खळ्यात पाणी.. डोळ्यात पाणी

ह्यो पाऊस..वैऱ्यागत झालाय राव. थांबाय तयार नाय. रातदिस नुसती रिप रिप रिप रिप..रानात पाय ठिवाय यीना झालाय
खळ्यात पाणी.. डोळ्यात पाणी

पाऊण एकर मका केलता. मक्राला रान तरार करण्यापासनं मळून पोत्रात घालोस्तर २० हजार खर्च आलार दादा.. लष्करी आळीनं पानं खाऊन रातोरात मका संपवलीवतीच, ती कशीबशी आवशीद मारून वाचीवली. भर पावसात मळणी केली. बाजारात आलोय तर १८ रुपयानं किलू द्या म्हंत्यात..दोन म्हैन्यापाठी मी सोता कोंबड्यास्नी ३४ रुपयानं मका घेतलीवती दादा..आन आता आमच्याकडनं घेताना १८ रुपयानं मागत्यात. जीव देवावा काय काय आता तुमची सांगा..

त्यात ह्यो पाऊस..वैऱ्यागत झालाय राव. थांबाय तयार नाय. रातदिस नुसती रिप रिप रिप रिप..रानात पाय ठिवाय यीना झालाय..गुडघाभर चिखुल नुसता..पिकं वाचवावी तर कशी वाचवावी सांगा की. जरा घरची आन जरा भाईरची जुळणी करुन पेरलं. खतं घातली, भांगाललं, कोळापलं, तवा कुठं हातातोंडाला घास आलता..पर आता समदं चिखलात उभं हाय न काय? काडार आल्राली हाब्रेट, मका, सोराबीन, उडीद, मूग, चवळी पाण्यातच रायली ना दादा. काढायच यीना. कुजून चालली पार. चिखलात उतरुन काढावी म्हंटलं.. ताटाला हात घातला का तर नुसता कुजका पालाच लागतूय हाताला. हिरीत जीव दिल्याल्या माणसागत झाल्यात पिकं. पाऊस म्हणायचा का दुस्मन? दिसरात कुटाना कराय लागलाय नुसता.. पिक काढता रेत नार, काढलं कसंबसं तर वाळवाय रेत नार, वाळवलं तर मळाय रेत नार..भर पावसात आयाबायास्नी कनात धराय लावून काल मका मळून घेतला तर आता इकताना ही येळ आली..कायच लागना झालंय हाताला..

तिकडं द्राक्षाची बाग तर जात्या का काय समजना..पावसानं द्राक्षबागा डाऊनीनं भरल्यात नुसत्या. रात दिस पाऊस. आता बागवर काय छत्री धरुन हूभं रहायचं का? काय करावं आमी सांगा की? पाणी साचून साचून घड पार कुजार लागल्रात. बरं आता आवशीद मारावं तर ते तर काय सुखाचं हाय का? आवशीद मारार बागत जायाला तर याला पायजे. चिखलात टॅक्टर जाग्याव अडकून बसतू. चालतच नार. पायपा लावून आवशीद मारोस्तोवर मारल्रालं आवशीद पाऊस पार धून घालवतूर. दोन दोन चार चार हजार रुपराची आवशीदं पर दोन मिनीटात पावसानं पार चिखलात जमा. डोळ्यातनं पाणी पडाय लागलं दादा..पर दावायचं कुणाला? बाग सोडा..साधं मिरच्या कुतमीर भाज्यापाल्याची पेंडी इकून चार पैसं मिळवावं तर त्याचीबी पार वाट लावली पावसानं.

व्हय दादा? ३६ लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं म्हंत्यात. खरीप तर कुजलाच पार. पंचनामा करु..जाग्याव नुकसान भरपाय देऊ..हे बरंय. पाऊस मागं पंचनामा की पंचनाम्या मागं पाऊस..चालूय आपलं चाक. तवर कापूस भिजून मेला. सोयाबीनची पार माती झाली. बाजरी, भात, भाजीपाला कुजून मातेरं झालं. या परतीच्या पावसानं नुसतं खळ्यात नाय तर आमच्या डोळ्यात बी पाणी भरलंय दादा..पाऊस इतका वाईट कधीपासनं झाला काय मायती?

