उत्तर भारतातील सत्यशोधक चळवळ

उत्तर भारतामध्ये पुराणमतवादी विचारांचा मोठा पगडा आजही आहे. हा धर्मांध पगडा दूर करण्यासाठी ‘अर्जक संघ’ गेल्या ५५ वर्षांपासून कार्य करत आहे. ‘अर्जक संघ’ मनुष्याच्या जीवनातील फक्त दोन संस्कार महत्त्वाचे मानतो.
 उत्तर भारतातील सत्यशोधक चळवळ
Published on

- राहुल थोरात

भ्रम-विभ्रम

उत्तर भारतामध्ये पुराणमतवादी विचारांचा मोठा पगडा आजही आहे. हा धर्मांध पगडा दूर करण्यासाठी ‘अर्जक संघ’ गेल्या ५५ वर्षांपासून कार्य करत आहे. ‘अर्जक संघ’ मनुष्याच्या जीवनातील फक्त दोन संस्कार महत्त्वाचे मानतो. पहिला विवाह आणि दुसरा अंत्यसंस्कार. जातवर्णवर्चस्ववादी संस्कृती नष्ट करून समतेवर आधारित मानवतावादी जातवर्णविरहित संस्कृतीची स्थापना करणे हे ‘अर्जक संघा’चे उद्दिष्ट आहे. ‘जानो तब मानो’ हे अर्जक संघाचे ब्रीदवाक्य आहे. महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीप्रमाणेच ‘अर्जक संघ’ ही उत्तर भारतातील सत्यशोधन करणारी चळवळ आहे.

उत्तर प्रदेशमध्ये महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रामस्वामी पेरियार, संत कबीर यांचे समतावादी विचार रुजवण्यासाठी रामस्वरूप वर्मा यांनी ‘अर्जक संघ’ या सामाजिक संघटनेची स्थापना १ जून १९६८ रोजी लखनऊ येथे केली. रामस्वरूप वर्मा हे राममनोहर लोहिया यांच्यासोबत राजकारणात काम करत होते. समानतेबाबत तडजोड नाही, समानता ही पूर्णच हवी, असा वर्मा यांचा आग्रह होता.अर्जक म्हणजे अर्जन करणारा, कष्ट करणारा श्रमिक.

अर्जक म्हणजे मजुरी किंवा श्रम करणारे लोक. म्हणूनच श्रमाला महत्त्व देणारी समतावादी संस्कृती स्थापन करणे, हे अर्जकांचे ध्येय आहे. संघातील प्रत्येक अर्जक सामाजिक विषमता आणि आर्थिक शोषणाला कारणीभूत असणाऱ्या श्रद्धा आणि प्रथा नाकारतो; विवाह आणि मृत्युसमयी ब्राह्मणाला बोलावत नाही. अर्जक जानव्याला उच्च वर्णाचे नव्हे, तर गुलामीचे प्रतीक मानतो. आदर दर्शवण्यासाठी ब्राह्मण व इतरांच्या पायाला स्पर्श करण्यास विरोध करतो. ‘जानो तब मानो’, हे या संघटनेचे सूत्र आहे.

सध्या उत्तर प्रदेशात ‘अर्जक संघा’च्या ५० शाखा कार्यरत आहेत. तसेच १३,००० सभासद आहेत. ‘अर्जक संघा’च्या प्रकाशन विभागाने ५० पेक्षा जास्त ग्रंथांची निर्मिती केली आहे. ‘अर्जक’ साप्ताहिकाचे दीड हजार वर्गणीदार आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली इथेही ‘अर्जक संघा’च्या शाखा कार्यरत आहेत.

धार्मिक विवाहामध्ये अनेक निरुपयोगी प्रथा परंपरा असतात. हे विवाह मानपानाच्या नावाखाली अत्यंत खर्चिक पद्धतीने केले जातात. महाराष्ट्रात महात्मा फुले यांनी ज्याप्रमाणे सत्यशोधक विवाह लावण्याची एक पर्यायी व्यवस्था निर्माण केली त्याच पद्धतीने अर्जक संघाने उत्तर भारतात अर्जक पद्धतीने विवाह लावून देण्याची मोहीम सुरू केली आहे.

अर्जक विवाह पद्धती

विवाह हा एक आवश्यक संस्कार आहे; पण गरीब-श्रीमंतांच्या विवाहात जमीन-अस्मानाचा फरक असतो. म्हणूनच अर्जक संघाने सुटसुटीत विवाहसंस्कार जाहीर केला. या विवाहामध्ये कोणताही मुहूर्त न पाहता दोघांना सोयीची होईल अशी तारीख निश्चित केली जाते. या विवाहामध्ये कोणत्याही प्रकारे हुंडा-आहेर-मानपान यांना स्थान नसते. विवाहाच्या दिवशी वरातीचे स्वागत करून त्यांना लग्नमंडपात आणले जाते. व्यासपीठावर वधू-वरांना बसवून विवाह लावणारी व्यक्ती त्यांचा परिचय करून देते. परिचयानंतर विवाहासाठी लेखी फॉर्मवर दोघांची संमती घेतली जाते. त्यानंतर विवाह लावणारा अर्जक कार्यकर्ता वधूवरांना शपथ देतो. ती पुढील प्रमाणे असते..

