नैतिक प्रश्नांवर कायदेशीर उत्तरांचा उतारा

सत्तेला कोणतेही प्रश्न विचारण्याचे धाडस नसलेल्या, लाचारीचे जिणे जगणाऱ्या वृत्तवाहिन्यांसाठी तेवढेच सोयीचे असते
नैतिक प्रश्नांवर कायदेशीर उत्तरांचा उतारा

स्मृती इराणी या भारतीय जनता पक्षाच्या फायरब्रँड नेत्या आहेत. अनेक पत्रकार परिषदांमधून तसेच संसदेतील भाषणांमधून त्यांचा आवेश देशाने पाहिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात नरेंद्र मोदी आणि अमित शहा वगळता बाकीचे नामधारी मंत्री खांदे पाडून चालत असतात. त्या तुलनेत मंत्रिपदाचा अहंकार फक्त एकट्या स्मृती इराणी यांच्या चालण्या-बोलण्यातून जाणवतो. साधारणपणे क्षमतेपेक्षा, योग्यतेपेक्षा अधिक मिळाले की, ज्या एक प्रकारचा अहंकार डोकावत असतो, तो स्मृती इराणी यांच्या वर्तनव्यवहारातून डोकावत असतो. त्याचा साधनशूचितेशी, नैतिकतेशी संबंध नसतो. वारंवार खोट्या गोष्टी केल्या जातात, लपवल्या जातात. खोट्या गोष्टी चव्हाट्यावर येतात, तेव्हा त्या दडपण्यासाठी आक्रमकतेचा आधार घेतला जातो. टीव्हीसारख्या माध्यमांचे महत्त्व त्यांनी ओळखलेले आहे. तिथे दृश्य महत्त्वाचे असते. त्याची पूर्तता त्या करून देतात. त्यांचा रणरागिणीचा आवेश पुन्हा पुन्हा दाखवला जातो. सत्तेला कोणतेही प्रश्न विचारण्याचे धाडस नसलेल्या, लाचारीचे जिणे जगणाऱ्या वृत्तवाहिन्यांसाठी तेवढेच सोयीचे असते. त्यामुळे संसदेतील त्यांचा आवेश वारंवार टीव्हीच्या पडद्यावर दिसत असतो. त्यांच्याशी संबंधित गोव्यातील बार-रेस्टॉरंटच्या विषयाची चर्चा करण्यात मात्र फारसा कुणी रस दाखवला नाही. त्यांची बाजू घेऊन चर्चा करण्याची संधी होती, ती घेऊन निष्पक्षपातीपणाचा आव आणता आला असता, तर तेही करण्याचे धाडस कुणी दाखवले नाही.

मूळ विषय सुरू झाला दोन आठवड्यांपूर्वी. स्मृती इराणी यांच्या मुलीने उत्तर गोव्याकडील आसगाव येथे चालवण्यासाठी घेतलेल्या कथित रेस्टॉरंटमधील बारचा परवाना एका मृत व्यक्तीच्या नावावर असल्याची बाब उघडकीस आली. थेट केंद्रीय मंत्र्यांशी संबंधित प्रकरण असल्यामुळे गदारोळ झाला. स्मृती इराणी यांनी आपली मुलगी बार चालवत नसून तिचा या रेस्टॉरंटशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला. आपली मुलगी १८ वर्षांची असून ती कॉलेजच्या पहिल्या वर्गात शिकत आहे, ती कोणतेही हॉटेल चालवत नाही. काँग्रेसने तिची बदनामी करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. विषय होता गोव्यातील रेस्टॉरंट आणि बारचा. गोव्यातील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने ते उजेडात आणले. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी त्याविरोधात आवाज उठवला. स्मृती इराणी यांच्याकडून महिला व बाल कल्याण विकास खात्याचे मंत्रिपद काढून घेण्याची मागणी करण्यात आली. आता इथे अमेठीचा संबंध आला कुठून? पण स्मृती इराणी यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा, राहुल गांधींनी आगामी निवडणुका अमेठीतून जिंकून दाखवाव्यात, असे आव्हान दिले.

स्मृती इराणी यांनी आपण काँग्रेसने केलेल्या आरोपांना न्यायालयात उत्तर देऊ, असे सांगितले. बोलल्याप्रमाणे त्यांनी काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा, जयराम रमेश व काँग्रेस पक्षाला मानहानीच्या नोटिसा पाठवल्या. संबंधितांनी त्वरित माफी मागावी; अन्यथा कायदेशीर लढाईला सामोरे जावे, असा इशारा त्यांनी दिला. काँग्रेस नेत्यांवर दोन कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला. या खटल्याची सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयात झाली.

या सुनावणीत न्या. मिनी पुष्कर्णा यांनी इराणी यांच्यावर अवमानजनक व खोटे आरोप लावल्याचे सांगितले. या प्रकरणाच्या प्राथमिक माहितीनुसार पुराव्यांची पुष्टी न करता इराणी यांच्यावर बदनामीकारक आरोप करण्यात आल्याचे दिसून येते. अशा आरोपांमुळे इराणी यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्यामुळे ज्या काँग्रेस नेत्यांनी ट्विट, रिट्विट, पोस्ट, व्हीडिओ, छायाचित्रे सोशल मीडियावर केली असतील, तर ती २४ तासांमध्ये हटवण्याचे निर्देश त्यांनी दिले. हे निर्देश न पाळल्यास ट्विटर, फेसबुक, यूट्यूब या सोशल मीडिया कंपन्यांना तसे आदेश दिले जातील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आम्ही दाद मागणार असून, इराणी यांनी केलेल्या दाव्याला आमचेही आव्हान आहे, असे ट्विट जयराम रमेश यांनी केले. रमेश यांचे हे ट्विट खेरा व डिसूझा यांनी रिट्विट केले आहे.

