टीव्हीचे दूरशिक्षण

नियोजनबद्ध पद्धतीने ठरवून माहिती दिल्यास जनमाध्यमे उपयुक्त सिद्ध होतील
टीव्हीचे दूरशिक्षण

जनमाध्यमांचा शिक्षण क्षेत्रात खुबीने उपयोग करून घेतला, तर शिक्षणाच्या स्तराबरोबरच सामाजिक स्तरही उंचावण्यास मदत होते, हे आजवरच्या अनेक अनुभवातून भारत शिकला आहे. कोणताही नवविचार जनमानसात पोहोचवायचा असेल, तर जनमाध्यमांइतका दुसरा कोणताही जवळचा आणि प्रभावी मार्ग नाही. लोकमतला वळण लावण्याबरोबरच कोणत्याही मुद्द्यावर जाणीव जागृती निर्माण करण्याची जनमाध्यमांची क्षमता अफाट आहे. ती क्षमता हेरून उपयुक्त माहिती लोकांपर्यंत जाणीवपूर्वक पोहोचवली गेली पाहिजे. नियोजनबद्ध पद्धतीने ठरवून माहिती दिल्यास जनमाध्यमे उपयुक्त सिद्ध होतील. केंद्र सरकारने प्रारंभीपासूनच जनमाध्यमांचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला आहे. शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही माध्यमे सर्वात प्रभावी ठरली आहेत. या सर्व बाबींची चर्चा करण्याचे कारण म्हणजे केंद्र सरकारने अलीकडेच २०० नवीन शैक्षणिक टीव्ही वाहिन्या सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी सरकार एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.देशातील शिक्षणाची गुणवत्ता आणि त्याचे सार्वत्रीकरण या दोन्हीवर गांभीर्याने चर्चा व्हायला हवी. राजकीय गदारोळ आणि माध्यामांशी त्यांची झालेली अभद्र युती यामुळे शिक्षणासारख्या मूलभूत विषयाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. राजकीय लोकांचीच भाषा समाजातील जाणता वर्ग, नेते, बुद्धिजीवी आणि जनमाध्यमे बोलू लागली की, हा धोका आणखी वाढतो. सध्याचा काळ असा एकसुरी बोलण्याचा आहे. रोजच्या जगण्याशी संबंधित प्रश्न बाजूला पडून भावनिक आणि मनाला गुदगुल्या करण्याच्या मुद्द्यांना माध्यमांतून केंद्रस्थानी आणले जात आहे. तथापि, माध्यमे या स्वस्त आणि निरुपयोगी विषयांचा उत्सव साजरा करण्यात मग्न आहेत. अशा काळात शिक्षणाच्या उद्योगात होत असलेल्या भल्या-बुऱ्या गोष्टींची चर्चा होणे आणि विशेषतः जनमाध्यमांच्या अंगाने ती पुढे जाणे गरजेचे वाटते. शिक्षणाच्या प्रवाहात अद्याप सामील होऊ न शकलेल्या घटकांसाठी केंद्र सरकार ई-लर्निंगद्वारे काही संधी उपलब्ध करून देऊ इच्छिते. अनेक वाड्या-वस्त्यांवर शिक्षण पोहोचले नाही. अशा घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी टीव्ही वाहिन्या उपयुक्त ठरतील. सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. या जमान्यात शिक्षणाचा प्रवाह वरून खाली या पद्धतीने जाताना दिसत आहे. ती एकमार्गी प्रक्रिया होण्याचा धोका वाढला आहे. जनमाध्यमे एकप्रवाही असतात. एकाच बाजूने संदेश देण्याची त्यामध्ये व्यवस्था असते. संदेश ग्रहण करणाराला तो कितपत समजला, याचा प्रतिसाद मिळविण्याची कोणतीही सोय जनमाध्यमात असत नाही किंवा प्रतिसाद मिळाला तर तो खूपच अल्प असतो आणि त्यावरून कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. अशा स्थितीत केंद्र सरकार टीव्ही वाहिन्यांद्वारे शिक्षण देण्याची कल्पना राबवत असले, तरी त्याच्या फलनिष्पत्तीबद्दल आतापासूनच काळजी घेणे आवश्यक आहे.भारतात टीव्हीच्या प्रारंभीच्या काळापासून शिक्षणासाठी या माध्यमाचा उपयोग करून घेतला जात आहे. शिक्षणविषयक समज मजबूत करण्यात टीव्हीचे योगदान कदापि विसरता येणार नाही. दिल्लीत १९६१ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर माध्यमिक शाळा टीव्ही प्रकल्प हाती घेण्यात आला. यामध्ये शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना विविध विषयांचे व्हिडीओ दाखवले जात होते. ज्या शाळांमध्ये हा प्रकल्प राबविला तेथील मुलांना विषय अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत झाली. १९६६ मध्ये याची व्याप्ती वाढवून कृषिक्षेत्रात टीव्हीचा उपयोग करून घेण्यात आला. दिल्ली कृषी टीव्ही प्रकल्प अर्थात ‘कृषिदर्शन’च्या माध्यमातून ८० गावांतील शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यात आली. यातूनही चांगले परिणाम दिसले. परिणामी, आत्मविश्वास वाढून अनेक मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले. टीव्हीचा शिक्षणासह ग्रामीण विकासात क्षेत्रात क्रांतिकारी उपयोग होऊ शकतो, हे १९७५ मध्ये साईट प्रकल्पाने दाखवून दिले. राजस्थान, कर्नाटक, आंध्र, बिहार, ओरिसा आणि मध्य प्रदेशातील २३३० शाळांमध्ये हा प्रकल्प राबविला. टीव्ही या माध्यमाचा शिक्षणात अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो, हे या प्रयोगाने दाखवून दिले. त्यानंतर १९८२ मध्ये कृषी उत्पादन, आरोग्य आणि स्वच्छता आदी उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी इन्सॅट प्रकल्प राबविला. १९८४ नंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पुढाकारातून उच्चशिक्षणात टीव्हीची मदत घेण्यात आली. ‘कंट्रीवाईड क्लासरूम’ या नावाने हा उपक्रम प्रसिद्ध होता. यातील काही कार्यक्रम इतर देशातून आयात करण्यात आले होते. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ दूरदर्शन टेलिकास्ट नावाचा आणखी एक प्रकल्प १९९१ मध्ये राबविण्यात आला होता. यामध्ये आठवड्यातील ठरावीक दिवशी ठरावीक वेळेत कार्यक्रम प्रसारित केले जात होते. या सर्व प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आणि या कार्यक्रमांचे अपेक्षित फलित मिळत असल्याने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, प्रसार भारती आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने २००० मध्ये ज्ञान दर्शन नावाची स्वतंत्र शैक्षणिक टीव्ही वाहिनी सुरू करण्यात आली. असे प्रयत्न त्यापुढील काळातही निरंतर सुरू राहिले. सध्या देशातील शिक्षण विषयाला वाहिलेल्या ३४ टीव्ही वाहिन्या आहेत. आता यामध्ये आणखी मोठी भर पडणार असून त्यांची संख्या ६० होणार आहे. शिवाय, येत्या काही काळात २०० स्वतंत्र ऑनलाइन वाहिन्या सुरू होत आहेत. शिक्षणक्षेत्रात माध्यमांचा इतक्या मोठ्या प्रमाणात वापर करूनही शिक्षणाची स्थिती म्हणावी तशी उत्तुंग नाही. माध्यमांचा सुकाळ असला किंवा उपलब्धता असली म्हणजे शिक्षण प्रक्रिया गतिमान होईल, असे नाही. माध्यमातून शिक्षणविषयक कोणता आशय जातो, हे खूप महत्त्वाचे आहे. माहिती आणि मनोरंजनाच्या विविध वाहिन्यांवरून प्रसारित होत असलेला सध्याचा आशय पाहता टीव्ही वाहिन्या भारतीय समाजाचे काही भले करतील असे वाटत नाही. अत्यंत प्रतिगामी, अवैज्ञानिक आणि सत्याचा अभास निर्माण करणारे कार्यक्रम टीव्ही वाहिन्यांवरून राजरोस सुरू आहेत. लहान मुलांसाठीचे कार्टून्स तर तद्दन टाकाऊ आणि मुलांच्या कोवळ्या मनाशी चाललेला खेळ आहे.