‘मैं...को अपनी पत्नी/ पती के रूप में स्वीकार करता हूँ / करती हूँ, और सत्यनिष्ठा के साथ प्रतिज्ञापन करता हूँ / करती हूँ, कि अपनी पत्नी/ पती के साथ समता का व्यवहार एवं आचरण करते हुए वैवाहिक जीवन को मधुर और अविच्छिन्न बनाने का सतत प्रयत्न करता रहूँगा/ रहूंगी। तथा मानव-मानव की बराबरी वाले समाज के विकास व समृद्धि में सदैव योगदान देता रहूँगा/ रहुंगी।’ ही शपथ वाचून झाल्यानंतर विवाह संपन्न होतो. अर्जक संघाच्या वतीने विवाह प्रमाणपत्र दिले जाते.

गेल्या ५५ वर्षांत उत्तर भारतात अर्जक संघाने असे हजारो विवाह लावले आहेत. १९६८ साली कानपूरमध्ये अर्जक पद्धतीने पहिला विवाह शिवकुमार कटियार यांचा झाला. ते आज अर्जक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे. धर्मांधानी या विवाहाचा तीव्र निषेध केला होता. त्यांनी या विवाहाला मान्यता दिली नव्हती. पण आज अर्जक विवाहांना समाज मान्यता मिळत आहे. चार वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशचे एक आय.ए.एस. अधिकारी हिमांशू सिंग यांनी स्वतःचा विवाह अर्जक पद्धतीने केला होता.

मृत्यूनंतरच्या कर्मकांडांना विरोध

खरे तर मृत्यू हा एका व्यक्तीचा होतो पण संपूर्ण कुटुंब त्या दुःखाच्या छायेत असते. अशावेळी दुःखी कुटुंबांना सहानुभूती देण्याऐवजी पुरोहितांकडून त्यांचे धार्मिक पूजापाठाच्या नावाखाली आर्थिक शोषण केले जाते. या सर्वाला पर्याय म्हणून अर्जक संघाने मृत्यूनंतर कोणत्याही पद्धतीचे धार्मिक कर्मकांड न करता मृत्यूच्या पाचव्या दिवशी शोकसभा आयोजित करावी असा पर्याय सुचवला आहे. म्हणजे मित्र-नातेवाईक आपल्या भावना शोकमग्न परिवारापर्यंत पोचवतील.

‘अर्जक संघा’चे यश

‘अर्जक संघा’ने उत्तर भारतात ब्राह्मणी श्रेष्ठत्व मानणाऱ्या जातवर्णवर्चस्ववादाच्या मुळावरच घाव घालण्याचा प्रयत्न केला आहे. दहा राज्यांमध्ये त्यांनी आपले अनुयायी-कार्यकर्ते उभे केले आहेत. तन, मन आणि धनाने प्रचार करण्याचा संस्कार त्यांना दिला आहे. संघटना उभी करण्यातही त्यांना यश मिळाले आहे. विचार-आचार-संस्कार आणि त्यौहार अशा चार मार्गांनी अर्जक संघाची वाटचाल सुरू आहे. उत्तर प्रदेशातील लोक पाप-पुण्य, आत्मा-परमात्मा, पुनर्जन्म, स्वर्ग-नरक या कल्पनांमध्ये गुरफटून पंडित-पुरोहिताचा शब्द प्रमाण मानतात. आहार, सार्वजनिक वावर यात विषमतेने वागतात, गुलाम म्हणूनच आयुष्य काढतात. त्यातून मुक्ती मिळवणे हेच खरे स्वातंत्र्य आहे, हा अर्जक संघाचा विचार आहे.

उत्तर भारतात अर्जकचे विचार घेऊन राजकारणात पुढे आलेले अनेक नेते आज दिसतात. काही पक्षांनीही हा विचार पाया म्हणून स्वीकारला. मंडल आयोगाची पार्श्वभूमी तयार होण्यातही ‘अर्जक संघा’चा वाटा होता. सर्वांना सामावून घेता येईल, असा सणांचा पर्याय ‘अर्जक संघा’ने दिला. शूद्रांना ताठ मानेने उभे राहता येईल, असे तत्त्वज्ञान दिले, आत्मविश्वास दिला. पन्नास वर्षांत अनेक लहान- मोठ्या संघटना वाढल्या आणि लयाला गेल्या; पण ‘अर्जक संघा’चे काम अव्याहत सुरू आहे. ‘अर्जक संघा’ने आत्मा-परमात्मा, ईश्वर, पुनर्जन्म, पाप-पुण्य नाकारून जाहीरपणे नास्तिकवादाचा पुरस्कार केला आहे; धार्मिक व पौराणिक ग्रंथांचे पुनर्मूल्यांकन केले आहे.

