काँग्रेसने जागे व्हावे

दुसरा स्वातंत्र्य लढा लढण्याची वेळ आली आहे आणि काँग्रेस अजूनही ढिम्म आहे. पक्ष संरचनेत तळापासून बदल करण्याची आवश्यकता असताना वरवरचे बदल केले जात आहेत. भाजपच्या पीचवर खेळण्याचे काँग्रेसने थांबवले आणि नवीन संघटन उभारले तरच २०२९ मध्ये त्यांना भाजपसमोर उभे राहता येईल.
काँग्रेसने जागे व्हावे
Published on

-विशेष

-रघुनाथदादा पाटील

दुसरा स्वातंत्र्य लढा लढण्याची वेळ आली आहे आणि काँग्रेस अजूनही ढिम्म आहे. पक्ष संरचनेत तळापासून बदल करण्याची आवश्यकता असताना वरवरचे बदल केले जात आहेत. भाजपच्या पीचवर खेळण्याचे काँग्रेसने थांबवले आणि नवीन संघटन उभारले तरच २०२९ मध्ये त्यांना भाजपसमोर उभे राहता येईल.

लोक भाजपला कंटाळले की सत्ता आपल्याकडे येईल एवढ्या एका गृहितकावर काँग्रेस ढिम्म आहे. संघटन मजबूत करून सक्रिय कार्यकर्त्यांची फौज उभी करण्याबाबत ते अजूनही कमालीचे उदासीन आहेत. सगळी काँग्रेस अगदी तळापासून बदलण्याची आज आवश्यकता आहे. नवीन लोक पक्षाशी जोडून पक्षाचा पूर्णतः नवीन चेहरा निर्माण करावा लागेल. या बदलत्या एआयच्या जमान्यात याच पद्धतीने विचार करू शकतील असे कृतिशील आणि शिक्षित लोक हेरून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवावी लागेल. आज मागे शिल्लक उरलेल्या, अपवाद वगळता बहुतांश बाजारबुणग्यांतून आता पर्याय मिळणे अशक्य आहे, ही बाब कोणत्याही नेत्याच्या लक्षात येत नाही आहे का? किंवा तेही हतबल आणि निराश झालेले आहेत की काय, अशीच शंका येते.

एकटे राहुल गांधी तेवढे नव्या दमाने, धैर्याने उभे राहू पाहत आहेत. मात्र त्यांना हवी तशी साथ इतर कुठल्याही नेत्यांकडून मिळत नाहीए. याउलट गुजरातमधील राज्यस्तरावरील नेत्यांनी भाजपशी संधान साधून पक्षाचे अपरिमित नुकसान केलेले आहे. महाराष्ट्रातही अशोक चव्हाण यांच्यासह कित्येक नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत आणि उरलेले कुठलीही जबाबदारी घ्यायला पुढे येत नाहीत. किंबहुना ते भाजपला पूरक अशीच भूमिका घेत आहेत. संवैधानिक संस्थांची भीती आणि व्यक्तिगत स्वार्थ या बांधावर उभे राहून ते सावध भूमिका घेत आहेत. उद्या पक्ष पुन्हा उभा राहिलाच, तर लाभ घेण्यासाठी मात्र हे नेते आपणच कसे ज्येष्ठ आहोत आणि आपण वाईट काळात कसे पक्षासोबत राहिलो याचेच गाणे गातील. आज या शिल्लक उरलेल्यांना भाजपमध्ये स्थान नाही. म्हणूनच अपवाद वगळता बहुतांश लोक इथे आहेत.

आज काँग्रेसला जमिनीस्तरावर काम करणाऱ्या नेतृत्वाची आणि कार्यकर्त्यांची गरज आहे. प्रत्येक स्तरावर एक साचलेपण आहे. निव्वळ नावालाच असलेल्या गढ्या ढासळल्या आहेत. आपले प्रस्थ कमी होऊ नये म्हणून इतर लोकांना पुढे येऊच द्यायचे नाही या पूर्वापारच्या उद्देशाने पक्षाची वाताहात झाली. ही अशी मंडळी सत्तेतून बाहेर गेली तरीही आपल्याच पक्षातील इतर पात्र लोकांना संधी मिळू नये, त्यांनी पुढे येऊ नये यासाठी सगळी ताकद पणाला लावताना दिसतात.

