
ग्राहक मंच
मंगला गाडगीळ
वसुंधरा दिवसाच्या निमित्ताने आपण पृथ्वीच्या रक्षणासाठी काय करू शकतो, याचा विचार करायला हवा. नागरिक म्हणून स्वच्छता, पुनर्वापर, ऊर्जा बचत, झाडे लावणे, सायकलचा वापर अशा कृतींनी आपण पृथ्वीला खरेच उपयुक्त भेट देऊ शकतो. वसुंधरेचा सन्मान करण्याचा हा योग्य मार्ग आहे.
एखाद्याच्या वाढदिवसाला आपल्याला बक्षीस द्यायचे आहे, तर आपण आधी काय करू? त्याची आवडीचे किंवा त्याला उपयोगी पडेल, असे काहीतरी देऊ. पुढील आठवड्यात २२ तारखेला वसुंधरा दिवस येऊ घातला आहे. एक प्रकारे तिचा गौरव दिन म्हणा ना! या निमित्ताने तिला जे हवे आहे ते तिला आपण देण्याचा प्रयत्न करू या. खर तर पृथ्वी आपल्याला सर्व काही देत असते तरी तिच्याही आपल्याकडून काही अपेक्षा आहेत. ती आपल्याकडे काय मागते? प्रदूषण आणि जंगलतोड यासारख्या गोष्टींपासून रक्षण. आपली वसुंधरा किंवा पृथ्वी म्हणजे आपला ग्रह हे एक अद्भुत ठिकाण आहे. तरी तिलाही आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे.
१९७० साली अमेरिकेतील विस्कॉन्सिनमधील एका सिनेटरला प्रथमच जाणीव झाली की, प्रदूषणाबाबत काही तरी करायला हवे. याच दिवशी त्यांनी पर्यावरणीय समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय निदर्शने आयोजित केली. देशभरात मोर्चे काढले. परिणामी वर्षाच्या अखेरीस अमेरिकन सरकारने पर्यावरण संरक्षण एजन्सी स्थापन केली. १९९० साल येईपर्यंत वसुंधरा दिन जगभरातील १४० हून अधिक देशांमध्ये साजरा केला करण्याची प्रथा सुरू झाली होती.
जीन्स पॅन्ट आबालवृद्धांच्या आवडीची. मुलांनी घालावी तशी मुलींनीही वापरावी. तरुणाईत तर एकही जीन्स पॅन्ट स्वतः कडे नाही, अशी व्यक्ती सापडणे कठीण. याच जीन्सचे कापड तयार करण्याचे कारखाने कसे प्रदूषण करतात हे नुकत्याच वाचनात आलेल्या पुढील बातमीवरून दिसून येईल.
मुंबई जवळील अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गावाजवळील कराव ग्रामपंचायतीतील ही बातमी आहे. सुरुवातीला हे कारखाने उल्हासनगरमधील वालधुनी नदीच्या काठावर होते. कोणतीही प्रक्रिया न करता जीन्स धुतल्यानंतरचे पाणी नदीत सोडले जाई. त्याचे प्रमाण इतके वाढले की नदी, नदी न राहता तिचे गटार झाले. फारच आरडाओरडा झाल्यावर या कारखान्यांना तेथून हुसकावून लावण्यात आले. नंतर ते ग्रामीण भागात आणि पुढे ओसाड जागी नेण्यात आले. सांडपाणी व्यवस्थेसाठी त्यांनी अजब उपाय केला. कारखान्यातच मोठे खड्डे केले. त्यात हे पाणी साठवले. तेथून टँकरने आणखी ओसाड जागी नेऊन ओतून टाकण्यात येते. असे करताना हे पाणी जमिनीत जिरवले जाते. कोणतीही दुर्गंधी येत नाही आणि नदीत सांडपाणी सोडत नाही म्हणजे कारखानदार करतात ते योग्य असे त्यांना वाटते. कारखानदार जरी जीन्सचे उत्पादक असले, तरी इतर वस्तू विशेषतः अन्नधान्यचे ते ग्राहक असतात. अशा सांडपाणी मुरलेल्या आसपासच्या शेतात पिकलेले धान्य खाल्यावर त्यांच्या आरोग्याचे काय होईल. इतर लोकांचे काय होईल याचा विचार ते करताना दिसत नाहीत.
