क्रिकेटच्या देवाचा वाढदिवस

क्रिकेट हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. म्हणूनच क्रिकेट हा भारताचा धर्म आहे असे मानले जाते आणि खेळात सचिन तेंडुलकर याने जी असामान्य कामगिरी केली आहे...
क्रिकेटच्या देवाचा वाढदिवस

- श्याम ठाणेदार

वेध

क्रिकेट हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. म्हणूनच क्रिकेट हा भारताचा धर्म आहे असे मानले जाते आणि खेळात सचिन तेंडुलकर याने जी असामान्य कामगिरी केली आहे त्यामुळे त्याला क्रिकेटचा देव मानले जाते. आज याच क्रिकेटच्या देवाचा म्हणजे सचिन तेंडुलकरचा ५१ वा वाढदिवस आहे. २४ एप्रिल १९७३ रोजी मुंबईत सचिनचा जन्म झाला. त्याचे वडील रमेश तेंडुलकर हे प्राध्यापक होते तसेच मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक होते, तर आई शिक्षिका होत्या. त्या काळातील प्रसिद्ध संगीतकार सचिनदेव बर्मन यांच्या नावावरून त्याचे सचिन असे नाव ठेवण्यात आले. सचिनने शारदाश्रम विद्यामंदिर या शाळेत रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. रमाकांत आचरेकर यांनी बालवयातच सचिनची गुणवत्ता हेरून त्याला प्रशिक्षण दिले. शाळेत असतानाच सचिनने त्याचा शाळेतील सहकारी मित्र विनोद कांबळी याच्यासोबत हॅरिस शिल्ड स्पर्धेत ६६४ धावांची विक्रमी भागिदारी रचली. सचिनने त्याच्या पहिल्या प्रथम श्रेणी सामन्यातच शतक झळकवण्याचा विक्रम केला. तेव्हा त्याचे वय १५ वर्ष २३२ दिवस होते आणि त्यावेळी पहिल्या सामन्यात शतकी खेळी करणारा तो सर्वात तरुण खेळाडू होता. सचिन हा असा एकमेव खेळाडू आहे ज्याने रणजी, दुलीप व इराणी चषकाच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केल्याने वयाच्या १६ व्या वर्षीच सचिनची भारतीय संघात निवड झाली.

१९८९ साली त्याने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना पाकिस्तानविरुद्ध कराची येथे खेळला. त्या सामन्यात त्याने इम्रान खान, वसीम अक्रम, वकार युनूस, अब्दुल कादिर या दिग्गज गोलंदाजांचा सामना केला. अर्थात त्याला पहिल्या सामन्यात विशेष काही करता आले नाही. अवघ्या १५ धावांवर तो बाद झाला, मात्र पुढच्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावून आपल्या क्षमतेची चुणूक जगाला दाखवून दिली. त्यानंतर तो भारतीय संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर गेला. तिथे त्याने ८८ धावांची लाजवाब खेळी केली, मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती १९९१-९२ च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात. या दौऱ्यात त्याने पर्थमधील उसळत्या आणि वेगवान खेळपट्टीवर शतकी खेळी केली. ज्या खेळपट्टीवर जगभरातील दिग्गज फलंदाज तग धरू शकत नाहीत अशा खेळपट्टीवर सचिनने ऑस्ट्रेलियाच्या दर्जेदार गोलंदाजीसमोर शतक झळकवल्याने हा खेळाडू ‘लंबी रेस का घोडा’ आहे असे जाणकार म्हणू लागले. त्यानंतर सचिनने मागे वळून पाहिले नाही. जगभरातील सर्वच खेळपट्ट्यांवर त्याने धावा काढायला सुरुवात केल्या. १९९६ च्या विश्वचषकात त्याने सर्वाधिक धावा काढून गोल्डन बॅट मिळवली. १९९० च्या दशकात तर सचिनच्या बॅटने अक्षरशः धुमाकूळ घातला. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, श्रीलंका, झिम्बाब्वे अशा सर्वच संघांविरुद्ध त्याने खोऱ्याने धावा केल्या. १९९७ साली विस्डेनने त्याला त्या वर्षीचा सर्वोत्तम वार्षिक खेळाडू म्हणून घोषित केले. याच वर्षी त्याने पहिल्यांदा कसोटीत १००० धावा केल्या. याची सचिनने १९९९, २००१, २००२ साली पुनरावृत्ती केली. सचिनने वर्षात १००० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम सलग सहा वेळा केला आहे. असा करणारा तो एकमेव खेळाडू आहे. सचिन तेंडुलकर हा क्रिकेट विश्वात डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा क्रिकेटपटू आहे. २००२ मध्ये कारकीर्दीच्या बाराव्या वर्षीच, विस्डेनने डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर सार्वकालिक दुसरा सर्वोत्तम कसोटीपटू व व्हीव्ह रिचर्ड‌्सनंतरचा दुसरा सार्वकालिक सर्वोत्कृष्ट एकदिवसीय फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकरची निवड केली होती. स्वतः डॉन ब्रॅडमन यांनी सचिनच्या फलंदाजीत स्वतःची छबी दिसते असे म्हटले होते. २००३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला, मात्र संघाला विश्वचषक जिंकता आला नाही याची त्याला खंत होती.

देशाला विश्वचषक जिंकून द्यायचे हे त्याचे स्वप्न होते. हे स्वप्न २०११ साली पूर्ण झाले. सचिनचे दुसरे नाव म्हणजे विक्रम. विक्रमांचे विक्रम करण्याची असाधारण कामगिरी त्याने केली. त्यांचे विक्रम सांगायला गेलो तर पानही पुरणार नाही. आंतरराष्ट्रीय सामन्यात १०० शतके करणारा तो एकमेव खेळाडू आहे. सर्वाधिक धावा, सर्वाधिक सामनावीर, सर्वाधिक मालिकावीर, सर्वात जास्त सामने, असे कितीतरी विक्रम त्याच्या नावे आहेत. त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, पद्मविभूषण या पुरस्करांनी त्याला गौरविण्यात आले आहे. भारतरत्न या देशाचा सर्वोच्च पुरस्काराने देखील त्याला गौरविण्यात आले. भारतरत्न मिळवणारा तो एकमेव खेळाडू आहे. तो राज्यसभेचा खासदारही होता. भारतीय हवाई दलाने त्याला ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हुद्दा प्रदान केला आहे. त्याला अनेक विद्यापीठांची ‘डिलीट’ ही मानाची पदवी मिळाली आहे. सचिनचा खेळ पाहतच आम्ही लहानाचे मोठे झालो. त्याचा खेळ पाहायला मिळाला हे आमच्या पिढीचे भाग्य.१४० कोटी भारतीयांना आनंद साजरा करण्याची संधी सातत्याने निर्माण करून देणाऱ्या या क्रिकेटच्या देवाला ५१ व्या वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in