पानिपतची तिसरी लढाई आम्ही जिंकणार आहोत

संयुक्त राष्ट्र संघाच्या सभागृहामध्ये मराठी भाषेमध्ये भाषण करणारी पहिली व्यक्ती मी ठरले, याचा मला विशेष अभिमान आहे. हीच गोष्ट जगभरातील मराठी भाषिकांना आनंद, ऊर्जा, आत्मविश्वास देणारी ठरली.
पानिपतची तिसरी लढाई आम्ही जिंकणार आहोत
Photo : X (@ActionAidIndia)
Published on

भवताल

ॲड. वर्षा देशपांडे

संयुक्त राष्ट्र संघाच्या सभागृहामध्ये मराठी भाषेमध्ये भाषण करणारी पहिली व्यक्ती मी ठरले, याचा मला विशेष अभिमान आहे. हीच गोष्ट जगभरातील मराठी भाषिकांना आनंद, ऊर्जा, आत्मविश्वास देणारी ठरली.

माझ्यासाठी ११ जुलै हा दिवस खूप आनंदाचा आणि ऊर्जा देणारा आहे. ११ जुलै हा जागतिक लोकसंख्या विकास दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस माझ्यासाठी वेगळाच आनंदाने ऊर्जा घेऊन आला. युनायटेड नेशन्सच्या न्यूयॉर्कमधील मुख्यालयात मला ‘संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघाच्या सभागृहामध्ये तिसरी भारतीय व्यक्ती म्हणून समस्त भारतीयांच्या वतीने आणि खास करून महाराष्ट्रातील लोकांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारताना मला आनंद झाला.

आपण आपल्या मातृभाषेत विचार करीत असतो आणि इतर भाषांमध्ये रूपांतर करून बोलत आणि लिहीत असतो. म्हणूनच हा पुरस्कार स्वीकारताना मी मराठीत बोलण्याची परवानगी मागितली आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या सभागृहामध्ये मराठी भाषेमध्ये भाषण करणारी पहिली व्यक्ती मी ठरले, याचा मला विशेष अभिमान आहे. दुसऱ्या भाषेचा दु:स्वास करायचा नाही; जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा अधिकाधिक भाषा, संस्कृती, त्या ठिकाणचे खाद्यपदार्थ यांचा आस्वाद घ्यायचा ही माझी भूमिका आहे. त्यामुळे मराठी बरोबरीनेच मी बेळगावची असल्यामुळे कन्नड देखील माझी मातृभाषा आहे. हिंदी आणि इंग्रजी मी लिहू-बोलू शकते. तेलुगू मला समजते. कोकणी मला येते. त्यामुळे देशभरात कामाच्या निमित्ताने फिरताना आणि बोलताना मला अधिक सोपे जाते. संयुक्त राष्ट्र संघाच्या सभागृहात मराठीतील भाषण इंग्रजीसह जगभरातील रशियन, स्पनिश, फ्रेंच इत्यादी नऊ भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आले. रियल टाइम भाषांतर होऊन तो कार्यक्रम यू.एन. टीव्हीवरून टेलिकास्ट झाला आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या म्हणजेच जगाच्या इतिहासाच्या पानावर आपण मराठीची मोहर उमटवली, याचा मला आनंद आहे. हीच गोष्ट जगभरातील मराठी भाषिकांना आनंद, ऊर्जा, आत्मविश्वास देणारी ठरली.

