द्रष्टा समाजपुरुष : जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट

मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट यांची ३१ जुलैला १५९ वी पुण्यतिथी आहे. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या नानांना त्यांच्या समाज सुधारणेच्या कामात इंग्रज अधिकाऱ्यांचेही सहकार्य मिळाले. अंधश्रद्धा निर्मूलन आणि स्त्रीशिक्षण हे त्यांच्या सामाजिक कामाचे प्रमुख पैलू होते. त्यांच्या सामाजिक कार्याचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा.
द्रष्टा समाजपुरुष : जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट
Published on

सात बेटांनी बनलेल्या मुंबई शहराच्या जडणघडणीत अनेक समाजधुरिणांचा सिंहाचा वाटा होता. त्यातील एक दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणजे दैवज्ञ सुवर्णकार घराण्यातील जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट हे होय. ठाणे जिल्ह्यातील मुरबाडचे 'मुर्कुटे' कुटुंब हे व्यापारानिमित्ताने मुंबईच्या आश्रयाला आले. त्यांचे वडील बाबुलशेट यांचा पिढीजात सोन्याच्या पेढीचा व्यवसाय असताना मालाची आयात-निर्यात करण्याचे कामही ते करीत. प्रसंगी सैन्याची ने-आण करण्याचेही काम या घराण्याकडे होते. याच घराण्यात १० फेब्रुवारी १८०३ रोजी नानांचा मुरबाड येथे जन्म झाला. बालपणीच मातृ व पितृछत्र हरपलेल्या नानांचे प्रारंभीचे शिक्षण त्यांच्या घरीच पंतोजीद्वारे झाले. जन्मतःच कुशाग्र बुद्धीचे लेणे लाभल्याने नानांचा इंग्रजी भाषेचा अभ्यास, पित्याचे संस्कार व चौकस दृष्टी यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण बनले.

इंग्रजी भाषेवरील असामान्य प्रभुत्वामुळे इंग्रज व्यापारी व अधिकारी यांच्यावर त्यांची छाप पडत असे. त्या काळात समाजातील अंधश्रद्धा, रूढी व परंपरा यांचे प्राबल्य पाहता त्यांनी समाजासाठी शिक्षणाचे तत्त्वज्ञान तयार केले. त्याद्वारे अंधश्रद्धा निर्मूलन व स्त्री शिक्षणाचा शुभारंभ आपल्या घरापासून सुरू केला. मुंबईतील कोळी, आगरी, भंडारी, पाचकळशी व हरिजन समाजातील मुलांना शैक्षणिक व आर्थिक पाठबळ दिले. या कामी तत्कालीन गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. समाजसुधारणा, नगरविकास, स्त्रीशिक्षण, लोकशिक्षण, पतपेढ्या, बँका व दवाखाने यांच्या उभारणीसह त्या सुस्थितीत कशा चालतील याच्याकडे त्यांचा कटाक्ष होता. नानांचे दातृत्व, प्रेरणा, कल्पकता, उद्योजकता, व्यापारी संस्कृती व आधुनिकतेचा ध्यास यांच्या बळावर यशाची उत्तुंग झेप घेत आपल्या द्रष्टेपणाची चुणूक दाखवून दिली. सरकारदरबारी वजन असल्याने इंग्रज अधिकारी त्यांना मान देत व प्रसंगी सल्लाही घेत यावरून त्यांच्या मोठेपणाची कल्पना येते.

विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण मिळावे, असा आग्रह असलेले नाना भाषा तज्ज्ञ होते. त्यांना सात भाषांचे ज्ञान अवगत होते. त्या काळात वैद्यकीय शिक्षणही मराठी भाषेतून मिळत होते हे विशेष! मुलींच्या शिक्षणासाठी (१८२२) त्यांनी आपल्या बंगल्यातील जागा दिली तर रेल्वेच्या कार्यालयासाठी ठाकूरद्वार येथील बंगल्यात जागा दिली होती. परंतु दुर्दैवाने त्यांच्या स्मारकासाठी मुंबई शहरात सुयोग्य जागा मिळू नये याची खंत वाटते. अखेर त्यांचे स्मारक वडाळा अँटॉप हिल येथे पूर्णत्वास नेण्याचे काम सुरू आहे. समाजसुधारणा व प्रगतीची बिजे रोवतानाच त्यांनी औद्योगिकरणावरही भर देत सूत गिरण्यांची निर्मिती केली. रस्ते, दिवाबत्ती व पाणीपुरवठा योजना आखल्या व कृतीत आणल्या. म्हणूनच मुंबईत गॅसचे दिवे, तलाव व गिरण्या सुरू झाल्या. सतीची चाल बंद करणे, धर्मांतर बंदी करून शुद्धीकरण मोहीम राबवणे या उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता, तर गव्हर्नर एल्फिन्स्टनच्या नावाने हायस्कूल व कॉलेज, ग्रँट मेडिकल कॉलेज व जे.जे. रुग्णालय, मुंबई विद्यापीठ, सेंट्रल रेल्वे मुख्यालय, मुंबई महापालिका, विहार तलाव, टाऊन हॉल, राणीचा बाग, जे.जे. कला महाविद्यालय, बॉम्बे गॅस कंपनी, डेव्हिड ससून ग्रंथालय, लॉ कॉलेज व सोनापूर स्मशानभूमी यांच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. मुंबईतील अनेक शिक्षण संस्था त्यांच्या आर्थिक योगदानातून उभ्या राहिल्या आहेत. आज शहरात रस्ते धुण्याची विशेष मोहीम पालिकेतर्फे हाती घेतली जाते. परंतु हीच कामगिरी नानांनी पालिकेकडून पूर्वी नियमित स्वरूपात सुरू करून घेतली होती. तसेच सार्वजनिक आरोग्य केंद्रे (दवाखाने) सुरू करण्यामागेही त्यांचीच प्रेरणा होती.

