
- दृष्टिक्षेप
- प्रकाश पवार
प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. ही संकल्पना विदेशी नसून ती बुद्ध विचारात आढळते. म्हणून १९४७ साली स्वातंत्र्यानंतर जे प्रजासत्ताक स्थापन झाले, त्याला बाबासाहेब आंबेडकर दुसरे प्रजासत्ताक म्हणतात, तर हिंदुत्ववादी मंडळी २०१४ नंतरच्या राज्यसत्तेला दुसरे प्रजासत्ताक म्हणतात. भारतीय लोकांची सत्ता अबाधित राहायची असेल तर हे वैचारिक राजकारण समजून घेतले पाहिजे.
भारतीय राजकारण संकल्पनांच्या अवतीभोवती घडत असते. संकल्पना राजकारणाला आकार देतात. ही एक प्रक्रिया आहे. परंतु याबरोबरच राजकारण संकल्पनांना गिळंकृत करते. ही दुसरी प्रक्रिया राजकारणात सतत घडत असते. सध्या भारतीय राजकारणात या दोन्हीही प्रक्रिया अतिजलद गतीने घडताना दिसतात. उदाहरणार्थ, आम्ही भारतीय लोक, पहिले प्रजासत्ताक, दुसरे प्रजासत्ताक, तिसरे प्रजासत्ताक असे विवेचन बिनीचे राजकीय नेते करताना दिसतात. हे राजकारण तसे दुर्लक्षित राहिलेले आहे. परंतु हे राजकारण महत्त्वपूर्ण आहे.
आम्ही भारतीय लोक
भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये ‘आम्ही भारतीय लोक’ ही संकल्पना वापरलेली आहे. विशेष म्हणजे राजकारणातील मध्यवर्ती संकल्पना आम्ही भारतीय लोक (we the people of India) ही आहे. सर्व भारतीय नागरिकांचे राजकारण ‘आम्ही भारतीय लोक’ या संकल्पनेच्या अवतीभोवती फिरते. ही गोष्ट समकालीन राजकारणाच्या माध्यमातून समजून घेतली पाहिजे. कारण ब्रिटिश राजकारण आणि भारतीय राजकारण या दोन राजकारणांमधील मूलभूत फरक ‘आम्ही भारतीय लोक’ या संकल्पनेमुळे झाला आहे. यामुळे ‘आम्ही भारतीय लोक’ ही संकल्पना मुळापासून समजून घ्यावी लागते. या संकल्पनेची कथा चित्तवेधक आहे. ‘आम्ही भारतीय लोक’ ही संकल्पना प्रजासत्ताक स्वरूपाची आहे. कारण १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले ते ब्रिटिशांच्या कायद्याने. ब्रिटनच्या पार्लमेंटने भारताला स्वातंत्र्य दिले. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये पास झाला. त्या पार्लमेंटचा अंतिम स्रोत राजेशाही हा होता. आजही आहे. म्हणजेच राजेशाही लोकांना अधिकार देते. याचाच दुसरा अर्थ राजेशाहीने सत्तांतर केले असा अर्थ घेतला जातो. म्हणजेच इथे राजेशाही पितृसत्तेच्या रूपात आहे. राजेशाही ही पिता आणि जनता म्हणजे लेकरे अशी पितृसत्ताक स्वरूपाची रचना आणि व्यवस्था ब्रिटनच्या पार्लमेंटने निर्माण केली होती. ही संकल्पना ‘आम्ही भारतीय लोक’ या संकल्पनेमध्ये सामील झाली नाही. ही एक भारतीय राज्यघटनाकारांनी घडवलेली क्रांती आहे. या गोष्टीचे आत्मभान प्रत्येक राजकारण घडवणाऱ्या व्यक्तीला आणि प्रत्येक नागरिकाला असतेच असे नाही. परंतु हा अर्थ नीटनेटका समजून घेतला पाहिजे.
१९४७ मध्ये ब्रिटनच्या क्राऊन-इन-पार्लमेंटमध्ये (crown in parliament) भारतीय स्वातंत्र्य कायदा लागू करून भारताला औपचारिकपणे स्वातंत्र्य देण्यात आले. भारताला स्वातंत्र्य देण्याचा कार्यकारी निर्णय कॅबिनेट मिशन प्लॅन (१९४६) मध्ये आधीच घेण्यात आला होता. कॅबिनेट मिशन प्लॅन अंतर्गतच संविधान सभेची संकल्पना करण्यात आली होती आणि भारतासाठी नवीन संविधान तयार करण्याचे अधिकार त्यांच्यावर सोपवण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्य कायद्याच्या कलम ८ मध्ये या प्रक्रियेला कायदेशीर मान्यता देण्यात आली होती. कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये अशी कल्पना करण्यात आली होती, की नवीन संविधान मंजुरीसाठी क्राऊन-इन-पार्लमेंटसमोर ठेवण्यात येईल. संविधान सभेने तयार केलेल्या नवीन संविधानाला भारताच्या गव्हर्नर जनरलची संमती मिळणे आवश्यक आहे, जे ब्रिटिश राजघराण्याच्या नावाने अशा कायद्याला संमती देतील. परंतु भारतीय संविधानकारांनी संविधान मंजुरीच्या राजकीय प्रक्रियेतून वरील पाचही गोष्टी हद्दपार केल्या. यामुळेच क्रांतिकारी घटना घडून आली. ती घटना म्हणजे राजाने सत्तांतर केले नाही, तर लोकांनी स्वतःच सत्तांतर केले आहे.
