

मत आमचेही
केशव उपाध्ये
राष्ट्रीय पातळीवर मतदार याद्या शुद्धीकरणासाठी सर्व संबंधितांच्या सहभागाने व्यापक राष्ट्रीय अभियान सुरू करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी काम करण्याचे सोडून फक्त याद्यांतील दोषांना लक्ष्य केले जात आहे. यामागे संविधानिक संस्थांना बदनाम करण्याचाच हेतू आहे.
राष्ट्रीय युवराज राहुल गांधी यांनी गेल्या काही महिन्यांपासून मतदार यादीतील चुकांचा विषय पत्रकार परिषदांतून पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करून मांडणे सुरू ठेवले आहे. राष्ट्रीय युवराज हे मातोश्रींच्या प्रादेशिक युवराजांचे प्रेरणास्थान असल्याने या वांद्रे स्थित युवराजांनी आणि त्यांच्या बालकानेही हा विषय हातात घेतला आहे. मतदार यादीतील चुका शोधून त्याला हायड्रोजन बॉम्ब वगैरे म्हणत राष्ट्रीय युवराज ढाण्या वाघाची शिकार करीत असल्याचा आव आणतात. राष्ट्रीय युवराजांमुळे शिवतीर्थाच्या स्वयंघोषित सरदारांनाही स्फुरण चढले आहे. शिवतीर्थाधीपतींना अनेक विषयांतील बौद्धिक ‘शिदोरी’ पुरवणाऱ्या पुणेरी मनसबदाराने मतदार यादीतील ढीगभर चुका शोधून दिल्या. त्यामुळे शिवतीर्थाधिपती कमालीचे खुश झाले. त्यांनीही तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपल्या बौद्धिक शिदोरीचा प्रकाश पाडला. एकंदरीत काय, तर मतदार याद्यांना सध्या चांगलाच भाव आला आहे. मातोश्रीच्या युवराजांची आणि त्यांच्या बालकाची बौद्धिक उंची ठाऊक असल्याने त्यांनी राष्ट्रीय युवराजांचा मुद्दा हातात घेतल्याचे आश्चर्य वाटले नाही. मात्र शिवतीर्थाधीपतींनीही हा विषय हातात घेतल्याचे नवल वाटले. असो. मुद्दा तो नाही. मुद्दा आहे तो मतदार यादीतील चुकांच्या विषयाला त्यांनी थेट निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेशी जोडल्याचा. केंद्रीय निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाला मदत व्हावी या एकमात्र हेतूने मतदार यादीत चुका करतो असे राष्ट्रीय युवराजांचे म्हणणे आहे. गेल्या सहा महिन्यांपासून राष्ट्रीय युवराज हीच गोष्ट सातत्याने सांगत आहेत. त्या पूर्वी त्यांनी मतदान यंत्रांत (ईव्हीएम) घोटाळा करून भाजप विजय मिळवत असल्याचा आरोप केला होता. तो मुद्दा चालत नाही असे लक्षात आल्यावर आता मतदार याद्यांचा विषय हाती घेतला गेला आहे. महाराष्ट्रातील माळशिरस मतदारसंघाच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी उत्तमराव जानकर यांनी ईव्हीएम यंत्रामध्ये गडबड झाल्याचा आरोप असाच ढोल वाजवून केला होता. शरद पवारांच्या पक्षाकडून विधानसभेत गेलेल्या जानकरांनी राष्ट्रीय युवराजांना भेटून मतदान यंत्रात घोटाळ्याचे प्रात्यक्षिक दाखवणार असल्याचे तसेच दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाची पोलखोल करणार असल्याची गर्जना केली होती. आपल्या मतदारसंघातील मारकडवाडी या गावात आपल्याला एवढी कमी मते पडणे शक्यच नाही. त्यामुळे या गावात मतपेटीद्वारे फेरमतदान घ्यावे, अशी मागणी करून जानकरांनी मोठी प्रसिद्धी मिळवली होती. जानकर यांच्या मारकडवाडी या गावाला शरद पवार यांनी तातडीने भेटही दिली होती.