अर्जक संघाचे चार प्रमुख नेते

१.संस्थापक रामस्वरूप वर्माजी

१९६८ साली 'अर्जक संघा'ची स्थापना रामस्वरूप वर्मा यांनी केली. एम.ए. एलएल.बी. झाल्यावर त्यांनी आय.ए.एस. परीक्षाही पास केली; पण प्रशासकीय नोकरी केली नाही. राममनोहर लोहियांच्या संपर्कात येऊन ते समाजवादी बनले. आमदार झाले. उच्च-नीचता, विषमता आणि धार्मिक पाखंड अशा खातेऱ्यात सामान्य जन पिचत असलेले पाहून त्यांनी ‘अर्जक संघा’ची स्थापना केली. वर्माजी भौतिकवादी होते. सृष्टी निर्माण करणारी किंवा चालवणारी कोणी बाह्य शक्ती नाही. सृष्टी स्वयंभू आहे, ही ‘अर्जक’ची तत्त्वे आहेत. मानवी विकासासाठी उत्पादन आवश्यक असून ते श्रमाद्वारेच होऊ शकते. म्हणून शारीरिक श्रम श्रेष्ठ आहेत. ते म्हणत - ‘जानो तब मानो’, समजून घ्या; मगच विश्वास ठेवा. तर्कशक्ती न वापरणे म्हणजे आत्महत्या होय.

२. चौधरी महाराजसिंग भारतीजी

महाराजसिंह भारती ‘अर्जक’चे एक महत्त्वाचे नेते होते. त्यांचा जन्मदिवस १ नोव्हेंबर हा ‘अर्जक संघा’तर्फे ‘विज्ञानदिन’ म्हणून साजरा केला जातो. १९५२ साली ते राम मनोहर लोहियांच्या बरोबर ‘सोशालिस्ट पार्टी’त सामील झाले. १९६२ साली ते आमदार बनले. नंतर ते खासदार बनले. ‘सृष्टी और प्रलय’ हा मानवी उत्क्रांतीचा माहिती सांगणारा त्यांचा ग्रंथ खूपच गाजला आहे.

३. बिहार लेनिन : बाबू जगदेव कुशवाह

शहीद बाबू जगदेव कुशवाह हे ‘बिहारचे लेनिन’ म्हणून प्रसिद्ध आहेत. देशात ९० टक्के लोक शोषित आहेत, त्यांच्यावर १० टक्क्यांचे राज्य चालणार नाही, असे ते सांगत. जगदेवबाबू जाहीर सभेत भाषण करत असताना पोलिसांनी त्यांच्या मानेमध्ये गोळी घातली, जखमी अवस्थेत फरफटत पोलीस स्टेशनमध्ये नेले. अखेरीस जनक्षोभ झाल्यानंतर त्यांचे शव लोकांच्या स्वाधीन करावे लागले. ही १९७४ सालची घटना आहे. बाबू जगदेवसिंह मारले गेले; पण अर्जक विचार पसरत गेला.

४. पेरियार ललईसिंग यादव

वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणवाद्यांना सर्वांत मोठा विरोध महाराष्ट्रात सत्यशोधकांनी व ब्राह्मणेतर चळवळीने केला, तसा दक्षिणेत रामस्वामी पेरियार यांनी केला. गावातील मंदिरासमोरून जायला दलितांना परवानगी नव्हती, त्या विरोधात पेरियारनी केलेला वायकोम सत्याग्रह प्रसिद्ध आहे. ललईसिंग यादव यांनी १९६८ मध्ये पेरियार यांची परवानगी घेऊन त्यांच्या ‘ट्रु रामायन’चे हिंदीत ‘सच्ची रामायण’ असे भाषांतर केले. शासनाने त्यावर बंदी आणून पुस्तकाच्या प्रती जप्त केल्या. तीन वर्षे खटला चालला आणि ललईसिंग यांनी खर्चासह न्यायालयाची लढाई जिंकली आणि पुस्तक मुक्त झाले. ललईसिंगना ‘उत्तरेतील पेरियार’ म्हणून गौरवण्यात आले. ललईसिंग यादव ‘पेरियार ललई’ बनले. पुढे ललईसिंग यादव बौद्ध बनले. त्यांनी धार्मिक गुलामगिरी विरोधात आवाज उठवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथावर तत्कालीन उत्तर प्रदेश सरकारने बंदी घातली होती, त्या विरोधात ललईसिंग यांनी आवाज उठविला. ते हायकोर्टात गेले. खटला जिंकून आंबेडकरांच्या ग्रंथावरील बंदी उठवली.

(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in