स्वप्नांवर पडले पाणी

अन्य देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था बऱ्या स्थितीत असल्याचा गाजावाजा केला गेला
स्वप्नांवर पडले पाणी

टेस्ला’ ही कंपनी तूर्तास भारतात आपल्या कार उत्पादनाचा कारखाना स्थापन करणार नसल्याचं मुख्याधिकारी एलन मस्क यांनी अलीकडे जाहीर केलं. भारतासाठी हा एक मोठा धक्का आहे. जगभरात इलेक्टि्रक वाहनं निर्माण करणारी ‘टेस्ला’ ही अमेरिकेतली सर्वात मोठी कंपनी आपल्या राज्यात यावी, यासाठी अनेक मुख्यमंत्री आग्रही होते; मात्र आता त्या सगळ्यांच्याच स्वप्नांवर पाणी पडलं आहे.

कोरोनाकाळामध्ये देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली. अन्य देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था बऱ्या स्थितीत असल्याचा गाजावाजा केला गेला असला तरी प्रत्यक्ष स्थिती वेगळी होती, हे तज्ज्ञांनी सांगितलं आणि सर्वसामान्य भारतीयांनी अनुभवलं. एकीकडे सर्वसामान्य माणूस जीव वाचवण्यासाठी धावाधाव करत होता, तर तिकडे अर्थव्यवस्थेचं सुकाणू पेलणारे जीव ती गोत्यात फसणार नाही, याची काळजी घेण्यात शक्ती खर्ची घालत होते. आता त्या दोन वर्षांच्या महाभयंकर काळ्या सावल्यांमधून आपण बाहेर पडत असलो तरी देशामध्ये पुन्हा कोरोनानं ग्रस्त रुग्णसंख्या वाढू लागली. सलग काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे तसंच जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे चिंताग्रस्त स्थिती बळावू लागली आहे. त्यातच वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना मास्क वापरण्याविषयी सूचित केलं असल्यामुळे लवकरच कोरोनाचं संकट समाजाला ग्रासू शकतं, अशी दाट भीती आहे. हे सगळं लक्षात घेता नुकतंच कुठे सावरू लागलेलं उद्योगविश्‍व धास्तावलं असून, अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर येण्याची प्रतीक्षा असताना पावसाच्या ढगांबरोबर या संसर्गाचे आणि पर्यायाने विकासदर वाढीच्या स्वप्नावर पाणी फिरवणारे ढग दाटून आल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शंका सर्वांच्या चिंतेत भर टाकणारी आहे.

प्रथमच उल्लेख केल्याप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्थेला अपेक्षित उभारी मिळू शकलेली नसल्याचं अलीकडेच स्पष्ट झालं आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत ४.१ टक्के एवढाच विकासदर नोंदवण्यात आला असून, त्या आधीच्या तीन तिमाहींच्या तुलनेत हा सर्वात कमी विकासदर आहे. ही आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केल्यामुळे शंका घेण्याचं कारण राहत नाही. खरं पाहता निर्मिती उद्योग, खाणकाम, बांधकाम आणि कृषी क्षेत्राच्या उत्तम कामगिरीमुळे एवढी तरी प्रगती होऊ शकली; परंतु आता आंतरराष्ट्रीय खनिज तेलाच्या किमतीने पिंपामागे १२० डॉलरपर्यंत मजल मारली आहे, तर दुसरीकडे परकीय गुंतवणूकदारांची निरंतर माघार सुरू आहे. परिणामस्वरूप रुपयाने नवा नीचांक गाठला आहे; परंतु या सगळ्यात दिलासादायक बाब म्हणजे एप्रिल २०२२ मध्ये भारतातून ४६ हजार कार्स निर्यात करण्यात आल्या. एप्रिल २०२१मध्ये हा आकडा ४२ हजार युनिट्स इतका होता. भारतात तयार होणाऱ्या काही चारचाकी गाड्या विदेशांमध्ये लोकप्रिय होत असून ही एक दुर्मीळ अशी सुवार्ताच म्हणावी लागेल. ‘किआ सेल्टोस’ या कारची सगळ्यात जास्त निर्यात झाल्याची बातमीही भारतीय कार उद्योगविश्‍वात नवा उत्साह आणि उमेद निर्माण करणारी ठरेल, यात शंका नाही.

