अनियंत्रित विकास मानवी मुळावर

अवकाळी पावसाने सारेच उद्ध्वस्त केले आहे. बळीराजाच्या शेतातही पाणी आहे आणि डोळ्यांतही! शेतातील पाणी ओसरेलही, पण शेतकरी राजाची जगण्याची आशा मात्र ओसरता कामा नये. त्यासाठी सगळ्यांनीच पुढाकार घ्यायला हवा.
अनियंत्रित विकास मानवी मुळावर
Published on

कोर्टाच्या आवारातून

ॲड. विवेक ठाकरे

अवकाळी पावसाने सारेच उद्ध्वस्त केले आहे. बळीराजाच्या शेतातही पाणी आहे आणि डोळ्यांतही! शेतातील पाणी ओसरेलही, पण शेतकरी राजाची जगण्याची आशा मात्र ओसरता कामा नये. त्यासाठी सगळ्यांनीच पुढाकार घ्यायला हवा.

समृद्ध पश्चिम महाराष्ट्र आणि दुष्काळी मराठवाडा महापुराशी झुंज देत आहे. हे संकट इतके विदारक आहे की ते मानवी जीवनाच्या, पशुपक्षांच्या मुळाशी आले आहे. शेती हे केवळ जगण्याचे साधनच नाही तर मातीशी इमान सांगणारी परंपरा आहे. आज हेच साधन हिरावून जाईल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांना महापूर आला आहे. वाड्या-वस्त्या पाण्याखाली आहेत. दुभत्या जनावरांनी गव्हाणीलाच माना टाकल्या आहेत.

बळीराजाच संकटात का?

गेली १०-१२ वर्षे अवकाळी पावसाने, महापुराने, सुक्या दुष्काळाने थैमान घालणे सुरू आहे. एकीकडे वर्षभर तुफान गारा पडत आहेत, अवकाळी पाऊस पडत आहे, पुराने गावं-शहरं वेढली जात आहेत, तर दुसरीकडे या सगळ्या संकटांवर मात करून पिकवलेल्या शेतमालाला भाव नाही अशी परिस्थिती आहे. यंदा मे महिन्याच्या सुरुवातीलाच आगमन झालेला वरुणराजा सप्टेंबर संपत आला तरी थांबायचे नाव घेत नाही. अजूनही जाता जाता काय कहर करेल याची खात्री नाही. कोकणात भातशेती बहरत आहे. आता पाऊस ओसरायला पाहिजे तरच फुलोऱ्यावरून लोंग धरलेले पीक पिकायला लागेल. दसऱ्यापर्यंत भाताचे पीक तयार होऊन पिवळे सोने व्हायला लागते. पण हा पावसाचा कहर थांबला नाही तर होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही. दरवर्षी कोकणासह राज्यभरातील शेतकरी संकटात यायची मालिका थांबायचे नाव घेत नाही. पाच वर्षांपूर्वीचा कोल्हापूर, सांगलीचा महापूर जनता विसरलेली नाही. पाण्याने वेढलेली गावं, तुंबणारी पिकं आणि महापुरात वाहून गेलेली दुभती जनावरं यांनी कोल्हापूर, सांगली, साताऱ्याची वाताहत केली होती. शेतकऱ्यांची पिकं, सामुग्री आणि स्वप्न आकाशाखाली उघड्यावर पडलेली असतात. त्यामुळे आकाश फाटले की त्याचा पहिला बळी ठरतो तो बळीराजाच.

