हवे आहे जनआंदोलन

घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या महानगरांमधील नागरिकांचा प्रवास दिवसेंदिवस जिकरीचा झालाय. वाहतूककोंडीमुळे तर मुंबईकर पुरते हैराण झाले आहेत. गर्दीच्या वेळेतला प्रवास जीवघेणा झाला असून याचाच गैरफायदा खासगी बसेस, रिक्षा, टॅक्सीचालक घेतात. वाहतूक पोलीस आणि परिवहन खात्याचा अर्थपूर्ण कानाडोळा या वाहनचालकांना सर्वसामान्यांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करण्यास प्रोत्साहन देणारा ठरतोय.
हवे आहे जनआंदोलन
Published on

आपले महानगर

तेजस वाघमारे

घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या महानगरांमधील नागरिकांचा प्रवास दिवसेंदिवस जिकरीचा झालाय. वाहतूककोंडीमुळे तर मुंबईकर पुरते हैराण झाले आहेत. गर्दीच्या वेळेतला प्रवास जीवघेणा झाला असून याचाच गैरफायदा खासगी बसेस, रिक्षा, टॅक्सीचालक घेतात. वाहतूक पोलीस आणि परिवहन खात्याचा अर्थपूर्ण कानाडोळा या वाहनचालकांना सर्वसामान्यांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करण्यास प्रोत्साहन देणारा ठरतोय. राजरोसपणे सुरू असलेल्या या मनमानी भाडेवसुलीला रोखण्यासाठी आता जनआंदोलनाचीच आवश्यकता आहे.

विकसित वाहतूक व्यवस्था सामाजिक, आर्थिक विकासासाठी साह्यभूत ठरते, असे मानले जाते. परंतु देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर विविध कोंडीमध्ये सापडले असून या शहराचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. नाविन्यपूर्ण शोध आणि तंत्रज्ञानामुळे राज्यात वाहतूक सेवेत आमूलाग्र बदल होत आहेत. साध्या वाहनांची जागा वातानुकूलित वाहनांनी घेतली आहे. मोटारसायकल, रिक्षा, टॅक्सी अशी ॲप आधारित वाहने प्रवासी सेवेत आहेत. त्यासोबतच लोकल रेल्वे, बस अशा सार्वजनिक वाहतुकीवर लाखो प्रवासी अवलंबून आहेत. रेल्वे, बेस्ट, एसटीसारख्या परिवहन सेवेचे खासगीकरण झाले नसल्याने प्रवाशांना निश्चित भाडेदरात प्रवास करता येतो. याउलट अव्वाच्या सव्वा भाडे वुसलीचा कटु अनुभव ॲप आधारित वाहने, रिक्षा आणि टॅक्सीने दैनंदिन प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाला घ्यावा लागत आहे.

घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या महानगरांमधील नागरिकांचा प्रवास दिवसेंदिवस जिकरीचा झाला आहे. वाहतूककोंडीमुळे मुंबईकर पुरते हैराण झाले आहेत. विविध पायाभूत सेवा विकास प्रकल्प पूर्ण केल्यानंतरही इथल्या नागरिकांच्या हालअपेष्टा कमी झालेल्या नाहीत. अलोट गर्दीने लोकल रेल्वे, बेस्ट बस धावत आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा अपुरी ठरत आहे. शहरांचा विस्तार वेगाने होत असताना सार्वजनिक वाहतूक सेवा त्या प्रमाणात विकसित झालेली नाही. यामुळे शहरी बसमधून गर्दीच्या वेळी प्रवास करणे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे. याचाच फायदा खासगी वाहनचालक उठवू लागले आहेत. प्रवाशांच्या बिकट परिस्थितीचा फायदा उठवत रिक्षा, टॅक्सीचालकांकडून मन मानेल तसे भाडे वसूल करण्याचे प्रकार राजरोसपणे घडत आहेत.

मुंबईत १.२५ कोटींपेक्षा अधिक लोकवस्ती आहे. मुंबई महानगर क्षेत्राची लोकसंख्या २.३ कोटींपेक्षा अधिक आहे. संयुक्त राष्ट्राने २०५० पर्यंत मुंबईची लोकसंख्या ४.२४ कोटी होईल, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे मुंबई हे जगातील सर्वाधिक गजबजलेले शहर ठरणार आहे. लोकसंख्येचा विस्फोट लक्षात घेऊन मुंबई महानगर क्षेत्रात राज्य सरकारकडून मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. या सेवांचा नागरिकांना खरेच फायदा होईल का, हे येणारा काळच ठरवेल. परंतु सद्यस्थितीत मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपैकी मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय लोकल ट्रेनमधून दररोज सुमारे ७० ते ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबईची रक्तवाहिनी असलेल्या बेस्ट बसमधून दररोज सुमारे ३२ लाख प्रवासी प्रवास करतात. या सेवांवर लोकसंख्येचा प्रचंड ताण आल्याने मेट्रो, टॅक्सी, रिक्षा व इतर खासगी वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे.

