चमत्काराची प्रतीक्षा...

चमत्काराची प्रतीक्षा...

अन्य आमदारांनी ‘दगाबाजी’ केल्याने शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले, असा जाहीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता.

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव करून भारतीय जनता पक्षाचे धनंजय महाडिक विजयी झाल्याने महाविकास आघाडीच्या जिव्हारी तो पराभव लागला होता. काही अपक्ष आणि अन्य आमदारांनी ‘दगाबाजी’ केल्याने शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले, असा जाहीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. तो पराभव लक्षात घेऊन आज होणाऱ्या विधानपरिषदेच्या १० जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. आमचेच सर्व उमेदवार विजयी होणार, असा दावा दोघांकडून करण्यात येत असला तरी त्यासाठी आवश्यक असलेल्या मतांची बेगमी करण्यासाठी धावाधाव सुरु असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आणि भाजपने आपापल्या आमदारांची व्यवस्था मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये केली आहे. महाविकास आघाडीने आपल्या आमदारांसाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये १२० खोल्या राखून ठेवल्या आहेत तर भाजपने आपल्या आमदारांसाठी १०० खोल्या राखून ठेवल्या आहेत. या सर्व आमदारांच्या वास्तव्याचा खर्च संबंधित राजकीय पक्षांकडून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव करण्याचे जोरकस प्रयत्न दोन्ही बाजूंकडून सुरु आहेत. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांची मनधरणी करून त्यांची मते आपल्याकडे वळविण्यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न करण्यात आले आहेत. असे असले तरी हितेंद्र ठाकूर यांनी आतापर्यंत तरी आपले पत्ते उघड केलेले नाहीत. महाविकास आघाडीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, ‘या निवडणुकीत चमत्कार कसा घडेल, हे उभा महाराष्ट्र सोमवारी पाहील’,असे मोठ्या आत्मविश्वासाने म्हटल्याचे लक्षात घेता, राज्यसभा निवडणुकीवेळी जशी मतांची फाटाफूट झाली, तशी होऊ न देण्याची दक्षता महाविकास आघाडीकडून घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. विधानपरिषदेच्या १० जागा आहेत. महाविकास आघाडीला आपले सहाही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास वाटतो. तर भाजपने पाच उमेदवार उभे केले असून आमचे पाचही उमेदवार विजयी होणार, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छातीठोकपणे म्हटले आहे. आजच मतदान असल्याने कोणाचा दावा किती खरा ठरतो, कोण ‘चमत्कार’ घडवून आणतो, याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी तर, महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला राज्यसभा निवडणुकीच्या वेळी हलला होता. आता २० तारखेला म्हणजे आज तो थेट कोसळेल, असा दावा केला आहे. राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी मतदानासंदर्भात जी व्यूहरचना केली होती, त्यामुळे भाजपचे धनंजय महाडिक हे संजय पवार यांचा पराभव करून विजयी झाले होते. या निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव करण्यात भाजप यशस्वी ठरला तर राज्यसभा निवडणुकीप्रमाणे आणखी एक ‘चमत्कार’ भाजप घडवू शकतो; पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही ‘चमत्कार’ घडेल, असे म्हटले आहे. ते लक्षात घेता प्रत्यक्षात कोण ‘चमत्कार’ घडवून आणणार, ते निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आपापला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील; पण काँग्रेसचा दुसरा उमेदवार आवश्यक असलेल्या मतांची जुळवाजुळव कशी करतो, त्यावर त्या उमेदवाराचा विजय अवलंबून आहे. भाजपलाही आपला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची जमवाजमव करावी लागणार आहे. त्यामुळे अपक्ष आणि लहान पक्षांच्या २९ आमदारांवर सर्वांचेच लक्ष आहे. त्यांची मते आपल्या उमेदवारांकडे कोण वळवितो, यावर महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार विजयी होतात की भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतात, ते अवलंबून आहे. दरम्यान, आमदारांवर दबाव आणण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. भाजपचा पाचवा उमेदवार अडचणीत आल्याने हे दबावतंत्र सुरु असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. या संदर्भातील सर्व माहिती आमच्याकडे असून ती योग्यवेळी उघड केली जाईल, असेही पटोले यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी किंवा भाजपला काही ‘चमत्कार’ घडला तरच अपेक्षित जागा मिळणार आहेत. या विधान परिषद निवडणुकांच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र अशा ‘चमत्कारा’ची प्रतीक्षा करीत आहे!

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in