

मत आमचेही
ॲड. श्रीनिवास बिक्कड
इतिहासाचा सन्मान करणे, संविधानाचे रक्षण करणे, लोकशाहीची मूल्ये जपणे आणि भारताच्या विविधतेतील एकतेसाठी ठामपणे उभे राहणे, हीच खरी राष्ट्रभक्ती आहे. म्हणून ‘वंदे मातरम्’चा जयघोष जरूर करा; पण त्याला राजकीय द्वेषाचे हत्यार बनवू नका.
'वंदे मातरम्’ हा शब्द उच्चारला की भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो. हे केवळ एक गीत नाही. हा भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लाखो भारतीयांच्या त्यागाचा, संघर्षाचा आणि बलिदानाचा भावनिक हुंकार आहे. ब्रिटिशांच्या दडपशाहीविरुद्ध लढताना असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या ओठांवर ‘वंदे मातरम्’ होते. तुरुंगाच्या कोठडीत, पोलिसांच्या लाठ्यांसमोर आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देताना हा जयघोष भारतीयांच्या मनात धैर्य निर्माण करत होता. म्हणूनच ‘वंदे मातरम्’चा सन्मान करणे म्हणजे केवळ एक गीत म्हणणे नव्हे; त्या गीतामागचा स्वातंत्र्यलढा, त्याग, बहुविध भारतीय समाजाची एकजूट आणि लोकशाही-स्वातंत्र्याची मूल्ये यांचा सन्मान करणे होय. दुर्दैव एवढेच की आज ‘वंदे मातरम्’च्या या महान इतिहासाला एका संकुचित राजकीय राष्ट्रवादाच्या चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या विचारधारांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता, ज्यांनी स्वातंत्र्यानंतर अनेक दशके तिरंगा फडकावला नाही. त्या विचारधारा आज स्वातंत्र्यलढ्याच्या प्रतीकांवर मालकी हक्क सांगत आहेत. आपल्याला राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र वाटण्याचा अधिकार मिळाला आहे, अशा थाटात द्वेषाचे राजकारण करत आहेत.
‘वंदे मातरम्’चा इतिहास काँग्रेसपासून वेगळा करता येणार नाही : आज काँग्रेसला ‘वंदे मातरम्’विरोधी ठरवणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी आधी स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास वाचावा. १८९६ मध्ये कोलकाता येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ‘वंदे मातरम्’ गायले; त्या अधिवेशनाचे अध्यक्ष रहिमतुल्ला सयानी हे मुस्लिम समाजातील नेते होते. १९०५ च्या बंगाल फाळणीनंतर स्वदेशी आंदोलनात ‘वंदे मातरम्’ हा ब्रिटिशविरोधी संघर्षाचा प्रभावी घोष बनला आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तो राष्ट्रीय आंदोलनाचा आवाज ठरला. म्हणजेच भाजपच्या जन्माच्या अनेक दशके आधीपासून ‘वंदे मातरम्’ स्वातंत्र्यलढ्याचा अविभाज्य भाग होते. त्यामुळे आज भाजपने त्याचा नव्याने शोध लावल्यासारखे करून काँग्रेसला ‘वंदे मातरम्’विरोधी ठरवणे हा केवळ राजकीय दुटप्पीपणा नाही, तर स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाशी केलेली प्रतारणा आहे.
१९३७ चा विवेकी निर्णय : ‘वंदे मातरम्’च्या संपूर्ण रचनेबाबत त्या काळात काही आक्षेप आणि चर्चा निर्माण झाल्या होत्या. भारत हा विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि परंपरांचा देश आहे, याची जाणीव असलेल्या काँग्रेस नेतृत्वाने या प्रश्नाकडे राजकीय भांडवल म्हणून नव्हे तर राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने पाहिले. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद आणि इतर राष्ट्रीय नेत्यांनी व्यापक भारतीय समाजाच्या भावनांचा विचार केला. त्यामुळे ‘वंदे मातरम्’च्या पहिल्या दोन कडव्यांना राष्ट्रीय आंदोलनात मानाचे स्थान मिळाले. आज दोन कडवी म्हणणाऱ्यांना राष्ट्रविरोधी ठरवण्याचा प्रयत्न करणारे महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस यांनाही राष्ट्रविरोधी ठरवणार का?
राष्ट्रभक्ती म्हणजे नेमके काय?
राष्ट्रभक्ती म्हणजे फक्त ‘भारत माता की जय’ म्हणणे नाही. राष्ट्रभक्ती म्हणजे तिरंगा हातात घेऊन फोटो काढणे नाही. राष्ट्रभक्ती म्हणजे ‘वंदे मातरम्’ किती वेळा म्हटले याची मोजदाद करणे तर अजिबात नाही. राष्ट्रभक्ती म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याचा सन्मान. संविधानाचे रक्षण. लोकशाही संस्थांचे स्वातंत्र्य. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण. धर्मनिरपेक्षतेचा आदर. विविधतेत एकतेचे जतन. गरीब, शेतकरी, कामगार, महिला, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांक यांच्या अधिकारांसाठी उभे राहणे आणि देशाच्या अखंडतेसाठी स्वतःच्या राजकीय स्वार्थापेक्षा भारताला मोठे मानणे, हीच खरी राष्ट्रभक्ती आहे.
