
भ्रम -विभ्रम
सम्राट हटकर
मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व निर्विवाद असले, तरी पाण्याचा शोध घेण्यासाठी काही जण अजूनही छद्म विज्ञान व भोंदूगिरीचा आधार घेत आहेत. नारळ, धातूच्या सळ्या वापरून पाणी शोधल्याचे दावे केले जातात. पण या पद्धतींमागे शास्त्रीय आधार नसून केवळ हातचलाखीचा खेळ असतो.
माणसाच्या मूलभूत गरजा पैकी पाणी ही अगदी वरच्या क्रमांकाची गरज आहे. मानवी वस्तीचा इतिहास सांगतो की, बाराही महिने पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणीच मानवाने वस्ती केली. भटके भटकंतीमध्ये पाण्याच्या ठिकाणीच मुक्काम करत स्थिरावू लागले. पशुपालन, शेती होऊ लागली. औद्योगीकरणाला सुरुवात झाली, वसाहतींचा विस्तार झाला. पशुपालनाचे, शेतीचे व्यवसायकरण झाल. शेतीचं पाणी कारखान्यांकडे वळवलं गेलं. औद्योगिकीकरण प्रचंड वाढल, त्या प्रमाणात पाण्याचा वापरही वाढला. शहराचे सांडपाणी, कारखान्याचे रसायन मिश्रीत पाणी कोणत्याही प्रक्रिये विना नदी-नाल्यात जाऊ लागले, जात आहे. त्यामुळे नद्यांचे आहे ते पाणी वापरण्यायोग्य राहिले नाही. वरचेवर वाढत असलेल्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. पाण्याचे स्त्रोत मात्र पूर्वी होते तेच आहेत. उलट हळूहळू ते कमी होऊ लागले आहेत. तलाव आटू लागलेत आणि वाहत्या नद्यांचे डबके होत आहेत. जमिनीवरील पाण्याच्या स्रोतांची अशी अवस्था होत असल्यामुळे पाणी टंचाई निर्माण होत आहे. टंचाई दूर करण्यासाठी आपण भूगर्भातील पाण्याकडे वळलो, पण त्याचा शोध घेण्यासाठी आधार घेत आहोत छद्म विज्ञानाचा.
बागायती शेतीला आणि बांधकामाला खूप पाणी लागते. शेतकऱ्यांला जलसंपदा विभागावर व प्लॉट धारकाला स्थानिक पाणीपुरवठा संस्थांवर विसंबून राहणं परवडत नाही. त्यामुळे ते बोअरवेल हा (विंधन विहीर) पर्याय निवडतात. पण बोर नेमका घ्यायचा कुठे? ... आता हा प्रश्न चिंतेचा राहिला नाही. या आधुनिक काळात घर बांधून देणाऱ्या काही आर्किटेक, इंजीनियर, कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे वास्तुशास्त्रींची यादी असते तसी पाणाड्यांचीही असते. त्यातून कोणताही पाणाडी निवडा चॉईस तुमची, असं ते सुचवितात.
भूगर्भातील पाणी (तेल, खनिजे) शोधण्याच्या तंत्राला 'डाऊझिंग' व पाणी शोधणाऱ्या व्यक्तीला 'डाऊझर' म्हणतात.आपल्याकडे काही पायाळू किंवा अलौकिक शक्ती असणारे (जमिनी खालील धन दाखवणारे असतात तसे) व्यक्ती हे काम करतात. हा उघड बुवाबाजीचा प्रकार आहे. सध्या यांना मागणी नाही. भौतिक वस्तूच्या सहाय्याने पाणी शोधण्याच्या पद्धतीत नारळ व धातूंच्या सळ्या वापरणाऱ्यांची चलती आहे. या सळ्यांना 'डाऊझिंग रॉड' म्हणतात. सध्याच्या मार्केटमध्ये लोकप्रिय असलेल्या या दोन पद्धतींची कार्यप्रणाली बघू.