एप्रिलमध्ये भारतातून पाच हजारांपेक्षा अधिक गाड्या विदेशामध्ये धाडण्यात आल्या. एप्रिल २०२२ मध्ये मारुती सुझुकीच्या ‘स्विफ्ट’च्या ४,१६५ गाड्यांची तर ‘डिझायर’च्या २,७०० गाड्यांची निर्यात करण्यात आली. त्याचप्रमाणे ‘ह्युंदई सँट्रो’च्या ३,३०० चारचाकींची निर्यात करण्यात आली. अगोदरच्या वर्षांपेक्षा निर्यातीतही भरघोस वाढ झाली असून ती निश्ि‍चतच दिलासादायक बाब आहे. ‘टाटा अल्ट्रोज ऑटोमॅटिक’, ‘अर्टिगा एक्सएल ६’ आणि ‘जीप मेरिडियन’ अशा नवनव्या गाड्या बाजारात आल्या आहेत. इलेक्ट्रिक कार्सबाबत बोलायचं झालं, तर ‘टाटा नेक्सन’ ही सर्वात जास्त विक्री होणारी चारचाकी आहे. अलीकडे तब्बल २५ हजार रुपयांनी महागलेली ही कार आता १४ ते १७ लाखांच्या घरात आहे. या पार्श्वभूमीवर ‘टेस्ला’ ही कंपनी मात्र भारतात आपल्या कार उत्पादनाचा कारखाना तूर्तास स्थापन करणार नसल्याचं ‘टेस्ला’चे मुख्याधिकारी एलन मस्क यांनी जाहीर केलं आहे. हा भारतासाठी एक मोठा धक्का आहे. ‘टेस्ला’ ही जगभरात इलेक्िट्रक वाहनं निर्माण करणारी अमेरिकेतली सर्वात मोठी कंपनी आहे. चारचाकी विकण्याची आणि त्यासंदर्भात सुविधा पुरवण्याची परवानगी मिळाल्याखेरीज आपण भारतात उत्पादन करणार नसल्याचं मस्क यांनी स्पष्ट केलं आहे. ‘तुम्ही चीनमध्ये कारची बांधणी करणार आणि भारतात तिची विक्री करणार, हे आम्हाला मान्य नाही’, असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं होतं. आमच्याकडे सर्व प्रकारचं तंत्रज्ञान उपलब्ध असून विक्रेतेही आहेत आणि कौशल्यंही आहेत, असा भारत सरकारचा युक्तिवाद आहे. टेस्लाचा कारखाना भारतात आला असता तर प्रचंड मोठी गुंतवणूक आपल्याकडे आकर्षित झाली असती. या कारखान्याला लागणारे सुटे भाग आणि अन्य असंख्य घटक भारतातून पुरवले गेले असते. अर्थातच, याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार तयार झाला असता.

