शस्त्रास्त्रांची स्पर्धा आता कुठवर जाणार?

अमेरिकेने अत्यंत खळबळजनक आणि तितकीच चिंताजनक कबुली देऊन जगाचे टेन्शन वाढवले आहे. मानवी इतिहासातील एका नव्या आणि अधिक धोकादायक युद्धाच्या पर्वाची ती अधिकृत नांदीच आहे.
शस्त्रास्त्रांची स्पर्धा आता कुठवर जाणार?
शस्त्रास्त्रांची स्पर्धा आता कुठवर जाणार?'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

देश-विदेश

भावेश ब्राह्मणकर

अमेरिकेने अत्यंत खळबळजनक आणि तितकीच चिंताजनक कबुली देऊन जगाचे टेन्शन वाढवले आहे. मानवी इतिहासातील एका नव्या आणि अधिक धोकादायक युद्धाच्या पर्वाची ती अधिकृत नांदीच आहे.

मानवाने अंतराळ जिंकण्याचे स्वप्न पाहिले, चंद्रावर पाऊल ठेवले, मंगळावर यंत्रे पाठविली आणि पृथ्वीभोवती हजारो उपग्रहांचे जाळे उभे केले. पण आता अंतराळाकडे पाहण्याची दृष्टी बदलत आहे. अंतराळ संशोधन, दळणवळण आणि हवामानाच्या अभ्यासासाठी असलेले अवकाश हळूहळू लष्करी सामर्थ्याचे नवे रणांगण बनत आहे. अमेरिकेने अंतराळ कक्षेत ‘ऑन-ऑर्बिट स्पेस कंट्रोल वेपन्स’ तैनात केल्याची केलेली सार्वजनिक घोषणा या बदलाचे गांभीर्य अधोरेखित करणारी आहे. अमेरिकी हवाई दलाचे सचिव ट्रॉय मिंक यांनी ही माहिती दिली; मात्र या शस्त्रांचे स्वरूप, क्षमता किंवा तैनातीची नेमकी वेळ त्यांनी स्पष्ट केलेली नाही.

ही केवळ अमेरिकेची संरक्षणात्मक तयारी आहे की अंतराळातील नव्या शस्त्रस्पर्धेची सुरुवात? हा प्रश्न आता केवळ लष्करी तज्ज्ञांचा राहिलेला नाही. कारण आजची युद्धव्यवस्था उपग्रहांशिवाय जवळजवळ अशक्य आहे. जीपीएस, क्षेपणास्त्रांचे मार्गदर्शन, गुप्तचर माहिती, लष्करी दळणवळण, हवामानाचा अंदाज, ड्रोन संचालन, अचूक लक्ष्यभेदन आणि रणांगणाचे निरीक्षण—या सर्वांच्या मुळाशी अंतराळातील उपग्रह आहेत. म्हणजेच भविष्यातील युद्ध पृथ्वीवर सुरू होण्यापूर्वीच अंतराळात सुरू होऊ शकते.

अमेरिका, चीन आणि रशिया गेल्या अनेक दशकांपासून उपग्रहविरोधी क्षमता विकसित करीत आहेत. उपग्रह पाडणारी क्षेपणास्त्रे, इलेक्ट्रॉनिक जॅमिंग, सायबरहल्ले, लेझर, उच्च-ऊर्जा मायक्रोवेव्ह आणि दुसऱ्या उपग्रहाच्या जवळ जाऊन त्याला निष्क्रिय करण्याची क्षमता—अशा अनेक प्रकारच्या ‘काउंटर-स्पेस’ तंत्रज्ञानावर काम सुरू आहे. अमेरिकी स्पेस फोर्सच्या मते चीन आणि रशिया अमेरिकी अंतराळाधारित क्षमतांना विस्कळीत किंवा निष्प्रभ करण्यासाठी विविध काउंटर-स्पेस प्रणाली विकसित करीत आहेत. चीनच्या लष्करी आधुनिकीकरणात अंतराळाला भविष्यातील संघर्षाचा महत्त्वाचा घटक मानले जात असल्याचे अमेरिकी विश्लेषणात नमूद आहे. रशियाच्या बाबतीतही जवळून उपग्रहांच्या हालचाली करणे, लेझर प्रणाली आणि इतर काउंटर-स्पेस क्षमता याबाबत अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे.