आपत्तीच्या मुळाशी जाण्याची गरज

आतापर्यंत हजारो वर्षं निसर्गचक्र ठरलेले असायचे. चार महिने उन्हाळा, चार महिने पावसाळा आणि चार महिने हिवाळा असे ऋतुचक्र असायचे. सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होते. ते हवेत गेले की बाष्पाच्या कणाकणातून ढग तयार होतात. नैऋत्येकडून येणारे मोसमी वारे समुद्रावरून प्रवास करत भारतात प्रवेश करतात. मान्सून म्हणजे समुद्रावरील बाष्पयुक्त वाऱ्यांपासून पडणारा पाऊस आहे. भारताची भौगोलिक रचना द्विपकल्पीय आहे. तीन बाजूने समुद्र आणि उत्तरेकडे जमीन. त्यामुळे जमिनीचे तापमान आणि समुद्राचे तापमान यावर या वाऱ्यांचा प्रवास ठरतो. उन्हाळ्यात जमीन जास्त तापते. जमिनीचा पृष्ठभाग तापल्याने हवा प्रसरण पावते आणि तेथील दाब कमी होतो. या दाबातील फरकामुळे समुद्रावरील वारे व तयार झालेले ढग समुद्राकडून कमी दाब असलेल्या जमिनीकडे वाहू लागतात. हे बाष्पयुक्त वारे जमिनीवरील समुद्रसपाटीपासून उंचावर जातात. या ढगांना थंड वारा लागला की पाऊस उडतो. यालाच ‘मान्सूनचा पाऊस’ म्हटले जाते. ही क्रिया मेच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू असते. पूर्वी ठरलेल्या नक्षत्रांवर पाऊस उडायचा. शेतकरी त्यानुसार आपल्या पिकांची आखणी-पेरणी करायचे. त्यामुळेच महाराष्ट्रातील मोठ डोंगर असलेल्या कोकणात आणि सह्याद्रीच्या डोंगररांगात सर्वाधिक पाऊस पडतो. हे निसर्गचक्र आता उद्ध्वस्त झालेले आहे. याला एकमेव कारण म्हणजे पर्यावरणाचा विनाश. विकासाच्या नावाखाली आपण जो हैदोस मांडला आहे, तोच आता मानवी मुळावर आला आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगा पोखरून आपण जे विकासाचे मॉडेल उभे करत आहोत तेच आता मानवी मुळावर येत आहे.

प्रकल्पांच्या नावाखाली पर्यावरणाचा विनाश

सरकारने गेल्या काही वर्षांपासून काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत विकासाचे काॅरिडोर उभारायला घेतले आहेत. सिमेंट-काँक्रीटचे अजस्त्र रस्ते ही विकासाची संकल्पना झाली आहे. सह्याद्रीच्या कुशीपासून हिमालयाच्या गोदीपर्यंत डोंगर पोखरून रस्ते, बोगदे काढले जात आहेत. डोंगराचे पायथे कापून कमकुवत केले जात आहेत. महाराष्ट्रात समृद्धीच्या नादात समृद्धी महामार्ग, बडोदा महामार्ग बनवण्यासाठी सगळे डोंगर पोखरून भराव घातला जात आहे. सिमेंटचे रस्ते हे पर्यावरणासाठी सर्वात घातक असतात. सिमेंट प्रचंड उष्णता तयार करते. याच सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यांमुळे प्रचंड तापमानवाढ होत आहे हे आपण मान्य केले पाहिजे. सिमेंट कंपन्यांच्या आणि मूठभर उद्योजकांच्या फायद्यासाठी विकासाच्या कल्पना मांडून लुटीची लयलूट सुरू आहे. यामध्ये उद‌्ध्वस्त होत आहे तो फक्त सामान्य शेतकरी. तसेही हे सरकार उद्योजकांचे सरकार आहे. येथे सामान्य माणसाला फार जागा नाही. समृद्धी आणि बडोदा महामार्ग जोडून गुजरात ते गडचिरोली एका रेषेत आणून येथील उद्योजकांना गडचिरोली, चंद्रपूरपासून छत्तीसगडपर्यंत जंगले कापून खनिज संपत्ती ओरबाडायची आहे. वाढवण बंदरासाठी समुद्रात पाच हजार एकरात मातीचा भराव घालून समुद्र बुजवायचा आहे. यासाठी ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील सर्व डोंगर व सुपीक जमीन पोखरली जाणार आहे. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी काढून घेतल्या जातील. पुढे बसतील त्या नव्या कारखानदाऱ्या, गोडावून, टाऊनशिप आणि झोपडपट्ट्या. मुंबईला ऑक्सिजन पुरवणारे हे पट्टे संपवले जाणार आहेत याची ना खेद ना खंत. बंदरांच्या नावाखाली माणसांची माकडे होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या सर्वांसाठी पर्यावरण कायदे, निसर्गाचे नियम, सीआरझेड कायदे बासनात गुंडाळून ठेवले जात आहेत. विकासाला विरोध म्हणजे अर्बन नक्षलवाद आणि देशद्रोह असा नवा राष्ट्रवाद उभा केला जात आहे. मग निसर्ग वाचवा असा टाहो तरी कोणापुढे फोडायचा आणि दाद तरी कुठे मागायची.