गेल्या वर्षी ‘टेस्ला’ने बंगळुरू येथे कार्यालयाची नोंदणीही केली होती. त्यामुळे भारतातला ‘कॉम्पोनंट’ उद्योग सुधारण्याची आणि वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती; मात्र भारतात आयात कर मोठ्या प्रमाणात असल्यामुळेच टेस्ला आणि ऑडीसारख्या कंपन्यांना इथे गुंतवणूक करण्याबाबत पुनर्विचार करावासा वाटला. असं असलं तरी ‘टेस्ला’ने चीनमध्ये नव्हे, तर भारतातच उत्पादन करावं, अशी आपली इच्छा आहे; मात्र आता ‘टेस्ला’ भारताऐवजी इंडोनेशियाचा विचार करत असल्याची बातमी आहे. यासंदर्भात मस्क यांची इंडोनेशियाच्या अध्यक्षांशी भेटही झाली आहे. भारतात ३० लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या आयात चारचाकींवर १०० टक्के आयात कर लागू होतो. ‘टेस्ला’वरही हा कर लागू होतो. त्यामुळे इथे ही गाडी खूपच महाग होते. मस्क यांना केवळ एक बाजारपेठ म्हणून भारताचा विचार करायचा आहे, तर इथे कारनिर्मिती करून पूरक उद्योगांचा विकास करा, असा भारताचा आग्रह आहे. जगाच्या बाजारपेठेत इलेक्िट्रक कार्स पाठवण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून भारताचा विचार करावा, हा भारत सरकारचा हट्ट योग्यच आहे; परंतु बहुराष्ट्रीय कंपन्या नेहमी केवळ आपल्या फायद्याचाच विचार करत असतात. मस्क हे कॅनेडियन अमेरिकन असून ‘टेस्ला मोटर्स’ या विख्यात कंपनीचे संस्थापक आणि मुख्याधिकारी आहेत. ‘स्पेस एक्स’ आणि ‘सोलर सिटी’ या बहुचर्चित कंपन्याही त्यांच्याच.

मस्क यांची आई कॅनेडियन तर वडील दक्षिण आफ्रिकेतील आहेत. त्यांचं लहानपण द. आफ्रिकेतच गेलं. अर्थशास्त्र आणि पदार्थविज्ञान या विषयांतील पदवी संपादन केल्यानंतर १९९५ मध्ये ते कॅलिफॉर्नियात आले आणि ‘झिप२’ ही वेब सॉफ्टवेअर कंपनी स्थापन केली. १९९९मध्ये ‘कॉम्पॅक’ या स्टार्ट अप कंपनीनं ती ३० कोटी डॉलर्सला खरेदी केली. त्याच वर्षी मस्क यांनी ‘एक्स डॉटकॉम’ ही ऑनलाइन बँक स्थापन केली. पुढच्याच वर्षात ही बँक ‘कॉन्फिनिटी’त विलीन झाली आणि त्यातूनच पुढे ‘पेपल’ची स्थापना झाली. २००२ मध्ये ‘ईबे’नं ती दीड अब्ज डॉलर्सला खरेदी केली. २००२मध्येच मस्क यांनी ‘स्पेस एक्स’ ही एरोस्पेस उत्पादन आणि अवकाश वाहतूक सेवा कंपनी स्थापन केली. २००४ मध्ये टेस्ला मोटर्सचे संस्थापक म्हणून त्याचं नाव झालं आणि इलेक्ट्रिक वाहनांचा उत्पादक म्हणून त्यांनी जगाच्या पटलावर आपली नाममुद्रा कोरली.

मस्क यांचं व्यक्तिमत्त्व ठाम आणि आक्रमक आहे. भारतात टेस्लाचं उत्पादन आणण्याबाबत मस्क विचार करत होते. त्यांच्याकडे भारतातून प्रस्तावांचा अक्षरशः पाऊस पडत होता. एवढंच नव्हे, तर महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ‘टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू; तुम्ही या’, असं आमंत्रण दिलं होतं; परंतु भारतात सरकारी पातळीवर अनेक आवाहनांचा सामना करावा लागत असून उत्पादनाच्या प्रारंभाची वेळ सांगू शकत नाही, असं मस्क यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं होतं. त्यांच्या या विधानामुळे केंद्र सरकारचे अधिकारी नाराज झाले होते. ‘टेस्ला’ भारतातल्या उत्पादनासाठी वचनबद्धता जाहीर करत नाही, तोपर्यंत शुल्ककपातीची मागणी करण्याचा तिला अधिकारच नाही, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. ‘टेस्ला’चा प्रकल्प आपल्या राज्यात यावा यासाठी तेलंगण, पंजाब, तामिळनाडू, पश्‍चिम बंगाल आदी राज्यांचे मुख्यमंत्रीही आग्रही होते. आता मात्र या सगळ्यांच्याच स्वप्नांवर पाणी पडलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in