यू.एन.एफ.पी.ए.च्या वतीने दिला जाणारा ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवार्ड २०२५’ हा सन्मानाचा पुरस्कार वैयक्तिक कॅटेगरीत दलित महिला विकास मंडळाच्या माध्यमातून मी गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा आणि मुलींची कमी होणारी संख्या या विषयात केलेल्या कामाबद्दल मला देण्यात आला आहे. यापूर्वी हा पुरस्कार खूप मोठ्या व्यक्तींना देण्यात आला आहे. त्यांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा मान मला मिळाला आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. हा पुरस्कार जनसामान्यांच्या सोबत राहून एका सामान्य महिलेने छोट्या संस्था- संघटनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीने केलेल्या स्त्री-पुरुष समतेच्या संदर्भातील कामाला दिला गेला आहे आणि म्हणून हा सन्मान संपूर्ण जगभरातील, भारतातील व महाराष्ट्रातील लोकांच्या प्रश्नांसाठी लोकांच्या सोबत राहून लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या, त्यांच्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व संस्था- संघटनांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा सन्मान आहे. म्हणून त्यांच्या सर्वांच्या वतीने हा पुरस्कार मी नम्रतापूर्वक स्वीकारला आहे. या पुरस्काराने केलेल्या कामाचा सन्मान तर होतच आहे, पण त्याहीपेक्षा हा पुरस्कार स्वीकारताना माझ्या मनात जबाबदारीची जाणीव अधिक आहे. भविष्यकाळातील जनसामान्यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना हा पुरस्कार ऊर्जा देईल, लढण्याचे बळ देईल, याची मला खात्री आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने गेल्या ३० वर्षांच्या सार्वजनिक जीवनातील प्रवासाचा मी जेव्हा आढावा घेते, तेव्हा अनेक सहप्रवासी आणि आपण करत असलेल्या कामात त्यांनी दिलेला सहभाग याची मला प्रकर्षाने आठवण येते.

गर्भलिंग निदान रोखण्यासाठी ज्या गरोदर महिलांनी सहकार्य केले; हे एवढे मोठे काम त्यांच्यामुळे होऊ शकले, म्हणून हा पुरस्कार त्यांना आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या लेकरांना म्हणजेच माझ्या नातवंडांना मी समर्पित करते आहे. त्याचबरोबर जे अधिकारी, सरकारी वकील, डॉक्टर, प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधी, साक्षीदार, पंच आणि अधिकाऱ्यांना मदत करणारे सरकारी कर्मचारी, यांनी आमच्या बांधिलकीवर विश्वास ठेवून आमच्यासोबत त्रास घेतला आहे, प्रवास केला आहे. त्यांच्या सहभागाशिवाय या टप्प्यावर हे काम येणे शक्य झाले नसते. माझे सगळ्यात महत्त्वाचे आणि सावलीसारखे सोबत असणारे सहकारी ॲड. शैला जाधव आणि कैलास जाधव यांचा उल्लेख न करता मी एकही पाऊल किंवा एकही गोष्ट करू शकत नाही. या पुरस्कारामध्ये ते माझ्या बरोबरीचे भागीदार आहेत, अशी माझी भावना आहे.

गर्भलिंग निदान आणि मुलींची कमी होणारी संख्या याबाबत आम्ही केलेले काम, हे स्त्री-पुरुष समतेच्या दिशेने पडलेले सगळ्यात मोठे महत्त्वाचे ऐतिहासिक पाऊल जरी असले तरी बीड जिल्ह्यात आम्ही यू.एन.एफ.पी.ए. यांच्या आर्थिक आणि तांत्रिक सहकार्यातून लहान मुलींची होणारी लग्न थांबवण्याचे काम केले. नुसते लग्न थांबवली असे नाही, तर त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. २५०० हून अधिक मुलींना हा विश्वास दिला. कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले आणि शंभरहून अधिक मुली आज बालविवाहाच्या कचाट्यातून वाचल्या आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. हे सगळे केवळ युनायटेड नेशन्स पाॅप्युलेशन फंड, त्यांच्या महाराष्ट्र ऑफिसचा पुढाकार, अनुजा गुलाटी आणि भारतातील यू.एन.एफ.पी.ए.चे ऑफिस आणि त्यामध्ये कार्यरत असणारे सर्व अधिकारी यांच्यामुळे होऊ शकले; त्यांच्याप्रति ऋण व्यक्त करायचे आहे. या सर्वांमुळे मुलींना जीवन कौशल्य, आर्थिक आणि कायदा साक्षरता मिळाल्यामुळे ‘नाही’ म्हणण्याची क्षमता मुलींच्यात निर्माण झाली. आयुष्यातला योग्य तो निर्णय मुली घेऊ शकतात, असा अनुभव या सगळ्या कामातून आम्हाला मिळाला. गावातील एका मुलीला तिच्या स्वप्नाप्रमाणे जगण्याचे बळ मिळाले, तिला स्वत्वाची जाणीव झाली, तर गावातील पुढच्या काही पिढ्यांमधील मुलींच्या समोर ती आदर्श बनून उभी राहते. म्हणून छोटे जरी असले तरी या दरम्यान झालेले हे काम संपूर्ण बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील अडीच-तीन हजार मुलींच्या आयुष्यामध्ये फरक पाडणारे ठरले आहे. तिथले बालविवाह थांबले आहेत; हा या कामाचा परिणाम आहे. ‘कोयत्याच्या मुठीत’ या पुस्तकाचे ‘बीटर शुगरकेन’ या इंग्रजी भाषेतील भाषांतरामुळे शिरूर कासारमधील अनुभव जगासमोर मांडता आले.

कोणत्याही कामाशी संबंधित सर्व घटकांना सोबत घेऊन ॲडव्होकसी लेवलवर, धोरण बदलण्याच्या पातळीवर, कायदा बदलण्याच्या पातळीवर आणि कायदा चालवण्याच्या पातळीवर जाऊन काम करण्याचा आत्मविश्वास युनायटेड नेशन्स पाॅप्युलेशन फंड यांनी आम्हाला दिला. त्यांच्यासोबतचा हा गेल्या २२ वर्षांचा प्रवास फार महत्त्वपूर्ण ठरला.

या सगळ्यांमध्ये अजून एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख करणे मला महत्त्वाचे वाटते. लघुपट, माहितीपट, नाटक, एकांकिका, पथनाट्य आणि संगीत फ्युजन पथनाट्य, गोंधळ यासारखे लोककलेचे माध्यम आम्ही अतिशय प्रभावीपणे वापरू शकलो. संपूर्ण चळवळीतील परफॉर्मिंग आर्टचे कॉन्ट्रिब्युशन महत्त्वपूर्ण ठरले.

देशपातळीवर ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ राष्ट्रीय कार्यक्रम देशाच्या प्रधानमंत्री यांनी पानिपतवर उद्घाटन करून सुरू केला. त्यावेळेला आम्ही म्हणालो की, पहिल्या दोन पानिपतच्या लढाया आम्ही हरलो आहोत, पण ही तिसरी पानिपतची लढाई आम्ही जिंकणार आहोत आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक पुरस्काराच्या या निमित्ताने आम्ही हा विषय जागतिक पातळीवर आणला आहे आणि ५० टक्के ही लढाई आम्ही जिंकली आहे, अशीच आमची धारणा आहे. मुलींची कमी होणारी संख्या आणि स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न संपलेला नाही. त्यामुळे या पुरस्काराने आमची जबाबदारी वाढली आहे. आमचे काम अधिकाधिक व्यापक, गतिमान होईल. भवताल आणि दै. ‘नवशक्ति’चे वाचक म्हणून या महत्त्वाच्या प्रश्नावर ‘लेक लाडकी अभियान’च्या माध्यमातून मी करत असलेल्या कामात तुम्ही सर्वजण सक्रिय साथ द्याल, ही आशा आहे. हा पुरस्कार हा केवळ सन्मान नाही, तर संपूर्ण जागतिक पातळीवर ज्यांनी नाव कमावले आहे अशांच्या पंक्तीत जाऊन बसल्यानंतर त्या तोलामोलाची व्यक्ती आपण आहोत हे भविष्यकाळातही सिद्ध करावे लागेल. तसेच हा दाखवलेला विश्वास खोटा नाही याचेही भान ठेवावे लागेल. त्यामुळे जबाबदारी वाढली आहे याची मला जाणीव आहे. संयुक्त राष्ट्रांनी जपलेल्या मूल्यांचे, समता, शांती, मानवी प्रतिष्ठा आणि सर्वांसाठी विशेषत: सर्वात असुरक्षित व उपेक्षित यांच्या हक्काचे पालन करण्याची मी ग्वाही देते.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व ‘लेक लाडकी अभियान’च्या संस्थापक

logo
marathi.freepressjournal.in