शाश्वत विकास गरजेचा

मोठमोठे रस्ते बनवले, महामार्ग बांधले, ब्रिज बनवले, बुलेट ट्रेन आणली, मेट्रो सुरू केली, नवी शहरं वसवली, त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी अजस्त्र धरणे बांधली की विकास झाला, अशा विकासाच्या भ्रामक कल्पनेतून आपण बाहेर पडले पाहिजे. डोंगर, नद्या-नाले, समुद्र, जंगले कायम ठेवून त्यांना धक्का न लागता शाश्वत विकासाच्या कल्पना आपण मांडल्या पाहिजेत. येणारी संकटे पुढील विनाशाची चाहूल देत असतात. ग्लोबल वॉर्मिंगमुळे प्रचंड तापमानवाढ होत आहे. विदर्भातील नापिकीकरणाचे आणि शेतकरी आत्महत्यांचे सर्वात मोठे कारण तापमानवाढ हे आहे. विदर्भातील तापमान ४५ ते ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. ज्या वातावरणात माणूस जगू शकत नाही, तिथे पिकं, पशुपक्षी कसे तग धरून राहतील? पिकं कशी येतील? विदर्भाचे वाळवंटीकरण होऊन ते चक्र मराठवाड्याकडे सरकत आहे. तापमानवाढीमुळे समुद्र-नद्यांच्या पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत असल्याने व हे ढग अवेळी सर्वत्र पसरत असल्याने अवकाळी पाऊस-गारा पडत आहेत. माणूस डोंगर, नद्या, समुद्र निर्माण करू शकत नसेल तर त्यांना उद्ध्वस्त करण्याचा अधिकार माणसाला कुणीच दिला नाही. एकाच पिढीमध्ये सगळेच कमावून ठेवण्याचा हव्यास माणसाच्या पुढच्या पिढ्या उद्ध्वस्त करू शकतात. निसर्गसाखळीतील डायनासोर, वाघ, सिंह, हत्ती व अनेक प्राणी-पक्षी संपले तर शेवटी माणसाचा नंबर लागणारच आहे. ही साखळी शिल्लक ठेवायची की उद्ध्वस्त करायची हे सर्वशक्तिमान आणि बुद्धिमान मानवाच्या हातात आहे. निसर्ग मानवी जीवनात फार ढवळाढवळ करत नाही, पण माणसाने जर निसर्गात अनियंत्रित हस्तक्षेप केला तर निसर्ग मात्र स्वतःला वाचवण्यासाठी आवश्यक पावलं जरूर उचलतो, हे कोरोना काळात आपण अनुभवले आहे. सरकार मदतीसाठी हात आखडता घेत आहे, तर विमा कंपन्यांनी बेसुमार लूट माजवली आहे. शेती हा आता आतबट्ट्याचा व्यवहार ठरला आहे. बळीराजाचे सगळेच आयुष्य निसर्गाच्या आणि सरकारच्या लहरीपणावर अवलंबून असते. शेती ही जगण्याची एकमेव आशाही संपुष्टात येत आहे. पावसाने झोडले आणि राजाने मारले तर दाद कोणाकडे मागायची अशी परिस्थिती आहे. आज बळीराजा जात्यात आहे. पण सुपात असलेल्या शहरवासीयांनी, राज्यकर्त्यांनी, बिल्डरांनी, धनिकांनी या सावध हाका आणि शेतकऱ्याचा आकांत ऐकलाच पाहिजे, नाहीतर विनाश अटळ आहे.

वकील, मुंबई उच्च न्यायालय

logo
marathi.freepressjournal.in