आम्ही कठपुतळी बाहुल्या नव्हे!

समाजाची लय बिघडलेली आहे. नकारात्मकता वाढीस लागली आहे. सामाजिक ध्रुवीकरणामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्त्रियांवरचा हिंसाचार वाढला आहे. जागतिकीकरण आणि नवीन माध्यमे त्यांचे वस्तुकरण करत आहेत. हे बदलायचे असेल तर स्त्रियांनाच परिवर्तनाचे माध्यम व्हावे लागेल. आधुनिक बाजारवादाला कृतिशील आव्हान द्यावे लागेल.
आम्ही कठपुतळी बाहुल्या नव्हे!
फोटो सौ - Pixabay
Published on

- ॲड. वर्षा देशपांडे

भवताल

समाजाची लय बिघडलेली आहे. नकारात्मकता वाढीस लागली आहे. सामाजिक ध्रुवीकरणामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्त्रियांवरचा हिंसाचार वाढला आहे. जागतिकीकरण आणि नवीन माध्यमे त्यांचे वस्तुकरण करत आहेत. हे बदलायचे असेल तर स्त्रियांनाच परिवर्तनाचे माध्यम व्हावे लागेल. आधुनिक बाजारवादाला कृतिशील आव्हान द्यावे लागेल.

सध्याची सामाजिक-राजकीय परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. देशाचे अर्थकारण कोसळले आहे. सामाजिक ध्रुवीकरणाचा परिणाम म्हणून प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाने पाहतोय. पूर्वी आपल्याकडे जे सामूहिक शहाणपण होते, त्याला सुरुंग लागला आहे. सर्वजण नकारात्मक बोलताना दिसत आहेत. नवमाध्यमांनी समाजातले वातावरण प्रचंड प्रमाणात बिघडवून टाकले आहे.

सर्वसामान्यांच्या राज्यकर्त्यांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही.

अशा या आजच्या सामाजिक वास्तवात जगाची अर्धी लोकसंख्या म्हणजे स्त्रिया जगतात आणि या वास्तवाचे, सामाजिक विकृतींचे परिणाम त्यांनाच सर्वाधिक भोगावे लागतात. मुळातच आपल्याकडे पितृसत्ताक पद्धतीमध्ये स्त्रिया दबल्या-पिचल्या अवस्थेत आहेत. त्यावर कॉर्पोरेट संस्कृतीचे कलम झाल्यानंतर स्त्रीचे वस्तुकरण व्हायला वेळ लागत नाही.

खरे तर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातही स्त्रियांना खूप मोठा संघर्ष करावा लागला. प्रत्येक गोष्ट लढून-झगडून मिळवावी लागली. स्त्रियांचा हा संघर्ष आश्वस्त करणारा आहे. अगदी राजकारणातसुद्धा सरपंचपदापासून ते राष्ट्रपतिपदापर्यंत त्या संघर्ष करतच पोहोचल्या. महत्त्वाच्या पदावर बसलेल्या स्त्रीच्या आडून बऱ्याचदा तिचा पती, भाऊ, बाप निर्णय घेतो हे वास्तव आहे. पण जिथे स्त्रीला कामाचे स्वातंत्र्य मिळाले, तिथे तिने चमत्कार घडवून आणलेत, हे विसरून चालणार नाही.

आज आपण पूर्णपणे कॉर्पोरेट क्षेत्राच्या कह्यात गेलो आहोत. भांडवली व्यवस्थेमध्ये स्त्रीचे स्त्रीत्व, हीच तिची ताकद मानली जाते. या व्यवस्थेने लैंगिकतेचा उपयोग एखाद्या शस्त्रासारखा करून घेतला आणि तिचे वस्तुकरण केले. त्यामुळे लैंगिक गुन्हेगारी वाढली. जाती, धर्म, प्रांत, भाषा या आधारावर ध्रुवीकरणासाठी तिचा वापर करून घेतला जातो. 'लव्ह जिहाद' वगैरे भाषा सुरू होते. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचाही राजकीय वापर करून घेतला जातो. स्त्रीला सुरक्षित करण्याची प्रामाणिक भावना आणि इच्छाशक्ती असती तर २०१२ मध्ये दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर आतापर्यंत अत्याचाराच्या घटना कमी व्हायला हव्या होत्या. परंतु महिलांविरुद्धची गुन्हेगारी उलट अधिक वाढली आहे. केवळ अत्याचाराच्याच नव्हे तर सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत कमी झाले आहे. कायद्याचा वचक राहिलेला नाही.

सर्व व्यवस्थेचा खेळखंडोबा करणे, चेष्टेचा विषय बनवून टाकणे हेच फॅसिस्ट व्यवस्थेचे वैशिष्ट्य असते. पानिपतमध्ये घोषित झालेल्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'सारख्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचीही वाईट अवस्था झाली आहे. या प्रकल्पासाठी मंजूर झालेल्या रकमेतील ५३ टक्के निधी केवळ जाहिरातबाजीवर खर्च झाला, असे अधिकृत आकडेवारी सांगते. एवढा खर्च करूनसुद्धा आजही दरवर्षी साडेचार लाख मुली गर्भातून नाहिशा केल्या जातात. याचाच अर्थ पुढील काळात वर्षाकाठी साडेचार लाख मुलांना लग्नासाठी मुली मिळणार नाहीत. हे प्रमाण वाढतच जाणार, कारण निसर्गाची व्यवस्था आपण मोडून काढत आहोत. स्त्री-पुरुषांचे एकास एक प्रमाण राहिले नाही, तर सामूहिक बलात्काराच्या घटना अटळ आहेत. बलात्काराच्या घटनांमागे ‘स्थलांतर’ हेही एक महत्त्वाचे कारण आहे. हैदराबादसह अनेक घटनांमध्ये पकडले गेलेले आरोपी स्थलांतरित असल्याचे दिसून आले आहे. भांडवली व्यवस्था अनेकांना आपल्या कुटुंबापासून सक्तीने दूर राहायला भाग पाडते. त्यांच्या इतर गरजांची दखल अर्थव्यवस्था घेत नाही आणि राजकीय व्यवस्थाही घेत नाही!

