तलावांमुळे दुष्काळी भागात जलक्रांती

ग्रामीण भागात पाण्याशी संबंधित विविध गरजा पूर्ण करण्यासाठी आणि भूजल पातळी राखण्यासाठी तलाव हा मुख्य आधार ठरतो.
तलावांमुळे दुष्काळी भागात जलक्रांती

-मिलिंद बेंडाळे

पर्यावरण

देशातील बऱ्याच भागात यावर्षी दुष्काळ आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात दुष्काळामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरी आणि ग्रामीण भागात तलावांमुळे पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आणि पाण्याचा निचरा करण्यात हे तलाव मोठी भूमिका पार पाडत असतात. वर्षानुवर्षे दुष्काळाशी सामना करणाऱ्या बुंदेलखंड भागात तर तलावांमुळे जलक्रांती झाली आहे. तो आदर्श समोर ठेवून क्रांती घडवता येऊ शकते.

ग्रामीण भागात पाण्याशी संबंधित विविध गरजा पूर्ण करण्यासाठी आणि भूजल पातळी राखण्यासाठी तलाव हा मुख्य आधार ठरतो. अलीकडच्या काळात विविध कारणांमुळे दुर्लक्षित राहिल्याने अनेक तलावांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी आता प्रयत्न केले जात आहेत. उत्तर प्रदेशमधील बुंदेलखंडमध्ये असे प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत. कारण तलावांनी पाण्याचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लहार ठाकूरपुरा गावात याच नावाचा अंदाजे ८७ एकर तलाव आसपासच्या ग्रामीण भागासाठी एक अभिमानास्पद वारसा आहे. अलीकडच्या काळात जलकुंभ, चिखल, गाळ आदीमुळे त्याचे सौंदर्य आणि उपयुक्तता कमी झाली आहे. अशा परिस्थितीत ‘परमार्थ’ नावाच्या एका संस्थेने तलावाच्या स्वच्छतेसाठी जाहीर सभा घेतली, मोहीम राबवली आणि प्रशासनाशीही संपर्क साधला तेव्हा मोठा पाठिंबा मिळाला. ‘मनरेगा’अंतर्गत तलाव स्वच्छ करण्याची मोहीम अनेक आठवडे सुरू होती. जलकुंभ आणि गाळ साफ करून कालव्याचे पाणी तलावात आणले. त्याभोवती कुंपण उभारून जमीन मोकळी करण्यात आली. त्यातून तलाव अतिशय सुंदर झाला. त्याची पाणी धारण क्षमता वाढली. यानंतर छोटा कालवा खोदून येथील पाण्याच्या सिंचनाची व्यवस्था करावी, असे ग्रामस्थांनी सांगितले. याशिवाय चंदेल राजांच्या काळापासून शंभर एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेल्या मानपूरच्या तलावात एका लहान कालव्याची पारंपरिक व्यवस्था आहे; परंतु तो अतिशय जीर्ण झाला आहे. येथील सेवाभावी संस्थेने या कालव्याच्या काठाच्या दुरुस्तीसाठी विशेष प्रयत्न करून तलावाचीही स्वच्छता करून दिली. त्यामुळे गावकऱ्यांना सिंचनाचा चांगला फायदा होत आहे. लोकांना रोजगाराची नितांत गरज असणाऱ्या काळात बिगरयांत्रिकी माध्यमातून हे काम केले जात होते.