त्याचवेळी भाजप मात्र सर्व स्तरावर बेफाम दौडत आहे. यदाकदाचित लोक भाजपला कंटाळले तर पक्षाचा कितीही मोठा नेता असो त्याला घरी बसवून, पक्ष संघटनेत पद देऊन चेहरे बदलण्याचे काम भाजप करते. यातून जनतेत पक्षाविषयी एक आशा निर्माण केली जाते. भाजपची ही क्षमता काँग्रेसला अजूनही कळलेली नाही. खरेतर, आज जनतेत प्रचंड रोष आहे. गुन्हेगारी भयंकर वाढलेली आहे. कायदा-सुव्यवस्था डबघाईला आली आहे. महागाई वाढली आहे. बेरोजगारी वाढली आहे. योजना फसल्या आहेत. धार्मिक तेढ वाढत आहे. शिक्षणाचा खर्च वाढला आहे. वीज बिलात प्रचंड वाढ झालेली आहे. जाती-जातीत तेढ निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना सरकार पाठीशी घालत आहे, अशी जनभावना आहे. एवढ्या सर्व मुद्द्यांची आरास हाताशी असताना जमिनीवर एकही आंदोलन नाही. काँग्रेसकडे युवा नेत्यांची कमी आहे. बहुतांश नेते आज वृद्धत्वाकडे झुकलेले आहेत. त्यांच्यात आता पूर्वीसारखी धमक राहिलेली नाही. जेलमध्ये टाकतील या भीतीने गर्भगळीत झालेले हे लोक आता मार्गदर्शक मंडळात पाठवण्याच्या पात्रतेचे झालेले आहेत याची जाणीव राहुल गांधी यांना देखील अजून झालेली नाही. हे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. आज जगातील सर्वाधिक तरुण आपल्या देशात असताना काँग्रेसमध्ये तरुण नेतृत्वाची संख्या समाधानकारक नाहीए. आजही अपवाद वगळता बहुतांश पदाधिकारी निव्वळ पदे घेऊन बसले आहेत, हे न समजणारा नेता देश चालवायला पात्र आहे असे कसे समजावे? असा प्रश्न सामान्य लोक विचारत आहेत.

सत्ताधारी लोक जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करणारे मुद्दे आणतात आणि विरोधी पक्ष त्यांच्या मुद्द्यावर अडखळत बसतात. विरोधकांकडे संख्येने प्रचंड मुद्दे असूनही विरोधक थंड आहेत. याउलट भाजपच्या पीचवर त्यांच्या अजेंड्याला पूरक मुद्दे देऊन भाजप यांना खेळायला भाग पाडते. अशा द्वेषाच्या राजकारणात भाजप जिंकणार याची त्यांना खात्री आहे. काँग्रेससह सर्व विरोधक आज चाचपडत आहेत. त्यांना कबरीला विरोधही करता येत नाही आणि समर्थनही देता येत नाही. म्हणून भाजप अजेंडा सेट करते आणि विरोधक हारण्यासाठी त्या अजेंड्यावर भर देतात. याउलट त्यांच्या अशा मुद्द्यांना पूर्णतः दुर्लक्षित करून राज्याचा होऊ घातलेला बिहार, गुन्ह्याचे वाढते प्रमाण, महिलांची सुरक्षा, वाढलेली महागाई, वाढलेले वीज दर, बेरोजगारी या प्रत्येक मुद्द्यावर मोर्चे काढून गावागावात चर्चा का घडवून आणली जात नाही? विरोधकांकडे आंदोलनाची दिशा ठरवणाऱ्या नेतृत्वाची कमतरता आहे.

राजकारणाचा केंद्रबिंदू आजही सामान्य माणूस आहे. त्याच्यापर्यंत पोहोचणारा नेता त्यांना हवा आहे. असे लोक गावागावात भाजपने आपल्या बाजूने केले, तसे काँग्रेसला का जमले नाही? कारण काँग्रेसच्या प्रस्थापितांनी पक्ष खुंट्याला बांधून केवळ आपले चारदोन बगलबच्चे सांभाळण्यात जनतेचा विश्वास गमावला आहे.

काळ कुणासाठीही थांबत नाही. अँटी इन्कम्बन्सीचा धोका कमी करायला भाजपने कित्येक राज्यात मोठमोठ्या चेहऱ्यांना घरी बसवले. यातून दोन गोष्टी साध्य झाल्या. पहिली जनतेचा रोष काही प्रमाणात कमी झाला आणि दुसरी म्हणजे पक्षापेक्षा कोणताही नेता मोठा नाही हे दाखवून काँग्रेससारखे बोजड नेते तयार करण्याची चूक टाळली.

भाजप एकीकडे सतत बेरजेचे राजकारण करत मताचा टक्का वाढावा म्हणून जीवाचे रान करत आहे, तिथे विरोधक आपल्याच कार्यकर्त्यांना कुठलाही कार्यक्रम देत नाहीत. आज कित्येक तरुण बेरोजगार आहेत. अशा नव्या रक्ताच्या आणि उच्चशिक्षित तरुणांना सोबत घेऊन आंदोलन उभे करता येऊ शकते, पण त्यासाठी प्रचंड इच्छाशक्तीची गरज आहे. आजपासून २०२९ ची तयारी सुरू केली तर काही बदल घडण्याची शक्यता आहे, पण एवढे योगदान देण्याची आणि कष्ट उपसण्याची तयारी कोणाची आहे?

कार्यकर्ता व राजकीय विश्लेषक.

logo
marathi.freepressjournal.in