अनोखा पाळी महोत्सव !

अनोखा पाळी महोत्सव !

शाळकरी मुलं-मुली त्यात सहभागी झाली होती. तिथं असणाऱ्या शिक्षकांनी एका किशोरवयीन मुलीला झाड लावू दिलं नाही.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ३३ वर्षांची झाली. शोषण करणाऱ्या अंधश्रद्धा संपविणे हा प्राथमिक उद्देश. तिथून सुरू झालेला अंनिसचा प्रवास विज्ञान, विवेक, समता, नैतिकता, आरोग्य, मानवता, प्रबोधन असा अखंडपणे चालू आहे. काही अंधश्रद्धा सार्वजनिक असतात. त्यांचा मुकाबला सांघिकरीत्या करावा लागतो. काही अंधश्रद्धा वैयक्तिक पातळीवरच्या असतात. त्याचा मुकाबला त्याच पातळीवर करून समाजाला दिशा द्यायची असते. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. वृक्षारोपण ठिकठिकाणी सुरू आहे.

शाळा-कॉलेजच्या पटांगणावर झाडे लावली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात एका शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. शाळकरी मुलं-मुली त्यात सहभागी झाली होती. तिथं असणाऱ्या शिक्षकांनी एका किशोरवयीन मुलीला झाड लावू दिलं नाही. कारण काय तर म्हणे, त्या मुलीची मासिक पाळी झाली होती. ती अपवित्र असल्याने तिनं झाड लावू नये. जर लावले तर ते लागू होणार नाही. अशी त्या शिक्षकाची समजूत नव्हे अंधश्रद्धा होती. ती बातमी सगळीकडे पसरली. डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या बरोबर काम करीत असलेले नाशिकचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते साथी कृष्णा चांदगुडे आपल्या सहकाऱ्यासमवेत त्या शाळेत गेले. संबंधित शिक्षकाचे शास्त्रीय पद्धतीने प्रबोधन केले. त्या शिक्षकांनीही ते ऐकून घेतले. त्यानंतर काही दिवसातच कृष्णा चांदगुडे यांच्या नाशिक केम्बि्रज स्कूलमध्ये शिकणाऱ्या यशदा या किशोरवयीन मुलीला पहिली पाळी आली. कृष्णा व त्यांची पत्नी ॲड विद्या चांदगुडे या जोडीने आपल्या लेकीचा पाळी महोत्सव साजरा करायचा निर्णय घेतला. केवळ लोकांचे प्रबोधन करणारे खूप जण असतात. कृष्णा चांदगुडे मात्र कृतिशील कार्येकर्ते आहेत. त्यांचा विश्वास फक्त कथनीवर नाही तर कथनीला ते नेहमी करणीची जोड लावतात. त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या मुलीच्या प्रथम पाळीचा महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. तसे सगळीकडे मेसेज पाठविले. निमंत्रण पत्रिका काढल्या. माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावलं. नाशिकमधील एका हॉटेलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले.

प्रशस्त अशा हॉलमध्ये प्रथम पाळी महोत्सव साजरा केला गेला. पहिल्यांदा पाळी झाली म्हणून मुलींचे औक्षण केले. पाळी ही नैसर्गिक बाब आहे. तिचा विटाळ नसतो. पाळी अपवित्र नसते. मुलींना याबाबत सविस्तरपणे कुणी माहिती देत नाहीत. त्यामुळे केवळ अज्ञानातून त्यांच्या मनात पाळीविषयी भीती व गैरसमज निर्माण होतात.

त्या काळात आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे याबाबत मुलींना मार्गदर्शन करण्याची गरज असते. म्हणून पाळीचे स्वागत केले पाहिजे. म्हणून पाळी महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यास नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचा हॉल खचाखच भरला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्याबरोबर समाजातील विविध स्तरातील मंडळी हजर होती. त्यात महिला व पुरुष डॉक्टरांची संख्या चांगली होती. पाळीचे स्वागत करताना प्रामुख्याने पाळीच्या काळात आरोग्यासाठी काय काय करावे याची चांगली चर्चा तिथं केली गेली. अनेक महिला व पुरुषांनी अनुभव कथन केले. विशेष म्हणजे, कोणताही आडपडदा न ठेवता अगर संकोच न बाळगता महिला दिलखुलासपणे बोलल्या. त्यांनी त्यांचे अनुभवकथन केले. पाळीला अपवित्र समजणे, पाळीच्या वेळी विटाळ पाळणे ही अंधश्रद्धा असल्याबाबत त्यांनी खुलेपणाने चर्चा केली. किशोरवयीन मुलींना त्याची शास्त्रीय माहिती दिली गेली. एका निष्णात डॉक्टराने याबाबत मार्गदर्शन केले.

‘आता माझी पाळी, मीच देते टाळी’

हे समूहगीत तिच्या मैत्रिणींनी सादर केले. पाळी या विषयावर लघुपट दाखविण्यात आला. शे-पाचशे स्त्री-पुरुष मंडळींनी त्यांचा सहभाग नोंदवला. हा असा कार्यक्रम पहिल्यांदा होत असल्याचे अनेकांनी नमूद केले. आम्ही आमच्या घरी मुलींना प्रथम पाळी आल्यानंतर असाच महोत्सव साजरा करू, असं बऱ्याच जणांनी आवर्जून सांगितले. सर्वांनी यशदाला शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी सॅनिटरी पॅड भेट देण्यात आली. भेट आलेली सॅनिटरी पॅड गरीब मुलींना देण्याचा संकल्प चांदगुडे कुटुंबीयांनी केला. सर्वांनी जेवणाचाही आस्वाद घेतला. चांदगुडे दाम्पत्याने हा एक आगळा वेगळा पाळी महोत्सव साजरा केला. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींची उपस्थिती चांगली होती. त्या महोत्सवास चांगली प्रसिद्धी मिळाली. समाजाने याचा आदर्श घेतला पाहिजे.

साथी कृष्णा व ॲड विद्या चांदगुडे यांनी स्वतःला कर्ते समाजसुधारक म्हणून सिद्ध केले आहे. साथी कृष्णा चांदगुडे यांचं संपूर्ण कुटुंब विज्ञाननिष्ठ व विवेकवादी आहे. याचा आणखी एकदा प्रत्यय आला. कारण साधारण दोन-तीन महिन्यांपूर्वी विधवा महिलांना सन्मान देण्याची चळवळ कोल्हापूर जिल्ह्यात काही ग्रामपंचायतीनी सुरू केली होती. तसे गावोगावी ठराव मंजूर करण्यात येत होते. त्याचे सर्वत्र पडसाद उमटले होते. विधवांना सन्मान न नाकारण्याचा फतवा शासनाने काढला होता. त्यावेळी साथी कृष्णा चांदगुडे यांनी त्यांची विधवा आई सुगंधाबाई यांना त्यांनी पतिनिधनानंतर काढून टाकलेले सर्व सौभाग्य अलंकार परत त्यांना वापरावयाला दिले. त्यांचा समाजाने नाकारलेला सन्मान परत दिला. असे हे आमचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृतिशील कुटुंब सर्वांच्या आदरास पात्र आहे. त्यांना सलाम.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in