खजरा खुर्द गावातील पुराण तलाव नावाने ओळखल्या जाणाऱ्या तलावाची उपयुक्तता अलीकडच्या काळात स्वच्छतेअभावी कमी झाली होती. सेवाभावी संस्था आणि तिच्याशी संबंधित महिला कार्यकर्त्यांनी तो पुनरुज्जीवित करण्यासाठी एक मोहीम सुरू केली. यानंतर काठाची दुरुस्ती, माती आणि गाळ काढणे, आजूबाजूला झाडे लावणे आदी कामे करण्यात आली. तलावाची पाणी धारण क्षमता वाढल्याने आजूबाजूच्या विहिरींची पाणीपातळीही वाढली. छतरपूर जिल्ह्यातील (मध्य प्रदेश) अंगरौथा गावात महिलांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये १०७ मीटरचा कालवा खोदण्याचे काम सुरू केले. त्यामुळे येथील कोरड्या तलावात पाणी पोहोचू शकेल. त्यांच्या कामाने प्रेरित होऊन इतर लोकांनीही सहकार्य केले. याच जिल्ह्यात गंगा नावाच्या महिलेने मैत्रिणींसोबत एक दुर्लक्षित कोरडा तलाव पुन्हा पाणीदार केला. या तलावाचे नूतनीकरण करणाऱ्‍याचे नुकसान होईल, अशी एक अंधश्रद्धा होती. परंतु गंगा यांनी ही अंधश्रद्धा असल्याचे लोकांना समजावून सांगितले आणि गावाची तहान भागवण्याचे महत्त्व पटवून दिले. या महिलांनी तलावाची स्वच्छता तर केलीच; शिवाय त्यात पाणीही आणले.

देशात बुंदेलखंडसारखे काही भाग आहेत, जिथे पाण्याच्या संतुलनात तलावांची विशेष भूमिका आहे आणि त्यांच्या बांधकाम आणि देखभालीसाठी पारंपरिक तंत्रज्ञान आणि सामाजिक पद्धती या दोन्हींचे उपयोजन केले गेले आहे. त्यांच्याकडून आपण आजही शिकू शकतो. सर्व घरांमध्ये नळ असले, तरी या तलावांचे महत्त्व कायम राहणार आहे. त्यांच्या संवर्धनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यातील साचलेला गाळ आणि माती काढून टाकून पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढवता येईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतासाठी सुपीक गाळ व माती मिळेल. अनेक ठिकाणी भूजल पातळी आधीच खाली गेली आहे. बोअरवेल आदीतील भूजल नळांसाठी वापरण्यात येणार असेल, तर पाण्याचा समतोल राखण्यासाठी तलावांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त पाणी असणे आवश्यक आहे. त्यामुळे तलावांचे संरक्षण आणि पावसाचे पाणी संवर्धनाचे काम अधिक महत्त्वाचे झाले आहे. एक काळ असा होता की, बुंदेलखंड दुष्काळाशी झगडत होता. जलव्यवस्थापन आणि संवर्धनाच्या प्रयत्नांचा मागमूसही नव्हता. दुर्दशेचे प्रतीक म्हणून दुष्काळ हा शब्द बुंदेलखंडशी जोडला गेला. गावागावांमधून स्थलांतराची प्रक्रिया सुरू होती. या पार्श्वभूमीवर संशोधनाचा विद्यार्थी रामबाबू तिवारी भगीरथ बनला. सामूहिक प्रयत्नांनी बुंदेली जमिनीचा गर्भ पाण्याने भरण्याच्या मोहिमेत सामील झाला. काही काळात ७४ तलावांना नवसंजीवनी मिळाली. चौपाल आणि जलयात्रेच्या माध्यमातून तो प्रत्येक गावात पाणीबचतीचा मंत्र देत आहे. जलसंधारणाचा हिरो ठरलेल्या रामबाबूची जलशक्ती मंत्रालयाने ‘वॉटर हिरो’ पुरस्कारानंतर जलप्रहरी पुरस्कारासाठीही निवड केली.