ही क्रांती करण्यासाठी घटनाकारांनी ब्रिटिशांच्या स्वातंत्र्य कायद्याचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले. त्यांनी संविधानाच्या अंमलबजावणीत प्रक्रियात्मक स्वरूपाच्या महत्त्वाच्या दोन बाबी सामील केल्या. या दोन बाबींमध्ये ‘आम्ही भारतीय लोक’ ही संकल्पना मध्यवर्ती ठेवली होती. ही घटनाकारांची दूरदृष्टी होती. अ) त्यांनी कॅबिनेट मिशन योजनेत नमूद केल्याप्रमाणे ब्रिटिश संसदेची किंवा भारतीय स्वातंत्र्य कायदा (१९४७) मध्ये नमूद केल्याप्रमाणे गव्हर्नर-जनरलची मंजुरी संविधानासाठी घेतली नाही. यामुळे राजाची (राजेशाहीची) प्रत्यक्षपणे या संविधानाला संमती घेतली नाही. ब) भारतीय संविधानाच्या कलम ३९५ ने भारतीय स्वातंत्र्य कायदा रद्द केला. असे काही करण्याचा अधिकार संविधान सभेला नव्हता. तरीही घटनाकारांनी या प्रकारची राजकीय प्रक्रिया घडवली. यामुळे भारतीय संविधानातील लोक आणि ब्रिटनचा राजा यांच्यामध्ये पितृसत्ताक नातेसंबंध अस्तित्वात आले नाहीत. हा देखील एक क्रांतिकारी बदल होता.
घटनाकारांनी संविधान लागू करण्यासाठी त्यांना अधिमान्यता देणाऱ्या स्रोताचे केवळ खंडन केले नाही, तर त्याही पुढे जाऊन प्रतीकात्मक गोष्टींचे देखील खंडन केले. भारतीय स्वातंत्र्याला संसदेच्या शाही राजघराण्याकडून मिळालेले अनुदान नाकारले. यामुळे संवैधानिक वैधतेचे धागेदोरे संसदेमार्फत राजघराण्यापर्यंत पोहोचले नाहीत. उलट राजाने भारतीय लोकांना सत्ता आणि अधिकार दिले हा संबंधच घटनाकारांनी जोडू दिला नाही. या प्रक्रियेमुळेच ‘आम्ही भारतीय लोक’ पूर्णपणे स्वायत्त राहिले. शिवाय भारतीय लोकांनीच भारतीय लोकांना सत्ता आणि अधिकार दिले. भारताच्या राज्यघटनेची सर्वोच्च सत्ता आणि अधिकार जनतेकडूनच आले आहेत, हा अर्थ अधोरेखित झाला. अशा प्रकारे पूर्णपणे ‘प्रजासत्ताक’ ही संकल्पना अस्तित्वात आली. थोडक्यात संविधानकर्त्यांनी दूरदृष्टीने राजेशाहीशी असलेले संबंध तोडून टाकले व लोकांशी असणारे संबंध जोडले. यामुळे भारतीय राज्यघटना ‘आम्ही भारतीय लोक’ हा शब्दप्रयोग प्रजासत्ताक, सार्वभौम, गणराज्य या अर्थाने वापरत असते. या पद्धतीचे राजकारण आजकाल घडत नाही.
पहिले प्रजासत्ताक
भारतीय राजकारणाला प्रजासत्ताक हा नवीन अर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्राप्त करून दिला होता. भारतात बुद्धाच्या काळात प्रजासत्ताक भावना (संकल्पना) अस्तित्वात होती. ही जाणीव आंबेडकरांनी विकसित केली. त्यास आंबेडकरांच्या युक्तिवादाप्रमाणे पहिले प्रजासत्ताक म्हटले पाहिजे. परंतु प्रजासत्ताकाच्या भावनेचा हळूहळू ऱ्हास होत गेला. प्रजासत्ताकाच्या भावनेचा ऱ्हास ब्राह्मण्यवाद या विचारसरणीने केला होता, हा युक्तिवाद महात्मा फुले यांनी केला होता. या युक्तिवादाचे नव्याने विश्लेषण डॉ आंबेडकरांनी केले. डॉ. आंबेडकर यांनी बुद्ध विचार आणि पहिले प्रजासत्ताक यांच्यातील सहसंबंधांचे एक चर्चाविश्व विकसित केले. दुसऱ्या प्रजासत्ताकाने पहिल्या प्रजासत्ताकापासून (बुद्ध विचार) प्रेरणा घेतली होती.