नारळाच्या मदतीने पाणी शोधण्यासाठी पाणी असलेला नारळ वापरतात. ज्या प्लॉटमध्ये किंवा शेतामध्ये पाण्याचा शोध घ्यायचा आहे तेथे त्या नारळची पूजा मांडतात. पूजेनंतर नारळाच्या डोळ्याच्या भागाकडे काही जटा (शेंडी) ठेवून त्याला पूर्ण सोलून घेतात. पाणाडी आपला उजवा तळहात आकाशाकडे व जमिनीला समांतर असा धरतो. शेंडी बोटाच्या दिशेने असेल अशा पद्धतीने तो नारळ तळहातावर ठेवतो आणि प्लॉट/शेतामध्ये पाण्याचा शोध घेत फिरतो. ज्या ठिकाणी नारळ उभा राहिला (जमिनीला समांतर असलेली शेंडी काटकोनात येते) त्या ठिकाणी जमिनीखाली पाणी आहे असं सांगतो.
'डाऊझिंग रॉड' पद्धतीमध्ये सहा मी. मी. व्यासाचे, इंग्रजी 'एल' अकराचे तांब्याचे रॉड वापरतात. यांची मुठीत धरण्याची बाजू सहा इंच व दुसरी बाजू १८ ते २४ इंच लांबची असते. पाणाडी हे दोन रॉड आपल्या दोन्ही मुठीत छातीजवळ, जमिनीला व एकमेकांना समांतर स्थितीत धरतात आणि प्लॉटमध्ये किंवा शेतात पाणी शोधत फिरतात. मुठीत धरलेल्या भागाच्या असाभोवती रॉड गोल फिरू शकतात. ज्या ठिकाणी हे रॉड गोल फिरत एकमेकांना छेदतील त्या ठिकाणी जमिनीखाली पाणी आहे असे सांगतात.
या शिवाय झाडाची फांदी, ओळंबा, अंड, बोळक, वारलं, घाडग, माठ, चलनी नान, या वस्तूंचा देखील वापर होतो. या सर्व पद्धतीचे तत्व एकच आहे. ज्या ठिकाणी वस्तू हलते तिथे जमिनीखाली पाणी असते.
प्रत्येक पाणाडी आपण वापरत असलेली पद्धत योग्य आहे व आपलेच रिझल्ट इतर पद्धतीपेक्षा चांगले असल्याचे सांगतात. काही पाणाडी तर आपण आत्तापर्यंत दाखवलेल्या सर्वच ठिकाणी पाणी लागल्याचा दावा करतात. म्हणजे यशाची १०० टक्के गॅरंटी. आपण दाखवलेल्या पॉईंटला भरपूर पाणी लागल्याचा पुरावा म्हणून कोणत्यातरी ठिकाणचे मशीन बोअर ड्रिलिंग करत असताना निघत असलेल्या पाण्याच्या फवाऱ्याचे फोटो दाखवतात.
पाणी शोधण्याची प्रक्रिया चालू असताना तिथे उपस्थित असलेल्या पैकी कोणी हा प्रयोग करायची इच्छा व्यक्त केली, तर त्याला स्वतःची साधन वापरू देत नाहीत. यासाठी ते कारण देतात त्याची व तुमची जन्मरास, नक्षत्र, तिथी वेगळी आहे. त्यामुळे ती साधन तुम्हाला योग्य प्रतिसाद देणार नाहीत. पाणाड्याने एकदा पाण्याचा पॉईंट दाखवल्यावर त्या ठिकाणी खून करून ठेवली व डोळे बांधून तीच कृती पुन्हा-पुन्हा करण्यास सांगितल्यास पाणाडी तयार होत नाहीत. अनेक पाणाड्यांनी एकाच प्लॉटमध्ये व शेतात वेगवेगळ्या पाणी असल्याचे पॉईंट दाखवले आहेत. जमिनीखाली पाणी शोधण्याची ही पद्धत खरोखरच शास्त्रीय पद्धत असेल, तर त्याची प्रचिती वारंवार व कोणाच्याही हस्ते यायला पाहिजे. परंतु तसे होत नाही. पाणाड्यामध्ये एक समान बाब दिसते ती अशी की, त्यांनी दाखविलेला पॉईंट प्लॉटच्या किंवा शेताच्या मध्यभागी नसतो. एवढी काळजी घ्यावीच लागते, ग्राहक दुसऱ्या दुकानावर जाऊ नये याची खबरदारी म्हणून...