‘वंदे मातरम्’ला राजकीय हत्यार बनवू नका : केंद्र सरकार ‘वंदे मातरम्’ला राजकीय रंग देऊन राष्ट्रभक्तीची नवी व्याख्या लादण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रभक्ती ही कोणत्याही सरकारने, पक्षाने किंवा सत्तेने दिलेली पदवी नाही. ती भारतीयांच्या मनात असलेली भावना आहे आणि ती देशासाठीची निष्ठा, संविधानावरील विश्वास, लोकशाहीचे रक्षण आणि देशाच्या एकतेसाठीच्या बांधिलकीतून सिद्ध होते. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, ज्यांना ‘वंदे मातरम्’ची दोन कडवीही पाठ नाहीत, किंबहुना ती पाहूनही नीट वाचता येणार नाहीत, अशी मंडळी आज इतरांना राष्ट्रभक्तीचे धडे देत आहेत.
महाराष्ट्रातील ‘फिल्मी वंदे मातरम्’चे काय?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ऐवजी चित्रपटातील गाणे वाजवण्यात आले. ‘वंदे मातरम्’च्या सन्मानाबाबत इतका आक्रमक पवित्रा घेणाऱ्या भाजपने या घटनेवर मात्र मौन बाळगले. ‘वंदे मातरम्’च्या या अवमानाचा निषेध करण्याचे धाडस भाजपने दाखवावे. याविरोधात ‘बोंबाबोंब’ आंदोलने करावीत आणि मगच इतरांकडे बोट दाखवावे.
संविधान सभेने दिलेले उत्तर आजही पुरेसे आहे : २४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी स्पष्ट केले की ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत असेल, तर स्वातंत्र्यलढ्यात ऐतिहासिक भूमिका बजावलेल्या ‘वंदे मातरम्’लाही ‘जन गण मन’इतकाच सन्मान आणि समान दर्जा असेल. हा निर्णय स्वतंत्र भारताच्या संविधान सभेने घेतला; त्यावेळी नरेंद्र मोदी नव्हे, तर पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान होते.
काँग्रेसला राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र नको : काँग्रेसला राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र भाजपकडून घेण्याची गरज नाही. या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसच्या लाखो कार्यकर्त्यांनी तुरुंगवास भोगला. हजारो कार्यकर्त्यांनी लाठ्या खाल्ल्या. असंख्यांनी प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस यांच्यासह असंख्य नेत्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य झोकून दिले. काँग्रेसने भारताला केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळवून दिले नाही; तर स्वतंत्र भारताला लोकशाही, सार्वत्रिक मतदानाचा अधिकार, संसदीय व्यवस्था, संस्थात्मक स्वातंत्र्य आणि संविधानिक मूल्यांचा पाया दिला. म्हणून काँग्रेसला राष्ट्रभक्ती शिकवण्याचा प्रयत्न म्हणजे इतिहासाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न आहे.
‘वंदे मातरम्’ कोणाचे?
हा प्रश्नच चुकीचा आहे. ‘वंदे मातरम्’ कोणत्याही राजकीय पक्षाची मालमत्ता नाही; तो भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा अमूल्य राष्ट्रीय वारसा आहे. त्यामुळे त्याचा सन्मान करायचा असेल तर त्याच्या इतिहासाचाही सन्मान केला पाहिजे आणि त्याचा जयघोष करायचा असेल तर त्यामागे उभ्या असलेल्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले पाहिजे. ‘वंदे मातरम्’ला राजकीय वादाचे किंवा हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचे हत्यार बनवणे हा त्याच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान आहे. राष्ट्रभक्ती घोषणा देऊन सिद्ध होत नाही; संविधानाचे रक्षण, लोकशाही संस्थांचे संरक्षण, स्वायत्त संस्थांचा सन्मान आणि प्रत्येक भारतीयाच्या अधिकारांसाठी ठामपणे उभे राहणे हीच खरी राष्ट्रभक्ती आहे.
‘वंदे मातरम्’ म्हणजे मातृभूमीला वंदन आणि त्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व झोकून दिले, त्यांच्या त्यागाला व बलिदानाला अभिवादन. या महान वारशावर कोणत्याही पक्षाला, सत्तेला किंवा विचारधारेला मालकी हक्क सांगता येणार नाही. इतिहासाला सोयीच्या राजकारणासाठी वाकवून राष्ट्रभक्तीची मक्तेदारीही मिळवता येत नाही. इतिहासाचा सन्मान करणे, संविधानाचे रक्षण करणे, लोकशाहीची मूल्ये जपणे आणि भारताच्या विविधतेतील एकतेसाठी ठामपणे उभे राहणे, हीच खरी राष्ट्रभक्ती आहे. म्हणून ‘वंदे मातरम्’चा जयघोष जरूर करा; पण त्याला राजकीय द्वेषाचे हत्यार बनवू नका.
माध्यम समन्वयक
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी