मत आमचेही
केशव उपाध्ये
उद्धव ठाकरे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिमा सुधारण्यासाठी राज यांच्याशी मनोमिलनाचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी टिकवायची की स्वतंत्र लढायचे, या पेचात ते अडकले आहेत. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ‘सिच्युएशनशिप’प्रमाणे गणित आखले जात आहे.
मराठी भाषिकांमध्ये हिंदी शिकण्याच्या निर्णयावरून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत, तसेच यानिमित्ताने महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांविरोधात अकारण वातावरण निर्मिती करत उद्धव ठाकरे हे मुंबई महापालिकेसाठी प्रतिमा निर्मितीच्या खेळात उतरले आहेत. या मुद्द्यावरून त्यांचे चुलत बंधू राज ठाकरे यांनी पूर्वीच हाळी दिली होती. राज ठाकरे यांच्या हाळीनंतर उबाठा गट जागा झाला. १९ वर्षांपूर्वी ज्या भावाला पक्ष सोडण्यास भाग पाडले गेले, त्याच भावाला मनोमिलनाची साद घालण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली. या १९ वर्षांत या दोन बंधूंमध्ये मनोमिलनाच्या बातम्या अनेकदा आल्या. मात्र उद्धव ठाकरे यांना आपल्या बंधूंची गळाभेट घेण्यात तेव्हा काहीच रस नव्हता. राज ठाकरे यांच्या राजकारणातील अपयशाची अनेकदा खिल्ली उडवणाऱ्या उद्धव ठाकरे यांना बंधूंबरोबरच्या मनोमिलनाची अचानक इच्छा व्हावी, यात पश्चात्तापाचा भाग मुळीच दिसत नाही. ६-७ महिन्यांनी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमुळेच उद्धव ठाकरेंना उपरती झाली आहे, असे
म्हणण्याशिवाय पर्याय नाही. आपणच निर्माण केलेल्या चक्रव्यूहात अडकलेल्या उद्धव ठाकरेंना त्यातून बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग दिसत नसल्याने त्यांनी मनोमिलनाचा सरधोपट मार्ग पत्करला असावा.
२०१४ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत जागा वाटपावरून अडेलतट्टू भूमिका घेत उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाबरोबरची २५ वर्षांपासूनची युती संपुष्टात येईल, अशी परिस्थिती निर्माण केली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अचानक त्यांनी आपला बेत बदलला आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करू, अशी गर्जना करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी दोन-तीन महिन्यांत घुमजाव करत भारतीय जनता पक्षाबरोबर पुन्हा घरोबा केला. येथपासून सुरू झालेला उबाठांचा प्रवास २०१९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर हातमिळवणी करत सरकार स्थापन करण्यापर्यंत पोहोचला. उबाठांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबरचे सरकार अडीच वर्षांत गडगडल्यानंतर राज्यातील राजकीय पटावरचे मोहरे पुन्हा बदलले.
आपले सरकार वाचवू न शकणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबरची आघाडी चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाच्या अनपेक्षित कथनामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. मात्र संविधान बदलाच्या खोट्या प्रचाराचा फुगा सहा महिन्यांत फुटून विधानसभा निवडणुकीत उबाठासह महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अलीकडेच मराठीच्या मुद्द्यावरून घेतलेल्या संयुक्त मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर २०१९ नंतरच्या या घटनांचा आढावा घेणे आवश्यक होते.
२०१४ मध्ये उद्धव ठाकरे राज्य सरकारमध्ये सामील झाले होते तरी त्यांनी आपली भारतीय जनता पक्षाविरोधातील भूमिका अचानक तीव्र केली होती. एकाच वेळी केंद्रात आणि राज्यात सत्ता भोगताना मोदी सरकार आणि राज्य सरकार यांच्यावरील सातत्याने भूमिका घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी २०१७ मध्ये मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढविली होती. त्यावेळीही त्यांची भाषा भारतीय जनता पक्षाला गाडून टाकू, पुरून टाकू या पद्धतीचीच होती. वेळीही राज ठाकरे यांच्याबरोबरच्या मनोमिलनाच्या चर्चा झाल्या होत्या. मुंबईतील आपल्या राजकीय ताकदीबद्दलचे उद्धव ठाकरे यांचे सर्व गैरसमज २०१७ च्या निवडणुकीत मतदारांनी दूर केले.
