जीवनसत्त्वाची कमतरता हा धोकाही मोठा आहे

सध्या हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी घातक आजारांचे प्रमाण वाढत आहे. खेरीज ब १२ (B 12) सारख्या आवश्यक जीवनसत्त्वाची कमतरता अनेकांना भेडसावत आहेत.
जीवनसत्त्वाची कमतरता हा धोकाही मोठा आहे
Freepik
Published on

मधुरा कुलकर्णी

दखल

सध्या हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी घातक आजारांचे प्रमाण वाढत आहे. खेरीज ब १२ (B 12) सारख्या आवश्यक जीवनसत्त्वाची कमतरता अनेकांना भेडसावत आहेत. ही कमतरता वरकरणी फारशी गंभीर दिसत नसली तरी अनारोग्याला कारणीभूत ठरते. वेळीच लक्ष न दिल्यास मेंदू आणि मज्जासंस्थेच्या विविध व्याधींपर्यंत अनेक गंभीर परिणाम दिसू शकतात. मधुमेह असणाऱ्यांमध्ये ब १२ या जीवनसत्वाची कमतरता निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. मधुमेहासाठी घेत असलेल्या औषधांमधील मेटफॉर्मिन घटकाचाही तो परिणाम असतो. म्हणूनच जागतिक मधुमेह दिनानिमित्त ब १२ या जीवनसत्त्वाचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे.

व्हिटामिन ब १२ हे जीवनसत्व शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असते. पण सहसा शाकाहारी अन्नपदार्थांमध्ये ते नसते. त्यामुळे शाकाहारी लोकांमध्ये या जीवनसत्त्वाची कमतरता राहते. इतर लोकांमध्येही या जीवनसत्वाची कमतरता असते. ‌‘ब-१२‌’ प्रमाणेच ‌‘ड ३‌’च्या कमतरतेने संत्रस्त असणाऱ्यांचे प्रमाणही नोंद घेण्याजोगे आहे. हृदयविकार, मधुमेह अशा जीवघेण्या आजारांविषयी अलीकडे जागरूकता निर्माण होत आहे. पण जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांची जाणीव अनेकांना नाही.

आपल्या शरीरातील लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये आणि मज्जासंस्था निरोगी बनवण्यासाठी जीवनसत्त्व ब १२ विशेष भूमिका बजावते. हे मानसिक स्वस्थतेसाठीही अत्यंत उपयुक्त मानले जाते. मेंदूचे नुकसान आणि अल्झायमरसारख्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी जीवनसत्त्व ब १२ उपयुक्त असल्याचे मानले जाते. या व्यतिरिक्त यामुळे तणाव कमी होतो. म्हणूनच या जीवनसत्त्वाला ‘तणावविरोधी जीवनसत्त्व’ असेही म्हणतात.

असे असताना अशक्तपणा, थकवा, शरीराची कमजोरी, भूक न लागणे, चिडचिडेपणा, हाता-पायांना मुंग्या येणे, अंगात कडकपणा जाणवणे, अवाजवी केस गळणे, तोंडात व्रण, बद्धकोष्ठता, स्मरणशक्ती कमी होणे, जास्त ताण, डोकेदुखी, त्वचा पिवळी पडणे, डोळ्यांची दृष्टी कमकुवत होणे ही ब १२ ची कमतरता असल्याची मुख्य लक्षणे आहेत. त्यामुळेच ती जाणवत असल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. व्हिटामिन ब १२ मुख्यतः मांसाहारी आहारामध्ये आढळत असल्याने शाकाहारी लोकांना या जीवनसत्वाच्या बाबतीत अधिक सजग राहावे लागते. ब १२ जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होण्यामागील कारणांमध्ये पोट किंवा आतड्यांमधून या जीवनसत्त्वाचे शोषण कमी होणे, आहारात ब १२ युक्त पदार्थांचा समावेश कमी असणे आणि ब १२ जीवनसत्त्वाची शरीरातील वाढलेली गरज यांचा समावेश होतो. पर्निशियस ॲनिमिया, शस्त्रक्रियेने पोटाचा काही भाग काढून टाकणे, स्वादुपिंडावर बराच काळ सूज आलेली असणे, आतड्यांमध्ये असलेले परजीवींचे अस्तित्व, ठरावीक औषधांचे त्रासदायक ठरू शकणारे सेवन, आनुवंशिकता या कारणांमुळे हे जीवनसत्त्व शरीरात शोषले जाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. शाकाहार किंवा कुपोषण यामुळे आहारातील ब १२ जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा समावेश कमी होऊ शकतो.

