 देशांमधील जंगले ऊष्णतेमुळे पेटू लागली आहेत. एकूणच जगातील अनेक देशात प्रचंड प्रमाणात वाढत चाललेले उष्णतामान, त्यामुळे जंगलांना लागणाऱ्या आगी लक्षात घेता हवामान तज्ञांनी, 'यंदा उष्णतेचे सर्व विक्रम मोडीत निघतील ' असा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे सहन करण्यापलीकडे प्रचंड वेगाने वाढत चाललेल्या उष्णतेमुळे अनेक लोक गंभीर आजारी पडतील व त्यातच असंख्य लोकांचा मृत्यू होईल अशी भीती आरोग्य तज्ञांनी वर्तविले आहे. स्पेन मध्ये ५६ ठिकाणी जंगलांमध्ये आग धडधडत असून सुमारे २२ हजार हेक्‍टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. दक्षिण-पश्चिम स्पेनमध्ये पारा ४४ अंशाहून पुढे गेला आहे. तर पोर्तुगालच्या उत्तरेकडील जंगलात लागलेल्या आगीने बारा हजार एकर जंगल जमीन प्रभावित झाली आहे. पोर्तुगालमध्ये जुलैमध्ये पारा ४७ पार गेला. अचानक वाढलेल्या उष्णतेने फ्रान्समध्ये वणवे पेटण्याचे प्रमाण वाढले आहे. जंगले भस्मसात झाली आहेत. तेथे आता जंगले वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात नष्ट झालेली वनसंपदा पुन्हा निर्माण करायची तर त्याला फार मोठा काळ वाट पाहावी लागेल. तोपर्यंत उघड्या बोडक्या झालेल्या जंगलांमुळे पर्यावरणीय संतुलन अधिकच घसरून सर्वच बाबतीत त्याचे भयावह परिणाम तेथील मानवाला भोगावे लागतील हे निश्चित. अचानक वाढलेल्या उष्णतेने अर्धे जग त्रस्त झाले आहे. झाडून जंगले पेटू लागली आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे संपूर्ण इंग्लंड त्रासून गेले आहे. इंग्लंडमधील तापमान सहारा वाळवंटा पेक्षाही अधिक झाले आहे. तेथील हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार देशाचे तापमान पहिल्यांदा चाळीस अंशांच्या पार जाऊ शकते. या आधी २०१९ मध्ये इथे सर्वाधिक नोंदलेले तापमान ३८.७ अंश सेल्सिअस इतके होते. आता तेथे पारा दोन अंशांनी वाढला आहे. ४० अंश सेल्सियस तापमानाने तेथील लोकांना भाजून काढले आहे. अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे तेथील काही भागातील शाळा देखील बंद ठेवाव्या लागल्याचे उघड झाले आहे.

खरंतर वाढत्या उष्णता मानाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी काही देशांनी सुरू केलेले प्रयत्न म्हणजे तहान लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखे आहे, तरीदेखील मानवी जीवनासाठी त्यांनी उचललेली पावले भविष्यात डोक्यावर घोंगावणार्‍या वादळाला काही अंशी अटकाव करणारी, मानवी मृत्यूचा संहार रोखण्यास कारणीभूत ठरू शकतील. जगाचे नेतृत्व करू पाहणारी अमेरिका देखील वाढत्या उष्णतेची बळी ठरू पाहत आहे. वाढत्या उष्णतेच्या झळा अमेरिकेतील सुमारे ५.५८ कोटी म्हणजेच १७ टक्के नागरिकांना बसत आहे. ही उष्णतेची लाट अति भीषण स्तरापर्यंत जाऊ शकते असा अंदाज तेथील हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. जगात अचानक उद्भवलेल्या या उष्णतेच्या लाटे विषयी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासचिवांनी व्यक्त केलेली भीती आणि चिंता जगाच्या अर्ध्या भागात आलेल्या आणि मानवी जीवनासह सर्व सजीवांना होरपळून टाकणाऱ्या उष्णतेची भीषणता दर्शविणारी आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस, यांनी उष्णतेच्या भीषणतेची दाहकता सांगताना म्हटले आहे की, "जंगलांमध्ये लागलेली आग आणि उष्णतेची लाट यामुळे जगातील निम्म्याहून अधिक मानव जातीची सामूहिक आत्महत्या होईल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोणत्याही देशाकडे याचे उत्तर नाही. तरीही आपली ऊर्जा निर्मिती साठी जीवाश्म इंधन जाळण्याची सवय काही जात नाही." महासचिवांनी व्यक्त केलेली भीती आणि उष्णता वाढीस जबाबदार असलेल्या नेमक्या कारणांवर ठेवलेले बोट सर्व देशातील राज्यकर्ते आणि मानवाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे.