राज्यातील महानगरांवर प्रचंड ताण आल्याने उपनगरीय लोकल, बससेवा अपुऱ्या ठरू लागल्या आहेत. या सेवा काही कारणांमुळे ठप्प झाल्यास मुंबई प्रदेशातील रिक्षा, टॅक्सीचालक प्रवाशांची लयलूट करतात. केवळ अडचणीच्या काळातच नव्हे, तर शहरातील आणि उपनगरातील काही ठिकाणी दररोज राजरोसपणे सामान्य मुंबईकरांकडून मनमानी भाडे वसुली केली जात आहे. यावर नियंत्रण मिळविण्यात परिवहन विभाग पूर्णतः अपयशी ठरला आहे. परिवहन विभाग, वाहतूक पोलीस सर्वत्र असले तरी त्यांच्याच सहमतीने हे प्रकार सुरू असल्याची कुजबूज नागरिकांमध्ये ऐकायला येते. हप्ता संस्कृती घट्ट रुजल्याने रिक्षा, टॅक्सीचालक बिनदिक्कतपणे प्रवाशांकडून हवे ते भाडे वसूल करत आहेत. मीटरने ६० ते १०० रुपये भाडे होणाऱ्या ठिकाणी रिक्षा-टॅक्सीचालक ३०० ते ६०० असे भाडे आकारत आहेत. शेअर रिक्षा, टॅक्सीचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करत मनमानी भाडे घेत आहेत. कार्यालयाच्या वेळेत पोहचण्यासाठी मुंबईकर सर्वकाही निमूटपणे सहन करत आला दिवस ढकलत आहेत. पोलीस, परिवहन विभागाने डोळेझाक केल्याने बेकायदेशीर गोष्टींबद्दल बोलणाऱ्या प्रवाशांना मारहाणीला सामोरे जावे लागते.

मुंबईत दादर पूर्व रेल्वे स्थानक, अंधेरी पूर्व रेल्वे स्थानक, सायन स्थानक, मुंबई सेंट्रल अशा प्रमुख स्थानकांजवळ उभे राहणारे अनेक टॅक्सीचालक विना मीटर गाडी चालवतात. १०० रुपयांपर्यंत होणाऱ्या प्रवासासाठी प्रवाशांकडून ५०० किंवा त्याहून अधिक रुपये घेण्यात येतात. हे सर्व यंत्रणांच्या समोर घडत असताना हतबल नागरिक प्रवासाच्या अडचणीमुळे बेकायदेशीर रिक्षा, टॅक्सीचालकांचे बळी ठरत आहेत. पोलीस, परिवहन अधिकारी बेकायदा भाडे आकारणाऱ्यांकडे दुर्लक्ष का करतात, हे सर्व नागरिक जाणतात. बेकायदा भाडे आकारणाऱ्यांविरोधात तक्रारी करण्याचे आवाहन यंत्रणा करते, पण नेमकी कुठे तक्रार करायची, याची माहितीच नसल्याने अनेक जण वाद घालत आपला रस्ता धरतात.

मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे जिल्हा, रायगड जिल्ह्यातील शहरांमध्ये तर मीटर रिक्षा शोधून भेटणार नाही. शेअर किंवा बोली लावून प्रवाशांना भाडे द्यावे लागते. हे प्रकार कोणी पोलीस, परिवहन अधिकारी थांबवू शकलेला नाही. मात्र नियमांची अंमलबजावणी व्हावी, अशीही या अधिकाऱ्यांची इच्छा दिसते. नियमाने चालणाऱ्या वाहनचालकांना व्यवस्थेच्या त्रासाला सामोरे जावे लागते, तर नियम धाब्यावर बसविणाऱ्या रिक्षा, टॅक्सीवाल्यांकडे लक्ष देण्यास पोलीस, परिवहन अधिकाऱ्यांना वेळ नसतो. हे चित्र सर्वत्र पाहण्यास मिळत आहे.

पुण्यातही सर्वत्र बोली लावून भाडे ठरविण्यात येते. गरजू, अडचणीत सापडलेला माणूस त्यामधून घासाघीस करून खिशाला कात्री लावत प्रवास करतो. रिक्षा, टॅक्सी वसुलीचे मोठे अर्थकारण असल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी कधीच सोडून दिली आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडून असे प्रश्न सुटतील अशी भाबडी अपेक्षा नागरिकांनी करण्यात आता काही हशील नाही. याउलट आता जनआंदोलन हाच एकमेव पर्याय नागरिकांसमोर आहे. महानगरांमधील जनतेने ठरवले तरच बेकायदा भाडे वसुलीला चाप बसू शकतो.

tejaswaghmare25@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in