‘तलाव वाचवा’ मोहिमेचे संयोजक आणि उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील बाबेरू तहसीलच्या अधान गावचे रहिवासी असलेले तिवारी तलावांचे सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि आर्थिक महत्त्व परत आणण्यासाठी अनेक वर्षांपासून मोहीम राबवत आहेत. गावापासून सुरू झालेल्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत, तलाव आणि विहिरींच्या संवर्धन मोहिमेने बुंदेलखंडमध्येच नव्हे, तर संपूर्ण देशात ठसा उमटवला आहे. तिवारी यांनी गावोगावी जाऊन पाणी चौपाल, पाणी पंचायत उभारून सामूहिक श्रमदानातून ७४ हून अधिक तलावांचे नूतनीकरण केले आहे. बांदा जिल्ह्यातील आंधव गावात ‘शेताचे पाणी शेतात, गावाचे पाणी गावात’ या अभियानांतर्गत गावातील पावसाचे पाणी अडवण्यासाठी शेतात बंधारे बांधून पावसाचा प्रत्येक थेंब जिरवण्यासाठी त्यांनी शेतकऱ्‍यांसोबत काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ जून २०२१ रोजी ‘मन की बात’ कार्यक्रमात या मोहिमेची प्रशंसा केली. त्यांच्या संशोधनाचा विषयही बुंदेलखंडचा आहे. हा लोकांचा सामाजिक-सांस्कृतिक अभ्यास आहे. जलसंधारण कामासाठी त्यांचा अनेक वेळा सन्मान केला गेला आहे. जलसंवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेले जलयोद्धा रामबाबू तिवारी यांना वॉटर हिरो पुरस्कार, परमार्थ सामाजिक सेवा संस्थेचा जलसेवक पुरस्कार, जल योद्धा पुरस्कार मिळाला आहे. विशाल संकल्प संस्था आणि अरुणोदय संस्था यांच्याकडून त्यांना जलरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे. आता २०२३ च्या जलप्रहरी पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.

बुंदेलखंडला सुरुवातीपासूनच दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. इथे चंदेला काळातील सुमारे पन्नास तलाव आजही अस्तिवात आहेत. जिल्ह्यातील महसुली नोंदीमध्ये ३२९५ तलाव आहेत. तलावांची संस्कृती परत आणण्यासाठी येथे तलाव महोत्सवाचे आयोजन केले जाते. तलावाच्या काठावर मानवी साखळी तयार करून स्थानिक गाणी आणि संगीतासह नाटक आणि नृत्य आदींचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या भागात तीन मोठ्या जलयात्रा काढल्या गेल्या आहेत. यामध्ये बुंदेलखंड भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनाही सहभागी करण्यात आले. कोरड्या बुंदेलखंडमधील जलस्रोतांना नवसंजीवनी देण्यावर सातत्याने भर दिला जात आहे. येथे विविध तलावांच्या बांधकामाबरोबरच नद्यांचेही पुनरुज्जीवन केले जात आहे. आता झाशीतून वाहणाऱ्‍या छेच नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. झाशीच्या गरौठा तहसीलमधून वाहणारी ही नदी सुमारे ३५ किलोमीटर लांब आहे. ‘मनरेगा’अंतर्गत या नदीचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. या नदीचे तीन किलोमीटरचे काम सुरू झाले आहे. छेच नदी बुंदेलखंडमधील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. नदीच्या दोन्ही बाजूंना एकूण २२ गावे वसली आहेत. ही नदी या गावांमधील पाण्याचा मुख्य स्त्रोत होती. कालांतराने नदी लहान होत गेली. आता परिस्थिती अशी आहे की नदीत पाणी थांबत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आता जिल्हा प्रशासनाने ‘मनरेगा’अंतर्गत या नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू केले आहे. या वर्षअखेरीस हे काम पूर्ण होईल.

झाशीचे मुख्य विकास अधिकारी जुनैद अहमद सांगतात, छेच नदी महत्त्वाची आहे. या ३५ किलोमीटर लांबीच्या नदीच्या तीन किलोमीटर लांबीचे काम ‘मनरेगा’अंतर्गत सुरू करण्यात आले आहे. यापूर्वीही या नदीचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. या वर्षाच्या शेवटच्या महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होईल.

logo
marathi.freepressjournal.in