गुढीपाडवा झाला की, गणपतीच्या मूर्ती बनवण्याची लगबग सुरू होते. आपल्याला माहितीच आहे की, या मूर्ती शाडू माती, कागदाचा लगदा किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस -पीओपीपासून बनवल्या जातात. शाडू माती आणि कागदापासून बनलेल्या मूर्ती तुलनेने महाग असतात, तर पीओपीच्या मूर्ती वजनाने हलक्या आणि स्वस्त असतात.
पीओपीच्या मूर्तीमुळे समुद्र, नद्या आणि तलावांचे कसे प्रदूषण होते हे सर्वांना माहित आहे. तरी या मूर्तीवर बंदी पुढच्या वर्षीपासून घाला, या वर्षी सूट द्या अशी मूर्तिकारांची मागणी असते. हेही गेली काही वर्षे चालू आहे. जीन्सच्या कारखानदारांना जो नियम लागू होतो तो मूर्तिकारांनाही लागू होतो, पण लक्षात घेतो कोण?
हे झाले उत्पादकांच्या बाबतीतील विचार. ग्राहक किंवा सामान्य नागरिकांना या बाबतीत काय करता येईल तेही पाहू.
गांधी जयंतीच्या निमित्ताने २ ऑक्टोबरला संपूर्ण देशभर स्वच्छता मोहीम चालू असते. निदान या एका दिवशी आपल्या परिसराची स्वच्छता करता येऊ शकते.
पर्यावरण दिनी किंवा पावसाळ्यात 'झाडे लावा' मोहीम पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या संस्था चालवतात. त्यात भाग घेता येईल.
आपण वापरात असलेली एक कापडी पिशवी ६०० प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या वापर टाळू शकते. घराच्या बाहेर पडताना आपल्या खिशात, पर्स मध्ये राहील, अशी पिशवी नेहमी बाळगू शकतो.
सॉफ्ट ड्रिंकचे कॅन, पाण्याच्या बाटल्या कुठेही न फेकता पुनर्वापरासाठी पाठवू शकतो. त्यामुळे प्लास्टिकचे प्रदूषण कमी करू शकतो.
वापरात नसताना किंवा गरज नसताना टीव्ही, पंखे, कॉम्पुटर बंद ठेवल्याने ऊर्जेची बचत होते. ही ऊर्जा निर्माण करण्यासाठी जो कोळसा वापरला जातो त्याचा वापर कमी होऊन हवेचे प्रदूषण टाळू शकतो.
कामासाठी अथवा अन्य कारणासाठी जवळच जायचे असल्यास गाडीने न जाता पायी जा किंवा सायकलचा वापर करू शकतो. जवळ जवळ एक किमी पायी गेलात तर ५०० ग्रॅम प्रदूषण करणारे कण हवेत जाण्यापासून वाचवू शकतो.
वाया गेलेले मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू पुनर्निर्मितीसाठी पाठवू शकतो. त्यापासून त्यातील निरनिराळे दुर्मिळ धातू परत मिळवता येतात. या वस्तू गोळा करणाऱ्या कित्येक संस्था आहेत.
वाया गेलेली किंवा वापरास अयोग्य औषधे कचऱ्यात किंवा मध्ये टाकू नका. तशी फेकल्यास ती पाण्यात विरघळून शेवटी नकळत आपल्याच पोटात जातात. गरज नसताना अशा प्रकारे सेवन केलेली औषधे आपल्यालाच त्रासदायक ठरू शकतात. अशी औषधे गोळा करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्याकडे ती द्या.
वरील गोष्टी आपण करत नसू, तर किती तरी प्रकारे आपण तिचा छळ करत असतो. लक्षात असू द्या की, आपली वागणूक पर्यावरण स्नेही असेल, तर ही वसुंधरा आपल्यासाठी एक आनंदी आणि निरोगी ठिकाण असेल. प्रत्येकाने हेही लक्षात ठेवले की, ही वसुंधरा राहण्यायोग्य राहिली नाही, तर आपल्याकडे दुसऱ्या वसुंधरेचा पर्याय नाही.
मुंबई ग्राहक पंचायत
mgpshikshan@gmail.com