सहयाद्रीचे वारे : शहरे वाढली, खेडी ओस पडली!

महाराष्ट्रात सर्वदूर पाहिले तर शहरे वाढली आहेत. सीमारेषा ओलांडत आहेत, मात्र महाराष्ट्राचा कणा असलेल्या ग्रामीण भागातील खेडी ओस पडली आहेत.
सहयाद्रीचे वारे : शहरे वाढली, खेडी ओस पडली!

महाराष्ट्रात सर्वदूर पाहिले तर शहरे वाढली आहेत. सीमारेषा ओलांडत आहेत, मात्र महाराष्ट्राचा कणा असलेल्या ग्रामीण भागातील खेडी ओस पडली आहेत. शेती करण्यास माणसेच न राहिल्याने भात शेती ओस पडत आहे. ठाणे व पालघर हे दोन जिल्हे मुंबई नजीक असल्याने ‘एमएमआर रिजन’ मुंबई पुरते मर्यादित होते, त्यांनी आपल्या सीमारेषा शहापूर तालुक्यापर्यंत तर पश्‍चिमेला डहाणूपर्यंत वाढविल्या आहेत.

ठाणे जिल्हा यापूर्वी एकत्र होता. आता काही वर्षापूर्वी आदिवासी जिल्हा जव्हार होण्याऐवजी पालघर हा नवीन जिल्हा झाला. या जिल्ह्याच्या सीमा ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, मीरा भाईंदर अशा एकाच जिल्ह्यातील ६ महानगरपालिका, २ मोठया नगरपरिषदा व त्यानंतर नगरपंचायत अशा वाढल्या. शहापूर नगर पंचायत असताना तेथील वाढते शहरी क्षेत्र पाहता लवकरच नगरपरिषद होऊ शकते. ‘कसारा’ हे मोठे शहर वसले आहे. तेथे नगर परिषद होऊ शकते इतकी लोकवस्ती वाढली आहे.

याशिवाय नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदरमध्ये नागरीकरण झपाट्याने वाढत असल्याने नवीन ठाणे, नवीन महामुंबई, बदलापूर, अंबरनाथ एकत्र महानगरपालिका होणे यावर प्रस्ताव तयार होत आहे. मुंबईला लागून मीरा-भाईंदर शहरे वसली आहेत. या सर्व शहारांतील गर्दी एवढी वाढली आहे की, नवी शहरे उभी करणे अपरिहार्य ठरले आहे.

आपण ठाणे, नवी मुंबई तथा अन्य शहारांचा विचार करता या विभागात एकेकाळी खेडी असलेली गावे आता शहरे झाली आहेत. शहापूर तालुक्यात वासिंद, आसनगांव, आटगांव, खर्डी, कसारा ही पाच रेल्वे स्टेशन आहेत. याशिवाय मुंबईला पाणी पुरवठा करणारी तानसा, वैतरणा, भातसा ही महाकाय धरणं आहेत. या सर्व क्षेत्रातील गावे आता शहरे झाली आहेत. घाटघर येथे मोठा वीज प्रकल्प उभा आहे. मध्य रेल्वे स्टेशनच्या आजुबाजूला असलेल्या खेडयांचे रूपांतर शहरात झाले आहे. या शिवाय मुंबई-नागपूर हा समृध्दी महामार्ग, मुंबई-आग्रा महामार्ग या तालुक्यातून जात आहे.