स्त्रियांच्या असुरक्षिततेच्या या समस्येवर उतारा म्हणून मग परंपरा, रीतिरिवाज, धार्मिक कर्मकांडं, त्याग वगैरे गोष्टी मोठ्या आवाजात सांगितल्या जातात. सगळ्या परंपरा स्त्रियांच्या माध्यमातूनच जोपासल्या जातात, हे आपल्याकडचे आणखी एक वैशिष्ट्य. पुरुष कुठलेच कर्मकांड, उपासतापास, व्रतवैकल्य करत नाहीत. सगळे स्त्रियांच्या माथी मारले जाते. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकींशी जोडल्या गेलेल्या स्त्रियांच्या हातात मग उरते काय? कोजागरीपासून वटसावित्रीपर्यंत प्रत्येक सणाच्या एकमेकींना शुभेच्छा देणे! यामुळे अधिकाधिक डेटा वापरला जातो आणि इंटरनेट देणाऱ्या कंपन्यांचे उखळ पांढरे होते.

या अराजकावर, केऑसवर आता आम्हा स्त्रियांनाच उपाय शोधावा लागणार आहे. सगळ्या परंपरागत व्यवस्था आणि व्याख्या स्त्रियांना आता मुळापासून बदलून टाकाव्या लागतील. आम्हालाच ठरवावे लागेल की, पुराणकथांमध्ये नको त्या ठिकाणी आम्ही अडकून पडणार नाही. रामाने त्याग केल्यानंतर आपल्या मुलांना त्यांचा हक्क मिळवून देणारी; पण कितीही बोलावलं तरी राजप्रासादात पुन्हा पाऊल न ठेवणारी ‘स्वाभिमानी सीता’ आमची आदर्श असेल. महिलांमध्ये असलेल्या सगळ्या शक्तींचा वापर आजकाल वेगवेगळ्या प्रकारे सामाजिक ध्रुवीकरणासाठी केला जातो, तो आम्ही होऊ देणार नाही, असा निश्चय करावा लागेल. गणेशोत्सवात स्त्रियांची ढोलपथकं किंवा एखाद्या राजकीय पक्षासाठी, संघटनेसाठी नऊवारी नेसून, फेटा बांधून मोटारसायकलवरून फिरणारी स्त्री आमची आदर्श असता कामा नये. कारण तो स्त्रीचा सन्मान नसून, तिला पुन्हा एकदा परंपरेत अडकवण्याचा हुशार प्रयत्न आहे. बहुराष्ट्रीय आणि कॉर्पोरेट कंपन्यांसाठी आम्ही कळसूत्री बाहुल्या बनणार नाही. कॉर्पोरेट शोषण रोखायचे असेल तर आपल्या सर्वांनाच आता जागतिकीकरणाची प्रक्रिया रोखण्याची म्हणजे डी-ग्लोबलायजेशनची गरज भासणार आहे. कारण समाज म्हणून निरोगी आणि एकोप्याने राहायचे असेल, तर आता आपल्याला आपल्या मूळ विचारांकडे परत जावे लागणार आहे. पुन्हा शेतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

या सगळ्या बदलाच्या प्रक्रियेचे माध्यम स्त्रीच असेल. कारण फॅसिस्ट प्रवृत्तींशी रचनात्मक पद्धतींने कसे लढायचे हे स्त्रीला घरापासूनच समजलेले असते. ती घरापासूनच फॅसिस्ट प्रवृत्तींचा मुकाबला करते आणि त्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. व्यवस्थेला आव्हान द्यायचेच आहे; पण तेही रचनात्मक पद्धतीने. परंपरा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगायचाच आहे; पण ज्या माणुसकीशी संबंधित आहेत अशाच गोष्टी इतिहासाकडून घ्यायच्या आहेत! विरोधासाठी विरोध न करता कृतिशील होऊन विरोध मोडून काढायचा आहे. अग्निदिव्यातून जाण्याची तर स्त्रीला सवय आहेच; पण त्यातून मिळणारे तेज आणि स्वाभिमान यातून ती स्वतः प्रबळ होईल आणि समाजालाही बलशाली बनवेल. गुलाम बनवणाऱ्या परंपरांना आणि बाहुली बनवणाऱ्या आधुनिक बाजारवादाला कृतिशील आव्हान देऊन स्त्रीने स्वत्व जपले तर आणि तरच एक सुजाण, संयमी, विवेकी आणि खऱ्या अर्थाने सुसंस्कृत समाज आपण निर्माण करू शकू.

(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या असून लेक लाडकी अभियानच्या संस्थापक आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in