
भ्रम-विभ्रम
डॉ. अस्मिता बालगावकर
सापांशी निगडित अनेक अंधश्रद्धा प्रचलित आहेत. सापाच्या डोक्यावर मणी असतो, साप पुंगीवर नाचतो, साप बदला घेतो, साप दूध पितो, विशिष्ट सापामुळे धनलाभ होतो. या निव्वळ अंधश्रद्धा आहेत. नागपंचमी सोडता वर्षातील इतर दिवशी लोकांना साप दिसला की, ते ताबडतोब त्याला दगडाने, काठीने ठेचून मारतात. साप हा अन्नसाखळीमधील अत्यंत महत्त्वाचा घटक असून, आपल्या परंपरामुळे प्राण्यांचा जीव जाऊन अन्नसाखळी धोक्यात येत असेल, तर आपण चिकित्सक पद्धतीने विचार करणे महत्त्वाचे आहे.
आफ्रिकन-अरब शास्त्रज्ञ आणि दार्शनिक अल-जहिज यांनी १९व्या शतकात सर्वप्रथम अन्नसाखळीचा परिचय करून दिला आणि त्यानंतर १९२७मध्ये चार्ल्स एल्टन यांनी प्रकाशित केलेल्या एका पुस्तकामुळे अनेक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली. परिसंस्थेतील एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे अन्नऊर्जेचे संक्रमण निम्नस्तरापासून ते उच्चस्तरापर्यंत होते, याला अन्नसाखळी म्हणतात. सजीवाला अन्नाची गरज असते. अन्नसाखळीत अन्न मिळविणे आणि दुसऱ्याचे अन्न होणे ही प्रक्रिया सतत चालू असते. पृथ्वीवर असणाऱ्या सर्वच प्रजातींच्या अस्तित्वासाठी अन्नसाखळीची स्थिरता अत्यंत आवश्यक आहे. अर्थात पृथ्वीवरील प्रत्येक जीवाला काही ना काही महत्त्व आहे. या अन्नसाखळीतील एक जरी घटक काढून टाकला, तर पृथ्वीवरील सर्वच प्रजातींचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात धोक्यात येऊ शकते.
हिंदू धर्म शिकवतो की, या पृथ्वीवरील सर्वच सजीवांमध्ये देवाचा अंश असतो, कोणत्याही सजीवास इजा करू नये. प्राण्यांचा आपण आदर करावा, तसेच आपल्या परंपरेत अनेक प्राणी पूजनीय असतात. निसर्गातील प्राण्यांचा आदर करणे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. परंतु आपल्या परंपरांमुळे प्राण्यांचा जीव जाऊन अन्नसाखळी धोक्यात येत असेल, तर आपण करीत असलेल्या कर्मकांडावर, पूजेवर, परंपरेवर चिकित्सक पद्धतीने विचार करून त्यात आवश्यक ते बदल करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा पृथ्वीवरील अनेक प्रजाती नामशेष झाल्याशिवाय राहणार नाहीत.
अन्नसाखळीमधील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे सर्प किंवा साप. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, असे आपण म्हणतो. साप उंदीर खातो आणि त्यामुळे होणारे धान्याचे मोठे नुकसान टळते. नागपंचमीला आपण त्याची पूजा करतो. काही बायका त्याच्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा करतात ते ठीक आहे. अनेक पुरातत्त्व वास्तूत, मंदिरात सुद्धा नागदेवतेची मूर्ती आढळते. परंतु या प्रथेचा गैरफायदा घेत जेव्हा गारुडींनी नागाला पकडून त्यावर अतोनात अत्याचार करायला सुरुवात केली. तसेच त्यात अनेक अंधश्रद्धाची भर पडल्याने या प्रजातीच्या अस्तित्वावर धोका निर्माण झाला.
गारुडी नाग पकडून त्याचे दात काढून टाकतात. नागपंचमीच्या दिवशी त्या नागाला घेऊन सगळीकडे फिरतात तेव्हा बायका त्याची पूजा करतात. पूजा करताना त्यावर हळद-कुंकू टाकतात. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असतात. त्याचा घातक परिणाम नागावर होतो. लाह्या-दूध याचा नैवेद्य दाखवला जातो. साप हा मांसाहारी प्राणी असल्याने तो अजिबात लाह्या-दूध खात नसतो. तो प्रामुख्याने उंदीर, बेडूक असे छोटे प्राणी खातो. त्यामुळे आपण त्याची पूजा करून, नैवेद्य दाखवून त्यांचा खरंतर छळच करत असतो. त्यात नागमणी असलेला नाग दाखवण्यासाठी अनेकदा गारुडी त्याच्या डोक्यावर मणी किंवा खडा दोऱ्याने शिवून किंवा चिकटवून ठेवतो. असे केल्याने त्या गारुड्याचा धंदा जास्त चालतो म्हणून. अशा सर्व यातना, अत्याचार त्या नागाला सहन होत नाहीत आणि त्यांचा लवकरच मृत्यू होतो.
सापांशी निगडित अनेक अंधश्रद्धा प्रचलित आहेत. जसे की, मंत्राने, जडीबुटीने सापाचे विष उतरते. (वास्तव : सापाच्या विषावर प्रतिसर्प विष हेच एकमेव औषध आहे.)
