
आपले महानगर
तेजस वाघमारे
ग्लोबल वॉर्मिंगमुळे अचूक अंदाज वर्तवणे दिवसेंदिवस अधिकाधिक कठीण होत आहे. पण म्हणून हवामान विभागाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. ज्या ज्या सूचना येतात त्याप्रमाणे उपाययोजना करणे आवश्यक आहे. नाही तर नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतू शकते.
हवामान खात्याचा अंदाज हा नेहमीच हे सर्वसामान्य नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरतो. हवामान खात्याने वर्तविलेले अंदाज कधीच खरे ठरत नसल्याचे नागरिक छातीठोकपणे सांगतात. मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे बहुतांश वेळा शासन शाळा, शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करते. त्या दिवशी लख्ख ऊन पडलेले असते. या अनुभवामुळे शासनही सुट्टी जाहीर करताना दहा वेळा विचार करत असावे. हवामान खात्याचा अंदाज प्रत्यक्षात खरा ठरतो, तोवर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असते. सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर शासन सुट्टीचा आणि नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा सल्ला देते. यामध्ये शासन स्वतःची जबाबदारी पूर्ण केल्याचे दाखवते. मात्र नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, हे महामुंबईने वारंवार पाहिले आहे.
तंत्रज्ञानामुळे हवामान खाते अधिक सक्षम झाले असले तरी हवामानाचे अंदाज आजही काही वेळा चुकतात. हवामान बदलांचे आव्हान असतानाही भारतीय हवामान विभाग काही तासांपूर्वी पावसाचा नेमका अंदाज वर्तवू लागले आहे. याचा प्रत्यय आठवड्याच्या सुरुवातीपासून मुंबईकरांना आला आहे. हवामान खात्याकडून अतिवृष्टी, वादळ, उष्णतेची तीव्र लाट याची तंतोतंत माहिती उपलब्ध होऊ लागली आहे. यामुळे प्रशासन आणि नागरिकांना सतर्क राहणे सोपे झाले आहे. मात्र अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतरही शासन झोपेतच असल्याने मुंबईतील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. याबाबत ना लोकप्रतिनिधींना जनतेची काळजी आहे, ना सरकारला. सर्व काही आलबेल असल्याप्रमाणे राज्याचा कारभार हाकला जात असल्याने यामध्ये सर्वच स्तरातील नागरिक भरडले जात आहेत.
भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबईने राज्यात १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. त्याप्रमाणे राज्याचा आपत्कालीन विभाग सज्ज झाला. परंतु अतिवृष्टीमध्ये मुंबईतील नागरिक सुरक्षित राहावा यासाठी ठोस निर्णय घेण्यात प्रशासन अपयशी ठरले. मुंबईत गेले दोन दिवस पावसाची धुवांधार बॅटिंग सुरू आहे. या कालावधीत स्वातंत्र्यदिन, गोपाळकाला आणि रविवारची शासकीय सुट्टी येत असल्यामुळे असेल कदाचित, पण जोरदार पावसाचा इशारा प्रशासनाने गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. सलग आलेल्या तीन सुट्ट्यांमुळे सुस्तावलेले प्रशासन सोमवारी (दि.१८) दुपारी झोपेतून खडबडून जागे झाले. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने चाकरमान्यांनी कार्यालयात वेळेत पोहोचण्यासाठी रोजची तारेवरील कसरत केली. तशीच धावपळ शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी विद्यार्थी-पालकांची झाली. पावसाचा जोर सकाळपासूनच तीव्र होता. यामुळे ठिकठिकाणी पाणी भरण्यास सुरुवात झाली. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर काही स्थानकांदरम्यान पाणी साचले आणि रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले.