ठाणे जिल्ह्यात भौगोलिकदृष्टया शहापूर तालुका सर्वात मोठा आहे. त्याचे विभाजन पूर्वीच होणे आवश्यक होते. परंतु तालुक्याला नेतृत्व नसल्याने विभाजन होऊ शकले नाही. मात्र १९९५-९६ च्या काळात वाटण्या करून उल्हासनगरचे विभाजन झाले व नवा अंबरनाथ तालुका तर इकडे वाड्यांमधून विक्रमगड तालुका झाला. १९७८ मध्ये स्व. उत्तमराव पाटील हे महसूलमंत्री असतांना तालुका विभाजनाचा प्रस्ताव आला होता. नवीन ४२ तालुके करण्याचा निर्णयही झाला होता. त्यात शहापूरचे विभाजन करून किन्हवली तालुका करण्याचा प्रस्तावही मंजूर झाला होता. ब्रिटिश काळात किन्हवली हा महाल होता. परंतु आज ४४ वर्षे झाली शहापूरचे विभाजन होत नाही. या तालुक्याची सरहद्द २५ ते ४० किलोमीटरपर्यंत आहे. आज या तालुक्यात असंख्य गावे शहरी झाली आहेत. आता नवीन ठाणे उभारले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला नव्या मुंबईचे विभाजन होऊन महा नवी मुंबई निर्माण केली जात आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे विभाजन होऊन या दोन शहरांच्या नवीन महापालिका होऊ पाहत आहेत. या शहरांनी सर्व मर्यादा आता ओलांडल्या आहेत. सिमेंटची प्रचंड जंगले उभी राहत असून तेथे सामान्य नागरिकाला घरे घेणे दुरापास्त झाले आहे. खेड्याचा सर्व लोंढा या शहरांकडे वळला आहे. त्यामुळे प्रचंड लोकवस्ती वाढल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. एवढेच कशाला खेडी सोडून अनेक कुटुंबांनी आपली घरे या महामार्गाच्या शेजारी बांधली आहेत.

कामधंद्यासाठी तरूण वर्ग हा आता शहारांकडे वळल्याने शेती ओस पडली आहे. एकेकाळी शहापूर तालुक्यातील किन्हवली-डोळखांब, मुरबाड तालुक्यातील सरळगाव टोकावडे हा पट्टा भात पिकासाठी मोठा गणला जात होता. आता शेती करण्यासाठी माणसेच न राहिल्याने व असलेल्या जागा इमारत बांधणीसाठी दिल्याने खरीपाचे उत्पन्न ५० टक्के खाली आले आहे. ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भाग म्हणून शहापूर, मुरबाड हेच तालुके आता राहिले आहेत. मात्र तेथेही आज ५००-५०० घरांच्या टाऊनशीप उभ्या राहत आहेत. तेथील प्रश्‍नही उपस्थित झाले आहेत. या दोन तालुक्यातून आणे-माळशेज घाट रस्ता जातो. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील दळणवळणाची साधने ही इकडे आली आहेत.

ठाण्या प्रमाणेच पालघर जिल्ह्याचीही अवस्था अशीच झाली आहे. अहमदाबाद महामार्ग हा या पट्टयातून जातो. मीरा-भाईंदर हे तर आता मुंबईचे उपनगरच झाले आहे. तर पुढे वसई-विरार हा पश्‍चिम रेल्वे महामार्गावरील भागही सतत वाढत आहे. नालासोपारा हे पूर्वी गाव होते. आता प्रचंड लोकवस्ती तेथे झाली आहे. वसई-विरार हा पट्टा एकत्र झाला आहे. तर तेथेही सिमेंटची मोठी जंगले उभी राहत आहेत. पुढे याच महामार्गावरून चारोटीपर्यंतचा भाग आता वाढला आहे. डहाणू येथे पॉवर सेंटर झाले आहे. तर बोईसर व तारापूर हा औद्योगिक पट्टा नागरी वस्तीने प्रचंड वाढला आहे. गुजरातची सर्व वाहतूक ही या महामार्गावरून मुंबईकडे येत आहे. डहाणू-चारोटीपर्यंतचा पट्टा याही विभागाने सर्व निकष तोडले असून या भागातही मोठया प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. इकडे सफाळा भागही पर्यटनाच्यादृष्टीने महत्वाचा ठरल्याने तेथेही लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळे या संपूर्ण पट्टयात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न व वाहतुकीचा प्रश्‍न जटील झाला आहे.