व्हय दादा? आता तर पार जानीवारीपातूर पाऊस पडल म्हणून सांगत्यात बातम्यात. कसं काय वो? काय करायचं मग? पाऊस असाच रायला तर ऊसाच्या हंगामाचं काय वो हंगामावर लर परिणाम हुणार बगा.. साखर कारखानं उशिरा सुरू झालं तर ऊस काय जात नाय..ते येगळंच टेन्शन हाय डोस्क्याला.

आता नुकसान भरपाय कवा मिळंल? तुमचा काय अंदाज दादा? देणार म्हंत्यात, पर ते काय खरं वाटत नाय. आमच्या गरीबापातूर काय येत बी नाय आन समजत बी नाय. अमक्याच्या शेतात गांजाची चार रोपं हायती म्हून नुसती हुळीव उठवा की..समदी यंत्रणा बांधावर येती का नाय बघा..आन् मंग आताच कुठं गेली दादा यंत्रणाबिंत्रणा? पिकं कुजत बसलीत पाण्यात..पार वाट लागल्या हितं..मंग कुठाय यंत्रणा? आली नाय आमच्या बांधापातूर. आमची जिंदगी कुजाय लागली पिकागत नुसती. ना वैरणीला उपेग ना खायाला. नुसतं नुकसानीला भार.

तुमचं बरंय दादा. पाच आकडी पगारबिगार हाय तुमाला. पर आमी कसं जगावं आता सांगा की. वाटलं पिक आलं का की बाजारात सवदा करुन पोराबाळाच्या हातावर काय तरी ठिवावं. लेक पुण्याला गेल्या शिकायला, तिचा लाखभराचा खर्च हाय वर्साचा. झालंच तर पोराच्या नोकरीची काय तरी जुळवाजुळव करावी म्हणत हूतो. घराची कौलं बदलायची रायलीत दोन चार साल झाली. आबा रोज शिव्या घालत्यात. अंगात दम असंल तर पत्र्याचं घर तरी हुभा करुन दावा म्हणत्यात. बायकू काय बोलत नाय, पर तीच्या डोळ्यात डोळं घालून बघायची हिंमत होत नाय दादा. दोन साल झालं तीला साधं पाताळ घ्याचं झालं नाय मला. जुनीच पातळं शिवून घालती बिचारी. काय सांगावं दादा आता तुमास्नी. दावनीला बैलं हूती ती इकली. हिर खोदायची रायली तरी रायली. पायपलाईन करायची म्हणतूय खालच्या वावरात पर काय जुळणी बसना दादा..दिवाळी आली तोंडाव..काय करायचं समजना. डोकं चालना झालंय दादा..नुसतं रानातनं घरात, घरातनं बाजारात पळत असतूय मी. काल मक्याची पोती इकाय सिटीत गेल्तो तर चेष्टा लावल्यागत बोलाय लागली यापारी मंडळी. अठरा रुपे किलोनं दे..बरं इस रुपयानं दे म्हणाय लागली. डोक्याव पाऊस पडाय लागल्याला. टेंपूत मका भिजाय लागल्याला. काय करावं दादा सांगा की..रडाय या लागलं, पर रडायचं तरी कसं? माणसं काय म्हंत्याल? हूंदका दाबून गप गावाकडं आलो. रानात जाऊन खळ्यात बसलो एकलाच. लय रडलोे..आरडलो..बास कर की लेका म्हणत पावसाला लय बोललो दादा..पर कुणाला काय बी ऐकाय गेलं नाय. वातावरण पार बिघाडलं दादा. भ्या वाटाय लागलंय. राती सपनात रान पाण्यात बुडल्यालं दिसतं. कुणीतरी डोेस्क पाण्यात दाबल्यागत वाटतं. झोप लागत नाय का आन जात नाय. लय वंगाळ दिस चालल्यात दादा..लय वंगाळ..

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in