कायद्याचे तीनतेरा! राज्यातून 'माफियाराज' नष्ट करण्याचा चंग पण...

राज्यातील माफियांना आणि अन्य गुंडांना वचक बसविण्याचे जे कार्य योगी आदित्यनाथ सरकारने हाती घेतले होते, त्याचे कौतुक होत आहे
कायद्याचे तीनतेरा! राज्यातून 'माफियाराज' नष्ट करण्याचा चंग पण...

उत्तम प्रदेश म्हणून जे राज्य ओळखले जावे अशी ज्या उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारची अपेक्षा होती त्या राज्यात कायद्याचे राज्य आहे की नाही असे म्हणण्यासारख्या घटना अलीकडील काळात घडल्या आहेत. राज्यातून ‘माफियाराज’ नष्ट करण्याचा चंग बांधलेल्या आणि त्यादृष्टीने कारवाई करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांचा सर्वत्र ‘बुलडोझर मॅन’ म्हणून दबदबा निर्माण झाला होता. गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही, असा निर्धार करून योगी सरकारकडून पावले टाकली जात होती, पण योगी आदित्यनाथ सरकारच्या कारभाराला डाग लावणाऱ्या ज्या घटना नुकत्याच घडल्या त्या लक्षात घेता उत्तर प्रदेशात कायद्याचे तीनतेरा वाजले आहेत, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.

राज्यातील माफियांना आणि अन्य गुंडांना वचक बसविण्याचे जे कार्य योगी आदित्यनाथ सरकारने हाती घेतले होते, त्याचे कौतुक होत असतानाच कुख्यात गुंड, माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांना शनिवारी रात्री पोलीस बंदोबस्तात वैद्यकीय तपासणीसाठी इस्पितळात नेत असताना तीन हल्लेखोरांनी त्यांची अगदी जवळून गोळ्या घालून हत्या केली. पोलीस बंदोबस्त असताना या दोघा कुप्रसिद्ध भावांना ठार करण्याची घटना पाहता उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य नसल्याचेच दिसून आले. आपल्याकडे गुन्हे करणाऱ्यांना कायद्यानुसार शासन केले जाते. अशा गुन्हेगारांना शिक्षा ठोठाविण्याचे काम न्यायपालिका करीत असते. न्यायपालिका जो काही निर्णय देईल तो लक्षात घेऊन गुन्हेगारांना शासन केले जाते. एखाद्या गुन्हेगाराने कितीही गंभीर गुन्हा केला असला तरी त्याच्यावरील गुन्हा सिद्ध होईपर्यंत त्याला शासन केले जाऊ शकत नाही. अतिक आणि अशरफ हे कुप्रसिद्ध गुंड होते. या ‘बाहुबलीं’नी राजकारणात दबदबा निर्माण केला होता, पण त्यांना गोळ्या घालून ठार करण्याचा अधिकार कायद्याने कोणालाही दिलेला नाही. या दोन्ही भावांविरुद्ध मोठ्या संख्येने गुन्हे नोंदविण्यात आले आहेत ही वस्तुस्थिती आहे, पण केवळ न्यायपालिकाच त्यांच्यापुढे आलेले पुरावे लक्षात घेऊन त्यांना शिक्षा फर्मावू शकते, पण अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांना पोलीस आणि पत्रकारांच्यादेखत गोळ्या घालण्यात आल्या. अवघ्या २२ सेकंदांमध्ये हे हत्याकांड पार पडले. या हत्येसंदर्भात पोलिसांनी तीन हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून, घटनास्थळावरून दोन पिस्तुले आणि काही जिवंत काडतुसेही ताब्यात घेतली आहेत.

या घटनेच्या आधी दोन दिवस उत्तर प्रदेश पोलिसांनी अतिकचा मुलगा असद अहमद आणि त्याचा साथीदार गुलाम या दोघांना झाशी येथे झालेल्या चकमकीत मारले होते. या दोघांना पकडण्यासाठी प्रत्येकी पाच लाखांचे इनाम जाहीर करण्यात आले होते. असद अहमद हा उमेश पाल हत्याकांडातील आरोपी होता. पोलीस चकमकीत झालेल्या या हत्येबद्दल विरोधकांकडून संशय व्यक्त निर्णय येत असतानाच अतिक आणि अशरफ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेची कसून चौकशी करण्याची मागणी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष यांनी केली होती. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ही चकमक ‘बनावट’ असल्याचा आरोप केला आहे. मुख्य मुद्यांवरून अन्यत्र लक्ष वळविण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे, असेही अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. गुरुवारी ही घटना घडली आणि शनिवारी रात्री अतिक आणि अशरफ यांची पोलीस बंदोबस्तात असताना हत्या झाली. २०१७मध्ये योगी आदित्यनाथ सरकार सत्तेवर आल्यानंतर पोलिसांसमवेत झालेल्या चकमकीत १८० आरोपी मारले गेल्याची आकडेवारी आहे. एकूणच, पोलिसांच्या अशा ज्या चकमकी होतात त्याबद्दल शंका उपस्थित केल्या जातात. अतिक आणि अशरफ यांची प्रचंड दहशत होती. त्यांच्यावर शेकडो गुन्हे होते. आपल्या गुंडागर्दीच्या बळावर त्यांनी प्रचंड माया गोळा केली होती. हे सर्व खरे असले तरी कायदा हातात घेऊन कोणीही कोणाला देहदंड देऊ शकत नाही. अशा घटना कोठे घडत असतील तर त्या राज्यात कायद्याचे तीनतेरा वाजले आहेत असे कोणी म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. अतिक अहमदसारख्या बाहुबलीचे कोणीच समर्थन करणार नाही, पण त्याला आणि त्याच्या भावाला कायदा हातात घेऊन ज्या प्रकारे ठार करण्यात आले त्याचे समर्थनही केले जाऊ शकत नाही. या घटनेची सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात घडलेल्या घटनेवरून राजकारण तापणार आहे हे उघड आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in