जागतिक पातळीवर निसर्ग संवर्धनासाठी काही प्रयत्न सुरू नाहीत असे नाही. प्रत्येक देश कमी अधिक प्रमाणात पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना करीत आहे. जागतिक स्तरावर दरवर्षी हवामान बदल, निसर्ग संवर्धन, वाढते प्रदूषण यावर विचार मंथन करून काही ठोस निर्णय घेण्यासाठी परिषदा होत आहेत हे सारे सुरू असले तरी प्रदूषण वाढत आहे. उष्णतामान वाढत आहे. वृक्षसंपदा कमी होऊन डोंगर बकाल होत आहेत. हवामान बदलाबरोबर पर्जन्यमानात अनिश्चितता आली आहे याचे मूळ कारण म्हणजे निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी विविध देशांकडून केल्या जाणाऱ्या उपाय योजनांपेक्षा निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्या बाबींची संख्या अधिक आहे. पर्यावरणाचे रक्षण केवळ घोषणा करून करता येणार नाही. तर त्यासाठी कठोर उपाय योजना आखत त्यांची तितक्याच गांभीर्याने अंमलबजावणी करावयास हवी. अर्थात पर्यावरण रक्षण, निसर्ग संवर्धन ही केवळ एकट्या सरकारची जबाबदारी नाही. तर ती देशातील प्रत्येक नागरिकाची आहे. यासाठी सर्वांनीच कंबर कसावयास हवी. वृक्षतोड थांबविण्यापासून पर्यावरणाची हानी करणाऱ्या गोष्टी रोखावयास हव्यात. पुढच्या पिढीचे जर आपल्याला उज्ज्वल भवितव्य घडवायचे असेल तर पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावयास हवा. अन्यथा पुढील पिढी आपणास माफ करणार नाही. आज युरोप जळतो आहे उद्या आपण असो याचे भान सतत ठेवल्यास येऊ पाहणाऱ्या निसर्गप्रकोच्या झंझावाताला काही अंशी तरी उंबरठ्या बाहेरच रोखणे शक्य होईल. अगदी अलीकडच्या काळात जगातील काही देशांच्या जंगलात लागलेले वणवे, आलेल्या उष्णतेच्या लाटा ताज्या आहेत .या सगळ्याचा थेट संबंध जागतिक पर्यावरण बदलांशी आहे. पृथ्वीचे सरासरी तापमान औद्योगिक क्रांती अगोदरच्या काळापेक्षा अकरा डिग्री ने वाढले आहे. तापमान वाढ याच वेगाने पुढे चालू राहिली तर भविष्यात काय घडू शकत याच भाकीत वर्तविणारे अनेक शास्त्रीय अभ्यास पुढे आले आहेत. त्यामुळे अशाश्वत विकासाकडे वेगाने सुटलेल्या आपल्या गाडीचा वेग आपण किती लवकर कमी करतो, किती लवकर योग्य दिशेने मार्गस्थ होतो, त्यासाठी आपण काय काय तयारी करतो यावरच समस्त मानव जातीचे पुढील भवितव्य अवलंबून आहे .

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in