दुसरे प्रजासत्ताक
डॉ. आंबेडकरांच्या युक्तिवादाप्रमाणे प्राचीन काळात प्रजासत्ताक होते. याचा अर्थ भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात स्वीकारलेले प्रजासत्ताक हे ‘दुसरे प्रजासत्ताक’ होते. दुसऱ्या प्रजासत्ताकाचा संबंध पहिल्या प्रजासत्ताकाशी आंबेडकरांनी जोडला होता. विशेषतः त्यांनी प्रजासत्ताकाच्या भावनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आम्ही ‘प्रजासत्ताक’ ही संकल्पना सुचविली. यामुळे ‘आम्ही भारतीय लोक’ या शब्दाचा अर्थ ‘प्रजेची सत्ता’ हा व्यक्त झाला. सर्व लोकांची सत्ता या अर्थाने प्रजासत्ताक हे स्पिरिट निर्माण केले पाहिजे, असा त्यांचा युक्तिवाद होता. आजच्या राजकारणात नेमकी हीच भावना दुबळी झाली आहे. ‘आम्ही भारतीय लोक’ या शब्दाचा अर्थ राजकीय प्रक्रियेमध्ये ‘प्रजासत्ता’ असा घेतला पाहिजे. परंतु राजकीय प्रक्रियेमध्ये हा अर्थ व्यक्त होत नाही. कारण सत्ता प्रजेची असण्याऐवजी सत्ता अर्थकारणाची आहे, असा अलिखित नियम घडला आहे.
खासगीकरण या प्रक्रियेने प्रजासत्ताकाची भावना आणि सार्वजनिक राजकारणाची भावना कमी केली आहे. यामुळे कृतिशील लोकसहभाग कमी झाला आहे.
निवडणुका आणि पैसे यांचे संबंध जोडले गेले आहेत. निवडणुकीमध्ये खर्चाचे प्रमाण वाढले आहे. निवडणूक खर्चाला आळा घालण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. यामुळे ‘प्रजासत्ता’ ही भावना दुबळी होत जाते. मतदारसंघातील किंवा मतदारसंघाच्या अवतीभोवतीचे दादा, भाई, मामा, अण्णा इत्यादींचे संबंध निवडणुकीशी जोडले गेले आहेत. सत्ता कोणाची? याचे आजकालचे उत्तर सत्ता दादाची, सत्ता भाईची, सत्ता मामाची, सत्ता अण्णाची असेच आहे. यामध्ये पितृसत्ताक रचना उदयाला येते. प्रजासत्ताक राजकारण मात्र पितृसत्ताक भावनेचा अंत घडवते. घटनाकारांनी पितृसत्ताक राजकारणाच्या ऐवजी प्रजासत्ताक राजकारणाचा पुरस्कार केला होता.
तिसरे प्रजासत्ताक
प्राचीन काळी बुद्धाच्या विचारात प्रजासत्ताक भावना होती. हे पहिले प्रजासत्ताक होते. महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या प्रयत्नातून दुसऱ्या प्रजासत्ताकाची भावना विकसित झाली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अनेकांनी दुसऱ्या प्रजासत्ताकाचा आग्रह धरला. प्रजासत्तेचे राजकारण घडावे हा विचार भारतीय राज्यघटनेने विकसित केला. या प्रकारच्या राजकारणाची प्रक्रिया १९४७ पासून जवळपास वीस वर्षे घडत गेली. परंतु नंतर प्रजासत्ताक राजकारणाचा अर्थ हळूहळू कमीत कमी होत गेला. जवळपास गेल्या ५५ वर्षांत प्रजासत्ताक स्वरूपातील राजकारणाचा अर्थ कमी कमी होत गेला आहे. यामुळे आज-काल प्रजासत्ताक ही भावना फार दुबळी झालेली दिसते. या प्रक्रियेची सत्तरीच्या दशकापासूनची काही उदाहरणे बोलकी आहेत. इंदिरा गांधी यांनी केलेल्या आणीबाणीच्या प्रयोगामुळे प्रजासत्तेची भावना दुबळी झाली.