त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून १८३४ मध्ये त्यांना जे.पी. ही मानाची पदवी बहाल करण्यात आली. १८४२ साली स्थापन झालेल्या 'बोर्ड ऑफ एज्युकेशन' व १८५७ साली स्थापन झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवरही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, तर 'बॉम्बे असोसिएशन' व 'बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन' या संस्था स्थापनेतही महत्त्वाची भूमिका बजावली होती. शिक्षणाची पायाभरणी मजबूत करताना वैद्यकीय व वकिली हे व्यवसाय सुरू करण्यात नानाचा पुढाकार होता याची अनेकांना आज कल्पनाही नसेल! तसेच ग्रँड ज्युरीत भारतीयांना प्रवेश मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. स्त्रीशिक्षणाबरोबरच धर्मकारण, अर्थकारण व संस्कृतीद्वारे देश बलवान व्हावा हे त्यांचे स्वप्न होते. १८५३ साली मुंबई ते ठाणे रेल्वेमार्ग सुरू झाला त्यावेळी ४०० महत्त्वपूर्ण व्यक्तींमध्ये अग्रस्थानी नानाच होते. मॉरिशसला जाऊन आणलेला ऊस त्यांनी ताडदेवला पिकवला. परंतु साखरसम्राट झाले ते मात्र आज नानांना विसरले.

आज मराठी भाषेची गळचेपी होत असून सरकार तिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देत नाही याची खंत वाटते. परंतु नाना मराठी व संस्कृत भाषेचे खंदे पुरस्कर्ते, ग्रंथप्रेमी, संस्कृत पंडित, धर्माभिमानी व सुधारणावादी असूनही मराठी मुलुखात मात्र काहीसे अपेक्षित राहिले. त्यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना होण्यासाठी मराठी अभ्यासक्रमात त्यांच्यावरील माहितीचा समावेश व्हावा. ज्याने शिक्षणाची पायाभरणी केली, शहराचा विस्तार केला, सर्वार्थाने हे शहर घडवले त्याच्या कार्याच्या खुणा आजही या शहरात दिमाखात उभ्या आहेत. त्यांच्या नावाने मुंबई विद्यापीठात संस्कृतमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास 'जगन्नाथ शंकरशेट स्मृती शिष्यवृत्ती' देण्यात येते. वास्तविक त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने अभ्यासक्रमात समावेश करणे गरजेचे आहे. मुंबई सेंट्रल स्थानकास त्यांचे नाव देण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव अद्यापही केंद्र सरकारकडे पडून आहे. सुमारे १६० वर्षांनी आज त्यांचे तैलचित्र मुंबई येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयात लावले जाणार आहे. बिल्डर लॉबी तर टोलेजंग इमारती व मॉल उभे करताना शहरातील मूळ संस्कृतीच्या खुणाच पुसून टाकण्याचे काम करीत आहे. परंतु मुंबईची शान धुळीस न मिळवता पुरातन वास्तूंचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे. मुंबईवर वर्चस्वासाठी टपलेल्या उपऱ्यांनी याची दखल घ्यायला हवी. स्वतःची संपत्ती सढळ हस्ते दान करून विलक्षण प्रेरणादायी कर्तृत्वाची सोनेरी मुद्रा उमटवणाऱ्या या आद्य शिल्पकार व द्रष्ट्या समाजपुरुषाची वयाच्या ६३ व्या वर्षी ३१ जुलै १८६५ रोजी प्राणज्योत मालवली. अशा या थोर दैवज्ञ शिल्पकारास भावपूर्ण शब्दांजली!

logo
marathi.freepressjournal.in