माध्यमांचा भवताल असा बटबटीत असताना टीव्ही वाहिन्यांवरील शैक्षणिक कार्यक्रमांचा पोत कसा असेल, यावर बरंच काही अवलंबून आहे. शिक्षणातून योग्य-अयोग्याची निवड करण्याइतपत क्षमता विकसित व्हायला हवी. प्रश्न विचारण्याची हिंमत आणि उत्तर मिळेपर्यंत पाठपुरावा करण्यासाठी मोकळे वातावरण हवे. विज्ञान विषय शिकवत असताना वैज्ञानिक दृष्टिकोनाचे तीन-तेरा वाजू नयेत, याचीही काळजी घ्यायला हवी. टीव्हीसारख्या माध्यमाचा खूप मोठा प्रभाव आहे. या माध्यमातून चुकीचा संदेश जाऊ नये, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. सरकारी माध्यमातून येणारा संदेश खूपच काळजीपूर्वक द्यावा लागेल. सरकारी माहिती खरी असते, यावर लोकांचा दृढविश्वास आहे. या विश्वासाला पात्र राहण्याची नैतिक जबाबदारी प्रत्येक सरकारची आहे. सरकार किंवा सरकारी व्यवस्थेवरचा सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास कमी होणे किंवा नाहीसा होणे ही अराजकाची नांदी असेल. त्यातच माध्यमांतून येणारा संदेश तपासून घ्यावा, असे सर्वसामान्यांना वाटू लागले, तर तो माध्यम व्यवस्थेचा खूप मोठा पराभव आहे. वर्तमान स्थितीत आपण अशा पराभवाच्या खूप जवळ आहोत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in