खासगीकरणाचा प्रयोग ऐंशीच्या दशकापासून सुरू झाला. नव्वदच्या दशकामध्ये त्याला गती आली. या प्रयोगामुळे प्रजेच्या हाती सत्ता आहे, प्रजा ही सत्तेचे उगमस्थान आहे, प्रजेचे सत्तेवर नियंत्रण असते, या भावनांचा लोप झाला आहे.
खासगीकरणाबरोबर जागतिकीकरण आणि उदारीकरण या दोन प्रक्रियांमुळे देखील प्रजासत्तेची भावना लोप पावली आहे. यामुळे नवीन प्रजासत्ताकाच्या भावनेचा विकास झाला पाहिजे, अशी मागणी राजकारणात पुढे येत आहे. ‘रिईन्व्हेंटिंग इंडियन डेमोक्रसी: अ व्हिजन फॉर सेकंड रिपब्लिक’ या पुस्तकामध्ये भारतीय राजकीय व्यवस्थेत सुधारणा करण्याचा विचार मांडलेला आहे. उदाहरणार्थ, राजकारणातील निवृत्तीचे वय इत्यादी. योगेंद्र यादव यांनी सरनाम्यामधील प्रजासत्ताकाला ‘प्रथम प्रजासत्ताक’ म्हटले आहे. त्यांनी ‘दुसरे प्रजासत्ताक’ घडवण्याची प्रक्रिया सुचवली आहे, तर २०१४ पासून नवीन भारत या अर्थाने दुसरे प्रजासत्ताक अशी संकल्पना हिंदुत्ववादी चौकटीत देखील मांडली जाते. या संकल्पनेला पर्याय म्हणून योगेंद्र यादवांनी दुसरे प्रजासत्ताक अद्याप घडवावयाचे आहे, असा विचार मांडला आहे. म्हणजेच ‘दुसरे प्रजासत्ताक’ ही संकल्पना हिंदुत्ववादी चौकटीत आणि पर्यायी चौकटीत वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण घडवत आहे. बुद्धाच्या विचारातील प्रजासत्ताक हे पहिले प्रजासत्ताक होते. त्यामुळे हिंदुत्वादी चौकट आणि योगेंद्र यादव हे दुसऱ्या प्रजासत्ताकबद्दल नव्हे, तर तिसऱ्या प्रजासत्ताकाची चर्चा करत आहेत. शासकीय पातळीवर दुसरे प्रजासत्ताक घोषित झालेले नाही. तसेच तिसरे प्रजासत्ताक देखील घोषित झालेले नाही. शासकीय पातळीवर २६ जानेवारी १९५० रोजीचे प्रजासत्ताकच ‘पहिले प्रजासत्ताक’ मानले जाते.
राजकारण संकल्पनांना गिळंकृत करते आहे. राजकारण प्रजासत्ताकाला गोंधळात टाकते आहे. यामुळे एकूण प्रजासत्ताक ही संकल्पना एका बाजूने सकारात्मक स्वरूपात पहिले प्रजासत्ताक (बुद्ध विचारातील), दुसरे प्रजासत्ताक (१९४७) आणि तिसरे प्रजासत्ताक (समकालीन चर्चा विश्व) असा एक प्रवाह विकसित करत आहे. तर दुसऱ्या बाजूने प्रजासत्ताक या संकल्पनेलाच नवीन वळण देण्याचा प्रयत्न भाजप आणि हिंदुत्व विचारसरणी करत आहे. ते ‘दुसरे प्रजासत्ताक’ या प्रकारचा विचार मांडत आहेत. २०२४ च्या निवडणुकीतील विजयानंतर भाजप समर्थक लेखक मिलन वैष्णव यांनी ‘भारताच्या दुसऱ्या प्रजासत्ताकाचा उदय’ हे पुस्तक लिहिले आहे (The rise of India’s second republic). त्यांनी दुसऱ्या प्रजासत्ताकाचे राजकीय चर्चा विश्व विकसित केले आहे. परंतु बुद्ध विचार, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय राज्यघटनाकरांना अपेक्षित असणारे प्रजासत्ताक आणि मिलन वैष्णव यांना अपेक्षित असणारे प्रजासत्ताक वेगवेगळे आहे. बुद्ध विचार, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनाकारांना अपेक्षित असणाऱ्या प्रजासत्ताकाचे चर्चाविश्व जुने आहे. परंतु नवीन संदर्भात या चर्चाविश्वाची चर्चा घडली पाहिजे.
हे वैचारिक पातळीवरील राजकारण आहे. या गोष्टीच्या आत्मभानाला नुकतीच सुरुवात झाली आहे. म्हणजेच समकालात ‘आम्ही भारतीय लोक’ या प्रकारच्या राजकारणाला स्थान मिळाले पाहिजे, हा विचार प्रवाही होत आहे.
राज्यशास्त्राचे अध्यापक आणि अभ्यासक