परंतु येथे एक महत्त्वाचा फरक आहे. अंतराळातील प्रत्येक लष्करी प्रणाली म्हणजे उपग्रह पाडणारे क्षेपणास्त्र असे नाही. भविष्यातील शस्त्रस्पर्धा अधिक सूक्ष्म असू शकते. एखाद्या उपग्रहाला नष्ट न करता त्याची दृष्टी बंद करणे, त्याचे संप्रेषण खंडित करणे, त्याच्या संगणकीय प्रणालीत हस्तक्षेप करणे किंवा त्याची कक्षा बदलणे. ही सुद्धा युद्धातील प्रभावी शस्त्रे ठरू शकतात. म्हणूनच अंतराळातील युद्ध म्हणजे उद्या आकाशात क्षेपणास्त्रांची आतषबाजी होईल, असे सरळ समीकरण नाही. उलट, अदृश्य युद्ध अधिक धोकादायक ठरू शकते.

अमेरिकेने यापूर्वी उपग्रहविरोधी क्षमता प्रदर्शित केली आहे. मात्र कक्षेत तैनात असलेल्या ‘स्पेस कंट्रोल वेपन्स’बाबत वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने केलेली सार्वजनिक कबुली वेगळी आहे. मिंक यांच्या म्हणण्यानुसार ही शस्त्रे शत्रूच्या कारवायांपासून संयुक्त दलाचे संरक्षण करण्यासाठी आहेत. त्यांच्या स्वरूपाची माहिती मात्र सार्वजनिक करण्यात आलेली नाही.

माजी अमेरिकी संरक्षण अधिकाऱ्यांनी अशा प्रणालींमध्ये लेझर, उच्च-शक्ती मायक्रोवेव्ह किंवा शत्रूच्या उपग्रहाला पकडून त्याची कक्षा बदलू शकणाऱ्या उपग्रहांचा समावेश असू शकतो, असे पूर्वी सांगितले होते. यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे ‘लो-डेब्रिस’ शस्त्रांवर दिला जाणारा भर. कारण एखादा उपग्रह क्षेपणास्त्राने उडवला तर त्याचे हजारो तुकडे कक्षेत विखुरू शकतात. हे तुकडे इतर उपग्रहांसाठीही प्रचंड धोका निर्माण करू शकतात. अमेरिकेच्या घोषणेनंतर चीनने अंतराळातील शस्त्रस्पर्धेला विरोध केला आणि अमेरिकेने अंतराळात लष्करी शक्ती वाढवणे थांबवावे, अशी भूमिका मांडली. रशियानेही अंतराळाचे शस्त्रमुक्तीकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहमतीची गरज व्यक्त केली. परंतु येथे जागतिक सुरक्षेतील नेहमीचा विरोधाभास दिसतो. एकीकडे प्रत्येक महासत्ता अंतराळाच्या शांततापूर्ण वापराची भाषा करते; दुसरीकडे प्रत्येकजण भविष्यातील संघर्षासाठी अंतराळातील आपली क्षमता वाढवत आहे. यातूनच ‘सुरक्षेसाठी शस्त्रसज्जता’ आणि ‘शस्त्रसज्जतेमुळे निर्माण होणारी असुरक्षा’ यांचे दुष्टचक्र सुरू होते.

आज उपग्रहांचे संरक्षण हा विषय आहे. उद्या कक्षेतून क्षेपणास्त्रांचा मागोवा घेणे आणि त्यांना अडवणे हा विषय असेल. त्यानंतर अंतराळातूनच आक्रमक क्षेपणास्त्र किंवा इतर प्रणाली वापरण्याचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. अमेरिकेच्या ‘गोल्डन डोम’ क्षेपणास्त्र संरक्षण संकल्पनेत अंतराळाधारित इंटरसेप्टरचाही विचार केला जात आहे. या संकल्पनेचा उद्देश क्षेपणास्त्रांच्या धोक्यापासून अमेरिकेचे संरक्षण करणे हा आहे.