खाद्य संस्कृती आणि तिचा परिचय करून देणारे समीक्षक यांची गेल्या काही वर्षांमध्ये चलती आहे. कुणाल विजयकर हे त्यातले एक महत्त्वाचे नाव आहे. त्यांनी घेतलेली स्मृती इराणी यांच्या मुलीची यूट्यूबवरील मुलाखत यानिमित्ताने पुढे आली. ‘सिली सोल्स कॅफे अॅण्ड बार’ हे संबंधित रेस्टॉरंटचे नाव. सिली सोल्स हे गोव्यातले खाद्यप्रेमींसाठीचे आकर्षणाचे केंद्र होईल, असा विश्वास संबंधित मुलीने कुणाल विजयकर यांना दिलेल्या मुलाखतीतून व्यक्त केला. ही मुलाखत लाखो लोकांनी पाहिली आणि स्मृती इराणी यांच्या मुलीने एका नव्या व्यवसायात पदार्पण केल्याचे पाहिले. तिचे कौतुकही केले; परंतु कौतुक रीतसर मार्गाने होत असते, तोवरच बरे वाटत असते. त्याला फाटे फुटायला लागतात, तेव्हा त्या कौतुकाचे काटे बोचायला लागतात.

स्मृती इराणींचेही तसेच झाले. कारण अनेक चुकीच्या आणि अवैध गोष्टी या रेस्टॉरंटच्या परवानगीच्या दरम्यान घडल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले होते. प्रकरण अंगाशी येते म्हटल्यावर स्मृती इराणी यांनी हात वर केले. गोव्याशी संबंध नाही, त्या रेस्टॉरंटशी संबंध नाही, बारशी संबंध नाही, असं सगळं म्हणाल्या. बऱ्यात बरं म्हणजे चुकूनमाकून मुलीशीही संबंध नाही, असं म्हणाल्या नाहीत.

या मूळ प्रकरणात डोकावताना दिसते ते असे. २१ जुलै रोजी गोव्याच्या अबकारी आयुक्तांनी सिली सोल्स कॅफे अॅण्ड बार या रेस्टॉरंटला कारणे दाखवा नोटीस बजावली. या रेस्टॉरंटच्या परवानाधारकाचा मृत्यू १७ मे २०२१ रोजी झाला, तरीही त्यानंतर त्याच्या परवान्याचे नूतनीकरण झाल्याचे त्यामध्ये नमूद केले आहे. या रेस्टॉरंटने दारुविक्रीचा परवाना मिळवण्यासाठी अवैध मार्गाचा व खोट्या कागदपत्रांचा उपयोग केल्याचेही नोटिशीत म्हटले होते. या रेस्टॉरंटमधील दारुविक्रीचा परवाना अँथनी डिगामा यांच्या नावावर करावा, असे पत्र २२ जून २०२२ रोजी अबकारी खात्याला पाठवण्यात आले होते. प्रत्यक्षात अँथनी डिगामा यांचा मृत्यू वर्षभरापूर्वी झाला होता; पण त्यांचा मृत्यू लपवून २०२२-२३ या काळासाठी परवान्याचे नूतनीकरण करावे, यासाठी डिगामा यांच्यावतीने एक कायदेशीर विनंती पत्र दाखल केले गेले. येत्या सहा महिन्यांत परवाना हस्तांतरित केला जाईल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले होते. यासंदर्भातील गफलतींची तक्रार गोव्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते आयरेस रॉड्रिग्ज यांनी अबकारी खात्याला केली. रॉड्रिग्ज यांनी माहिती अधिकारांतर्गत रेस्टॉरंटची माहिती मागवली. त्यातून अबकारी खात्यातील अधिकारी, तसेच आसगाव पंचायतीशी संबंधितांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला. हा भ्रष्टाचार एका केंद्रीय मंत्र्यासाठी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रॉड्रिग्ज यांच्या मते, गोव्यातील कायद्यानुसार गोव्यातील बारचा परवाना हा चालू असलेल्या रेस्टॉरंटना दिला जातो; पण सिली सोल्स कॅफे अॅण्ड बारने गेल्या फेब्रुवारी महिन्यात अबकारी खात्याचे नियम डावलून मद्य विक्रीचे परवाने मिळवले.

रॉड्रिग्ज यांनी अनेक महिने पाठपुरावा करून हे प्रकरण बाहेर काढले. त्याचे स्मृती इराणी यांच्या कुटुंबीयांशी असलेले संबंधही उघडकीस आणले; परंतु केवळ काही कागदोपत्री त्रुटींचा आधार घेऊन क्लीन चिट मिळवण्याचा प्रयत्न स्मृती इराणी करताहेत. आपले वैफल्य लपवण्यासाठी संसदेत आक्रस्ताळेपणा करताहेत. सोनिया गांधी यांच्या वयाचाही विचार न करता त्यांच्याशी अत्यंत उर्मटपणे व्यवहार करताहेत. महत्त्वाचे म्हणजे गोव्यातील त्यांच्या मुलीशी संबंधित बार रेस्टॉरंटचा प्रश्न हा नैतिकतेशी संबंधित आहे. त्याचे कायदेशीर उत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न त्या करताना दिसत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in