टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल महागणार ; कच्च्या मालाच्या किमतीत वाढ

तीन ते चार महिन्यांत सणांचा मोसम सुरू होत असल्याने ओपन सेल पॅनलच्या दरात सतत वाढ आहे
टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल महागणार ; कच्च्या मालाच्या किमतीत वाढ

तुम्ही स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाईल घेण्याचा विचार करत असल्यास तो निर्णय लवकरच घ्या. कारण ही उत्पादने बनवणाऱ्या कंपन्या दरवाढीच्या विचारात आहेत. कारण या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये ओपन सेलचा वापर केला जातो. जागतिक बाजारात त्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे टीव्ही कंपन्या याच्या किमतीत वाढ करण्याच्या कामाला लागल्या आहेत. टीव्हीत ओपन सेल नावाचे कंपोनंट असते. टीव्हीच्या उत्पादनात ओपन सेलचा वाटा ६० ते ६५ टक्के असतो. या ओपन सेलचे दर १५ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे लॅपटॉप व स्मार्टफोनच्या दरातही वाढ होऊ शकते.

इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, २०२३ पासून ओपन सेलच्या दरात १५ ते १७ टक्के वाढ झाली आहे. ३२ इंचाच्या टीव्हीतील ओपन सेल २७ डॉलर्स प्रति पॅनलला असतो. त्यात १५ टक्के वाढ झाली आहे.

जगात ओपन सेल पॅनलचे उत्पादन चीनच्या ४ ते ५ कंपन्या करत असतात. त्यांनी केलेल्या दरवाढीचा परिणाम जगाच्या अनेक देशांत दिसत आहे.

जुलैपासून १० टक्के महाग होणार टीव्ही

देशातील नामवंत कंपन्या टीव्हीच्या दरात वाढ करण्याच्या तयारीत आहेत, तर काही कंपन्यांनी १० टक्के दरवाढ लागूही केली आहे. स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाईलच्या व्यापाऱ्यांनी सांगितले की, ओपन सेल पॅनलची किंमत २५ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. तसेच याचा पुरवठाही सुरळीत होत नाही.

तीन ते चार महिन्यांत सणांचा मोसम सुरू होत असल्याने ओपन सेल पॅनलच्या दरात सतत वाढ आहे.

सरकार आयात कर कमी करू शकते

सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, स्मार्टफोन व टीव्हीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात कर कमी करून सरकार काही प्रमाणात दिलासा देऊ शकते. सरकारने यंदा अर्थसंकल्पात ओपन सेल टीव्ही पॅनलच्या काही सामुग्रीत आयात शुल्कात ५ वरून २.५ टक्के करण्याची घोषणा केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in