एकूण काय, तर निवडणूक आयोग आणि संपूर्ण सरकारी व्यवस्थेच्या विरोधात सामान्य माणसाच्या मनात अविश्वास निर्माण होण्याच्या उद्देशाने हे सारे प्रयत्न सुरू आहेत. मध्यंतरी मारकडवाडीच्या सरपंच, उपसरपंचांनी मुंबईत येऊन आपल्याला मतदानाबद्दल संशय घेण्यास कसे भाग पाडले गेले याबद्दलचे कथन केले होते. त्यानंतर जानकर हे एकदमच शांत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने निर्माण केलेल्या न्यायालय, निवडणूक आयोग यांसारख्या संस्थांच्या कारभाराबद्दल भारतीय नागरिकांच्या मनात अविश्वास निर्माण व्हावा, निवडणूक आयोग, न्यायालये, पोलीस, सरकारी कर्मचारी ही संविधानाने निर्माण केलेली व्यवस्था एखाद्या पक्षाला मदत करते आहे, हे सतत सामान्य भारतीयांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय युवराज करीत आहेत. ही यंत्रणा कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांमधून तयार झाली आहे. या कर्मचाऱ्यांमधील प्रत्येक कर्मचारी हा आपल्या कर्तव्याशी बेईमानी करतो आहे, हेच राष्ट्रीय युवराजांना सांगायचे आहे.
निवडणूक आयोग आणि मतदार याद्या हे दोन्ही स्वतंत्र विषय आहेत हेही राष्ट्रीय आणि वांद्र्याच्या युवराजांना माहिती नाही. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करणे, त्याप्रमाणे राज्य आणि केंद्र सरकारच्या यंत्रणेच्या माध्यमातून निवडणुका घेणे, मतमोजणी करणे, निकाल घोषित करणे ही कामे निवडणूक आयोगाद्वारे होतात. मतदार याद्या तयार करण्याचे काम प्रत्येक राज्य सरकारच्या यंत्रणेच्या माध्यमातून होते. घरोघरी जाऊन सरकारी कर्मचारी मतदारांची नोंदणी करतात. ही यादी बहुतांश वेळा सदोषच असते. मतदार यादीतून नावे वगळल्या जाण्याच्या तक्रारी प्रत्येक निवडणुकीत होतात. मतदाराचे, मतदाराच्या वडिलांचे नाव चुकणे हे आज घडलेले नाही. राज ठाकरेंनी प्रथमच मतदार यादी हातात घेतली असावी. त्यामुळे त्यांनी त्यातल्या चुकांची खिल्ली उडवली असावी. मतदार यादी शुद्धीकरण करण्याचे काम सरकारी यंत्रणेबरोबरच सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिकांचेही आहे. प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर त्यात आपले नाव नाही, नाव चुकले आहे, फोटो, पत्ता चुकीचा आहे हे तपासण्याचे कष्ट कोणी घेत नाहीत. आणखी एक मुद्दा बोगस मतदानाचा. प्रत्येक राजकीय पक्षाचे प्रतिनिधी मतदान केंद्राबाहेर मतदार याद्या घेऊन बसलेले असतात. मतदान केंद्रांमध्येही प्रत्येक उमेदवाराचा प्रतिनिधी (पोलिंग एजंट) हजर असतो. मतदाराचे नाव पुकारून त्याला कोणाचा आक्षेप आहे का, याची विचारणा अधिकाऱ्यांकडून केली जाते. या सर्व प्रक्रियेत बोगस मतदान करणे जवळपास अशक्य असते. राष्ट्रीय युवराज आणि वांद्र्याच्या युवराजांच्या गावोगावच्या कार्यकर्त्यांना या प्रक्रियेची माहिती असेल. त्यामुळे ते मनातल्या मनात आपल्या नेत्यांवर हसत असतील. राष्ट्रीय पातळीवर मतदार याद्या शुद्धीकरणासाठी सर्व संबंधितांच्या सहभागाने व्यापक राष्ट्रीय अभियान सुरू करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी काम करण्याचे सोडून फक्त याद्यांतील दोषांना लक्ष्य केले जात आहे. यामागे संविधानिक संस्थांना बदनाम करण्याचाच हेतू आहे.
भाजप, प्रदेश मुख्य प्रवक्ते