अंतराळातील युद्धाची सर्वात भीषण बाब म्हणजे त्याचे परिणाम केवळ दोन देशांपुरते मर्यादित राहणार नाहीत. समजा एखाद्या संघर्षात मोठ्या संख्येने उपग्रह नष्ट झाले. त्यातून निर्माण झालेला अवकाशीय कचरा इतर उपग्रहांवर आदळू शकतो. अशा प्रकारची साखळी प्रतिक्रिया निर्माण झाल्यास पृथ्वीभोवतीची काही कक्षा दीर्घकाळ वापरण्यायोग्य राहणार नाही, अशी भीती व्यक्त केली जाते. याचा परिणाम मोबाइल दळणवळणापासून विमान वाहतूक, जहाज वाहतूक, इंटरनेट, हवामान अंदाज आणि लष्करी संप्रेषणापर्यंत सर्वत्र होऊ शकतो.

या बदलाकडे भारताला अत्यंत गांभीर्याने पाहावे लागेल. भारताची अंतराळ क्षमता वेगाने विस्तारत आहे. दूरसंचार, नेव्हिगेशन, हवामान, कृषी, आपत्ती व्यवस्थापन, सीमाव्यवस्थापन आणि संरक्षण या सर्व क्षेत्रांसाठी अंतराळ महत्त्वाचे होत आहे. विशेषतः चीनच्या वाढत्या अंतराळ क्षमतेच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी सुरक्षित, लवचिक आणि पर्यायी अंतराळ पायाभूत व्यवस्था आवश्यक ठरते. युद्धाच्या परिस्थितीत एखादा उपग्रह निकामी झाला तरी संपूर्ण व्यवस्था ठप्प होऊ नये, यासाठी अनेक उपग्रहांचे जाळे, सुरक्षित संप्रेषण, जमिनीवरील पर्यायी प्रणाली आणि काउंटर स्पेस धोक्यांचा सामना करण्याची क्षमता विकसित करणे महत्त्वाचे ठरेल. पण त्याच वेळी भारताने अंतराळाला केवळ शस्त्रस्पर्धेचे क्षेत्र बनविण्याऐवजी जबाबदार अंतराळ शक्ती म्हणून आपली भूमिका मजबूत करणेही आवश्यक आहे.

आज अमेरिका म्हणते की, आम्ही संरक्षणासाठी सज्ज आहोत. चीन म्हणतो की, अमेरिका शस्त्रस्पर्धा वाढवत आहे. रशिया म्हणतो की, अंतराळ शस्त्रमुक्त असावे. पण या सर्व वक्तव्यांच्या पलीकडे प्रत्यक्षात तिन्ही महासत्ता आपापली क्षमता वाढवत आहेत. याच विरोधाभासात भविष्यातील संकट दडले आहे.

अंतराळात शस्त्र ठेवणे सोपे असू शकते; पण तेथे युद्ध सुरू झाल्यावर ते थांबवणे अत्यंत कठीण असू शकते. म्हणूनच आज प्रश्न केवळ ‘कोणाकडे किती शक्तिशाली अंतराळशस्त्रे आहेत?’ हा नसावा. खरा प्रश्न असा असायला हवा—मानवजातीला अंतराळात शस्त्रस्पर्धेची मर्यादा आखता येईल का? कारण शस्त्रास्त्रांची स्पर्धा जर जमिनीवरून आकाशात, आकाशातून अंतराळात आणि आता कक्षेत पोहोचली असेल, तर पुढची पायरी कुठली असेल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे. अंतराळ जिंकण्याच्या शर्यतीपेक्षा अंतराळ वाचवण्याची शर्यत अधिक महत्त्वाची ठरणार आहे. जर आज आपण या अंतराळातील शस्त्रास्त्र स्पर्धेला आळा घातला नाही, तर उद्याचे आकाश चांदण्यांचे नसून क्षेपणास्त्रे आणि विध्वंसक उपग्रहांच्या सावल्यांचे असेल. विज्ञानाचा हा असा पराभव असेल, जिथे बुद्धिमत्तेने स्वतःच्याच विनाशाचा मार्ग प्रशस्त केला आहे. आज या क्षेत्रातील गुप्त स्पर्धा ही मानवजातीच्या नैतिकतेची अधोगती दर्शवते. शांततेच्या सुरातून सुरू झालेला मानवाचा अवकाश प्रवास जर युद्धाच्या घोषात संपणार असेल, तर यापेक्षा मोठी शोकांतिका कोणतीही असू शकत नाही. वेळेवर पावले उचलली नाहीत, तर हा 'अंतिम सीमांत' मानवाचा अखेरचा सीमांत ठरेल यात तीळमात्र शंका नाही.

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार.

logo
marathi.freepressjournal.in