पहिल्या सत्रातील शाळा सुटण्यापूर्वी आणि दुपारच्या सत्रात शाळेत जाण्यासाठी मुले घरातून निघाली असतानाच महापालिकेने दुपारच्या सत्रातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. यामुळे पहिल्या सत्रातील मुलांना घरी घेऊन जाण्याबाबतचे मेसेज शाळांच्या ग्रुपवर पडले आणि पालकांची पळापळ सुरू झाली. साचलेल्या पाण्यातून वाट काढत मुले, पालकांनी घर जवळ केले, तर किंग्ज सर्कल स्थानकाजवळ पाण्यात बस बंद पडल्याने शाळकरी मुले बसमध्ये अडकून
पडली. या मुलांना अखेर पोलिसांनी बसबाहेर सुरक्षितरीत्या काढून पोलीस ठाण्यात आधार दिला. अनेक मुलांवर पावसाळ्यात असा बाका प्रसंग येतो. यानंतरही प्रशासन जागे होण्यास तयार नसल्याचे आज पुन्हा पाहण्यास मिळाले.
मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचते. यामुळे जनजीवन विस्कळीत होते. पावसाळ्यात सखल भागातील पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी लाखो-करोडो खर्चुन विविध उपाययोजना करण्यात येतात. यानंतरही या यंत्रणांना अपयश येते. पाऊस अधिक होत असेल. मात्र याचे योग्य नियोजन पालिका प्रशासनाकडून होताना दिसत नाही. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यास प्रशासन केवळ औपचारिकता म्हणून "आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे" असे आवाहन करून मोकळे होते. मात्र हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना कितीही संकटे समोर असली तरी घराबाहेर पडावेच लागते. मात्र शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे अधिकार असताना प्रशासन सुट्टी जाहीर करण्याऐवजी थेट मुंबईची तुंबई झाल्यावर सुट्टी जाहीर करून पालक-विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालत असल्याचे सोमवारच्या गोंधळावरून दिसले.
हवामान बदलामुळे देशातील हवामानाचा अंदाज वर्तविणे अधिक कठीण बनले आहे. याची कबुली भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी एका नामांकित वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी अचानक होणारी ढगफुटी, काही तासांत होणारी अतिवृष्टी, गारपीट किंवा उष्णतेची तीव्र लाट याचा अंदाज वर्तविणे कठीण असल्याचे म्हटले आहे. यानंतरही हवामान विभाग अचूक माहिती देण्यासाठी प्रयत्नशील असताना
शासनाने दुर्लक्ष करणे हे मोठ्या दुर्घटनेस निमंत्रण देण्यासारख आहे. लहरी हवामानाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासनाने वेळीच ठोस निर्णय घेऊन जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. अन्यथा तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखा प्रकार ठरेल. आणि यामध्ये अनेकांना संकटांना सामोरे जावे लागेल. यासाठी हवामान विभाग आणि शासन यंत्रणेतील समन्वय वाढवणे ही काळाची गरज बनली आहे.
हवामान विभागाने यापूर्वी दिलेले अॅलर्ट फसवे ठरले आहेत. अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार शासनाने सुट्टी जाहीर केल्यावर त्या दिवशी पाऊस पडला नसल्याचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळेच कदाचित शासन अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतरही तातडीने पावले उचलत नाही. याची प्रचिती मंगळवारीही (दि.१९) आली. शासनाने एक दिवस अगोदरच शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. मात्र शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू होण्यापूर्वी घरून काम करण्याचे आदेश देण्यात आले. कामावर वेळेत पोचण्यासाठी घरातून निघालेले कर्मचारी कार्यालयाजवळ पोहचत असताना शासनाचे आदेश आल्याने कर्मचाऱ्यांनी पुन्हा घरचा रस्ता धरला. यातून शासनाचा नियोजनशून्य कारभार समोर आला.
हवामान बदलामुळे भविष्यात मोठ्या शहरांना संकटांना सामोरे जावे लागणार आहे. हे ओळखून राज्य शासनाने हवामान विभाग अधिक सक्षम करण्यासाठी आणि विभागाच्या अंदाजानुसार नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियोजन करणे गरजेचे आहे. 'लांडगा आला रे आला' गोष्टीप्रमाणे मुंबईकरांची अवस्था होऊ नये, यासाठी दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय गरजेचा आहे.
tejaswaghmare25@gmail.com