दोन मुलाखती

कोणाची मुलाखत घ्यायची, कोणाची नाही घ्यायची, हे आमचं आम्हीच ठरवत असतो
दोन मुलाखती

कोणाचीतरी मुलाखत घेणं हा म्हटलं तर आमचा छंद आहे, म्हटलं तर आमचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे, कारण आम्ही पत्रकार आहोत. आता पत्रकार म्हटलं की, तुम्हाला आम्ही ‘चाय-बिस्कूट’छाप पत्रकार वाटले असू; पण आम्ही असल्या फुटकळ, अल्पसंतुष्ट प्रकारात मोडणारे नाही हो. तसं आम्हाला पोटापाण्यासाठी कोणाच्या ‘मॅरेथॉन मुलाखती’ घ्याव्या लागत नाहीत, कारण आम्ही काही कोणाचे ‘पगारी’ नाही. आम्ही तसे मुक्त (मोकाट नव्हे!) पत्रकार आहोत, त्यामुळे आम्ही कोणाचे बांधील नाही. त्यामुळे कोणाची मुलाखत घ्यायची, कोणाची नाही घ्यायची, हे आमचं आम्हीच ठरवत असतो. थोडक्यात, आम्ही अपक्ष आमदारांसारखे आहोत. कोणाच्या बाजूला कलंडायचं ते आमचं आम्हीच ठरवत असतो. अर्थात, त्यासाठी आम्ही लक्ष्मीमातेला कौल लावत असतो. तिचा कौल आम्ही शिरोधार्य मानत असतो. थोडक्यात काय, तर ‘ईश्वर इच्छा बलयेसी’प्रमाणे आम्ही, ‘लक्ष्मी इच्छा बलयेसी’ मानणारे आहोत! तात्पर्य - कोणीही आम्हाला गृहीत धरू नये. आताच पाहा ना, नुकतीच एक परीक्षा झाली. त्यात अनपेक्षितपणे कोणी गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकावर झळकले तर काही ‘बोलबच्चन’ मात्र काठावर पास झाले! थोडक्यात काय तर ‘लटकता-लटकता’ वाचले! साधारणपणे जो परीक्षेत पहिला येतो, त्याची मुलाखत घेतात. परीक्षेत पहिला येणारा जरी असामान्य बुद्धिमतेचा असला तरी त्याची मुलाखत घेणारा साधारणपणे अतिसामान्य बुद्धिमतेचा असतो. मुळातच आम्ही असामान्य बुद्धिमत्तेचे धनी असल्यामुळे आम्ही गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकवणाऱ्याची मुलाखत तर घेतलीच; पण काठावर पास झालेल्याचीसुद्धा मुलाखत घेतली! आम्ही -(गुणवत्ता यादीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास) गुणवत्ता यादीत प्रथम आल्याबद्दल अभिनंदन. कसं काय साधलंत हे? गु.या.प्र.आ.वि. - मुळात म्हणजे आमचे गुरुवर्य देवानाना नागपूरकर म्हणजे अतिविद्वान. आकडेमोड, माणसंजोड आणि माणसंफोड यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. आम्हाला गुणवत्ता यादीत झळकण्याचं भाग्य त्यांच्यामुळेच लाभलं. आम्ही - ते ठीक आहे; पण परीक्षेत जे काठावर पास झाले, त्यांचं म्हणणं असं आहे की, तुमची लायकीच नव्हती गुणवत्ता यादीत यायची. तुम्ही परीक्षेत गैरप्रकार केल्यामुळे गुणवत्ता यादीत आलात आणि ते काठावर पास झालेत. गु.या.प्र.आ.वि. - अहो, परीक्षेच्या गुणवत्ता यादीत येणं म्हणजे काय रोज सकाळी ९ वाजता पत्रकारांसमोर मान उडवत, डोळे वर चढवत, हातवारे करत फुकाच्या बढाया मारण्याइतकं सोपं वाटलं की काय? आम्ही - नक्कीच नाही. तुम्हाला आणि तुमच्या गुरुवर्यांना मानलंच पाहिजे; पण जे ‘लटकता - लटकता’ वाचले, म्हणजे थोडक्यात काठावर पास झाले, त्यांचं कुठे चुकलं? ते कुठे कमी पडलेत असं तुम्हाला वाटतं? गु.या.प्र.आ.वि. - (कुत्सितपणे हसत) मुळातच परीक्षा गणिताची आणि यांचा मास्तर चित्रकलेचा! करायला गेले गणपती आणि झाला मारुती! बरं झाला तर झाला मारुती, वर तोही कोपला, ‘हनुमान चालीसा’ला विरोध करतात म्हणून! आहे की नाही गंमत? बरं, परीक्षेला बसायचं म्हणजे स्वतःची काही तयारी हवी की नको ? दुसरे दोन बाहेरून कॉप्या पुरवतील या भरवशावर हे बसले परीक्षेला. त्यांनी कॉप्याच पुरवल्या नाहीत आणि यांची पडली बोंब. काय? आम्ही - शेवटी काय सांगाल? गु.या.प्र.आ.वि. - (मिश्कीलपणे) तो शाहिस्तेखानाचा किस्सा माहीत आहे का तुम्हाला? ‘जीवावर बेतले होते; पण बोटांवर निभावले.’आम्ही - (गोंधळून) त्याचा इथे काय संबंध? गु.या.प्र.आ.वि. - (टवाळीच्या सुरात) ‘राऊतांवर बेतले होते; पण पवारांवर निभावले.’

आम्ही - (काठावर पास झालेल्या विद्यार्थ्यास) अभिनंदन. कसं काय घडलं हे? का.पा.झा.वि. - (आवाज चढवत) काय घडलं?

आम्ही - (निर्विकारपणे) थोडक्यात वाचलात म्हणे तुम्ही? का.पा.झा.वि. - (संतापून) काहीतरी काय बरळता? कोणाची सुपारी वाजवायला आलात, त्या कॉप्या करून पास झालेल्यांची? आम्ही - (आपली बाजू सावरत) तसं नाही; पण.....का.पा.झा.वि. - (चिडून) काही पण नाही आणि बिन नाही. एका विजयानं इतकं हुरळून जाण्याचं कारण नाही म्हणावं. बरं का? एका यात्रेने देव म्हातारे होत नसतात म्हणावं. बरं का? आम्ही - (चिकाटीने) हो ना; पण नक्की गडबड कुठे झाली? का.पा.झा.वि. - (तुच्छतेने) घोडे निघाले घोडे. आम्ही ज्यांना माणसं समजत होतो ते घोडे निघाले घोडे. विकले गेले घोडेबाजारात. काही फरक पडत नाही. बरं का.आम्ही - (खडा टाकत) कोणीतरी तुम्हाला ‘कट टू साईज’ करण्यासाठी हे घडवून आणलं असावं असं नाही का वाटत? का.पा.झा.वि. - (चिडून) तुम्हाला समजलं त्याचं नाव तर कळवा. आम्ही - (शांतपणे) मला पामराला ते कसं समजेल? त्यासाठी तर मला १०० जन्म घ्यावे लागतील! त्यानंतर जे घडलं ते सांगण्यासारखं नाही; पण डोळे उघडले तेव्हा आम्ही आयसीयूमध्ये होतो. 

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in