यापूर्वी रायगड हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जात होता. परंतु आता तेथील उद्योग बंद पडले असून तेथे नागरी वस्ती वाढली आहे. आता न्हावा-शेवा ट्रान्सहार्बर रोड पूर्ण होत आला असून उरण पर्यंतचा पट्टा वाढला आहे. या पट्टयामध्ये नवी मुंबई विमानतळ, एपीएमसी मार्केट येत असल्याने बाहेरच्या देशातील बिल्डर इकडे धावले आहेत. नव्या मुंबईतील शेवटचा पट्टा म्हणजे ‘उलवा’ हा भाग होता. तेथे दहा-पंधरा वर्षापूर्वी केवळ माजी मंत्री गणेश नाईक यांचा फार्महाऊस होता. आता उलव्याचे चित्र संपूर्ण बदलले आहे. तेथे आता उंचच उंच इमारती शेकड्यांनी उभ्या राहिल्या आहेत. सध्या या पट्टयांमध्ये सिडको आणि नवी मुंबई महापालिका कार्यरत आहे. तर पूर्वी पनवेल ही नगर परिषद होती आता ही महानगरपालिका झाली आहे. या पनवेल महापालिकेचे क्षेत्रही प्रचंड वाढले आहे. यापूर्वी रायगड जिल्हा धान्याचे कोठार म्हणून ओळखले जात होते. आता तेथेही जमिनींना इंचाचा भाव आल्याने प्रचंड नागरी वस्ती उभी राहिली आहे. तर शेजारील उरणची स्थितीही अशीच आहे. आता हा महाकाय पूल उभा राहताच मुंबईही उरणला १५ मिनिटांवर आली आहे.

यापूर्वी बॅरिस्टर ए.आर.अंतुले मुख्यमंत्री असताना या विभागाचे नियोजन करून मुंबईचा भार नवी मुंबईकडे वळवला होता. कोकण भवन मुख्यालय तर जवळ-जवळ आठ ते दहा वर्षे बेवारस म्हणून पडले होते. आता तो संपूर्ण भाग दाटीवाटीचे क्षेत्र झाले आहे. रायगड मधील कळंबोली, खारघर हा भाग तर मुंबईशी निगडित झाला आहे. मुंबई-गोवा रस्ता हा या भागातूनच जातो. या रस्त्यावरही प्रचंड अनधिकृत बांधकामे उभी आहेत. नागोठण्यापर्यंतचा भाग हा विस्तृत झाला आहे. उरण, अलिबाग, पोयनाड या आता नगर परिषदा झाल्या आहेत. आता हा ट्रान्सहार्बर महामार्ग सुरू होत असल्याचे समोर येताच २५ ते ४५ मजल्यांच्या इमारतींचे बांधकामांचे प्रस्ताव पुढे आले आहेत. नवी मुंबई विमानतळ होणार म्हणून अनेकांनी या भागात जमिनी हस्तांतर करून इमारती बांधण्यासाठी हजारोंनी प्लान सादर केले आहेत. आता त्या भागात उत्तुंग अशा इमारती उभ्या राहत आहेत. रायगड जिल्ह्याचा ३/४ भाग हा सिडकोशी निगडीत असल्याने तेथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी सिडकोने हसतांतरीत केल्याने १२.५ टक्के प्लॉट मिळाले होते. आता या प्लॉटची विक्री करण्यात आली असून तेथे नवीन शहरे उभी राहत आहेत. उलव्याचे तर नामांकित उदाहरण देता येईल. शेती प्रधान असलेला हा संपूर्ण पट्टा आता उत्तुंग इमारतीनी व्यापला आहे. तसे पाहू गेल्यास ठाणे, रायगड येथील कुणबी व आगरी समाज हा खऱ्या अर्थाने ही शहरे वाढल्याने विस्थापित झाला आहे. आजही बिहार, झारखंडमधून असंख्य कामगार हे या इमारती उभारण्यासाठी बायका मुलांसह आले आहेत.

मुंबईच्या जवळचा असलेला हा परिसर नागरी वस्तीने स्फोटक झाला आहे. नव्या मुंबईतील नोसिल, स्टँडर्ड अल्कली हे महाकाय केमिकल कारखाने बंद पडले आहेत. ठाणे जिल्ह्यातील अनेक एमआयडीसी रोजगार निर्मितीची केंद्रेही बंद पडली आहेत. मुरबाड ते बदलापूर हा मधला भाग आता शहरी झाला आहे. या पट्टयातच एमआयडीसीचे बारवी धरण आहे. धरणाचे पाणी औद्योगिक क्षेत्राला मिळण्याऐवजी ते नागरी वस्तीला मिळण्यासाठी सर्व नगरपालिकांचे प्रयत्न सुरू आहेत ते पाणी कारखानेच अस्तित्वात नसल्याने नागरी वस्तीला दिले जात आहे. हे सर्व पाहता नागरी वस्ती किती वाढावी, याची कल्पना यावरून येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in