२०२४ मधील विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मतदारांनी मोठा झटका दिला. या धक्क्यातून अजूनही न सावरलेले उद्धव ठाकरे आपल्या गटाच्या भविष्यातील वाटचालीबाबत साशंक झाले आहेत. गेली २५-३० वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता अखंडपणे आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या उद्धव ठाकरे यांना या निवडणुकीत आपला थारा लागणार की नाही, याची भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच काँग्रेस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबरची आघाडी कायम ठेवायची की स्वतंत्र लढायचे, असा पेच उद्धव ठाकरेंपुढे दोन-तीन महिन्यांपूर्वीपर्यंत होता.
त्यांच्या पुढील पेचप्रसंगाला राज ठाकरे यांच्या पुनरागमनामुळे नवा कोन मिळाला आहे. राज ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व, वक्तृत्व याच्यापुढे उद्धव ठाकरे निस्तेज वाटणारच. काँग्रेस आणि शरद पवार गटाची मदत मुंबई महापालिकेत कितपत उपयोगी ठरेल, याची खात्री नसल्यामुळे उबाठांनी नव्या पर्यायाची जुळवाजुळव सुरू केली आहे.
हल्लीच्या तरुण पिढीत लिव्ह-इन, सिच्युएशनशिप यासारख्या संकल्पनांचे मोठे आकर्षण आहे. तरुण पिढीच्या जीवनशैलीत सिच्युएशनशिप ही लोकप्रिय संकल्पना आहे. रिलेशनशिप आणि सिच्युएशन या दोन शब्दांच्या संयोगातून ही संकल्पना जन्मास आली आहे. आपले नाते चालू ठेवायचे की तोडायचे याचा निर्णय परिस्थितीनुसार घ्यायचा, असा सिच्युएशनशिपचा सोपा अर्थ आहे. उबाठांपुढे ‘आपले बंधू की मविआ’ असा प्रश्न सध्या पडला आहे.
राज ठाकरेंचा पर्याय त्यांच्या दृष्टीने आणि त्यांच्या समर्थकांच्या दृष्टीने फायदेशीर आहे. मात्र राज ठाकरे यांच्या दृष्टीने सध्याच्या परिस्थितीत बंधूंबरोबरचा मनोमिलनाचा पर्याय फायदेशीर असणार की नाही, यावर उबाठा आणि मनसे यांच्यातील एकत्रिकरणाचे, म्हणजेच रिलेशनशिपचे भवितव्य अवलंबून आहे.
मराठी माणूस, मुंबईतील मराठी माणसाचे भवितव्य या मुद्द्यांच्या आधारे शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी १९८५ च्या महापालिका निवडणुकीत बाजी मारली होती. ‘उबाठां’ना त्याच निकालाची पुनरावृत्ती करण्याची स्वप्ने पडत आहेत. मात्र त्यावेळची स्थिती आणि सध्याचे राजकीय चित्र यात आमूलाग्र बदल झाला आहे, हे उद्धव ठाकरेंच्या गावीही नाही.
भारतीय जनता पक्ष आणि मविआबरोबर सत्तेत असताना आणि नसतानाही उबाठांना राज ठाकरे यांची गरज भासत नव्हती. मुंबई महापालिकेत जीव अडकलेल्या उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने यावेळची निवडणूक राजकीय अस्तित्वाची आहे. त्यामुळेच सर्व शक्यतांचा विचार करून कोणाबरोबर आघाडीत राहायचं, याचा निर्णय त्यांना घ्यावा लागेल.
मुख्य प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश भाजप