पाणाड्यांनी पॉईंट दाखवलेल्या ठिकाणी हीच साधन इतर वस्तूंच्या आधारे धरली/ठेवली तर हलणार नाहीत. परंतु पाणाड्याच्या हातात असल्यावर हलतात. याचे कारण न्युटन दादाने सांगून ठेवले आहे, जोपर्यंत बाह्यबलाचा वापर होत नाही तोपर्यंत स्थिर वस्तू हलणार नाही. इथे याची प्रचिती येते. पाणाडी हा नारळ तळव्याच्या व बोटांच्या मधील उंचवट्यावर ठेवतो. तळव्याची किंवा बोटांची खाली वर किंवा तिरपी हालचाल न करता (लोकांचे लक्ष इकडे असते), नकळत हात सरळ रेषेत अगदी थोडा मागे पुढे केला की क्षणात नारळ तळव्याच्या उंच भागावरून खोलगट भागात येतो. नारळात असलेल्या पाण्याच्या हेलकाव्यामुळे ही प्रक्रिया जलद गतीने घडते. तळ हाताला समांतर असलेली नारळाची शेंडी काटकोनामध्ये उभी राहते. खरंतर ही शेंडी जागेची खून म्हणून ठेवली असते. पण ती लक्ष वेधून घेते व नारळ फिरला हे दर्शवते.
डाऊझिंग रॉडचीही हालचाल याच पद्धतीची असते. रॉडच पुढचे टोक थोडे उचलले की, रॉड पाहिजे त्या दिशेला फिरवता येतात. ही कृती करताना लोकांचं लक्ष मनगट व मुंठीकडे असतं. पण पाणाडी डाऊझिंग रॉडचे पुढचे टोक खाली-वर करण्यासाठी खांद्याची हालचाल करतो. खांद्यापासून मोठीपर्यंत व तेथून रोडच्या टोकापर्यंत हे अंतर बरेच असल्यामुळे खांद्याच्या थोड्याशा हालचालींची मोठा परिणाम साधता येतो.
खरंतर अनेक पाणाड्यांना पाण्याचे, भूगर्भ रचनेचे आणि संबंधित इतर बाबींचा प्राथमिक ज्ञान सुद्धा नसते. परंतु त्यासंबंधीच्या संज्ञा मात्र अधिकारवाणीने वापरतात. जसे इथे तीन इंची पाणी लागेल, पाच इंची लागेल, चार एच.पी.ची, पाच एच. पी ची मोटर २४ तास चालेल, वीस तास चालेल. तसेच तीन इंची पाणी म्हणजे किती? किंवा किती एच.पी. ची मोटर किती लिटर पाणी किती उंचीवर पोहचवेल याच उत्तर त्यांच्याकडे नसते. त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी बोर ड्राय का गेला याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे असते. ते असे, आम्ही सांगितलेला पॉईंट बरोबर होता. बोअर मारताना मशीनवाल्यांने दोन फूट बाजूला मारला किंवा आम्ही सगळे व्यवस्थित केले, पण तुमच्याच नशिबात पाणी नाही त्याला आम्ही काय करणार?
नारळ किंवा डाऊझिंग रॉड व्यवस्थित हाताळू शकणारी व्यक्ती नदीत/समुद्रात बोटीवर हा प्रयोग करून त्या ठिकाणी खाली पाणी नसल्याचे संकेत देऊ शकतो किंवा फ्लाय ओव्हरवर, २५ माळ्याच्या बिल्डिंगच्या टेरेसवर किंवा १० कि.मी. उंचीवरून आकाशात ९०० कि.मी. प्रती तास वेगाने पुढे सरकणाऱ्या विमानात ही कृती करून खाली भरपूर पाणी असल्याचे संकेत देऊ शकतो.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राज्य कार्यकारी समिती सदस्य