ब १२ च्या कमतरतेचे निदान रक्ताची तपासणी करून केले जाते. रक्तातील ब १२ चे प्रमाण १२० ते १८० पिकोमोल प्रति लिटर एवढे असायला हवे. रक्तातील मिथिलमॅलोनिक ॲसिडच्या प्रमाणावरूनदेखील ही कमतरता समजते. हे प्रमाण ०.४ मायक्रोमोल प्रति लिटरपेक्षा कमी नसावे. ब १२ च्या कमतरतेवरील उपचार तसा सोपा आहे. इंजेक्शनद्वारे किंवा तोंडावाटे पूरक आहार घेतल्यास त्यावर यशस्वी उपचार करता येतात.

मुख्यत्वे प्राण्यांपासून मिळणाऱ्या अंडी, मांस, दूध अशा पदार्थांमध्ये ब १२ हे जीवनसत्त्व आढळून येते. अलीकडेच झालेल्या संशोधनानुसार ते ‌‘क्लोरेला‌’ आणि ‌‘सुसाबी-नोरी‌’ यासारख्या शैवालांमध्येही आढळून येते. काही जीवाणूंचे प्रयोगशाळेत संवर्धन करून त्यापासूनही ब १२ जीवनसत्त्व मिळवले जाते. अशा प्रकारे मिळवलेले जीवनसत्त्व रुग्णांना पूरक आहारात मिसळून दिले जाते. मोठ्यांपेक्षा लहान मुलांमध्ये बी १२ जीवनसत्त्वाची कमतरता असण्याचे प्रमाण अधिक असते, कारण त्यांच्या शरीरात जीवनसत्त्वे साठवून ठेवण्याची क्षमता कमी असते. त्याचबरोबर त्यांच्या वाढत्या शरीराला जीवनसत्त्वांची अधिक गरज असते.

मोठ्या माणसांच्या शरीरात साधारणत: दोन ते पाच मिलीग्रॅम ब १२ जीवनसत्त्व साठवून ठेवले जाते. त्यापैकी सुमारे ५० टक्के ब १२ यकृतात साठवले जाते. परंतु अंदाजे ०.१ टक्के ब १२ जीवनसत्त्व आतड्यांमधील स्त्रावांबरोबर वाहून जाते. आतड्यांमधील हे सर्वच ब १२ जीवनसत्त्व पुन्हा शरीरात शोषले जात नाही. शरीरातील पित्त हे ब १२ जीवनसत्त्वाचे वहन करते. पित्तामध्ये स्त्रवलेल्या ब १२ जीवनसत्त्वाचा ‌‘एंडरोहेपॅटिक सर्क्युलेशन‌’ या यंत्रणेद्वारे पुनर्वापर केला जातो. या यंत्रणेच्या कार्यक्षमतेमुळे सुदृढ यकृत तीन ते पाच वर्षे पुरेल एवढे ब १२ जीवनसत्त्व साठवून ठेवू शकते. असे असले तरी आहारातून ब १२ मिळण्याचे प्रमाण कमी असताना त्याचे शरीरातील प्रमाण कमी-अधिक होणे हे इतर अनेक घटकांच्या समतोलावर अवलंबून असते. एकूणच ब १२ जीवनसत्त्वाच्या कमतरतेकडे दुर्लक्ष न केलेलेच बरे. मासे, चिकन, अंडी आणि कोळंबीमध्ये जीवनसत्त्व ब १२ आढळते. त्यामुळेच मांसाहारींनी या गोष्टी आवर्जून खाव्यात. शाकाहारी लोक काही प्रमाणात दही, ओटमील, सोयाबीन, ब्रोकोली आणि टोफू खाऊन ही कमतरता भरून काढू शकतात. या व्यतिरिक्त एक चांगला पर्याय म्हणजे शाकाहारी लोकांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्हिटामिन ब १२ पूरक आहार घेतला पाहिजे.

मधुमेह, हृदयविकार या आजारांची काळजी घेत असतानाच शरीरातील या जीवनसत्त्वाचे प्रमाणही योग्य राखायला हवे.

(लेखिका वैद्यकीय क्षेत्राच्या अभ्यासक आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in