काऊंटर पॉइंट
रोहित चंदावरकर
भारतातील वेगवेगळ्या राज्यातील विधानसभांची मुदत जशी जशी संपते, तशा तिथे विधानसभा निवडणुका घेतल्या जातात. पण अन्य कोणत्याही राज्याकडे नव्हते, इतके देशाचे लक्ष यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे. ते कशासाठी? महाराष्ट्रात नेमके काय होण्याची शक्यता आहे? महाराष्ट्रात वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला मिळणार?
राज्यात यावेळी २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी थोडी जास्त आहे. राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूरमध्ये होणे ही थोडी अनपेक्षित गोष्ट आहे. विदर्भात किंवा मराठवाड्यातील ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी जास्त असणे असा ट्रेंड आपण अनेक वर्ष बघितला, पण यावेळी कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मतदान होणे ही थोडी वेगळीच गोष्ट घडली आहे. आता चर्चा अशी सुरू आहे की, वाढलेल्या मतदानाचा फायदा नेमका कोणाला मिळणार? पारंपरिकदृष्ट्या मतदान वाढणे म्हणजे सत्तेत असलेल्या सरकारविरुद्धचा कौल असा अंदाज बांधला जात असे, पण गेल्या काही काळात वाढलेल्या मतदानात सत्ताधारी पक्षालाच लाभ मिळणे अशी काही उदाहरणे घडली आहेत. पश्चिम बंगालमध्ये गेल्या वेळी झालेल्या मतदानात टक्केवारी खूप वाढलेली दिसली. पण सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांनाच जनतेचा कौल मिळाला. गुजरात राज्यात मतदानाची टक्केवारी कायम जास्त दिसली, पण तिथे लोकांनी सत्तेवर असलेल्या भाजपलाच पुन्हा पुन्हा निवडून दिले. त्यामुळे वाढीव मतदानाचा अर्थ सरकारविरोधी वातावरण आहे, असा आता काढला जात नाही.
काही तज्ज्ञ म्हणतात की, लाडकी बहीण योजनेमुळे महिला जास्त प्रमाणावर बाहेर पडल्या असतील आणि त्यामुळे जास्त मतदान झाले असेल. काही तज्ज्ञ म्हणतात की, विदर्भात शेतीविषयक समस्या आणि मराठवाड्यात आरक्षणाचा प्रश्न यामुळे लोकांमध्ये राग असल्यामुळे जास्त प्रमाणात मतदार बाहेर पडले. या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी आहेत. जर यातील पहिली गोष्ट घडली असेल तर त्याचा फायदा महायुतीला मिळेल आणि जर यातील दुसरी गोष्ट घडली असेल तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला मिळेल. बहुसंख्य तज्ज्ञांच्या मते राज्यात यावेळी महाविकास आघाडी आणि महायुती यांना मिळालेल्या जागांमध्ये फार मोठा फरक असणार नाही, असा अंदाज आहे. जर अधांतरी विधानसभेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली, तर भाजप केंद्रात सत्तेवर असल्यामुळे काही डावपेच अधिक वेगाने करून सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने पावले टाकू शकते. त्या अर्थाने केंद्रात ज्या आघाडीची सत्ता असेल त्यांना फायदा मिळतो हे विविध राज्यात आपण पूर्वी पाहिले आहे.
या निवडणुकांबद्दलची उत्सुकता ही संपूर्ण देशातच दिसते आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये काय होणार, याबद्दल राष्ट्रीय माध्यमांमध्ये ज्या प्रकारची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे, तशी ती अन्य कोणत्याही राज्याच्या बाबतीत होताना दिसली नाही. महाराष्ट्राच्या निवडणुकांबद्दल देशात इतके उत्सुकतेचे वातावरण का आहे? आणि या राज्यातल्या निवडणुकांमध्ये नेमके काय होण्याची शक्यता आहे? असे प्रश्न साहजिकच निर्माण होत आहेत.
राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत ४१३७ उमेदवार उभे आहेत. २८८ मतदारसंघांमध्ये ९५ लाखांपेक्षा जास्त पोलिंग बूथवर मतदान झाले आहे. या निवडणुकीत नऊ कोटी सत्तर लाख मतदार नोंदले गेले आहेत, त्यामध्ये साडेचार लाख मतदार या महिला आहेत. ४०० पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये अशाप्रकारे एकावेळी मतदान होणे, ही एक अवाढव्य मोठी प्रक्रिया आहे. महाराष्ट्रात लोकसभेचे ४८ मतदारसंघ आहेत. म्हणजेच उत्तर प्रदेशातील ८० मतदारसंघांच्या खालोखाल महाराष्ट्रातील मतदारसंघांची संख्या ही देशात सर्वाधिक आहे. महाराष्ट्राबद्दलच्या उत्सुकतेचे हे एक कारण आहेच. पण या व्यतिरिक्त सुद्धा अनेक कारणे आहेत ज्यामुळे दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि बिहार या राज्यातील लाखो लोकांनाही महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये काय होते, याबद्दल उत्सुकता आहे.
महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या अतिशय प्रगत राज्य असणे आणि आर्थिक उलाढालीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असणे, हा एक भाग झालाच. त्या व्यतिरिक्त या राज्याबद्दल आकर्षणाची भावना असण्याची जी अनेक कारणे आहेत, त्यामध्ये मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असणे, राष्ट्रीय पातळीवरचा शेअर बाजार हा मुंबईमध्ये असणे, मुंबईमध्ये बॉलीवूडचे केंद्र असणे, मुंबई हे मनोरंजन उद्योगाचे देशव्यापी केंद्र असणे, अशा अनेक बाबींचा समावेश आहे. याव्यतिरिक्त काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून अरुणाचलपर्यंत सर्व राज्यातील माणसे मुंबईत येऊन काम करत असल्यामुळे त्या सर्व प्रदेशांमधील त्यांच्या परिवारांना महाराष्ट्रात काय सुरू आहे, मुंबईत काय सुरू आहे, याबद्दल कुतूहलाची भावना असते. या सगळ्यामुळे महाराष्ट्रातील शरद पवार असोत, अजित पवार असोत, उद्धव ठाकरे असोत की, देवेंद्र फडणवीस असोत, हे सगळे राज्यपातळीवरचे नेते असले, तरी त्यांची इमेज राष्ट्रीय स्तरावर पसरलेली आणि पोहोचलेली आहे. ते कसा विचार करतात, काय कृती करतात किंवा त्यांचे राजकारण कसे आहे, ही जाणून घेण्याची इच्छा देशभरातील नागरिकांना असते. या सगळ्यामुळे मुंबईतील निवडणुका किंवा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका याबद्दल देशभर जनमनात कुतूहलाची भावना आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आगामी निकालाबद्दल देशभरातील मीडियामध्ये फारच चर्चा होताना दिसत आहे. मुंबई शहरातील विधानसभेच्या सर्व जागांवर बहुभाषिक उमेदवार उभे आहेत ते त्यामुळेच.
यापूर्वी देशातील कोणत्याही राज्यात नव्हे, इतक्या मोठ्या संख्येने वेगवेगळे पक्ष यावेळच्या मतदानामध्ये उतरलेले आहेत. महाराष्ट्रातल्या दोन प्रादेशिक पक्षांची विभागणी गेल्या दोन-तीन वर्षांत झाली असल्यामुळे मोठ्या पक्षांची संख्या सहा झाली आहे. त्या व्यतिरिक्त इतर चार-पाच लहान पक्ष असल्यामुळे दहा ते १२ पक्ष या वेळच्या विधानसभा निवडणुकीत उतरलेले दिसतात. यामुळे मत विभागणी फार मोठ्या प्रमाणावर होणार असून जिंकणाऱ्या उमेदवारांची विनिंग मार्जिन ही अतिशय कमी असणार आहे. यामुळे आलेली अनिश्चितता हे सुद्धा महाराष्ट्राच्या निवडणुकीबद्दल कुतूहल निर्माण होण्याचे आणखी एक कारण आहे. लोकसभा निवडणुकीत विशिष्ट मतदारसंघांमध्ये काही उमेदवार केवळ काही हजार मतांच्या फरकाने जिंकले किंवा काही ठिकाणी तर अक्षरशः १०० पेक्षा कमी मतांच्या फरकाने सुद्धा जिंकले. मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघाचे उदाहरण यासंदर्भात देता येईल. लोकसभेच्या मोठ्या मतदारसंघांच्या बाबतीत अशी परिस्थिती होती, तर विधानसभेला जिथे मतदारांची संख्या बरीच कमी आहे तिथे जिंकणाऱ्या उमेदवाराचे मार्जिन आणखीनच कमी असणार आणि त्यामुळे अनिश्चितता अधिक वाढणार, ही स्थिती आहे.
लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.