साप चावल्यावर मिरची किंवा कडुलिंबाचा पाला खायला दिला, तर तो गोड लागतो. (वास्तव : सर्पदंशाने संवेदना कमी झाल्याने त्या माणसाला काहीही खायला दिले तरी त्याची चव कळत नाही)
गर्भवती स्त्री आणि साप यांची नजरानजर झाल्यास त्यांचे डोळे जातात. (वास्तव : सापाला इतकी बुद्धिमत्ताच नसते की कोण स्त्री, कोण पुरुष आणि कोण गर्भवती हे कळेल.)
फुलझाडावर साप असतात. (वास्तव : त्या फुलांवर जे कीटक बसतात ते खायला तिथे बेडूक येतात. त्या बेडकांना खायला साप येतात)
पुंगीच्या तालावर साप डोलतो. (वास्तव : सापांना ऐकूच येत नाही. पुंगीच्या हालचालीवर साप डोलतो. आवाजावर नाही )
साप डुख धरतो, बदला घेतो. (वास्तव : सापांना इतकी बुद्धिमत्ता नसतेच की, ते कोणाला ओळखतील आणि बदला घेतील.)
नागाच्या डोक्यावर मणी असतो. (वास्तव : याला काहीही शास्त्रीय आधार नाही)
मांडूळ सापाला दोन तोंडे असतात आणि तो पैशांचा पाऊस पडतो. (वास्तव : मांडूळ सापाला एकच तोंड असते. त्याची शेपटी आखूड असल्याने तोंड आणि शेपटीत फरक काळत नाही. पैशांचा पाऊस निव्वळ अंधश्रद्धा)
अशा असंख्य अंधश्रद्धा समाजात दिसून येतात. त्यावर अजिबात विश्वास न ठेवता आपण विवेकी वर्तन ठेवले पाहिजे.
सर्पदंश होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो. अनेकदा घराजवळ आपण खरकटे, कचरा टाकतो. ते खायला तिथे उंदीर येतात आणि त्या उंदरांना खायला मागोमाग साप येतात. म्हणून आपला परिसर साफ आणि स्वच्छ ठेवावा. परिसरात दगड, विटा, लाकूड यांचा ढीग करू नये. अशा सांदीत सापांना लपायला जागा मिळते. म्हणून उंदरांची बिळे, भिंत, खिडकी, दरवाज्यांना असलेल्या फटी बुजवून घ्याव्यात. सापांसाठी हे आपल्या घराचे प्रवेशद्वार असते. चप्पल, बूट घालण्यापूर्वी त्यात साप नसल्याची खात्री करावी. अंधारातून चालताना सोबत टॉर्च व काठी ठेवावी. रात्री जमिनीवर न झोपता पलंगावर झोपावे. सरपण, गोवऱ्या, गबाळ घराजवळ न ठेवता काही अंतरावर जमिनीपासून वर ठेवावे.
साप शेतीसाठी मित्र आहे. परंतु तो माणसाचा मित्रही नाही किंवा शत्रूही नाही. त्यामुळे त्याला पापी द्यायलाही जाऊ नये किंवा मारूही नये. काहीजण सेल्फी काढण्यासाठी, व्हिडीओ काढण्यासाठी उगाच नाही ते साहस करायला जातात आणि जीव गमावून बसतात.
सापांच्या विषाचा उपयोग औषधे बनवण्यासाठी केला जातो. उदा. कॅन्सर, हार्ट अटॅक, ब्लडप्रेशर, ॲनेस्थेशिया, पेनकिलर, इत्यादी. काही साप पाण्यावरील डासांची अंडी खाऊन डेंग्यू, मलेरिया इ. रोगांपासून आपले संरक्षण करतात. नागपंचमी सोडता वर्षातील इतर दिवशी लोकांना साप दिसला की, ते ताबडतोब त्याला दगडाने, काठीने ठेचून मारतात. तेव्हा त्यांना त्यात देव दिसत नाही. वास्तविक पाहता सर्वच साप हे विषारी नसतात. परंतु आपण कोणता साप विषारी, कोणता बिनविषारी हे ओळखू शकत नसल्याने अनेकदा लोक सर्वच सापांना घाबरून मारून टाकतात. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार साप मारणे हा कायदेशीर गुन्हा आहे. नियम मोडल्यास तीन ते सात वर्षांची कैद व दहा ते पंधरा हजार दंड होऊ शकतो. एक साप त्याच्या जीवनकाळात सुमारे ५,५०,००० उंदरांवर नियंत्रण ठेवतो. एक साप सरासरी १२ वर्षे जगल्यास ४५,००० (सरासरी) ×१२ = ५,४०,००० इतक्या उंदरांवर नियंत्रण ठेवतो. म्हणून साप न मारता आपण त्यांना अभय दिले पाहिजे. आपल्या परिसरात साप आढळल्यास सर्पमित्रांना बोलावून त्यांना नैसर्गिक सान्निध्यात सोडून दिले पाहिजे. नागपंचमीला आपण विवेकी वर्तन करून सापांना अभय दिले, तर आपण खऱ्या अर्थाने या नागराजाला प्रसन्न करू शकतो.
लेखिका अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या आहेत.